रविवार, 31 अगस्त 2008

इन्सपेक्टर प्रदीप शर्माचा ‘एन्काउंटर’; पोलिस सेवेतून बडतर्फ

मुंबई, ३१ ऑगस्ट-मुंबईतल्या गुन्हेगारी टोळ्यांमध्ये एकेकाळी प्रचंड दरारा असलेले एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलिस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना शनिवारी पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे। ११२ गुंडांना चकमकीत ठार करणारे शर्मा यांच्यावर कुख्यात ‘ डी ’ कंपनीला मदत करणे तसेच हजारो कोटीची बेहिशीबी मालमत्ता ठेवण्याचे गंभीर आरोप होते.
यासंबंधात शर्मा यांची पोलिस विभागातर्फे खातेनिहाय चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत शर्मा दोषी आढळल्यानं कलम ३११ अंतर्गत त्यांना पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचं वृत्त आहे.
१९८३ साली महाराष्ट्र पोलिस दलात सामिल झालेले शर्मा अंमली पदार्थ विरोधी पथकात असताना पहिल्यांदा प्रकाशझोतात आले होते. मुंबई पोलिस दलातील विविध विभागांमध्ये त्यांनी उपनिरीक्षक आणि निरीक्षक म्हणून काम केले आहे. मुंबई पोलिसांचे खंडणी विरोधी पथक, गुन्हे अन्वेषण विभागातही त्यांनी काम केले होते. शिवाय मुंबईतल्या डी.एन. नगर पोलिस ठाण्यातही ते काही काळ कार्यरत होते.
प्रदीप शर्मा यांची अमरावती येथे बदली करण्यात आली होती. मात्र तिथला कार्यभार त्यांनी स्वीकारला नव्हता. त्यानंतर आजारपणाचे कारण दाखवून त्यांनी मुंबईत परत बदली करवून घेतली होती. शर्मा यांना काही काळ सेवेतून निलंबित करण्यात आले होते.
मुंबई पोलिस दलात असताना प्रदीप शर्मा यांनी काही कुख्यात गुन्हेगारांना मदत केली असल्याचा गंभार आरोप कुख्यात गुंड छोटा राजनने न्यूज चॅनलशी बोलताना केला होता. शिवाय शर्मा यांनी एक हजार कोटी रूपयांची बेहिशेबी मालमत्ता साठवल्याचा आरोपही करण्यात आला होता.
यापूर्वी बेहिशेबी मालमत्ता ठेवल्याच्या आरोपातून मुंबई पोलिस दलातील इन्सपेक्टर दया नायक यांना पोलिस दलातून काढून टाकण्यात आले होते.

नाशिक जिल्ह्यात वीज कोसळून ५ महिला जखमी

नाशिक, ३१ अगस्त- चांदवड तालुक्‍यातील शिंडे येथे वीज पडून पाच महिला जखमी झाल्या आहेत. येथील तुकाराम मंदिराच्या आडोस्याला या महिला उभ्या असताना वीज कोसळली. रविवारी दुपारी ही घटना घडली.
गंभीर जखमी झालेल्या एका महिलेला नाशिकच्या रूग्णालयात तर अन्य ४ महिलांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे।
जखमी महिलांची नावे अशी, राधाबाई बाजीराव बरडे, सुनिता मनोहर गोधडे, कमल रंगनाथ शिंदे, कल्याबाई नारायण पवार आणि अंजनाबाई राजाराम गोधडे.

विदर्भात दोन दिवसांत ९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

नागपूर, ३१ ऑगस्ट - विदर्भात गेल्या दोन दिवसांत नऊ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहीती विदर्भ जन आंदोलन समितीने रविवारी येथे दिली.
यामध्ये यवतमाळमध्ये तीन, बुलढाणा आणि चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येकी दोन, तर अमरावती आणि नागपूरात प्रत्येकी एका शेतकऱ्यांने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली.
यवतमाळमधील दोन शेतकऱ्यांनी तसेच नागपूरातील व चंद्रपूर जिल्ह्यातील एक अशा चौघा शेतकऱ्यांनी शनिवारी बैल पोळा सणादिवशीच आपली जीवनयात्रा संपवली.

पूरग्रस्‍तांसाठी मदतीचे हात सरसावले

नवी दिल्ली, ३१ ऑगस्ट-बिहारमध्‍ये कोसी नदीला आलेल्‍या महापुरामुळे मोठ्या अडचणींचा सामना करीत असलेल्‍या नागरिकांच्‍या मदतीसाठी देशभरातून मदतीचे हात सरसावले आहेत. नेते, अभिनेते, लष्‍करासह खेळाडूंनीही पूरग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी सर्वतोपरी मदत करण्‍यास सुरूवात केली आहे. लष्‍कराच्‍या पश्चिम विभागातील जवानांना मदतकाया्रसाठी मुंबईहून बिहारला रवाना करण्‍यात आले आहे.
रेल्‍वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी रेल्‍वेच्‍या अधिका-यांना पूरग्रस्‍तांना रेल्‍वेच्‍या प्रवास भाड्यात सूट देण्‍याचे आदेश दिले आहेत. या सोबतच बिहारच्‍या रेल्‍वे स्टेशनांवर त्‍यांना फूड पॅकेट्सही उपलब्‍ध करून देण्‍यात आले आहेत.
महाराष्ट्र सरकारनेही मदत जाहीर केली असून मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या कामासाठी २५ कोटी रुपयांची घोषणा केली आहे. तर हरियाणा सरकारने ५ कोटी देण्‍याचे आश्‍वासन दिले आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी भाजपची सत्‍ता असलेल्‍या राज्‍यातील मुख्यमंत्र्यांना पूरग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी पुढे येण्‍याचे आवाहन केले आहे. तर भाजपने स्‍वतः त्‍यासाठी निधी उभारण्‍याचे प्रयत्‍न सुरू केले आहेत.
ऑलम्पिक पदक विजेता ‍अभिनव बिंद्रा आणि अभिनेता सुनील शेट्टी यांनीही पूरग्रस्‍तांसाठी मदतीची घोषणा केली आहे. बिंद्राने पूरग्रस्‍तांसाठी ५ लाख रुपये देण्‍याची घोषणा केली आहे. तर सुनील शेट्‍टी याने लोकांना बिहारच्‍या मदतीसाठी धावून जाण्‍याचे आवाहन केले आहे.
पतंजलि योग पीठातर्फे पूरग्रस्‍तांसाठी दोन कोटी रुपयांचे औषधे आणि अन्‍नधान्‍य देण्‍याची घोषणा करण्‍यात आली आहे.

टी. चंदशेखर घेणार राजकारणाची सनद?

मुंबई, ३१ ऑगस्ट-महाराष्ट्राच्या प्रशासनात धडाडीचे सनदी अधिकारी म्हणून ओळखले जाणारे टी. चंदशेखर हे प्रशासकीय सेवेचा राजीनामा देऊन आंध्र प्रदेशच्या राजकारणात सक्रिय होणार असल्याचे कळते. तेलगू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार चिरंजीवी याच्या 'प्रजा राज्यम्' या पक्षातून ते आपली नवी कारकीर्द सुरू करतील, अशी चिन्हे आहेत.
ठाणे, नागपूर व मुंबईत एमएमआरडीएचे आयुक्त म्हणून धडाकेबाज विकासकामे करून चंदशेखर यांनी स्वत:चा ठसा उमटविला. राजकीय नेत्यांच्या 'गुडबुक'मध्येही त्यांनी स्थान मिळविले. परंतु म्हाडाचे उपाध्यक्ष असताना त्यांचे खासदार गुरूदास कामत यांच्याशी मतभेद झाले. तेव्हा त्यांनी थेट आपल्या सनदी सेवेचा राजीनामा मुख्यमंत्र्याकडे दिला. परंतु तो मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला नव्हता. त्यानंतर ते सहा महिन्यांच्या सुट्टीवर गेले असून त्यांचा सध्या आंध्र प्रदेशमध्ये मुक्काम आहे. चंदशेखर यांचा राजीनामा लवकरच मंजूर होऊन ते राजकारणात उडी घेतील. सहा-सात महिन्यांत लोकसभेबरोबर आंध्र विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। त्यापूवीर् ते राजकारणात प्रवेश करतील हे नक्की.
१९८७ च्या आयएएस बॅचचे असलेले टी. चंदशेखर हे परदेशात गेले असल्याची चर्चा आयएएस अधिकाऱ्यांमध्ये होती. ते पुन्हा प्रशासकीय सेवेत परतणार नसल्याचेही बोलले जात होते. मात्र गेले काही महिने ते आंध्र प्रदेशमध्ये दौरे करत आहेत. नव्या पक्षाच्या स्थापनेमागे त्यांचाच 'ब्रेन' असल्याचे बोलले जाते. आपली राजकीय महत्त्वाकांक्षा त्यांनी काही दिवसांपूवीर् जवळच्या मित्रांकडे बोलून दाखवली होती. आंध्रमधील राजकीय नेत्यांशी त्यांचा निकटचा संबध आहे. दिवंगत माजी पंतप्रधान नरसिंहराव यांच्या कुुटुंबाशीही त्यांचे चांगले संबध आहेत.

शनिवार, 30 अगस्त 2008

भटक्या कुत्र्यांचा वाद पूर्णपीठाकडे

मुंबई, ३० ऑगस्ट- भटक्या कुत्र्यांना ठार मारावे की त्यांचे निर्बिजीकरण करून त्यांना निवा-यात सोडून देण्यात यावे, याबद्दल मुंबई हायकोर्टाच्या दोन खंडपीठांमध्ये मतभेद झाल्याने ते तीन न्यायमूर्तीच्या पूर्णपीठापुढे सुनावणीला गेले असून त्याची नियमित सुनावणी पुढच्या शुक्रवारपासून सुरू होणार आहे.
या प्रकरणी मुंबई हायकोर्टाचे तत्कालिन मुख्य न्या. एम. बी. शहा यांच्या खंडपीठाने कुत्रे मारण्यास मनाई करणारा निर्णय दिला होता. तर गोवा खंडपीठाचे न्या. पाटणकर यांच्या खंडपीठाने कुत्रे मारण्याच्या बाजूने निकाल दिला आहे. आता यावर न्या. एस. राधाकृष्णन, न्या. दिलीप भोसले व न्या. विजया कापसे-ताहिलरमानी यांचे खंडपीठ दर शुक्रवारी सुनावणी घेईल.

शुक्रवार, 29 अगस्त 2008

जुन्या पिढीतील गायिका लीला नायडू यांचे पुण्यात निधन

पुणे, २९ ऑगस्ट- जुन्या जमान्यातील प्रसिद्ध गायिका लीला नायडू (वय ८६; पूर्वाश्रमीच्या लीला पाठक) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.
ज्येष्ठ भावगीत गायक गजाननराव वाटवे यांच्याबरोबर त्यांनी गायलेले "हवास मज तू हवास सखया' हे "दहा वाजता' या "प्रभात'च्या चित्रपटातील गीत आजही रसिकांच्या मनात घर करून आहे.
प्रभात आणि नवयुग फिल्म कंपनीच्या "गोकूळ' "किती हसाल' "नवरदेव' या चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्‍वगायन केले होते. "संगीत सौभद्र' या नाटकात त्यांनी केलेल्या कृष्णाच्या भूमिकेचे आचार्य अत्रे यांनी कौतुक केले होते.

जयश्री गडकरी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

मुंबई, २९ ऑगस्ट- ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री गडकर यांच्या पार्थिवावर आज दुपारी दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी सिने तसेच नाट्य सृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
जयश्रीताईंच्या हाजी अली येथील निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. तत्पूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्यासह अनेकांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. ज्येष्ठ नाट्यनिर्माते मोहन वाघ , लता नार्वेकर , आशा काळे , प्रकाश भेंडे व उमा भेंडे , दिग्दर्शक शशिकांत देशपांडे यांचा त्यात समावेश होता. दुपारी तीन वाजता अंत्ययात्रा शिवाजी पार्कला पोहोचली. तेथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जावडेकरांच्या मद्यपानावर 'प्रकाश'

मुंबई, २९ ऑगस्ट- जगाला नैतिकतेचे डोस पाजणार्‍या भारतीय जनता पक्षाचे एकेक नेते नवनवीन वादात अडकत आहे. ताजा वाद आहे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार प्रकाश जावडेकर यांच्यासंदर्भातला.
इंदूरमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेल्या जावडेकरांची मद्याचे चषक हातात घेताना व चीअर्स करतानाची छायाचित्रे स्थानिक वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केल्याने भाजप चांगलाच अडचणीत आला आहे.
त्यांच्या या छायाचित्रांवरून सध्या मध्य प्रदेशातील राजकारण चांगलेच तापले असून, कॉग्रेसनेही जावडेकरांविरोधात टीकेची झोड उडवली आहे. मंगळवारी जावडेकर इंदूरमध्ये एका खाजगी कार्यक्रमासाठी आले होते, कार्यक्रम आटोपून ते हॉटेलमध्ये परतल्यावर तेथे शॅंपेन पार्टी झाली. यात शॅंपेनची बाटली उघडतानाचा फोटो येथील वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आला आहे. सुरुवातीला हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु आता हे प्रकरण चांगलेच पेटले आहे.
यापूर्वी, भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस संजय जोशी हेही एका सेक्स कॅंडलच्या सीडी प्रकरणात अडकले होते. तर दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांचा उत्तराधिकारी म्हणून ज्याचे नाव घेतले जात होते, ते त्यांचे पुत्र राहुल महाजनही अमली पदार्थ सेवन करताना आढळून आल्याने भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा उघड झाल्याची टीका प्रदेश कॉग्रेस प्रवक्ते मानक अग्रवाल यांनी केली आहे.

"नॅनो' प्रकल्पाचे कामकाज ठप्प

नवी दिल्ली, २९ ऑगस्ट- तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी "टाटा मोटर्स'च्या सिंगूर प्रकल्पाकडे जाण्याचा रस्ता अडवला आहे. त्यामुळे येथील कामकाज ठप्प झाले आहे, असे "टाटा'च्या प्रवक्‍त्यांनी सांगितले आहे.
ममता बॅनर्जींच्या समर्थकांनी "नॅनो'कडे जाणाऱ्या रस्त्यावर झोपून येणाऱ्या कामगारांना कंपनीत प्रवेश करु दिला नाही.
हिंसाचाराच्या भीतीने येथील कर्मचाऱ्यांनीही कंपनीच्या आवारात येणे टाळले.
या प्रकल्पासाठी घेतलेल्या जमीनीपैकी चारशे एकर जमीन शेतकऱ्यांना परत करावी, अशी मागणी तृणमूल कॉंग्रेसने केली. ही जमीन शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने घेतली गेली आहे, असे तृणमूल कॉंग्रेसचे मत आहे.
रतन टाटा मात्र अशी कोणतीही तडजोड करण्यास तयार नाहीत. किंबहुना कामात अशा प्रकारचे अडथळे येत असतील आणि हिंसाचार सुरुच राहणार असेल तर आपण हा प्रकल्प दुसरीकडे हलवू, असा इशारा रतन टाटा यांनी दिला आहे.

चारित्र्यहीन स्त्रीवर बलात्कार हा गुन्हाच

नवी दिल्ली, २९ ऑगस्ट- अनेकांशी संबंध असलेल्या महिलेवर शारीरिक संबंध कोणालाही लादता येणार नाहीत आणि तशी मुभाही कायद्याने कोणाला दिलेली नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावले.
बलात्काराच्या खटल्यात निर्दोष सोडलेल्या दोन आरोपींच्या खटल्याबाबत न्या. अरिजित पसायत आणि मुकुंदकम शर्मा यांनी हा निकाल दिला.
सतरा वर्षांच्या एका मुलीवर बलात्कार केल्याबद्दल मुन्शी आणि अन्य एका आरोपीला स्थानिक न्यायालयाने दोषी ठरविले होते. त्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केले. ती मुलगी कुमारिका नव्हती, या मुद्द्यावर न्यायालयाने आरोपींची सुटका केली होती. त्यावर सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. मुलगी कुमारिका नाही याचा अर्थ तिच्यावर कोणीही बलात्कार करावा असा नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. उच्च न्यायालयाने पुन्हा हा खटला चालविण्याचा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिला.

गुरुवार, 28 अगस्त 2008

मनसेची गुंडगिरी खपवून घेणार नाही

मुंबई, २९ ऑगस्ट-शिवसेना व मनसे यांनी मराठीचे श्रेय लाटण्यासाठी मुंबईकरांना वेठीस धरू नये। ते खपवून घेतले जाणार नाही. मोडतोड, गुंडगिरी करणे हा कायदा राबवणा-यांचा मार्ग असू शकत नाही. जबरदस्तीने बोर्ड तोडणा-यांना पोलिस चोख उतर देतील, असे सांगत मुंबईत मनसेच्या ११३५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितले.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास पोलिस दल सक्षम आहे. त्यासाठी गुरुवार दुपारी चार वाजेपर्यंत मनसेच्या ११३५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. त्यात प्रत्यक्षात ७२८ जणांना ताब्यात घेण्यात आले. दोघांना तडीपार केले असून, १४९ जणांना वॉर्निंग नोटीस देण्यात आली आहे, याकडेही आर. आर. पाटील यांनी लक्ष वेधले.

सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र विक्रीस काढला - नितिन गडकरी

जळगाव, २९ ऑगस्ट- - राज्यात वीज भारनियमनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. तब्बल पंधरा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. अशी परिस्थितीत असतानाही राज्यातील मंत्री त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
सध्या त्यांच्यात जमीन विक्रीसाठी स्पर्धा सुरू आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या या सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र विक्रीस काढला आहे. असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी केला.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी ते गुरुवारी जळगाव आले होते। हॉटेल रॉयल पॅलेस येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर, जिल्हाध्यक्ष आमदार गिरीश महाजन, प्रदेश सरचिटणीस सुनील बढे, डॉ. राजेंद्र फडके, सुनील नेवे, आमदार अरुण पाटील उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, की सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्यांनी जळगाव येथील सभेत सत्ता मिळाल्यास शहराचा कायापालट करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले आहे। परंतु याच मंत्र्यांनी गेल्या आठ वर्षात सत्ता असतानाही महाराष्ट्राचा कोणताही कायापालट केला नाही. त्यामुळे त्यांच्या या आश्‍वासनावर जनतेने विश्‍वास ठेवू नये. राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती ढासळली आहे. बॉम्बस्फोट होत आहे दर तीन तासांनी एक खून होत आहे. तर राज्यात शेतीची परिस्थिती अत्यंत खराब आहे.
केंद्रातील सरकारनेही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. महापालिकेतील गैरव्यवहार प्रकरणी जाहीर झालेल्या सोनी समितीच्या अहवालाबाबत बोलताना ते म्हणाले, की समितीच्या शिफारशी शासनाने स्वीकारल्या आहेत. त्यामुळे विधिमंडळात त्यावर चर्चेची गरज नाही. त्यामुळे आता केवळ कारवाईच आवश्‍यक आहे. शासनाने तातडीने कारवाई करावी याचा पाठपुरावा आपण करणार आहोत असेही त्यांनी सांगितले. महापालिकेत भाजप सत्तेवर आल्यास नागपूर प्रमाणेच येथेही विकास करण्यात येईल असे आश्‍वासनही गडकरी यांनी दिले.

फोर्ब्सच्या यादीत मायावतींचे नाव

न्यूयॉर्क, २८ ऑगस्ट- जगातील शंभर शक्तिशाली महिलांच्या यादीत बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांचाही समावेश करण्यात आला आहे.
अमेरिकन मासिक फोर्ब्सने ही यादी नुकतीच जाहीर केली आहे, यात कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा पूर्वीपासूनच समावेश आहे।
गेल्यावर्षीच्या मानाने सोनियांचा क्रम यात घसरला असून, सहाव्या स्थानावरून त्या २१ स्थानापर्यंत घसरल्या आहेत. तर दुसरीकडे मायावतींना या यादीत स्थान मिळाले असून त्या ५९ व्या जागेवर आहेत. इंदिरा नुई यांच्या क्रमवारीत वाढ झाली असून त्या तिसऱ्या स्थानावर पोहचल्या आहेत.
बायोटेक्नॉलॉजी कंपनी बायोटेकच्या प्रमुख किरण मुजूमदार यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे। त्या ९९ व्या स्थानावर आहेत.
सोनिया गांधी या जरी देशातील सर्वात शक्तिशाली पक्षाच्या प्रमुख असल्या तरी मायावती यांनी त्यांना आव्हान देण्यास सुरू केल्याचे फोर्ब्सने नमूद केले आहे.

राज शेवटच्या क्षणी फुस्स...

मुंबई, २८ ऑगस्ट-२८ ऑगस्टनंतर इंग्रजी पाट्या लावणा-या दुकानांवर ‘ आपल्या स्टाइल ’ मधे आंदोलन करणाची भाषा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे माघार घेतली आहे. अनेकांनी पाट्या तयार करायला दिल्या असल्याचं कारण त्यांनी सांगितलंय.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मराठी पाटी आंदोलनाने व्यापा-यांना दिलेली २८ ऑगस्टची तारीख आता अवघ्या एका दिवसावर आली आहे. असे असताना राज्य सरकार आणि महापालिकेने कारवाईचे आश्वासन देण्यात आल्याने आपण कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. मराठी पाट्या न लावणा-या दुकानांवर कारवाई करावी अशी मागणी राज ठाकरे यांनी मनसेचे मुख्यालय असलेल्या ' राजगड ' येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली.
मुंबईतील अनेक भागात २८ ऑगस्टच्या डेड लाइन दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात मराठी पाट्या लागल्या आहेत. तसेच अनेकांनी मराठी पाट्या करायला टाकल्या आहेत. त्या पाट्या येईपर्यंत आंदोलन मागे घेतले आहे. तसेच दुकानादारांनी मराठीत पाट्या लावाव्यात , या संदर्भात महापालिका आदेश काढून कारवाई करणार आहे. त्यामुळे आता काही दिवस आंदोलन न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण ही कायम स्वरूपाची शांतता नाही. कशी कारवाई होत आहे. यावर आमची बारीक नजर आहे , असेही राज यांनी सांगितले.
राज्यात कायद्याची अमंलबजावणी होत नसेल तर हे सरकारचे अपयश आहे. नागपूरमध्ये महिलांनी गुंडाला ठार मारले. त्यांनी कायदा हाता घेतला , पण त्यांनी कायदा हातात का घेतला याच्या मागचं कारण लक्षात घेतले पाहिजे. सरकारचं जनतेवर कायदा हातात घेण्याची वेळ येवू देते. सरकारने योग्यवेळी योग्य कारवाई केल्यास असे प्रकार घडणार नाही. कायदा हातात घेता म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना अटक करतात. त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करतात. मूळात कायदे तोडतं कोण आणि हा कायदा आहे हे सांगायला जाणा-यावरच कारवाई का केली जाते , असा सवालही त्यांनी यावेळी केला.

दीड मिनिटात घर साफ करणारी टोळी अटकेत

मुंबई, २८ ऑगस्ट - "टाटा स्काय' डिश लावण्यासाठी आल्याचा बहाणा करून केवळ दीड मिनिटात घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी पकडण्यात शिवाजी पार्क पोलिसांना यश आले आहे. यातील एक तरुण पुण्याचा आहे. या टोळीने मुंबई, पुणे, गुजरात, बंगळूर, कर्नाटकात उच्चभ्रू वस्ती निवडून चोऱ्या केल्याचे उघड झाले आहे.
नीलेश चौगुले (पुणे) आणि संतोष मांजरेकर व अबीबुल्ला खान (दोघेही रा. मुंबई) हे काल सायंकाळी दादरच्या गोखले रोड येथील सखाराम कृपा इमारतीच्या गच्चीवर चढले. त्या वेळी येथील रहिवाशांनी त्यांना हटकले. आपण टाटा स्काय डिश तपासणीसाठी आलो आहोत, असे त्यांनी सांगितले; पण तरीही संशय आल्याने त्यांच्याकडे ओळखपत्र मागितले. ओळखपत्र गाडीत असल्याचे सांगून त्यांनी निसटण्याचा प्रयत्न केला; मात्र नागरिकांनी पकडून त्यांना पोलिसांच्या हवाली केले.
विशेष म्हणजे हे तिघेही चांगले कपडे, टाय लावून यायचे. त्यामुळे कोणालाच संशय येत नव्हता. उच्चभ्रू वस्ती निवडायची. अगोदरच कोणत्या घरात माणसे नाहीत, हे हेरायचे आणि त्या घरात शिरायचे आणि अवघ्या दीड मिनिटात घर साफ करायचे कौशल्य त्यांच्याकडे होते.

वीस तासांच्या प्रयत्नांनंतर दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू, २८ ऑगस्ट-जम्मूतील बंदतालाब भागातील एका घरात घुसून नऊ जणांना बंधक बनवणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा भारतीय लष्कराने तब्बल वीस तासांच्या अथक प्रयत्नांनंतर खात्मा केला.
या वीस तासांच्या संघर्षात दहशतवाद्यांनी तीन पुरुष बंधकांची मात्र नाहक हत्या केली. बंधक बनवण्यात आलेल्यांमध्ये एक महिला आणि चार मुलांचाही समावेश होता. या साऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली असली तरी महिलेला गंभीर दुखापत झाल्याने येथील लष्करी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असल्याचे लष्करी प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.
काल पहाटे साडे सहा दरम्यान एका रिक्षा चालकाची हत्या करत या भागात दहशतवादी घुसले होते. दहशतवाद्यांची माहिती मिळताच या भागाला लष्कराने वेढा घातला. दहशतवाद्यांना मारण्याचे आदेश जवानांना मिळाल्यानंतर त्यांनी अत्यंत संयम दाखवत आधी या भागातील अनेक रहिवाशांना सुखरूप इतरत्र हालवले.
यानंतर दहशतवाद्यांना घेरण्यात आले. दहशतवाद्यांनी जबरदस्त गोळीबार केल्यानंतर त्याला भारतीय लष्कराने चोख प्रत्योत्तर दिले. दुपारी पहिला दहशतवादी ठार झाल्यानंतर जवानांनी या भागाला आणखी वेढा वाढवला. संध्याकाळी मात्र दोन्ही दहशतवादी मारले गेले.
तीन दहशतवादी मारल्या गेल्याची खात्री पटल्यानंतर रात्री उशिरा लष्कराने बंधक बनवण्यात आलेल्या चार मुलांसह एका महिलेची घरातून सुटका केली. दहशतवाद्यांकडे एके-४७ रायफलसह अनेक शस्त्रास्त्र आढळून आले.

महापौर, आमदारांच्या खासगी वाहनांचा 'प्रोटोकॉल' रद्द

मुंबई, २८ ऑगस्ट- मुंबईतील वाहतूक नियंत्रण पोलिसांकडून महापौर, शेरीफ, आमदार, हायकोर्ट न्यायमूर्ती आदी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या खासगी वाहनांसाठी देण्यात येणाऱ्या प्रोटोकॉल स्टिकरच्या आदेशाला कायद्याचा कोणताही आधार नसल्याचे स्पष्ट करून ती प्रथा बंद करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने बुधवारी राज्य सरकारला दिले.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त जे. एफ. रिबेलो यांनी हायकोर्टाचे मुख्य न्यायमूतीर् स्वतंत्रकुमार यांना पत्र लिहून या प्रकारकडे लक्ष वेधले होते. कोर्टाने या पत्राचे जनहित याचिकेत रूपांतर केले. न्या. जे. एन. पटेल व न्या. के. के. तातेड यांच्या खंडपीठापुढे त्याची सुनावणी झाली.
मुंबईचे महापौर, शेरिफ, आमदार, सचिव आदी व्यक्तींना त्यांच्या खासगी वाहनांवर लावण्यासाठी प्रोटोकॉल स्टिकर देण्याची प्रथा १९७९पासून सुरू आहे। तसेच २००५मध्ये राज्य सरकारने आदेश काढून त्याला नियमित केले होते. मुंबईतच ही प्रथा असून वाहतूक नियंत्रण विभागाच्या सहपोलिस आयुक्तांकडून हे स्टिकर देण्यात येतात. मात्र त्यांचा गैरवापर होत असल्याचे आढळून आले आहे. तुमच्या या स्टिकर देण्याच्या आदेशाला कोणत्या कायद्याचा आधार आहे, असा सवाल यावेळी न्या. पटेल यांनी सरकारी वकील प्रदीप पाटील यांना केला असता तसा कोणताही आधार नसल्याचे त्यांनी मान्य केले. त्यामुळे कोर्टाने २००५चा आदेशच बेकायदा ठरवून तो रद्द केला.

बुधवार, 27 अगस्त 2008

विद्या देशमुख हत्या प्रकरणी महबूब खानला फाशी

औरंगाबाद, २७ ऑगस्ट- बहुचर्चित विद्या देशमुख खून प्रकरणी परभणी येथील न्यायालयाने मुख्य आरोपी महबूब खानला फाशीची शिक्षा सुनावली. २००३ मध्ये परभणी येथील भाग्यनगर भागात ही घटना घडली होती.
१६ वर्षीय विद्यावर चाकूने हल्ला करत महबूब खान आणि त्याच्या साथीदाराने तिचा खून केला होता.
याप्रकरणी पोलिसांनी महबूब खानला २००६ मध्ये हैदराबाद येथून अटक केली होती. या प्रकरणाचा निकाल काल लागला. यात न्यायालयाने महबुब खान याला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली. त्याचा साथीदार असलेल्या वसीम याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
तब्बल २५ वर्षांनंतर परभणी न्यायालयाने एखाद्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा सुनावली आहे. निकाल लागल्यानंतर विद्याचे वडील दत्ताराव देशमुख यांनी समाधान व्यक्त केले आहे.

मराठी पाट्या लावा, नाहीतर... - राज ठाकरे

मुंबई, २७ अगस्त- दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी दिलेली मुदत उद्या संपत असतानाच, बुधवारी पुन्हा एकदा "मनसे'चे प्रमुख राज ठाकरे यांनी हे आंदोलन तीव्र करण्याचे संकेत दिले.
वांद्रयातील रंगशारदा सभागृहात आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या शिबिरात श्री. ठाकरे यांनी "एक दिवसाच्या आत मराठी पाट्या लावल्या नाहीतर, उद्या परिणामांबद्दल विचारू नका' असे सांगत व्यापाऱ्यांना कडक शब्दांत इशारा दिला.
आंदोलन करून पोलिसांना त्रास देण्याची आपली इच्छा नाही. मराठीच्या नावाने आम्ही जे आंदोलन करीत आहोत ते कायद्याचा पालनासाठीच करीत आहोत. त्यामुळे आंदोलकांना सहकार्य करावे, असेही आवाहन त्यांनी केले.
भाषणात त्यांनी १९६१ च्या कायद्याचाही उल्लेख केला. या कायद्यान्वये प्रत्येक राज्यातील दुकानांच्या पाट्या त्या राज्याच्या स्थानिक भाषेत असायला हव्यात. देशातील सर्व राज्यांमध्ये हा कायदा काटेकोरपणे पाळला जातो. पण येथील व्यापारी न्यायालयात जाण्याची भाषा करतात. हे काय चालू आहे, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

"कस्टम'चे २२ अधिकारी बारबालांसमवेत पोलिसांच्या ताब्यात

खंडाळा, २७ ऑगस्ट- - खंडाळ्यातील प्रसिद्ध फरियाझ हॉटेलच्या मागे असलेल्या ताज कॉटेज या खासगी बंगल्यावर लोणावळा शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री टाकलेल्या छाप्यात सीमा शुल्क विभागाचे २२ अधिकारी, ११ बारबाला आणि इतर सहा जणांना ताब्यात घेतले. रात्री साडे अकराच्या सुमारास हा छापा टाकण्यात आला.
सीमाशुल्क विभागातील अधीक्षक आणि निरीक्षक पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे। कान्हा ग्रामीण रुग्णालयात या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या सर्वांना सध्या पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. दुपारी अडीच वाजता त्यांना वडगाव येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
ताब्यात घेतलेल्या सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची नावे आणि त्यांचे पद-
- अजयकुमार षण्मुगम (वय ४४, रा. ठाणे) निरीक्षक - शंकरतन कृष्ण मुंडा (वय ५०, रा. भांडूप, मुंबई) अधीक्षक - विनयकुमार नाथ (वय ३९, रा. माटुंगा) निरीक्षक - अनुपम कोस्टा (वय ३९, रा. माटुंगा) निरीक्षक - महेश वसंत जाधव (वय ४५, रा. ठाणे) निरीक्षक - संतोष ऊर्फ गुरुचरण बाळकृष्णराव (वय ५०, रा. दादर) अधीक्षक - अन्वर इस्माईल खान (वय ५२, रा. अंधेरी) अधीक्षक - सबील करुणन (वय ४५, रा. ठाणे) निरीक्षक - भास्कर खंडू हांडे (वय ५२, रा. शिवडी) अधीक्षक - विमलकुमार गुलाबरॉय सोनेजा (वय ४२, रा. वाशी) निरीक्षक - चंद्रकांत मनसाराम मोरे (वय ५०, रा.कल्याण) निरीक्षक - नरेंद्रकुमार महिचंद रायपुरीया (वय ३१, रा. पवई) निरीक्षक - मॅथ्यू मामेन (वय ५४, रा. मुंबई) अधीक्षक - मनसूख रामचंद्र लिंगायत (वय ५६, रा. ठाणे) अधीक्षक - रविचंद्रन कलाईप्पा (वय ४२, रा. पवई) निरीक्षक - ओमनारायणन कृष्णमुरारी (वय ५०, रा. पवई) अधीक्षक - ओमप्रकाश रामानंद पांडे (वय ४५, रा. मुलुंड) अधीक्षक - शिवसिंग कमल यादव (वय ४७, रा. पवई) अधीक्षक - राजेश भाऊराव ढोणे (वय ४०, रा. माटुंगा) अधीक्षक - रमेशबाबू सूर्यनारायण वंगेती (वय ४४, रा. पवई) अधीक्षक - सतीश नारायण उच्छील (वय ५६, रा. बांद्रा) अधीक्षक - विजयकृष्णकुमार राघवन (वय ३६, रा. पवई) निरीक्षक

हिंदुच्‍या हत्‍येवर कॉंग्रेस शांत का?- बाळासाहेब

मुंबई, २७ ऑगस्ट-शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ओरीसात नक्षलवाद्यांकडून स्वामी लक्ष्मणानंद यांच्‍या हत्येच्‍या घटनेची कडक शब्‍दात टिका केली असून ‘माओवाद हा मुस्‍लीम दहशतवादा इतकाच गंभीर असल्‍याची टिका केली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मधील संपादकीय लेखात ठाकरे यांनी म्‍हटले आहे, की 85 वर्षीय लक्ष्मणानंद ओरीसात ख्रिस्‍ती मिशन-यांकडून गरीब आदिवासींच्‍या धर्मांतरणास विरोध करीत असल्‍यामुळेच त्‍यांची हत्या केली गेली आहे.
ठाकरे यांनी धर्मनिरपेक्षवादी असल्‍याचा दावा करणा-या कांग्रेस, राष्ट्रवादी, डावे आणि बहुजन समाज पार्टीच्‍या नेत्‍यांना लक्ष्‍य करताना टीका केली आहे, की ओरीसात लक्ष्मणानंद यांची हत्या केल्‍याच्‍या घटनेचा या पक्षांनी निषेध का केला नाही.

