शनिवार, 28 जून 2008

ग्रामीण शाळा बंद पडण्याच्या मार्गावर!

सम्पादकीय

ग्रामीण शाळा बंद पडण्याच्या मार्गावर

हल्ली सर्वच राजकीय पक्षांना मराठीविषयी अचानक प्रेम दाटून आल्याचे सर्वत्र दिसते। दुकानांच्या इंग्रजी पाट्या हटविणे, बॉम्बे, पुना चे मुंबई, पुणे केले. महापालिका, न्यायालयांमधून मराठी कामकाज व्हावे यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत राज्यात शैक्षणिक प्रगती कशी उंच भरारी मारीत आहे हे दाखविण्यासाठी शासनातर्फे कागदपत्रे रंगवली जात आहेत. पण प्रत्यक्षात मराठी भाषा आणि मराठी शाळांची अवस्था काय आहे याची दखल कोण घेणार?
सगळीकडे मराठीविषयी दाटून आलेल्या प्रेमाचे प्रदर्शन सुरू असताना पुणे जिल्हा परिषदेकडे यंदा एकूण 305 नव्या शाळांसाठी प्रस्ताव दाखल झाले आहेत। त्यापैकी 200 प्रस्ताव फक्त इंग्रजी शाळांसाठी आहेत तर मराठी शाळा सुरू करण्याची तयारी दाखवणारे फक्त 98 आहेत। त्यामुळे टक्केवारीत इंग्रजी-मराठी शाळेचे प्रमाण पाहिल्यास ते 70:30 असे होते. त्यामध्ये 70 टक्के इंग्रजी शाळा या भरमसाठ शुल्क आकारण्यासाठीच असतात की काय, असा प्रश्न पडतो. पर्यायाने अशा शाळेत शिकणारे विद्यार्थी धड इंग्रजी बोलू शकत नाहीत आणि धड मराठीतही बोलू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. विद्यार्थ्यांची मधल्यामध्ये गोची होते. याकडे कोणीच लक्ष देत नाही. "बा बा ब्लॅक शीप हॅव यू एनी वूल' ही कविता शिकवताना विद्यार्थ्यांनी "शीप' कुठे पाहिलेले असते?
"लंडन ब्रिज इज फॉलिंग डाऊन' म्हणताना हा लंडनचा ब्रिज शिक्षकांनीही पाहिलेला नसतो. "रेन रेन गो अवे कम अगेन अनादर डे' या कवितेचा आपल्या "येर येरे पावसा' म्हणत पावसाला बोलावणाऱ्या कृषि संस्कृतीशी कसा मेळ घालणार? या बालमनांवर नेमके काय बिंबवायचे आहे याचा विचार पालकांनी करायला हवा. हव्यासापोटी हा इंग्रजीचा अट्टाहास कशासाठी?
महाराष्ट्राची आर्थिक पाहणी-2008 या सर्व्हेक्षणात महाराष्ट्रातील शैक्षणिक प्रगतीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. हा अहवाल कागदावर जरी उत्तम दिसत असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती मात्र अत्यंत गंभीर आहे यामध्ये शहरी व ग्रामीण असे भाग केलेले नाहीत. शहरांमधून शैक्षणिक प्रगती होत असताना ग्रामीण भागात मात्र शैक्षणिक अधोगती होताना दिसत आहे. याला सर्वस्वी जबाबदार असणाऱ्या सरकारने वस्तुस्थिती लपवून हा आलेख तयार केला असून प्रत्यक्षात खेडेगावातील शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत।