मंगलवार, 26 अगस्त 2008

प्रियांका चोप्राच्या माजी खासगी सचिवास अटक

मुंबई - बॉलीवुड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा माजी सचिव प्रकाश जाजू याला मुंबई गुन्हे शाखेने आज (मंगळवार) मध्य प्रदेशात अटक केली आहे. प्रियांकाला धमकी तसेच अश्‍लिल एसएमएस पाठविण्याचा त्याच्यावर आरोप आहे.
गेली दोन वर्षे पोलिसांना चकवा देणाऱ्या जाजूला मध्य प्रदेशातील महू येथून अटक करण्यात आल्याचे अतिरिक्‍त पोलिस आयुक्त (गुन्हे शाखा) देवेन भारती यांनी सांगितले.
आर्थिक वादातून प्रियांकाने जाजूला कामावरून काढून टाकले होते. त्यानंतर जाजूने एसएमएसवरून प्रियांकाला धमकी तसेच अश्‍लिल एसए मएस पाठविण्यास सुरूवात केली होती. प्रियांकाने त्याच्याविरूद्ध तक्रार दाखल केली.

डाऊ'ला विरोधासाठी साताऱ्यात "रास्ता रोको'

सातारा - शिंदे (ता। खेड), २६ ऑगस्ट- येथील डाऊ केमिकल कंपनीला विरोध करण्यासाठी पुणे- बंगळूर महामार्गावर वाडे फाट्यावर वारकऱ्यांनी मंगळवारी रस्ता सुमारे अर्धातास अडवून धरला. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यावर वाहतूक पूर्ववत झाली.
व्यसनमुक्त युवक संघ व जिल्हा वारकरी संघ यांच्या वतीने "डाऊ' कंपनीला विरोध करण्यासाठी हे आंदोलन झाले. दुपारी बाराच्या सुमारास सुमारे शंभरहून अधिक कार्यकर्ते वाडे फाटा येथे जमा झाले. महामार्गावरील वाहतूक त्यांनी रोखून धरली. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

कोसी नदीने प्रवाह बदलला, बिहारमध्ये लाखो लोक बेघर

पाटणा, २६ ऑगस्ट- कोसी नदीने प्रवाह बदलल्यामुळे आलेल्या पुरामुळे विहारमध्ये हाहाकार उडाला आहे. या पुरामध्ये ४२ जणांचा बळी गेला आहे. हा आकडा यापेक्षाही जास्त असण्याची शक्‍यता आहे.
नेपाळमधील कुसाहा गावाजवळ कोसीने आपला प्रवाह बदलला. त्यामुळे बारा लाख लोक जुन्या आणि नव्या प्रवाहांच्यामध्ये अडकले आहेत.
या पुराचा फटका अनेक जिल्ह्यांना बसला आहे. मधेपूरा आणि सुपौल जिल्हे तर नकाशावरुन पुसले जाण्याची शक्‍यता आहे. या जिल्ह्यातील १० लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी कठीहार, सहारसा. पूर्णिया आणि आरारीया जिल्ह्यांमधील स्थितीही गंभीर आहे.
ही नेहमीची पूरस्थिती नसल्याने मदतकार्य करणेही अवघड झाले आहे.
अधिकाधिक लोकांना सुरक्षित स्थळी पोहचविणे हेच आमचे सध्याचे उद्दिष्ट असल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सांगितले.

सोमवार, 25 अगस्त 2008

ममतांच्या आंदोलनाने नॅनो अडचणीत

कोलकाता, २५ ऑगस्ट-सिंगुरमधील परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर नॅनो राज्या बाहेर हालवण्याचा आपला इरादा टाटा उद्योग समूहाने व्यक्त केल्याचा कोणताही परिणाम तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी यांच्या सत्याग्रह आंदोलनावर झाला नसून, त्यांच्या बेमुदत आंदोलनाने आता नॅनोच्या उत्पादनाला विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नॅनो प्रकल्पा बाहेर ममतांनी आपले आंदोलन सुरू केले असून, त्यांना आता समाजवादी पार्टी आणि नर्मदा बचाव नेत्या मेधा पाटकर यांनीही आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
टाटांनी नॅनोसाठी जी जमीन घेतली आहे, त्यातील ४०० एकर जमीन परत करण्याची प्रमुख मागणी ममतांची आहे.
टाटांनी या प्रकल्पासाठी १५०० कोटीची गुंतवणूक केली आहे. परंतु सिंगुरमध्ये त्यांच्या या प्रकल्पाला विरोध होत असल्याने आणि शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक उग्र होत असल्याने हा प्रकल्प बाहेर नेण्याचा प्रयत्न टाटांनी सुरू केला आहे.

मारूलकरांच्या स्मृत्यर्थ कंठसंगीतासाठी सुवर्णपदक

पुणे, २५ ऑगस्ट- प्रसिद्ध संगीत समीक्षक दत्ता मारूलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात कंठसंगीतात एम. ए. संगीत (फायनल) या विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला "मारुलकर सुवर्णपदक' देण्यात येणार आहे.
मारूलकर यांच्या पत्नी सुलोचना मारूलकर यांनी त्यासाठी पुणे विद्यापीठाच्या कुलसचिवांकडे नुकताच एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. हे सुवर्णपदक २००९ या शैक्षणिक वर्षापासून देण्यात येईल, असे ललित कला केंद्राच्या संगीत विभाग प्रमुख डॉ. शुभांगी बहुलीकर यांनी सांगितले.

जयपूर बॉम्बस्फोटातील संशयिताला उत्तर प्रदेशात अटक

लखनौ - जयपूर शहरात १३ मे रोजी झालेल्या साखळी बॉंबस्फोटांसंदर्भात शाहबाज हुसैन या संशयित अतिरेक्‍याला राजस्थान पोलिसांनी सोमवारी अटक केली.
उत्तर प्रदेशातील मौलवीगंज येथून त्याला ताब्यात घेतले. तेथील पोलिसांच्या सहकार्याने राजस्थान पोलिसांनी ही कारवाई केली.
अहमदाबाद येथे २६ जुलै रोजी झालेल्या बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार अबू बशर याच्याशी हुसैन याचे जवळचे संबंध असल्याचे सांगितले जाते. अबू बशर याला १५ ऑगस्ट रोजी ताब्यात घेण्यात आले होते.
या अटकेमुळे राजस्थान बॉम्बस्फोटाच्या तपासाला आणखी वेग मिळेल अशी पोलिसांना आशा आहे.

"बीसीएनएल'च्या "थ्री जी' सेवेला पुण्यात प्रारंभ

पुणे, २५ ऑगस्ट - व्हिडिओ कॉल, व्हिडिओ कॉन्फरन्सिग, ऑनलाइन गेमिंग आणि वेगवान इंटरनेट सेवा यासाठी आवश्‍यक असलेल्या "थ्री जी' सेवेचा प्रारंभ भारत संचार निगम लिमिटेडच्या महाराष्ट्र परिमंडळाचे मुख्य व्यवस्थापक चंद्रप्रकाश यांच्या हस्ते सोमवारी झाला.
"बीएसएनएल'चा "प्लॅन ७२५' निवडलेल्या पुण्यातील दोन हजार ग्राहकांना ही सेवा मिळणार आहे. शहरातील दहा टॉवरच्या कार्यक्षेत्रात दोन किलोमीटरच्या अंतरातील ग्राहकांना ही सेवा मिळणार आहे. राज्यातील ५६ शहरात ही सेवा मिळणार आहे.
"थ्री जी' सेवेचा देशातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे चंद्रप्रकाश यांनी यावेळी सांगितले.

काश्‍मिरात तणावाची स्थिती; यासिन मलिक यांना अटक

श्रीनगर, २५ ऑगस्ट - अमरनाथ ट्रस्टला वनजमीन देण्याच्या मुद्‌द्‌यावरून जम्मू- काश्‍मीरमध्ये निर्माण झालेली तणावाची स्थिती निवळण्याची चिन्हे नाहीत. सोमवारच्या मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी फुटीरतावादी गटाचे नेते यासिन मलिक यांना अटक केली.
जमात-ए-इस्लामिया संघटनेचे नेते सयद अली शाह गिलानी आणि हुरियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष मिरवाईज उमर फारूक यांना रविवारी रात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून राज्यातील दहा जिल्ह्यांत अनिश्‍चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही शक्तिप्रदर्शनासाठी लाल चौकाकडे मोर्चा काढण्याच्या निर्धारावर फुटीरतावादी गटाचे कार्यकर्ते ठाम आहेत. त्यामुळे शहरात तणावपूर्ण वातावरण आहे.
सुरक्षिततेसाठी पोलिसांबरोबर निम-लष्करी दलाच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत.

कुख्यात बंटी पोलिस चकमकीत ठार

नवी दिल्ली, २५ ऑगस्ट - दिल्लीसह उत्तर भारतात धुमाकूळ घालणाऱ्या बंटी टोळीचा म्होरक्‍या बंटी सोमवारी पहाटे पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला. गेल्या दोन महिन्यांपासून पोलिस बंटीचा शोध घेत होते. त्याच्यावर खुनासह इतर अनेक गुन्हे दाखल होते.
दक्षिण दिल्लीतील बदरपूर भागात एका इमारतीत बंटी लपल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. पोलिसांनी पहाटे साडेपाचच्या सुमारास या इमारतीवर छापा टाकला. त्यावेळी बंटी आणि त्याचा साथीदार राजेश तिथे होते. या दोघांनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात बंटी आणि राजेश ठार झाले. चकमकीत तीन पोलिस कर्मचारीही जखमी झाले आहेत.

राणे-मनसेचा 'प्रसिद्धी'काला

मुंबई, २५ ऑगस्ट-सत्तेच्या हंडीतले लोणी मटकावण्यासाठी राजकारण्यांनाही डावपेचांचे थरावर थर लावावे लागतात, पण लक्ष्य साधण्यासाठी अचूक नेमही हवा. गेल्या काही वर्षांत दहिकाला उत्सवाचा नेम राजकारणी नेमका साधत आहेत. हा 'प्रसिद्धीचा उत्सव' साजरा करण्यासाठी नेत्यानेत्यांमधील चुरस कमालीची वाढू लागली आहे.
रविवारी या लढाईत महसूल मंत्री नारायण राणे आणि त्यांचे चिरंजीव नीतेश राणे यांचे शहरात तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे उपनगरांत वर्चस्व पहायला मिळाले. यंदा उत्सव मंडळांना राणे यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर बंड्या वाटल्या. राणेंचा फोटो आणि त्याखाली 'स्वाभिमानी नेता' असे लिहिलेल्या बंड्या घातलेली अनेक गोविंदा पथके शहरात फिरत होती. तर, राणे यांचे चिरंजीव नीतेश राणे यांच्या शुभेच्छा देणारी होल्डिंग खूप ठिकाणी लावलेली होती. उपनगरांत मात्र गोविंदा पथकांच्या बंड्यांवर मनसेचे झेंडे आणि राज ठाकरे यांचे नाव झळकत होते.
काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, मनसे या सर्वच राजकीय पक्षांनी उत्सव मंडळांना लाखोंची बक्षिसे जाहीर केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सचिन अहिर यांच्या 'संकल्प प्रतिष्ठान'च्या वतीने वरळीत दहीहंडी उत्सवाने मोठी गदीर् खेचली. तर, धारावीत शिवसेनेचे उपविभागप्रमुख मुथ्थू थेवर, मनोहर रायबागे यांनी उभारलेली एक लाख ११ हजार १११ रुपयांची हंडी वडाळा येथील 'श्री साई सोशल ग्रुप'च्या गोविंदांनी फोडली. ही हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांची झुंबड उडाली होती. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी हजेरी लावली होती. लालबाग येथे आमदार दगडू सकपाळ यांनी उभारलेली ५१ हजार रुपयांची हंडी रात्री उशिरापर्यंत फुटली नव्हती. मात्र, ही हंडी फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुमारे १४० गोविंदा पथकांवर बक्षिसांची खैरात झाल्याने गोविंदा खूष होते. मनसेच्या वतीने चेंबूरमध्ये ११ लाख ११ हजार रुपयांची हंडी उभारण्यात आली होती. शिवसेना भवनसमोर भारतीय विद्याथीर् सेनेच्या वतीने उभारण्यात आलेल्या १ लाख ११ हजार १११ रुपयांची हंडी अनेकांचे आकर्षण ठरली होती. बघ्यांच्या गदीर्मुळे ट्रॅफिक जॅम झाले होते.

रविवार, 24 अगस्त 2008

नगरसेवकासह पाच जणांना अटक

नवी मुंबई, २४ ऑगस्ट-अनधिकृत झोपड्या तोडल्यामुळे ऐरोली येथे दोन गटांत उसळलेल्या दंगलीप्रकरणी राष्ट्रवादीचे नगरसेवक गणेश ठाकूर यांच्यासह दोन्ही गटांतील पाच जणांना शुक्रवारी अटक करण्यात आली. आरोपींना पोलिस कोठडी सुनावली.

दिघा परिसरातील न्यू गणेश नगर वस्तीमध्ये मोकळ्या असलेल्या एमआयडीसीच्या भूखंडावर तेथेच राहणाऱ्या बापू धांडेने झोपड्या बांधल्या होत्या. ही बाब स्थानिक नगरसेवक गणेश ठाकूर यांना समजल्यावर त्यांच्या समर्थकांनी या झोपड्या जमीनदोस्त केल्या. त्यामुळे संतापलेल्या बापू धांडेची मुले राजेंद व गोविंद यांनी नगरसेवक ठाकूर यांचा सुपरवायझर नागेश नाईक याला बेदम मारहाण केली.

मुंबईत दहीहंडी फोडताना ५९ गोविंदा जखमी

मुंबई, २४ ऑगस्ट- राज्यभर दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा केला जात असताना, मुख्य आकर्षण असलेल्या मुंबईत दडीहंडी फोडताना विविध ठिकाणी झालेल्या घटनांत ५९ गोविंदा जखमी झाले आहेत.
त्यातील ४७ जणांना केईएम रूग्णालयात, पाच जणांना नायर रूग्णालयात तर सात जणांना लोकमान्य टिळक रूग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मेटे यांचे केतकरांना आव्हान

मुंबई, २४ ऑगस्ट- ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्यावरील हल्ल्याचे आपण कधीच समर्थन केले नाही, मात्र असे हल्ले करण्याची पाळी का येते, याचाही विचार झाला पाहिजे, असे सांगत 'छत्रपतींचा अवमान केला नसल्याचे केतकर यांनी सिद्ध करून दाखवावे', असे आव्हान शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे माजी उपाध्यक्ष विनायक मेटे यांनी शनिवारी दिले. तसेच, शिवस्मारकासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करून स्मारकाचे काम पावसाळा संपताक्षणी सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली.
' पत्रकारांवर यापूवीर् शिवसेनेने, आरपीआय तसेच नारायण राणे यांच्या कार्यर्कत्यांनीही हल्ले केले आहेत. या हल्ल्यांसाठी बाळासाहेब ठाकरे, राणे किंवा आरपीआयच्या नेत्यांवर कधीही गुन्हा नोंदवला गेला नाही. माझ्यावर मात्र गुन्हा नोंदवण्यात आला. आमच्याच पक्षाचे राज्य असताना कसलीही शहानिशा न होता अशा प्रकारे गुन्हा नोंदवला जाणे हा गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या निष्पक्षपातीपणाचा पुरावा आहे', असा टोलाही त्यांनी हाणला.
पवार काय भूमिका घेतात, यानुसार आपण आपल्या राजकीय वाटचालीचा निर्णय घेऊ, असे त्यांनी शिवसेनाप्रवेशाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. ठाणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात आरोप करणाऱ्या नगरसेवक प्रताप सरनाईक यांच्या हकालपट्टीची मागणी करण्यात आली. मग केतकर हल्ल्याप्रकरणी आपल्याविरोधात बोलणाऱ्या पक्षातील नेत्यांवर कारवाई का झाली नाही, असा सवाल त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार जीतेंद आव्हाड यांचे नाव न घेता केला.

इंडियन मुजाहिदीन'चा धमकीचा मेल, गुजरात आणि महाराष्ट्र "हिट लिस्ट'वर

नवी दिल्ली, २४ ऑगस्ट-गुजरातमधील बॉम्बस्फोटांची जबाबदारी स्वीकारलेल्या "इंडियन मुजाहिदीन' या दहशतवादी संघटनेने महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आणखी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिली आहे.
वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांना रविवारी मुजाहिदीनने हा धमकीचा मेल पाठविला आहे.
या मेलमध्ये "सिमी' च्या कार्यकर्त्यांच्या आणि इतर दहशतवाद्यांच्या कृत्यांचे समर्थन केले आहे.
या मेलमध्ये अहमदाबाद स्फोटामध्ये वापरलेल्या कारची छायाचित्रेही आहेत.
यापूर्वी गुजरातमध्ये स्फोट घडवून आणण्यापूर्वी पाठविलेल्या मेलमध्ये त्यांनी पाच स्फोट घडवून आणण्याची धमकी दिली होती.

शनिवार, 23 अगस्त 2008

निरुपम ‘बिग बॉस’ बाहेर

मुंबई, २३ ऑगस्ट-' बिग बॉस ' सारख्या कार्यक्रमात भाग घेण्याची रिस्क घेणारा , मी देशातील पहिला राजकारणी आहे , अशी बढाई मारणारे काँग्रेसचे नेते संजय निरुपम बिग बॉस मधून ‘ आऊट ’ झाले आहेत. या शो मधून आपल्याला बाद करण्यात यावे , अशी विनंती आपणच सहभागी स्पर्धकांना केल्याचे निरुपम यांनी सांगितले.
बिग बॉस मधून निरुपम यांचे बाहेर जाणे हे प्रिप्लॅन होते. त्यांना आपल्या पाच लाखांच्या दहीहंडीचे वेध लागले होते. बिग बॉसमध्ये राजकारण्याबद्दलचे भारतीयांचे मत बदलण्यासाठी आलेल्या निरुपम यांनी बढाई मारली. पण , १४ स्पर्धेकांशी जुळवून घेण्यात त्यांना अपयश आले. मग काय आपल्याला शोमधून काढून टाकावे म्हणून मुद्दाम प्रयत्न केल्याची सारवासारव ते करताना दिसत आहेत. हे सांगणे विसंगत असून कोल्ह्याला द्राक्षे आंबट हा त्यातला प्रकार असल्याचे बोललं जातेय.
खरं तर तीन महिने या शोसाठी वेळ देणे आपल्यासारख्या राजकारण्याला शक्य नाही. जास्तीत-जास्त एक आठवडा शक्य असतो तो वेळ मी दिला. पण या स्पर्धेत भाग घेणा-या अनोळख्या माणसांशी ओळख झाली , तो अनुभव राजकारणात फायद्याचा ठरेल , असे त्यांनी सांगितले.

दौंड रेल्वे स्थानकावर पोलिसांच्या ताब्यातून गुन्हेगार फरार

दौंड, २३ ऑगस्ट- येथील रेल्वेस्थानकावरून कुख्यात गुन्हेगार अंकुश ऊर्फ अंक्‍या वसंत काळे हा काल रात्री पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला.
न्यायालयीन कामकाजासाठी त्याला येरवडा कारागृहात नेले होते. तेथून त्याला दौंड स्थानकावर आणण्यात आले. त्याच्यावर खून, दरोडे, जबरी चोरी असे एकूण सात गुन्हे दाखल आहेत. नगर जिल्ह्यातील पोलिस शिपाई अंकुश धावडे याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून त्यांची हत्या केल्याच्या प्रकरणातील तो प्रमुख आरोपी आहे.
दौंड पोलिस, दौंड लोहमार्ग पोलिस आणि पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या पथकाने परिसराची नाकेबंदी केली असून, शोध घेण्याचे काम सुरू आहे.

अजितसिंहांनी सोडली मायावतीची सोबत

नवी दिल्ली, २३ ऑगस्ट- मायावतींच्‍या राजकीय डावपेचांनी हताश झालेल्‍या राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष अजितसिंह यांनी कॉंग्रेस आणि भाजप दोघांसोबत पुन्‍हा चर्चा सूरू केली असून लवकरच ते मायावतींची सोबत सोडण्‍याची शक्‍यता आहे.
भाजप अजितसिंग यांच्‍या सोबत निवडणुकीत आघाडी करण्‍यासाठी उत्सुक आहे. तर कॉंग्रेसने आपल्‍याला अशी गरज नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे.
विश्वासमत ठरावाच्‍या वेळी संपुआच्‍या विजयानंतर बसपामध्‍ये गेलेल्‍या अजितसिंह यांच्‍या जवळच्‍या सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार अजितसिंह यांना मायावतींची कार्यपध्‍दती आवडत नसून ते नाराज आहेत.
९ ऑगस्‍टला लखनऊमध्‍ये झालेल्‍या रॅलीत मायावतीने 'एकला चलो' संदेश दिला. तेव्‍हा पासून अजितसिंह नवीन आघाडीच्‍या शोधात आहेत. भाजपाच्‍या सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि पक्षाध्यक्ष राजनाथसिंह हे रालोद सोबत आघाडी करण्‍यास अनुकूल आहेत.
भाजप अजितसिंह यांच्‍या मागणी नुसार त्‍यांना लोकसभेच्‍या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्‍ये दहा जागा सोडण्‍यास तयार आहे. असे असले तरीही अजितसिंग भाजपसोबत गेल्‍यास पक्षात बंडाळी माजण्‍याची शक्‍यता आहे त्‍यामुळे अजितसिंग कॉंग्रेससोबत चर्चा करीत आहेत.

काश्‍मिर अशांतच, पुन्हा तीन दिवस "बंद'

श्रीनगर, २३ ऑगस्ट- (पीटीआय) : जम्मू-काश्‍मीरमधील फुटीरतावादी नेत्यांनी शुक्रवारी ईदगाह मैदानावर मोठा मेळावा घेऊन शनिवारपासून पुन्हा खोऱ्यात तीन दिवसांचा "बंद' पुकारला आहे.
काश्‍मीर मुद्द्यावरून भारत, पाकिस्तान आणि काश्‍मीरमधील नागरिकांनी एकत्र येऊन चर्चा करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
""पुढील तीन दिवस काश्‍मीरमध्ये पूर्ण "बंद' पाळण्यात येईल. शांततापूर्ण मार्गाने आम्ही निषेध करू,'' असे हुरियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष मिरवैझ उमर फारुक यांनी सांगितले.
ईदगाह मैदानात फुटीरतावाद्यांचा जो मोठा मेळावा झाला त्यात हजारो लोकांनी हिरवे आणि काळे झेंडे दाखवले.
सोमवारी श्रीनगरच्या मुख्य लाल चौकात समितीतर्फे ठिय्या आंदोलनही केले जाणार आहे.

राणे आणि काँग्रेस; दोघेही कोंडीत!

मुंबई, २३ ऑगस्ट-महसूलमंत्री नारायण राणे दिल्लीला बोलाविल्याशिवाय जाण्यास तयार नाहीत आणि पक्षश्रेष्ठीही दिलेला राजीनामा स्वीकारला हे सांगायला तयार नाहीत, त्यामुळे राणे आणि काँग्रेस हे दोघेही कोंडीत सापडले असून यातून कसे बाहेर पडायचे असा पेच दोघांना सतावत असल्याचे समजते.
पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी राणे यांनी स्वत:हून पक्षश्रेष्ठींना भेटायला जावे, असा आग्रह काही काँग्रेस नेते करीत आहेत तर चीनच्या दौ-यावर जाण्यापूर्वीच आपण सोनिया गांधी यांची भेट मागितली होती, त्यामुळे पुन्हा भेट कशी मागणार, असा पवित्रा राणे यांनी घेतला आहे. तशात राणे यांचा राजीनामा स्वीकारला तर ते कालांतराने पक्षातूनही बाहेर जातील व त्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान होईल, असे काही मंत्र्यांनी प्रत्यक्ष श्रीमती गांधी यांची भेट घेऊन सांगितल्याचे कळते. त्यामुळे राणे यांचा राजीनामा स्वीकारायचा नाही, पण त्यांनी स्वत: मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठविला तर तो स्वीकारायचा असा निर्णय काँग्रेसने केला आहे.
पण आपण एकदा राजीनामा दिलेला असल्याने तो स्वीकारला अथवा फेटाळला यापैकी काहीही स्पष्ट होत नसल्याने आता राणे केवळ दिल्लीच्या निर्णयाची वाट पाहत आहेत, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. राजीनामा स्वीकारला असे सांगितले तर राणे हे दुस-या क्षणी मुख्यमंत्री अथवा राज्यपाल यांच्याकडे राजीनामा पाठवून देतील, असेही त्यांच्या समर्थकांनी सांगितले.
राणे आणि काँग्रेस या दोघांची कोंडी झालेली असताना मध्येच केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल हे त्यांना भेटून गेल्याने तसेच राणे यांनी काँग्रेस सोडली तर त्यांनी आपल्या पक्षात यावे, यासाठी अनेकजण प्रयत्नाला लागल्याने काँगेसमध्ये काहीशी चलबिचल सुरू झाल्याचे कळते. राणे आणि काँग्रेस यांच्यामध्ये सुरु झालेला पेचप्रसंग सुटला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दरवाजे खुले आहेत, असे संकेत देण्यासाठीच पटेल हे राणे यांना भेटले असावेत, असे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
राणे यांनी टोकाचा निर्णय घेऊ नये, अशी विनंती करण्यासाठी काँग्रेसच्या दोघा खासदारांनी त्यांची भेट घेतली. पाठोपाठ रिपब्लिकन पक्षाचे खासदार रामदास आठवलेही त्यांना भेटून गेले. शुक्रवारी दुपारी उद्योगमंत्री अशोक चव्हाण यांनी राणे यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे कळते. याबद्दल चव्हाण यांच्याकडे विचारणा करता महसूल खात्याशी संबंधित नांदेड जिल्ह्यातील काही प्रश्न सोडविण्यासाठी भेट घेतली होती, असे ते म्हणाले.
तहसीलदारांच्या काही जागा रिकाम्या असून दुष्काळी स्थिती असल्याने त्या लवकर भराव्यात, अशी विनंती केल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईतली 'व्यावसायिक' दहीहंडी

मुंबई, २३ ऑगस्ट- गोकुळाष्टमी म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस ! श्रीकृष्णाचा जन्म गोकुळाष्टमीच्या रात्री 12 वाजेच्या सुमारास कंस राजाच्या कोठडीत झाला. पण श्रीकृष्ण वाढला मात्र गोकुळात. नंद आणि यशोदेच्या प्रेमात आणि गोपिकांच्या सहवासात. गोकुळातच चोरून लोणी खाणे, गोपिकांची छेड काढणे अशा लीला त्याने केल्या. घराच्या छताला टांगलेली दह्याची हंडी श्रीकृष्ण फोडायचा. तीच प्रथा आता दहीहंडीच्या रूपाने पाळली जाते. पण, काळाच्या ओघात हा उत्सव इतका बदलला आहे की, त्या मागची मुळ संकल्पनाच नाहीशी झाली आहे.
''गोविंदा आला रे आला....मटकी संभाल ब्रिजबाला !'' असे म्हणणार्‍या गोविंदाला बाजूला सारत आधुनिक युगात पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात वावरणार्‍या महिलाही दहीहंडी फोडण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिसतात। मुंबईत चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी चाळीत गोकुळाष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जायची. त्याकाळी गोपाळकाला मोठा उत्सव मानला जायचा. तेव्हा मात्र आतासारखी व्यावसायिकता त्यात नव्हती. दोन चाळीमध्ये दोरखंडाच्या आधारे दहीहंडी बांधली जायची. आंब्याची पाने, फुले, फळे व रूपये त्या दोरीला बांधले जायचे. दहीहंडीच्या जवळ हंडी फोडण्यासाठी नारळ बांधले जायचे. हंडी फोडण्यासाठी दोन पथकांमध्ये जोरदार स्पर्धा चालायची.
पण आता हा सण राजकारण्यांच्या ताब्यात गेला आहे। त्यात अनेक गुडांनीही स्वतःला 'सोवळे' करून घेण्याची संधी साधली आहे. अनेक 'भाई' लोकांनी आपली स्वत:ची दहीहंडी, गणपती, नवदुर्गा मंडळे स्थापन करून त्या माध्यमातून लाखो रूपयांची देणगी उकळण्याचा प्रकार सुरू केला आहे. त्यामुळे सामाजिक उत्सवातून व्यावसायिकता डोकावताना दिसत आहे. त्यातून उद्‍भवणारे वादविवाद आणि त्याला होणारा राजकारणाचा स्पर्श यामुळे हा सणही त्यात माखला गेला आहे. राजकारणी लोक अशा सामजिक महोत्सवाला भल्या मोठ्या देणग्या देवून आपल्या पक्षाची व नावाची प्रसिध्दी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसतात.
गेल्या काही वर्षांपासून मुंबईल्या चाळींची जागा गगनचुंबी अपार्टमेंटने घेतल्याने उंचच उंच दहीहंडी बांधल्या जातात. त्यांच्यावर ठेवण्यात आलेली बक्षिसेही लाखोंच्या घरात जाणारी आहेत. मुंबईतच्या दहीहंडीला आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रसिध्द मिळू लागली आहे. यंदाच्या वर्षी मुंबईत १० पेक्षा जास्त दहीहंड्यांना २० ते २५ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. पुरूषांच्याच बरोबरीने महिलांची पथकेही सहभागी होणार आहेत. दंहीहंडी फोडण्याच्या वेळी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने यजमान मंडळाच्या वतीने गोविंदाचा विमा तसेच जागेवर प्राथमिक उपचाराच्या सोयी उपलब्ध करून देण्यात येतात. गोकुळाष्टमीच्या तीन महीने अगोदरच दहीहंडी फोडणार्‍या पथकांचा सराव सुरू होतो. सराव करतानाही काही जर जखमी होतात. मुंबईतील दहिहंडीकडे देशातीलच नाही तर विदेशातील मीडीयाचेही लक्ष लागलेले असते.

रस्ता अपघातांत घट

नवी मुंबई, २३ ऑगस्ट- वाहतूक पोलिसांनी महिनाभर राबविलेल्या 'झिरो टॉलरन्स' मोहिमेमुळे रस्ता अपघातांच्या प्रमाणात २६ टक्क्याने तर अशा अपघातांत मृत पावणा-यांच्या प्रमाणात २४ टक्क्याने घट झाल्याचा दावा नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी केला आहे.
मद्यप्राशन करून वाहन चालवणे, वेग मर्यादेचे उल्लंघन करणे, अवैध प्रवासी वाहतूक व शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून विना लायसन्स व अतिवेगाने वाहने चालविण्याच्या प्रकारांमुळे अपघाताच्या संख्येत प्रचंड वाढ झाली होती. या बाबी विचारात घेऊन अपघातांना आळा घालण्याच्या दृष्टीने पोलिस आयुक्त रामराव वाघ यांनी वाहतूक शाखेला सूचना केल्या होत्या. त्यानुसार पोलिस उपायुक्त एन. डी. चव्हाण (मुख्यालय), वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त धिवरे व वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद जाधव यांनी २० पोलिस अधिकारी व ६० पोलिस कर्मचा-यांच्या सहाय्याने गेला महिनाभर 'झिरो टॉलरन्स' मोहीम उघडली होती.
या मोहिमेत मद्यप्राशन करून वाहन चालविणा-यांविरुद्ध ९६ केसेस दाखल करून त्यांच्याकडून दंड वसूल केला. तसेच वेग मर्यादेचे उल्लंघन करणा-यांविरोधात ३३५३ केसेस दाखल करून ६,७९,७०० इतका दंड वसूल केला. त्याचप्रमाणे विना लायसन्स गाडी चालवणा-या शाळा - कॉलेजच्या विद्यार्थ्यांविरुद्ध १०३ केसेस दाखल करुन १०,३०० दंड तर अवैध प्रवासी वाहतूक करणा-यांविरुद्ध ८८१ केसेस दाखल करुन ८,६१,७०० इतका दंड वसुल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील अनेक वाहनचालकांना १ ते ३ दिवस पोलिस कोठडीही सुनावण्यात आली.