या कागदोपत्री आलेखानुसार राज्यात 1960 साली 34,594 शाळांमधून 41 लाख 78 हजार मुले प्राथमिक शिक्षण घेत होती. 1980 मध्ये 51,045 शाळांमधून 86 लाख 92 हजार, 2000-01 मध्ये 65,960 शाळांमधून 1 कोटी 18 लाख 57 हजार तर 2007-08 या वर्षात 69,330 शाळांमधून 1 कोटी 15 लाख 71 हजार मुलांनी शिक्षण घेतल्याचे दिसते. मात्र आकडेवारीवरून समाधान मानण्यात काहीच अर्थ नाही. कारण यामध्ये मराठी माध्यम किती? इंग्रजी माध्यम किती? शहरांमधील शाळा किती? ग्रामीण भागातील शाळा किती? याचा काहीच विचार केलेला दिसत नाही. फक्त 34 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक हे धोरण राबवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर मात्र शिक्षण खात्याकडून घोर अन्याय होताना दिसत आहे।
कोकणातील उदाहरणादाखल रत्नागिरी जिल्ह्याचा अधिकृत अहवाल पाहिल्यास 2,669 प्राथमिक शाळांमधून 2 लाख 1 हजार 49 मुले शिकत असल्याचे आढळून येते याची सरासरी काढल्यास फक्त 72 मुले प्रत्येक शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिकत आहेत. याच जिल्ह्यातील गणपतीपुळे गावातील प्राथमिक शाळेचे उदाहरण घेतल्यास या शाळेत यावर्षी इयत्ता 1लीत फक्त 9 मुले, इयत्ता 2 री -10 मुले, इयत्ता 3 री मध्ये फक्त 2 मुले तर इयत्ता 4 थी मध्ये 6 मुले शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांची पटसंख्या पाहून येथे फक्त 2 शिक्षकांना नेमण्यात आले आहे. इयत्ता पहिली ते चौथीच्या चार वर्गांसाठी फक्त दोन शिक्षकांनी कसे आणि काय शिकवायचे? त्यामुळे पहिली व दुसरी एकत्र आणि तिसरी व चौथी एकत्र असे 2 वर्गच दिवसभर चालवावे लागतात. मग या अवस्थेत येथील मुले काय शिकणार? शिक्षक तरी कसे काय शिकविणार? शासन मात्र 34 मुलांसाठी 1 शिक्षक या धोरणावर ठाम असल्याने या शाळेला 2 पेक्षा जास्त शिक्षक देऊ शकत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा पायाच कच्चा राहिल्यावर पुढे जाऊन हे काय दिवे लावणार?
ग्रामीण भागातील तरुण रोजगाराच्या शोधात शहरांकडे वळत आहे. तेथे नोकरी धंद्याची सोय होताच एखादं घर घेऊन तेथेच संसार थाटतो. त्यामुळे त्याची मुले शहरात वाढतात. शिक्षण घेतात. त्यामानाने हल्ली ग्रामीण भागातील मुलांमध्ये घट होत आहे. यावर्षी पहिलीच्या वर्गात फक्त 9 मुले आहेत. पुढच्या वर्षी ती 5 वर येईल. आणखी 2-4 वर्षांनी पहिल्या इयत्तेमध्ये मुलेच असणार नाहीत. त्यावेळी काय? त्या शाळा बंद पडल्यास गावातील गोरगरीब 2-4 मुलांनी कोठे शाळेत जायचे? या गंभीर प्रश्नाकडे लक्ष कोण देणार?
मराठी माध्यमातून शिकूनही इंग्रजीतून उत्तम बोलू, लिहू शकणारे जयंत नारळीकरांसारखे थोर शास्त्रज्ञ तयार झालेच ना? मग मराठी माध्यमांच्या शाळांबाबत पालक आणि सरकार एवढे उदासिन का? जगातल्या अतिप्रगत राष्ट्रात इंग्रजीतून सर्व व्यवहार चालवणारी राष्ट्रे किती आहेत? जपान, चीन, जर्मनी, फ्रान्स या देशात कुठे इंग्रजीला एवढे महत्त्व दिले जाते? मात्र हे कोणीच लक्षात घेत नाही. या साऱ्याचा गांभीर्याने विचार करायची आज खरी गरज आहे. -
राजेश सावंत