शुक्रवार, 22 अगस्त 2008

दुहेरी बॉम्बस्फोट खटल्यात भुजबळांची साक्ष

मुंबई, २२ ऑगस्ट - गेटवे ऑफ इंडिया आणि झवेरी बाजार येथे पाच वर्षांपूर्वी झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटाच्या खटल्यात तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांनी आज विशेष पोटा न्यायालयात साक्षीदार म्हणून हजेरी लावली।
विशेष न्या। एम. आर. पुराणिक यांच्यापुढे आज या खटल्याची सुनावणी झाली. गेटवे आणि झवेरी बाजार येथे दुहेरी बॉम्बस्फोट घडल्यानंतर (२५ ऑगस्ट २००३) पोलिस आयुक्तालयातून वेळोवेळी काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकांबाबत माजी पोलिस आयुक्त रणजितसिंग शर्मा यांची साक्ष यापूर्वी नोंदविण्यात आली होती. अटक आरोपी अश्रत अन्सारी, सय्यद अनिस आणि फमिदा सय्यद यांच्याकडून जिलेटीनच्या कांड्या जप्त करण्यात आल्या होत्या, असे शर्मा यांनी त्या वेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत (१ सप्टेंबर २००३) सांगितले होते. या परिषदेला भुजबळही उपस्थित होते. मात्र या आरोपींची अटक गुन्हे शाखेने ३१ ऑगस्टला कागदोपत्री दाखविली आहे, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताबाबत भुजबळ यांची साक्ष नोंदविण्यात आली.
प्रसिद्धिमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेली माहिती पोलिस आयुक्तांनी दिल्याची शक्‍यता नाही, असे भुजबळ यांनी न्यायालयाला सांगितले. पत्रकार परिषदेत तारखेचा उल्लेख झाल्याबाबतही त्यांनी संदिग्धता व्यक्त केली. यासंबंधित अधिक तपशील मात्र ते देऊ शकले नाहीत.

करीमुल्ला खानला "सीबीआय' कोठडी

मुंबई, २२ ऑगस्ट- मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी करीमुल्ला खान याला येत्या २९ ऑगस्टपर्यंत केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कोठडीत ठेवण्याचे आदेश शुक्रवारी विशेष "टाडा' न्यायालयाने दिले। करीमुल्ला खानला गुरुवारी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नालासोपाऱ्यातून अटक केली होती.
या बॉम्बस्फोटांच्या आधी रायगडमधील किनाऱ्यावर स्फोटके उतरवून घेण्यात आणि ते मुंबईपर्यंत आणण्यात खान याचा सहभाग होता, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. बॉम्बस्फोटांनतर तो फरारी झाला होता. या काळात त्याने दाऊद इब्राहिमच्या कराचीतील निवासस्थानी काम केले होते.

भूकंपाच्या भितीने लातूरकरही जागे!

लातूर - शुक्रवारी पहाटे चार वाजता भूकंप होणार आहे, जागे रहा, घराच्या बाहेरच बसा, अशी अफवा पसरल्याने संपूर्ण रात्र लातूरकरांनी अक्षरशः जागून काढली। अनेक नागरिक रस्त्यावरच येऊन बसले होते. नागरिकांत एक प्रकारची भीती परसरली होती. पण भूकंप न झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्‍वास टाकला.
पंधरा दिवसांपूर्वी अशाच अफवेने लातूरकरांना जागवले होते। गुरुवारी रात्री नागरिक आपल्या घरात झोपले होते. दीड-दोनच्या सुमारास अचानक पहाटे भूकंप होणार आहे जागे रहा, अशी अफवा पसरली. पाहता पाहता ही अफवा संपूर्ण लातूरमध्ये गेली. प्रत्येकांनी आपल्या नातेवाईकांना जीव वाचविण्यासाठी ही माहिती दूरध्वनी, मोबाईलवरून देण्याचा प्रयत्न केला.
अनेकांनी मित्रांना फोन करून याची माहिती दिली. एक दीड तासांत ही बातमी सगळ्या नगरात गेली. त्यामुळे नागरिकांत एकच भीती पसरली. जे शेजारी झोपेत होते, त्यांना देखील उठविण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. बहुतांश नागरिक रस्त्यावरच येऊन बसले होते. रात्रभर भूकंप हा एकच चर्चेचा विषय होता.

अत्राम यांचा अर्ज मुंबई न्यायालयानेही फेटाळला

मुंबई, २२ ऑगस्ट-राज्याचे माजी परिवहन मंत्री धर्मराम बाबा अत्राम यांचा जामीन अर्ज पुण्यातील न्यायालयाने फेटाळला असताना आता मुंबई उच्च न्यायालयानेही अत्राम यांचा अर्ज फेटाळून लावत त्यांना 28 ऑगस्ट पर्यंत वनखात्यापुढे हजर होण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून अत्राम फरार असून, वनखाते त्यांचा शोध घेत आहे. अत्राम यांच्यावर चिंकाराची शिकार केल्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यानंतर त्यांच्या विश्रामगृहातून चिंकाराचे अवशेषही वनखात्याने जप्त केले आहेत.
यानंतर आपल्याला अटक होईल या भीतीने अत्राम यांनी पुणे न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. पुणे न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. अत्राम हे तेव्हा पासूनच फरारी असून, त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजेही ठोठावून पाहिले परंतु आज उच्च न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

दाऊद आणि कंपनी पाकिस्तानातच!

मुंबई, २२ ऑगस्ट-संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या १९९३ मधील मुंबई बॉम्बस्फोटांत महत्त्वाची भूमिका बजावणारा फरार आरोपी करीमऊल्ला खान ओसाम खान तब्बल १५ वर्षांनी, गुरुवारी नालासोपाऱ्यात क्राइम ब्रँच युनिट सहाच्या हाती लागला. सध्या इस्टेट एजंट म्हणून काम करणाऱ्या आणि अजूनही थेट दाऊद इब्राहिमच्या संपर्कात असलेल्या खानच्या अटकेनंतर हाती लागलेल्या माहितीमुळे दाऊद आणि कंपनी पाकिस्तानमध्येच मुक्कामाला असल्याच्या भारताच्या म्हणण्याला पुष्टी मिळाली आहे.
मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्यासाठी शेखाडीत शस्त्रे तसेच आरडीएक्स उतरले ते खानच्याच देखरेखीखाली। शेखाडीतून हा साठा मुंब्रा ते वांदे तलाव आणि पुढे टायगर मेमनच्या माहीममधील बिल्डिंगमध्ये नेण्याची जबाबदारीही त्याने पार पाडली. दाऊदचा हस्तक एझाझ पठाणचा उजवा हात समजला जाणारा खान स्फोटानंतर जून ९३मध्ये दुबई आणि नंतर थेट कराचीत दाऊदच्या आश्रयाला गेला. तिथे दाऊद, अनीस यांच्या घरीच त्याचा मुक्काम होता. या दोघांचा बॉडीगार्ड म्हणून काम करणाऱ्या खानकडे त्यांचे फोन घेणे, महत्त्वाचे मेसेज त्यांना देणे अशाही जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. भारतातील युवकांना पाकिस्तानात घातपाती प्रशिक्षणास पाठवण्याचेही काम तो करीत होता. त्याच्यावर केंदीय अन्वेषण विभागाने पाच लाखांचे इनाम ठेवले होते.
फेब्रुवारी २००६मध्ये खान कराचीतून काठमांडू आणि तिथून भारतात परतून मिरारोडला आला. पुढे नालासोपाऱ्यातील समेळपाड्यात पत्नी, तीन मुले, मुलीसह त्याने मुक्काम ठोकला. युनिट सहाचे प्रमुख अन्सारी पीरजादे, सतीश गोवेकर, एपीआय पंढरीनाथ वाव्हळ, निकम, साळसकर, नेमळेकर, प्रदीप कदम यांनी गुरुवारी त्याच्या मुसक्या बांधल्या, अशी माहिती पोलिस सहआयुक्त (गुन्हे) राकेश मारिया यांनी दिली. खानला शुक्रवारी विशेष टाडा कोर्टात हजर करण्यात येणार असून नंतर सीबीआयकडे सुपूर्द करण्यात येईल.

सरकारच्या नाकर्तेपणामुळेच मराठी माणसावर अन्याय - राज ठाकरे

उस्मानाबाद, २२ ऑगस्ट - सरकार व विरोधीपक्ष यांच्या नाकर्तेपणामुळेच महाराष्ट्रात मराठी माणसावर अन्याय केला जात आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.
उस्मानाबाद जिल्ह्यातील पक्षाचे आजी, माजी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी लातूरहून तुळजापूरला जात असताना राज ठाकरे यांचे गुरुवारी (ता। २१) येथे शिवाजी पुतळ्याजवळ मनसेनेच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांची संख्या पाहून तेथेच ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली.
मराठवाड्यात पक्ष संघटना बांधणीसाठी मी दौऱ्यावर आलो आहे या दौऱ्यात कोठेही जाहीर सभा घेणार नाही, असे ठरविले होते, परंतु कार्यकर्त्यांनी दाखविलेले प्रेम लक्षात घेऊन सभा घ्यावी लागत आहे, असे स्पष्ट करून ठाकरे म्हणाले "लाखो मराठी तरूण बेरोजगार असताना परप्रांतीय मंडळी महाराष्ट्रात येऊन काम हिसकावून घेत आहेत। परप्रांतियाचे हे आक्रमण आपण किती दिवस सहन करायचे. परप्रांतियांना मी विरोध करतो म्हणजे देशाचे विघटन करीत आहे अशी टीका काही मंडळी करतात. भारतीय रेल्वे सर्व देशाची आहे पण नोकऱ्या देताना तेथे बिहारी व उत्तर प्रदेशातील लोकांना प्राधान्य दिले जाते हा समान विचार आहे का? असा सवाल करून ठाकरे यांनी महाराष्ट्रात उपलब्ध नोकऱ्याही मराठी तरूणांना मिळू द्यायच्या नाहीत हा या मागचा कट असल्याचा आरोप केला.
परप्रांतीय येऊन अनधिकृत झोपडपट्टी उभी करतात आपले सरकार मात्र अशा झोपडपट्टीवासीयांना २२५ चौरस फुटांचे घर मोफ त देते। मात्र राब राब राबणाऱ्या राज्यातील पोलिसांना घरे मिळू शकत नाहीत, अशी टीका करून राज ठाकरे यांनी मराठी माणसावर अन्याय होत असेल तिथे लाथ मारा, सतत जागता पहारा द्या, असे आवाहन केले.
ठाकरे यांच्यासोबत आमदार बाळा नांदगावकर, सरचिटणीस प्रविण दरेकर, शिरीष पारकर, बंटी मंजूळे, दिनेश देशमुख, सुनिल शिंदे, हेमंत पाठक आदी कार्यकर्ते होते. प्रारंभी सौ. निलाबाई विठ्ठल मंजूळे यांनी ठाकरे यांना औक्षवण केले. सायकलच्या साह्याने व्यायाम करीत वीज निर्मितीचा प्रयोग करणारा कळंब येथील युवक मधुकर बाबर याचा यावेळी ठाकरे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
ठाकरे यांचे आगमन होताच फटाक्‍यांची प्रचंड आतिषबाजी करीत ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. ठाकरे उस् मानाबादेत केवळ स्वागत स्वीकारणार, असे जाहीर झाले असताना शिवाजी चौकात प्रचंड संख्येने तरूणवर्ग जमला होता हे पाहून त्यांनी भाषण केले.

गुरुवार, 21 अगस्त 2008

समाजाला अधिकाधिक स्वस्त वैद्यकिय केंद्राची गरज-गोपिनाथ मुंडे

मुंबई, २१ ऑगस्ट- राजकारण करत असताना त्याला समाजकरणाची भक्कम जोड़ दिली पाहिजे तरच ते ख-या अर्थाने राजकारण असते व हे विचार आपल्या कृतीतून अमलात आणणारे जयप्रकाश ठाकुर व विनस कल्चरल असोसिएशन यांचे याबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो असे उदगार भाजपा नेते गोपिनाथ मुंडे यांनी काढले ।
विनस कल्चरल असोसिएशन या संस्थेतर्फे चारकोप विधानसभा मतदार संघातील वैद्यकिय सेवा केंद्राचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते; या वैद्यकिय सेवा केंद्रात तज्ञ डॉक्टर तसेच अत्याधुनीक सोयी सुविधा अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध करून दिल्या असून त्यामुले गोरगरिबांना याचा मोठा फायदा होईल असा विश्वासही त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला. या केंद्राच्या उद्घघाटनाला पूर्व केंद्रीय पेट्रोलियम मंत्री राम नाईक, मुंबई भाजपा अध्यक्ष गोपाल शेट्टी, भाजपा जिलाध्यक्ष योगेश सागर, महाराष्ट्र उपाध्यक्ष भाई गिरकर, यांच्या सह अनेक प्रतिष्ठित डॉक्टर व मान्यवर उपस्थित होते.
येणा-या दिवसांमधे वैद्यकिय सोयी-सुविधा अधिक खर्चीक होत जाणार असल्याचे सांगून त्यामुले अशी वैद्यकिय सुविधा केन्द्र अधिक मोठ्या प्रमाणावर सुरू केली गेली पाहिजेत असे आव्हानही या प्रसंगी बोलताना गोपीनाथ मुंडे यांनी केले । या प्रसंगी अनेक मान्यवरांनी काही लाखापर्यंतच्या देणग्याही या संस्थेकरीता जहीर केल्या.

विलासरावांचा आता राणेंवर 'प्रहार'

मुंबई, 21 ऑगस्ट- विलासरावांनी व्हिडीओकॉन उद्योगसमूहाला दिलेल्या जमिनीचा व्यवहार अनधिकृत असल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्याविरोधात बंडाचे निशाण फडकवणाऱ्या नारायण राणेंवर आता विलासरावांनीच प्रहार केला असून, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणताही विरोध न होता या व्यवहारावर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केल्याने आता राणे या प्रकरणी एकटे पडले आहेत.
या उलट मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर आता वरिष्ठांनाही विलासरावांची या प्रकरणी घेतलेली भूमिका योग्य वाटत आहे.
आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मुद्दा चर्चिला जाणार असल्याने आणि राणे या मुद्द्यावरून नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
राणेंनी या बैठकीला अनुपस्थिती लावत आपण अजूनही नाराज असल्याचे स्पष्ट केले. आणि आपण आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.
परंतु राणेंनी या बैठकीला अनुपस्थिती लावल्याने हा मुद्द्यावर अधिक विरोध होण्या आधीच या व्यवहाराला मंत्रिमंडळाने हिरवा झेंडा दाखवला.

पीपीपीकडून राष्ट्राध्यक्षपदासाठी झरदारींची उमेदवारी?

इस्लामाबाद, २१ ऑगस्ट-पाकिस्तानातील सत्ताधारी आघाडीत मतभेद गंभीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान पीपल्स पक्षाच्या वरिष्ठ नेत्यात झालेल्या बैठकीनंतर राष्ट्राध्यक्षपदासाठी पक्षाचे सहायक अध्यक्ष असिफ अली झरदारी यांचे नामांकण जाहीर करण्याची शक्यता आहे.
झरदारींनी काल आयोजित केलेल्या रात्रीभोजनात पक्षाच्या खासदारांनी त्यांच्या उमेदवारीस समर्थन व्यक्त करून 'सर्वात योग्य उमेदवार' म्हणून निर्वाळा दिला. आघाडीतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष मुताहिदा क्वामी मुव्हमेंटनेही झरदारींनास राष्ट्राध्यक्ष बनवण्याचे समर्थन केल्यानंतर याबाबत घडामोडीस सुरूवात झाली आहे.
एवढ्यातल्या मुलाखतीत झरदारींनी राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे खंडन केले होते, मात्र सत्ताधारी आघाडीतील सर्वात मोठ्या पक्षाच्या नात्याने पदावर अधिकार असल्याचे स्पष्ट केले होते.
सत्ताधारी आघाडीतील नेत्यांसोबत चर्चेनंतरच याबाबत अंतिम निर्णय घेणार असे त्यांनी पक्ष खासदारांना सांगितले आहे. माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी बडतर्फ केलेल्या न्यायाधीशांना परत सेवेत न घेतल्यास सरकारमधून बाहेर पडून विरोधात बसण्याची धमकी पीएमएल-एन पक्षाच्या नवाझ शरीफ यांनी दिली होती. या पार्श्वभूमीवर पीपीपीने झरदारी यांना प्रोजेक्ट केले आहे.

बहुप्रतिक्षीत "आयफोन' गुरूवारी मध्यरात्री पासून भारतीय बाजारात

नवी दिल्ली, २१ ऑगस्ट - असंख्य मोबाईल प्रेमींची शिगेला पोहोचलेली प्रतिक्षा आता संपलीअसून बहुप्रतिक्षीत "आयफोन' भारतीय बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी आज (गुरूवारपासून) मध्यरात्रीपासून दाखल होत आहे.
एअरटेल आणि वोडाफोन या दोन मोबाईल कंपन्या "३-जी' सुविधायुक्त "आयफोन' भारतीय बाजारात आणत आहेत.
यातील "८-जीबी' मॉडेलची किंमत ३१ हजार रूपये तर "१६-जीबी' मॉडेलची किंमत ३६ हजार ठेवण्यात आल्याचे कळते. मात्र ही किंमत अपेक्षेपेक्षा जास्त असल्याचे जाणकारांच्या मत आहे.
काही महिन्यांपुर्वी "आयफोन' हा इंटरेनट सुविधेने युक्‍त मल्टिमिडीया स्मार्टफोन ऍपल कंपनीने बाजारात आणून जगभर खळबळ उडवून दिली आहे.
ब्रिटन आणि जर्मनीत तर खरेदीसाठी हजारो ग्राहकांनी एकच गर्दी केली. लंडनमध्ये तर लांबच-लांबरांगा लागल्या होत्या.

सिमी राष्ट्रदोहीच! केन्द्र सरकार

नई दिल्ली, २१ ऑगस्ट- सिमी राष्ट्रदोही कारवाया करणारी दहशतवादी संघटना असल्याचे पुरावे केंद सरकारने बुधवारी सुप्रीम कोर्टात सादर केले. गुजरातच्या बॉम्बस्फोट मालिकेमागे सिमीच असल्याचा दावा करीत सिमीवरील बंदी उठवण्याचा दिल्ली हायकोर्टाचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी केंदाने या याचिकेद्वारे मुख्य न्यायमूर्ती के.जी.बालकृष्णन यांच्या खंडपीठापुढे केली आहे.
अहमदाबादच्या बॉम्बस्फोट मालिकेमागे सिमीचा हात असल्याचा सबळ पुरावा गुजरात पोलिसांच्या हाती लागला. सिमीच्या १० कार्यर्कत्यांना अटकही झाली. या आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार सिमी सध्या 'इंडियन मुजाहिदीन' या नावाने कारवाया करीत असल्याचे निष्पन्न झाले. या संघटनेने बॉम्बहल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली असल्याची माहिती केंद सरकारतफेर् बुधवारी सुप्रीम कोर्टाला दिली.
केंद सरकारने २००१ साली सिमीवर सर्वप्रथम बंदी घातली तेव्हापासून ती आजतागायत कायम आहे. दर दोन वर्षांनी केंद सरकार बंदीचा कालखंड वाढवल्याची अधिसूचना प्रसिद्ध करते. दिल्ली हायकोर्टाच्या न्यायाधिकरणाने तीन आठवड्यांपूवीर् सिमीच्या बाजूूने निकाल देताना बंदी कायम ठेवण्यासाठी पुरेसा पुरावा नसल्याचा निकाल दिला होता. सरकारने केवळ २००६ सालच्या मालेगाव येथील बॉम्बस्फोटांसंदर्भातील पुरावा न्यायाधिकरणापुढे मांडला, असे मत कोर्टाने व्यक्त केले होते. अलीकडेच राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातमध्ये दहशतवादी हल्ले झाले. तेथील राज्य सरकारांनी बॉम्बस्फोट मालिकांमागे सिमीचा हात असल्याचा पुरावा केंदाला सादर करण्याची आवश्यकता होती. गुजरात पोलिसांनी तो पोहोचवताच केंद सरकारने सुप्रीम कोर्टात अपिलाद्वारे हे तपशील सादर केले. त्याची सुनावणी आता २५ ऑगस्ट रोजी होईल.

स्पेन विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा १५३

मेड्रीड, २१ ऑगस्ट- विमानाच्या इंजिनाने पेट घेतल्याने स्पेनमध्ये झालेल्या अपघातातील मृतांचा आकडा आज (गुरूवारी) १५३ वर पोहोचला आहे। स्पेनच्या सरकारी सूत्रांनी बुधवारी हा आकडा १०० सांगितला होता.
विमानात १७२ प्रवासी आणि चालक दलाचे सदस्य होते। त्यातील १९ जण बचावले आहेत.
बुधवारी स्थानिक प्रमाणवेळेनुसार दुपारी अडीचच्या सुमारास हा अपघात घडला।
विमानाने बराजस विमानतळाच्या धावपट्टीवरून उड्डाण करताच डाव्या इंजिनाने पेट घेतला.

विडिओकॉनला मंजुरी, राण्यांचो 'पोपट'!

मुंबई, ऑगस्ट- विडिओकॉनला नवी मुंबईतील सिडकोची २५० एकर जमीन देण्याच्या वादग्रस्त निर्णयाला कोणतीही चर्चा न होता मंत्रिमंडळाची अंतिम मंजुरी मिळाली आहे. जमीन देण्याच्या निर्णयाने नारायण राणे आणि मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यातील या वादात राणेंचा पोपट झाला आहे.
विडिओकॉनला जमीन देण्याच्या निर्णयाबरोबर इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी आज मंत्रिमंडळाची बैठक झाली। नारायण राणे यांच्या राजीनाम्याबद्दल काहीच निर्णय होत नसल्याने लांबणीवर पडलेली राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज घेण्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ठरवले. त्यानुसार सकाळी १० वाजता ही बैठक सुरू झाली. मात्र, नाराज असलेले महसूलमंत्री या बैठकीला उपस्थित राहीले नाही.
त्यामुळे, विडिओकॉनला जमीन देण्याला कोणाचाही विरोध नाही, असे गृहीत धरून हा निर्णय मंत्रिमंडळाने मंजूर करून राणेंचा 'पोपट' केला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थित राहून या प्रकरणी नाराज असल्याचे संकेत राणे यांनी पक्षश्रेष्ठींना दिले आहे. तर राणे गैरहजर राहिल्याने मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना राणेंविरुद्ध कोलीत सापडले आहे.

बुधवार, 20 अगस्त 2008

स्पेनमध्ये विमान कोसळून ४५ ठार

माद्रिद, २० ऑगस्ट - माद्रिद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात "स्पेन एअर' च्या विमानात स्फोट होऊन विमानातील ४५ प्रवासी ठार झाले तर तितकेच जखमी झाल्याचे वृत्त आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी रात्री आठच्या सुमारास हा अपघात घडला.
अपघातग्रस्त "स्पेनएअर ५०२२ हे विमान माद्रिद कडून कॅनरी बेटावर असलेल्या लास पामास्‌ कडे निघाले होते.
विमानातील प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार मुख्य धावपट्टीवरून उड्डाण केल्यानंतर काही अवधीतच विमानाच्या मागील बाजूला स्फोट होऊन आग लागली. त्यानंतर जमिनीवर उतरविण्याच्या प्रयत्नात विमान कोसळले.
दरम्यान अपघातग्रस्तांच्या मदतकार्यास सुरवात झाली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता सूत्रांनी वर्तविली आहे.

कोल्हापूरात पोलिसांना महिलांकडून चोप

कोल्हापूर - मोरेवाडी येथील अवैध दारू हातभट्टयांवर कारवाईसाठी गेलेल्या राजारामपुरी पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्यासह सहा पो लिसांना महिलांनी बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजता घडली.
एका गर्भवती महिलेला कारवाईवेळी पोलिसांनी मारहाण केल्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी हा चोप दिला। हातभट्टीतील जळावू लाकूड, दगड आणि काठ्या यांचा वापर मारहाणीत करण्यात आला. तसेच पोलिस अधिकाऱ्याची रिव्हॉल्वर काढून घेण्याचाही प्रयत्न महिलांनी केला.
रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी पोलिसांची सुटका केली.
मारहाण केलेल्या महिलांच्या शोधासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कांजारभाट वस्तीवर छापा टाकून शोध मोहीम सुरू ठेवली होती.

भारताचे आणखी एक पदक निश्‍चित - बॉक्‍सिंगमध्ये विजयेंद्र कुमार उपांत्य फेरीत

बीजिंग, २० ऑगस्ट - भारतीय ऑलिम्पिकसाठी बुधवारचा दिवस दुहेरी आंनद घेवून आला आहे।
सुशील कुमारने वैयक्तिक पातळीवर कुस्तीत "ब्रॉन्झ'पदक मिळवून देवून नव्याने इतिहास लिहिला असताना, त्यापाठोपाठ विजयेंद्र यानेही बॉक्‍सिंगमध्ये अंतिम फेरी गाठून आणखी एक पदकाची निश्‍चिती केली आहे।
विजयेंद्र याने ७५ कि।ग्रॅ. च्या गटात ईक्‍युडोरच्या कार्लोस गोंगोरावर पहिल्यापासूनच वर्चस्व निर्माण करत ९-४ ने धूळ चारली.
त्यामुळे भारताचे आणखी एक पदक निश्‍चित झाले आहे.

मराठी अस्मितेविषयी आम्हाला कोणी शिकवू नये - राज ठाकरे

नांदेड, २० अगस्त - मराठी माणूस, मराठी भाषा हा आपल्यासाठी सर्वोच्च प्राधान्याचा विषय आहे। त्यामुळे कृपाशंकरसिंह यांनी आम्हाला मराठी अस्मितेचा विषय शिकवू नये, असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे लगावला. ते पत्रकारांशी बोलत होते.
मराठवाड्यातील पक्षबांधणी, पक्षसंघटनेची पुनर्रचना करुन संघटना बळकट करण्यासाठी आपण मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहोत, असेही त्यांनी सांगितले।
मुंबईत दुकाने, व्यापारी संस्थांवर मराठी भाषेचे फलक लावण्यासाठी मनसेची मोहिम सुरुच आहे; मुंबईच्या पालिका आयुक्‍तांनी तेथे दुकानांना नोटिसा देऊन मराठीत फलक लावण्याचे कळविले आहे, त्यामुळे त्यांच्या नोटीसीच्या मुदतीपर्यंत आम्ही वाट पाहू, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

साध्वीच्या ह्त्येप्रकरणी अरोपीचे चित्र प्रसिध्द !

मुंबई, २० ऑगस्ट, ऑगस्ट महिन्याच्या १० तारखेला पहाटे साडेचारच्या सुमारास कांदिवली येथील आनंदवन आश्रमातील एक ४५ वर्षीय महिला स्वामी चित्तकलानंद गिरी हिच्यावर चाकूच्या धारदार ह्त्याराने वार करून तिचा खून झाला होता. या प्रकरणाचा तपास करताच पोलिसांना त्याच आश्रमातील एक अन्य साधू फरार असल्याचे कलले. पोलिसांनी त्याच आश्रमातील पद्मनाभ याचा कसून तपास सुरू केला आहे .
कांदिवली पोलिसांनी त्या आरोपीचे चित्र जाहीर केले असून वय ६० ते ६५, ऊँची ५ फूट ७ इंच, रंग काला, मजबूत बांधा, केश काले-पांढरे, अंगावर भगवी वस्त्रे घालत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचप्रमाणे हा संशयित आरोपी इंग्रजी, हिन्दी व मल्यालम भाषा बोलतो व पायाने अधू असल्याने लंगडत चालतो, असे सांगितले. त्याचप्रमाणे पोलिसांनी आरोपीचे केश, दाढी असलेले व नसलेले असे दोन्ही फोटो जाहीर केले असून संबंधित व्यक्तीबाबत कुणालाही माहिती असल्यास त्यानी त्वरित कांदिवली पोलिस ठाण्यात ह्या दूरध्वनी क्रमांक २८०५०९०४ वर संपर्क साधावा. असे आवाहन पोलिसांनी केले आहे । या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेन्द्रकुमार जायसवाल आणि पोलिस निरीक्षक सुभाष वेले करीत आहेत !

लातूरची ओळख हरित जिल्हा व्हावी

लातूर, २० अगस्ट-राष्ट्रीय हरित सेनेतील विद्यार्थ्यांनी घराच्या परिसरात, गावात, आणि शेतात वृक्षारोपण करावे तसेच जिथे मोकळी जागा आहे त्या ठिकाणी वृक्षारोपण करुन लातूर जिल्ह्याची ओळख हरित जिल्हा म्हणून निर्माण करण्यासाठी नियोजनबध्द रीतीने सामाजिक वनीकरण विभागाने काम करावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्वातंत्रदिनी आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात केले।
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते। या वेळी सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक सी. एम. धारणकर यांनी जिल्ह्यातील वनीकरणाची माहिती देताना सांगितले की, लातूर जिल्ह्यात ७ हजार ३८० झाडे गायरान जमिनीवर, तर २ हजार १३५ झाडे खासगी जमिनीवर, आणि ५८० किलोमीटर रस्त्यावर झाडे लावण्यात आलेली आहेत. २००८ या वर्षात आणखी ३७५ हेक्टर जमीनीवर झाडे लावण्याचे उद्दिष्ट असून जिल्ह्यात साडेबारा लाख रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सामाजिक वनीकरण विभागातफेर् दहा लाख रोपं लावण्याचे उद्दिष्ट असून जिल्ह्यात सध्या ४५ जातींची पाच लाख झाडे उपलब्ध आहेत.
यावेळी नगराध्यक्ष अॅड. व्यंकट बेदे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. त्रिंबकदास झंवर, जिल्हाधिकारी एकनाथ डवले यांच्या हस्तेही वृक्षारोपण करण्यात आले.

निरीक्षकासह पोलिसांच्या कोठडीत वाढ

नाशिक, २० अगस्ट-हिरे-सोने चोरीचा परस्पर तपास करून हाती आलेला ऐवज स्वत:च हडप केल्याचा आरोप असलेल्या अंबड पोलिस ठाण्यातील तत्कालिन निरीक्षक बाबासाहेब बुधवंत यांच्यासह चार पोलिस कर्मचाऱ्यांच्या पोलिस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
या पाच कर्मचाऱ्यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून अटकपूर्व जामीन मिळविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सुप्रीम कोर्टाने जामीन फेटाळून त्यांच्या या प्रयत्नांना पूर्णविराम दिला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. बुधवंत यांच्यासह पोलिस शिपाई राजेंद नगरकर, बाळू वाघ, कैलास थेटे व विठ्ठल माळी यांच्याविरुध्द जुलैच्या पहिल्या आठवड्यात अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तीन महिन्यांपूवीर् कुरिअरच्या माध्यमातून शहरातील एका सराफाने हिरे, कच्चे सोने व सोन्याचे दागिने असा सुमारे २५ लाखांचा ऐवज मागविला होता। कुरिअर घेऊन येणारा ट्रक जकात भरण्यासाठी विल्होळी नाक्यावर थांबल्यावर हिरे व सोन्याचे पाकिट ट्रकमधून चोरीस गेले होते. या प्रकरणी तक्रार नोंदवून न घेता अंबड पोलिसांनी परस्पर तपास केला होता.
तपासादरम्यान तीन संशयितांना ताब्यात घेतले व खासगी गाडीतून संगमनेर गाठून चोरीस गेलेला ऐवज हस्तगत केला. पुढील कायदेशीर प्रक्रियेला फाटा देत त्यातील निम्मा ऐवज स्वत:च हडप केला होता. त्यानंतर २८ मे रोजी दाखल केलेल्या तक्रारीत केवळ १० लाखाचा ऐवज चोरीला गेल्याचे नोंदविण्यात आल्याचा आरोप या पाचही संशयितांवर ठेवण्यात आला आहे.

मंगलवार, 19 अगस्त 2008

बोरिवलीत ज्वेलरवर गोळीबाराचा प्रयत्न

मुंबई, १९ अगस्ट-बोरिवलीतले प्रसिद्ध ज्वेलर श्रीनिवास आचार्य यांच्यावर आज सकाळी दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. सुदैवानं, घाईगडबडीत त्यांचा नेम चुकला आणि आचार्य बचावले. हे हल्लेखोर हेमंत पुजारी टोळीचे असण्याची शक्यता आहे.
श्रीनिवास आचार्य आज सकाळी घरून आपल्या दुकानात जायला निघाले होते। ते त्यांच्या गाडीजवळ पोहोचले, तेव्हाच दोन जण समोर उभे ठाकले आणि त्यांनी दोन गोळ्या झाडल्या. पण त्या आचार्य यांच्या ब-याच लांबून गेल्या. त्या आवाजानं आजूबाजूची बरीच माणसं गोळा झाली. दोघांना पकडण्याचा त्यांनी प्रयत्नही केला, पण एक गोळी हवेत झाडून त्यांनी सगळ्यांना बाजूला सारलं आणि रिक्षातून पसार झाले.
हा हल्ला नेमका कोणत्या उद्देशानं झालं, श्रीनिवास आचार्य यांना लुटण्याचा हा प्रयत्न होता की धमकावण्याचा हे अद्याप कळू शकलेलं नाही. परंतु, हेमंत पुजारी गँगनं हा हल्ला केला असावा, अशी शक्यता आहे.

सोमवार, 18 अगस्त 2008

मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईत भोजपुरी चित्रपट बंद पाडला

मुंबई, १८ अगस्ट - येथील चेंबूरमधील नटराज चित्रपटगृहात सुरू असलेला भोजपुरी चित्रपट मनसेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडला. या चित्रपटगृहात "थैला नंबर ५०१' हा चित्रपट सुरू होता.
विजय गर्जे यांच्या नेत्रित्वाखाली ८ ते १० मनसे कार्यकर्त्यांनी रविवारी चित्रपटगृहात प्रवेश केला. तसेच चित्रपटगृहाच्या पडद्याचे नुकसान करत प्रेक्षकांना पळवून लावले. त्यानंतर चित्रपटगृहाबाहेरील पोस्टर्स, कटआऊट फाडून हे सर्वजण निघून गेले.
दरम्यान, गर्जे, चंद्रकांत सावंत तसेच इतर ८ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

"एम्स' मधील क्‍लिनिकल ट्रायलमुळे अडीच वर्षात ४९ बालकांचा मृत्यू

नवी दिल्ली, १८ अगस्ट- "ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस' (एम्स)मध्ये नवीन औषधे आणि उपचारपद्‌धतींसाठी घेतल्या जाणाऱ्या क्‍लिनिकल ट्रायलमुळे गेल्या अडीच वर्षांत ४९ बालकांना प्राण गमवावे लागले आहेत.
माहितीच्या अधिकारांतर्गत विचारल्या गेलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना ही धक्कादायक माहिती उघडकीस आली.
संस्थेच्या बालरोग विभागाने १ जानेवारी २००६ पासून ४१४२ मुलांवर अशाप्रकारच्या चाचण्या घेतल्या होत्या . त्यांतील तीन हजार मुले ही एक वर्षाच्या आतील होतील.

"बिग बॉस'च्या नजरकैदेत राहुल महाजन, संजय निरुपम आणि मोनिका बेदी

नवी दिल्ली- "बिग बॉस' या रिएलिटी शोमध्ये कोण कोण सहभागी होणार, याबद्दलची उत्सुकता संपली आहे। तीन महिने बिग बॉसच्या "काचेच्या घरा'त एकमेकांसोबत राहणाऱ्या चौदा सेलिब्रिटींची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
कलर्स वाहिनीवरुन प्रसारित होणाऱ्या "बिग बॉस'च्या दुसऱ्या भागात राहुल महाजन, कॉंग्रेस नेते संजय निरुपम, गॅंगस्टर अबू सालेमची मैत्रीण मोनिका बेदी, अभिनेत्री केतकी दवे, "बिग ब्रदर' या शोमध्ये शिल्पा शेट्टीवर वर्णद्वेषी टिप्पणी करणारी जेड गुडी हे सहभागी होणार आहेत.
त्यांच्यासोबत अभिनेत्री राखी विजयन, पायल रोहतगी, संभावना सेठ, मॉडेल जुल्फी सईद, गायक देबोजित सहा, राजा चौधरी, एहसान कुरेशी हे देखील शोमध्ये सहभागी होतील.
हे सर्वजण ८४ दिवस एका खास घरात एकत्र राहतील। या घरात टी.व्ही किंवा टेलिफोनसारख्या सुविधा नसतील. आणि त्यांच्यावर चोवीस तास "बिग बॉस'ची नजर असेल.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही या कार्यक्रमाची सूत्रधार असेल आणि केवळ तीच या स्पर्धकांशी संवाद साधेल.

अलविदा मुशर्रफ... अलविदा 'मुशर्रफ राज'

इस्लामाबाद, १८ अगस्त-गेली नऊ वर्षे पाकिस्तानवर सर्वार्थाने हुकूमत गाजवणा-या ‘ मुशर्रफ राज ’ ची आज अखेर इतिश्री झाली. राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी आज दुपारी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा देऊन पाकिस्तानला ‘ अलविदा ’ केले. ते संयुक्त अरब अमिरातीच्या आश्रयाला गेले असून, आता मुशर्रफ यांची गादी कोण सांभाळणार, याबाबतची उत्सूकता ताणली गेली आहे. पाकच्या इतिहासात प्रथमच एका महिलेला राष्ट्राध्यक्षपद देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
पाकिस्तानच्या संसदेत लष्करशहा मुशर्रफ यांच्याविरोधात महाभियोग खटला सुरु होणार होता. पेशाने आणि वृत्तीने फौजी असलेले मुशर्रफ या खटल्याचा समर्थपणे मुकाबला करतील, अशी अटकळ होती. परंतु जनरलनी लोकशाहीशी दोन हात करण्याऐवजी शस्त्र खाली टाकणेच पसंत केले. त्यापूर्वी त्यांनी पाकिस्तानच्या जनतेला उद्देशून इमोशनल भाषण केले. आपणावरील सर्व आरोप खोडून काढतानाच, त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. पदत्याग करताना त्यांचा चेहरा रडवेला झाला होता. पाकिस्तानी जनतेला खुदा हाफिज करत ते पायउतार झाले आणि विमानाने सौदी अरेबियाला रवाना झाले.

रविवार, 17 अगस्त 2008

महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी माणिकराव ठाकरे यांची निवड

मुंबई, १७ अगस्त - प्रभाराव यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्‍ती करण्यात आल्याने रिक्त झालेल्या महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी अखेर माणिकराव ठाकरे यांची निवड करण्यात आली.
निवडीबरोबरच जयवंतराव आवळे यांच्याकडे प्रदेश शाखेचे कार्यकारी अध्यक्षपद, गुरूदास कामत यांच्याकडे प्रचार आणि प्रसिद्धी समितीचे अध्यक्षपद, तर मुंबई शहर कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी कृपाशंकर सिंह यांची निवड करण्यात आली आहे.
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडून रविवारी ही घोषणा करण्यात आली.

पंजाबमध्ये अनेक गावांना पुराचा वेढा

जालंधर, १७ अगस्ट- सतलज नदीकाठच्या छित्ती बेन बंधा-याला तडा जाऊन बंधारा १०० फुटांपर्यंत फुटल्याने आलेल्या पुरात लोहियन परिसरातील असंख्य गावे जलमय झाली. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराला पाचारण करावे लागले.
हा बंधारा सतलजला जेथे मिळतो त्या मुंडीकलू या गावात फुटला. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडताच पुराचे पाणी झपाट्याने नजिकच्या गावांत पसरले. आजूबाजूच्या १० गावांमध्ये आठ ते दहा फूट पाणी साचले. पूरपरिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी हवाई पाहणी करण्यात आली. त्यानुसार, पुरात अडकलेल्यांना सोडवण्यासाठी लष्करी बोटी वापरून तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले.
बंधाऱ्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या मैदा, सज्जनवाल, मखी, सिंदरुर, खोसा, नवनपिंज खारोवल आदी गावांनाही पुराचा जोरदार तडाखा बसला.

फेडरर-वावरिंका जोडीने सुवर्ण जिंकले

बिजींग, १७ ऑगस्ट-जागतिक क्रमवारीत पहिल्‍या क्रमांकाचा टेनिस खेळाडू म्‍हणून ओळख असलेल्‍या रॉजर फेडरर आणि त्‍याचा सहकारी स्तानिसलास वावरिंका यांच्‍या जोडीने शनिवारी बिजींग ऑलम्पिक खेळांमध्‍ये युगुल टेनिस स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.
टेनिस कोर्टवर गेल्‍या पाच वर्षांपासून आपले वर्चस्‍व गाजवित असलेल्‍या फेडरर आणि वावरिंका यांनी एकत्र येउन स्वीडनचे सायमन एसपेलिन आणि थॉमस जोहानसन यांना ६-३, ६-४, ६-७, ६-३ ने हरवून स्विझरलॅण्‍डसाठी पदक जिंकले आहे।
ऑलम्पिकमध्‍ये गेल्‍या वेळी दोन वेळा अपयशाचा सामना करावा लागलेल्‍या फेडररने सुवर्णपदक जिंकल्‍यानंतर पचंड जल्‍लोष केला.

शनिवार, 16 अगस्त 2008

जितेंद्रकुमारचा बुक्का, भारतीयांना सुखद धक्का!

बीजिंग, १६ अगस्ट-भारतीय बॉक्सिंगपटू मेडल मिळविण्याच्या शर्यतीत आगेकूच करत असून अखिल कुमारनंतर ५१ किलो वजनी गटात जितेंद्रकुमारनेही उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. त्याने उजबेकिस्तानच्या तुलाश्बॉयला १३-६ अशा फरकाने पराभूत केले.
बीजिंग ऑलिंपिकमध्ये शनिवारची सुरूवात अॅथलेटिक्समध्ये काहीशी निराशाजनक झाल्यानंतर भारताच्या जितेंद्रकुमारने बुद्धी आणि कौशल्याची शानदार सांगड घालत प्रतिस्पर्धी उजबेकी बॉक्सरला चांगले नमोहरम केले. या लढतीत आक्रमणाबरोबरच बजावही तितका सुंदर केल्याने त्याला हे यश मिळवता आले.
चार राउंडमध्ये झालेल्या या लढतीत पहिल्याच राउंडमध्ये जितेंद्रने ४-१ अशी आघाडी घेतली. तुलाश्बॉय याला तीन राउंडपर्यंत केवळ तीनच अंक मिळवता आले. त्यामुळे तो लढतीत अनेकवेळा वैतागला आणि चिडून त्याने जितेंद्रकुमार याला दोनवेळा खाली पाडले. परंतु, त्याच्या या आक्रमतेला मनोधर्याने आणि चतुराईने सामना करत जिंतेद्रने विजश्री खेचून आणला.
आता पुढील सामना जिंकल्यावर जितेंद्र कुमारलाही निश्चित पदक मिळू शकते. आता भारतीय क्रीडा रसिकांच्या नजरा अखिलकुमारनंतर जितेंद्रकुमारवरही लागून राहिल्या आहेत.

आज मंत्री आहे...उद्याचे काही सांगता येणार नाही - राणे

सावंतवाडी, १६ अगस्ट - ""मी आज सिंधुदुर्गचा पालकमंत्री आहे; पण उद्या असेन की नाही, हे सांगता येणार नाही. सिंधुदुर्गच्या विकासासाठी मात्र कायम कार्यरत राहणार'' असे भावनिक उद्‌गार राज्याचे महसूलमंत्री नारायण राणे यांनी ओरोस येथे काढले.
कार्यक्रमानंतर या वक्तव्याबाबत विचारले असता, पद राहिले नाही, तरी राजकारणात मात्र असणारच असेही त्यांनी स्पष्ट केले.
राणेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। यावर निर्णय घेण्यासाठी कॉंग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर खल सुरू आहे. नेमक्‍या याच काळात गेले दोन दिवस राणे स्वातंत्र्यदिन कार्यक्रमासाठी पालकमंत्री या नात्याने येथे होते.
१४ ऑगस्टला एका वृत्तवाहिनीने "राणेंचा राजीनामा मंजूर झाल्याची' ब्रेकींग न्यूज दिली। यानंतर सगळ्या मिडीयाचा लक्ष राणेंच्या प्रतिक्रियेकडे लागला होता. प्रत्यक्षात ती ब्रेकींग न्यूज अफवाच असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर काल ओरोस येथे शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात राणेंनी आपण उद्या जिल्ह्याचा पालकमंत्री असेलच असे नाही. तरीही जिल्ह्याच्या विकासासाठी तत्पर राहणार. यासाठी जिल्हावासियांनी पाठिंबा द्यावा. असे आवाहन त्यांनी केले. यानंतर चहा पानाचा कार्यक्रम झाला. यातही ते नेहमी प्रमाणे "फ्रेश' मुडमध्येच होते.
जाहीर वक्तव्याबाबत विचारले असता ते फारसे बोलले नाहीत. आपण राजकारणात मात्र असणारच असेही त्यांनी अगदी आत्मविश्‍वासाने सांगीतले. यानंतर दोन -तीन तासातच मुंबईला रवाना झाले.

गुजरात स्फोटांमागे 'सिमी'चाच मास्टरमाइंड

अहमदाबाद, १६ अगस्त-संपूर्ण देशाला हादरवून टाकणा-या अहमदाबाद तसेच जयपूरमधील विध्वंसकारी बॉम्बस्फोटांचा गुंता सोडवण्यात गुजरात पोलिसांना अखेर यश आले आहे. बंदी घातलेल्या ‘ सिमी ’ या अतिरेकी संघटनेनेच हे बॉम्बस्फोट घडवल्याचे उघड झाले आहे. इंडियन मुजाहिद्दीन ही संघटना सिमीचाच एक भाग असल्याचा दावा करतानाच , या कटाचा मास्टरमाइंड ‘ सिमी ’ कार्यकर्ता मुफ्ती अबु बशीर याला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे.
गुजरातचे पोलिस महासंचालक पी। सी. पांडे यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन बॉम्बस्फोट कटाच्या सुत्रधारांना अटक करण्यात आल्याचे जाहीर केले. अहमदाबाद , जयपूरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांमागे सिमी संघटनेचे अतिरेकीच असल्याचा ठाम दावा त्यांनी यावेळी केला. सिमी या संघटनेवर बंदी घातली असल्याने इंडियन मुजाहिदीन नावाने त्यांच्या कारवाया सुरु होत्या. या कटाचा मुख्य सुत्रधार अबु बशीर याला आज उत्तर प्रदेशातील आजमगढ येथून अटक करण्यात आली. त्याशिवाय याआधीच सफदर नागोरी या सिमीच्या प्रमुखाला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत दहा आरोपींना केरळ , कर्नाटक , महाराष्ट्र आणि गुजरातच्या विविध भागांतून अटक करण्यात आली आहे , असे पांडे यांनी सांगितले.
गुजरातमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यासाठी तब्बल ४० जणांना खास ट्रेनिंग देण्यात आली होती. केरळच्या जंगलामध्ये त्यांना ट्रेनिंग देण्यात आले. बॉम्बस्फोटांचा कट आखण्यासाठी बडोदा , मुंबई आणि अहमदाबाद येथे सिमी कार्यकर्त्यांच्या बैठका झाल्या. यातील एक बैठक युनूस याच्या घरी झाली होती. एप्रिल २००८ मध्ये हा कट आखण्यात आला. स्फोटांसाठी वापरण्यात आलेली स्फोटके बाहेरच्या राज्यातून आणण्यात आली. त्यांची जुळणी मात्र अहमदाबादमध्ये करण्यात आली , अशी माहिती पोलिसांनी दिली. या कटाचा तपास करण्यात राजस्थान व महाराष्ट्र पोलिसांनीही मोलाची मदत केल्याचे त्यांनी सांगितले.

"याहू'ला "बॉम्बे'चे मुंबई करावे लागले!

पुणे, १६ अगस्ट- "बॉम्बे'चे मुंबई होऊन आता जवळपास एक तपाहून जास्त काळ लोटला आहे. तरीही काही संकेतस्थळांवर अजूनही मुंबईचा उल्लेख बॉम्बे असाच केला जातो. काही जागरूक वाचक "बॉम्बे'चा उल्लेख मुंबई करून घेण्यासाठी आजही प्रयत्नशील आहेत. वैभव देशपांडे हा त्यापैकीच एक. त्याच्या जागरूकतेमुळे "याहू'लाही "बॉम्बे'कडून मुंबईकडे वळावे लागले.
झाले असे की, बीजिंग ऑलिंपिकचे वृत्त देताना "याहू डॉट कॉम'वर मुंबईचा उल्लेख "बॉम्बे' केला असल्याचे देशपांडे याच्या लक्षात आले। त्याने तातडीने "याहू'शी संपर्क साधला आणि मुंबई हेच आता या शहराचे अधिकृत नाव असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले. विशेष म्हणजे "याहू'नेही ही आपली चूक लगेचच मान्य केली आणि त्वरित दुरूस्त करण्याचे आश्‍वासनही दिले.
इतरांच्या भाषेबद्दल किंवा संस्कृतीबद्दल द्वेष बाळगण्यापेक्षा आपण आपल्या भाषेबद्दल, संस्कृतीबद्दल जागरुक असले पाहिजे. कारण आपण स्वतःच्या भाषेचा आदर केला, तरच इतर लोक त्याचा आदर करतील, असे वैभवला वाटते.

गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात हिवरे बाजार ग्रामपंचायत प्रथम

पुणे- १६ अगस्त- महाराष्ट्र शासनाच्या गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २००६-०७ चे निकाल काल स्वातंत्र्यदिनादिवशी जाहीर झाले।
यावर्षी पहिले तीनही क्रमांक हे विभागून देण्यात आले आहेत.
प्रथम क्रमांक अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे-बाजार ग्रामपंचायतीला आणि सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्‍यातील कोरेगाव ग्रामपंचायतीला विभागून मिळाला।
द्वितीय क्रमांक (विभागून)- आसगाव (ता. सातारा, जि. सातारा), चिचिटोला (ता. खडक-आर्जुणी, जि. गोंदिया)
तृतीय क्रमांक (विभागून)- साहिले (ता।संगमेश्‍वर, जि. रत्नागिरी) ,चाफ्याचा पाडा (ता. सटाणा, जि. नाशिक)
ईश्‍वरभाई पटेल, चंदीचरण बेग आणि शहाजी क्षीरसागर यांच्या त्रिस्तरीय समितीने अभियाना अंतर्गत गावांची पहाणी केली होती.

चंद ग्रहणाबद्दल गैरसमज नको

नाशिक, १६ अगस्त-रक्षाबंधन आणि चंदग्रहण एकाच दिवशी येत असले, तरी ग्रहणाचे वेध हे दुपारी तीन वाजून ५४ मिनिटांपासून सुरू होत आहेत. त्यामुळे दुपारपर्यंतचा काळ हा शुभ आहे, त्यावेळेत पूजाअर्चा व रक्षाबंधन करण्यास काहीच अडचण नाही, असे आवाहन सनातन वैदिक धर्मसभेचे अध्यक्ष भालचंद शौचे यांनी केले आहे.
शनिवारी रक्षाबंधनाच्या दिवशी खंडग्रास चंदग्रहण आहे। ग्रहण उत्तररात्री एक वाजून सहा मिनिटांपासून पहाटे चार वाजून १५ मिनिटांपर्यंत राहील. या ग्रहणाचे वेध शनिवारी दुपारी तीन वाजून ५४ मिनिटांपासून लागतील. वेध लागल्यापासून ते ग्रहण सुटण्यापर्यंतचा काळ कुठल्याही शुभ कार्यासाठी अशुभ मानला जातो. त्यामुळे रक्षाबंधनाबाबतदेखील लोकांमध्ये तर्कवितर्क लावले जात आहेत.
शनिवारी पहाटेपासून ते दुपारपर्यंतच्या वेळेत (वेधापूवीर्ची) पूजाअर्चा, जप, होमहवन, भोजन व रक्षाबंधनास काहीही अडचण नाही, असेही शौचे यांनी सांगितले.

शुक्रवार, 15 अगस्त 2008

वाशी खाडी पूल १२ लेनचा!

ठाणे, १५ अगस्ट- शीव-पनवेल हायवेवर मानखुर्द-वाशीदरम्यान उभारण्यात आलेला दुसऱ्या वाशी खाडी पूल (ठाणे खाडी पूल) १२ लेनचा करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून नजीकच्या काळातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्याचा त्यामागचा उद्देश आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) हा प्रस्ताव मांडला आहे. पुलाच्या रुंदीकरणाचे हे काम एमएसआरडीसी करणार असून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती एमएमआरडीएकडे करण्यात आली आहे. या कामासाठी ४०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
शीव ते पनवेल रस्ता १४ लेनचा होणार आहे। त्यातील दहा लेन वाहतुकीसाठी, तर दोन्ही बाजूंना दोन-दोन लेनचे सव्हिर्स रोड असतील. या दहा लेनमधून धावणाऱ्या वाहनांची पुढे खाडी पुलावर कोंडी होऊ नये, यासाठी पुलाचे रुंदीकरण आवश्यक आहे. एमएमआरडीएचे चेअरमन या नात्याने मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंजुरीनंतर पुलाचे रूंदीकरण मागीर् लागेल. टेंडर काढल्यापासून तीन वर्षात पुलाचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
नवी मुंबईची लोकसंख्या व शहरातील वाहनांची संख्या झपाट्याने वाढते आहे। मुंबई-पुणे एक्प्रेसवेवरून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. न्हावा-शेवा मार्ग झाल्यानंतर वाशी खाडी पुलावरून मुंबईकडे येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ अपेक्षित आहे. रायगड जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ उभा राहणार आहे. नवी मुंबई-रायगडमध्ये उभारल्या जात असलेल्या १२ एसईझेडमुळे दहा लाख रोजगार निर्माण होणार आहेत. त्यातून वाहतुकीचा बोजा वाढणार, हे स्पष्ट असल्याने रुंदीकरणाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
पहिला वाशी खाडी पूल अपुरा पडू लागल्याने दुसरा पूल उभारण्याचे राज्य सरकारने एप्रिल १९८५ मध्ये ठरवले. त्याचे काम १७ फेब्रुवारी १९८७ रोजी सुरू होऊन ५ एप्रिल १९९७ रोजी पूर्ण झाले. त्यासाठी ११९ कोटी, ३७ लाख रु. खर्च आला. हा पूल उभारताना, सन २००१ मध्ये खाडी पुलावरून रोज एक लाख, १७ हजार, ८०० पॅसेंजर कार युुनिट वाहतूक होईल, असे अपेक्षित होते. नंतरच्या काळात त्यात मोठी वाढ झाल्याने पूल रुंदीकरण आवश्यक ठरले आहे.

मुंबईसाठी स्वतंत्र निधी द्या

मुंबई, १५ अगस्ट- मुंबईतील झोपड्यांचा प्रश्न मिटवण्यासाठीही मुंबईकडून केंदाला मिळणाऱ्या रकमेपैकी १० टक्के रक्कम महापालिकेला देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार मोहन रावले यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे केली आहे.
हा निधी मिळाल्यास मुंबईतील जुन्या बिल्डिंगांचा प्रश्न सोडवता येईल. तसेच पालिकेच्या शाळांतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुविधा पुरवता येतील, असेही त्यांनी सुचवले आहे. अमरनाथमध्ये होणारा संघर्ष टाळण्यासाठी अमरनाथ बोर्डाला संपूर्ण स्वायत्तता द्यावी, असेही त्यांनी सुचवले आहे. या बोर्डाच्या कामकाजात राज्यपालांना हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशाच्या जनतेच्या भावनांची दखल घेत वादग्रस्त जागा अमरनाथ बोर्डाला देण्यात यावी; अशी मागणीही त्यांनी या पत्रात पंतप्रधानांकडे केली आहे.

पुण्यातील मर्सिडिस बेंझ शाळेत "मनसे'कडून तोडफोड

पुणे १५ अगस्ट - स्वातंत्र्यदिनी हिंजवडी येथील मर्सिडिस बेंझ इंटरनॅशनल शाळेमध्ये ध्वजारोहण न केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी शुक्रवारी या शाळेत तोडफोड केली।
मनसेच्या कार्यकर्त्यांनी शाळेच्या आवारातील फर्निचरची आणि सुरक्षा रक्षकाच्या केबिनची तोडफोड केली. घटनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
संपूर्ण देशभरात शुक्रवारी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असताना बेंझ शाळेतील घटनेमुळे त्याला गालबोट लागले.

ठाण्यात राष्ट्रध्वजाचा अवमान

ठाणे, १५ अगस्ट-राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाच्या कार्यर्कत्यांनी शुक्रवारी नौपाड्यातील एका दुकानासमोर निदर्शने केल्यानंतर नौपाडा पोलिसांनी या दुकानमालकाविरोधात गुन्हा नोंदवला. स्नेहल शहा असे या दुकानमालकाचे नाव आहे.
गोखले रोडवर शहा यांचे इनर टच हे अंतर्वस्त्रांचे दुकान आहे. शुक्रवारी स्वातंत्र्यदिनानिमित्त या दुकानात करण्यात आलेल्या सजावटीत भारताच्या राष्ट्रध्वजाची प्रतिमाही तयार करण्यात आली होती. मात्र, राष्ट्रध्वजातील पांढऱ्या रंगाच्या जागी अंतर्वस्त्रांचा वापर करण्यात आला होता. या प्रकारामुळे खवळलेल्या रिपब्लिकन कार्यर्कत्यांनी या दुकानावर हल्लाबोल चढवला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या कार्यर्कत्यांनी केलेल्या फिर्यादीनंतर नौपाडा पोलिस ठाण्यात दुकानमालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.

साताऱ्यात एसटी बसची तोडफोड

सातारा, १५ अगस्ट - साताऱ्यातील मध्यवर्ती एस. टी. स्थानकावर शुक्रवारी सकाळी काही जणांच्या जमावाने बसगाड्या आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉलची मोडतोड केली.
शहरात गुरुवारी एस. टी. बसखाली सापडून एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यामुळेच जमावाने ही मोडतोड केली असण्याची प्राथमिक शक्‍यता आहे. या प्रकरणी पोलिस तपास सुरू आहे.

पंतप्रधानांच्या भाषणावर अडवाणी नाराज

नवी दिल्ली, १५ अगस्ट - संसद सदस्यांना लाच देण्याच्या प्रकरणाचा उल्लेख स्वातंत्र्यदिन सोहळ्यातील भाषणात पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी न केल्याबद्दल भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आज (शुक्रवारी) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "या लाचखोरी प्रकरणामुळे लोकशाहीवरील विश्‍वासाला तडा केला आहे. हीच परिस्थिती आणीबाणीच्या काळात होती,' असे अडवाणी यांनी म्हटले आहे.
"दोनवेळा लोकांचा लोकशाहीवरील विश्‍वास डळमळीत झाला। पहिल्यांदा १९७५ मध्ये. जेव्हा, घटनात्मक अधिकारांचा दुरुपयोग करून आणीबाणी लादण्यात आली. तो स्वतंत्र भारताच्या इतिहासावरील डाग आहे. यावर्षी दुसरा डाग पडला. आपण आतापर्यंत निवडणुकांमध्ये पैशाचा वापर होत असल्याची तक्रार करीत होतो, तथापि, यावेळी थेट संसदेवर प्रभाव पाडण्यासाठी धनशक्तीचा वापर झाला,' अशी टीका अडवाणी यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
ते म्हणाले, "पंतप्रधान आपल्या भाषणात या प्रकरणाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष उल्लेख करतील, अशी मला अपेक्षा होती. अमरनाथ वादाचा उल्लेख त्यांनी केला असला, तरी याप्रकरणाचा उल्लेख करणे अत्यावश्‍यकच होते.'

बॉक्सिंगच्‍या प्रीक्वार्टर फाइनलमध्‍ये जितेंद्र

भारताच्‍या जितेंद्रकुमारने तुर्कीच्‍या उलास फुर्कान मेमिसचा तीनपेक्षा कमी फे-यांमध्‍ये पराभव करीत बॉक्‍सींगमध्‍ये ईवेट स्पर्धेच्‍या प्री क्वार्टर फाइनलमध्‍ये प्रवेश केला आहे.
ऑलम्पिकमध्‍ये पदार्पण करणारा जितेंद्रने जेव्‍हा तिस-या फेरीची सुरुवात केली त्‍यावेळी तो 13-2 ने पुढे होता. तर त्‍याचा प्रतिस्‍पर्धी मेमिस साफ बचावात्‍मक खेळ करीत होता. आशियन चॅम्पियनस स्‍पर्धेतील कास्य पदक विजेता असलेल्‍या जितेंद्रने सुरुवातीपासूच आक्रमक पवित्रा घेत प्रतिस्‍पर्ध्‍याला हतप्रभ केले.

गुरुवार, 14 अगस्त 2008

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी माणिकराव ठाकरेंची वर्णी

मुंबई, १४ ऑगस्ट- प्रभाराव यांची हिमाचलच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर रिक्त झालेल्या कॉग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी राज्यमंत्री माणिकराव ठाकरे यांची वर्णी लागल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
अनेक दिवसांपासून या पदासाठी राज्यात रस्सीखेच सुरू आहे. कॉग्रेसचे अनेक नेते दिल्ली वारी करून थकल्यानंतर आता या पदावर अचानक स्पर्धेत नसलेल्या माणिकरावांचे नाव आल्याने राज्यातील नेत्यांसह कार्यकर्तेही बुचकळ्यांत पडले आहेत.
पतंगराव कदम यांना प्रभारीप्रदेशाध्यक्ष करण्‍यात आल्याने त्यांच्या समर्थकांच्या आशा अधिक उंचावल्या होत्या, परंतु आता माणिकरावांचे नाव यात आल्याने त्यांचे समर्थकही नाराज झाल्याचे समजते.

नारायण राणे नवा पक्ष स्थापणार

मुंबई, १४ ऑगस्ट- मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी असलेल्या मतभेदामुळे आपल्या महसूल मंत्री पदाचा राजीनामा दिलेल्या नारायण राणे यांनी आता आपल्या समर्थकांची जमवाजमव केली असून, ते स्वातंत्र्य दिनानंतर नवा पक्ष स्थापन करण्याची दाट शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांना कॉग्रेस पक्ष श्रेष्ठींनी पुन्हा एकदा अभय देत 'जुने ते सोने' हा पाढा राणेंपुढे वाचल्याने व्यथित झालेल्या राणेंनी आता बंडाचे निशाण फडकवण्याची तयारी सुरू केल्याचे समजते। राणे सध्या कोंकण दौऱ्यावर आहेत.
दरम्यान त्यांनी आपल्या समर्थकांची जमाजमव सुरू केली आहे। येत्या दोन दिवसांमध्ये राणे मुंबईत एक बैठकही घेण्याची शक्यता आहे.
राणे समर्थकांसह त्यांनीही या बाबतीत मौन पाळल्याने याला दुजोरा मिळत असून, राणेंच्या पाठीशी 30 ते 32 आमदारांचा फौजफाटा असल्याचे त्यांच्या निकटवर्तियांचे म्हणणे आहे. या आमदारांची संख्या पाहता राज्यातील अनेक पक्षांना राणेंनी सुरुंग लावण्याची तयारी पूर्णं केल्याचे दिसून येते.

बुधवार, 13 अगस्त 2008

सायनाचा 'सायोनारा', आव्हान संपुष्टात

बीजिंग, १३ अगस्ट-ऑलिंपिकमध्ये पहिल्या दिवसापासून जिगरबाज खेळ करून ऑलिंपिकच्या बॅडमिंटन स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारणा-या सायना नेहवालचं आव्हान अखेर आज संपुष्टात आलं. जागतिक क्रमवारीत ३० व्या क्रमांकावर असलेल्या इंडोनेशियाच्या मारिया युलान्तीनं तिला नमवलं.
सामन्याची सुरुवात झाली, ती सायनाच्या बाजूनं। तिनं पहिला गेम जिंकला, पण त्यासाठी तिला बरंच झगडावं लागलं. २०-१६ अशी सायना आघाडीवर होती. पण सलग चार पॉइंट मिळवत युलान्तीनं बरोबरी केली. मग शेवटी नेटजवळ थरारक खेळ करत सायनानं हा गेम २८-२६ असा जिंकला. तिच्यातला आत्मविश्वास स्पष्ट जाणवत होता आणि तो स्वाभाविकही होता. कारण, आधीच्या सामन्यात वर्ल्ड रँकिंगमध्ये पाचव्या स्थानावर असलेल्या हाँगकाँगच्या चेन वँगचं आव्हान तिनं दणक्यात परतवून लावलं होतं.
पण दुस-या गेममध्ये मारियानं आपले काही ठेवणीतले शॉट्स खेळत सायनाला सतावलं. हा गेम तिनं २१-१४ असा जिंकला. त्यामुळे दबावाखाली आलेली सायना तिस-या गेममध्येही प्रभावहीन ठरली आणि हा गेम तिनं १५-२१ असा गमावला. या पराभवामुळे सायना ऑलिंपिकमधून बाहेर पडली आहे. भारतीयांच्या पदकाच्या आशा त्यामुळे मावळल्या आहेत. आता सगळ्यांचंच लक्ष आहे, पेस-भूपती जोडीकडे.