आता सलमानचाही ब्लॉग

ब्लॉग लिहिण्याची 'लागण' आता सलमान खानलाही झाली आहे। अमिताभ बच्चन, आमीर खान यांच्यानंतर आता सलमान खानही ब्लॉग लिहिणार आहे.
सलमानचे वडिल सलीम खान यांनी बॉलीवूडचे अनेक हिट चित्रपट लिहिले आहेत। सहाजिकच सलमानलाही आपल्यातल्या लेखकाला जागे करायचे आहे. खरे तर त्याने याच्या आधीही लेखनाचे काही प्रयोग केले आहेत. त्याने अनेक चित्रपटांच्या कथा लिहिल्या आहेत. त्याच्याच एका कथेवर 'वीर' हा चित्रपट तयार होतो आहे. सलमानने लिखाणाला सुरवात केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एका वेबसाईटवर त्याचे विचार वाचायला मिळतील, असेही ते म्हणतात.
सलमानचा एक टिव्ही शो' दस का दम'ही लवकरच सुरू होतो आहे. तो त्याच्या प्रचारात गुंतला आहे. आयपीएलच्या फायनलमध्ये तो या चित्रपटाची प्रसिद्धी करणार आहे.

चीन - ऑलिंपिकसाठीची मैदाने बांधून पूर्ण

बीजिंग - नुकत्याच झालेल्या भूकंपाच्या पार्श्‍वभूमीवरही चीनमधील ऑलिंपिकच्या पूर्वतयारीची सर्व कामे वेळेत पूर्ण होत आहेत। ऑलिंपिकचा उद्‌घाटनाचा आणि समारोपाचा सोहळा रंगणाऱ्या पक्ष्याच्या घरट्याच्या आकाराच्या मुख्य मैदानाचे काम पूर्ण झाल्याचे शनिवारी जाहीर करण्यात आले. हे मैदान आता पूर्ण क्षमतेने वापरता येऊ शकते, असे चीनमधील अधिकृत वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
येत्या ऑगस्टमध्ये ऑलिंपिक स्पर्धा होणार आहेत. ऑलिंपिकमधील विविध क्रीडाप्रकारांसाठी जलतरण तलाव आणि ३७ छोटी मोठी मैदाने बांधून पूर्ण करण्यात आली आहेत. यापैकी काही बंदिस्त आहेत, तर काही खुली मैदाने आहेत. मुख्य मैदानाची रचना स्वित्झर्लंडच्या हरझॉंग, डिमेरॉन आणि चीनमधील वास्तूरचनाकार ली झिगॅंग यांनी केली आहे.

पोलीसांनी दखल न घेतल्याने महिलांनीच केले दारूअड्डे उद्‌ध्वस्त!

आष्टी - तालुक्‍यातील धानोरा, पिंपळा आणि अंभोरा येथील महिलांनी दारूबंदीसाठी आक्रमक पवित्रा घेऊन आंदोलन सुरू केले आहे।
महिलांनी १९ जूनला अंभोरा पोलिसांकडे निवेदन देऊन दारूबंदीची मागणी केली होती; परंतु दारू विक्रेत्यांवर कारवाई झाली नाही। त्यामुळे या महिलांनी ग्रामपंचायत सदस्य अनसूया शेळके व किसनाबाई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी रात्री गावातच मोर्चा काढला आणि गावातील तब्बल ११ दारूअड्डे उद्‌ध्वस्त केले.
गावकऱ्यांनी या आंदोलनाचे स्वागत केले। ज्या ज्या गल्लीत हा मोर्चा जाईल तिथे तिथे फटाके वाजवून महिलांचे स्वागत केले. काही तरुणांनी गावातील मटक्‍याच्या साहित्याची होळी केली. त्यामुळे गावात आता दारूबंदीबरोबर मटकाबंदीही झाली आहे.
पिंपळा येथेही महिलांनी गावातील तळिरामांची धुलाई केली, तसेच अंभोरा पोलिसांमार्फत गावातील दारू विक्रेत्यांवर कारवाई केली. अंभोरा येथील महिलांनीही शुक्रवारी गावातील पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला आणि पोलिसांना दारू विक्रेत्यावर कारवाई करण्यास भाग पाडले. त्यामुळे या तिन्ही गावांत दारूबंदी झाली आहे.
आता गावातील महिलांनी पाणंदमुक्त गाव करून निर्मलग्रामकडे वाटचाल करण्याचा निर्धार केला आहे. धानोऱ्यात तळिराम आढळल्यास त्याचे मुंडन करण्यात येणार आहे. अंभोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुणी अवैध दारूविक्री करीत असेल तर २४११३३ या क्रमांकावर फोन करून कळविण्याचे आवाहन अंभोऱ्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुडके यांनी केले आहे.

प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या

आरमोरी - आरमोरी पोलिस ठाण्यांतर्गत सात किमी अंतरावरील पाथरगोटा या गावी पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने स्वत:च्या पतीची विष पाजून हत्या केल्याची घटना बुधवारी (ता।२५) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली। दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
हितेश रतन खोब्रागडे (२६) रा। कोकडी हा काही कामानिमित्त पाथरगोटा येथे गेला. त्याची सुमित लिंगायत (४०) रा. पाथरगोटा यांच्याशी ओळख झाली. त्याचे त्यांच्या घरी येणे-जाणे सुरू झाले. यातच त्याचे सुमितची पत्नी सुषमा लिंगायत (३५) हिच्याशी प्रेमसंबंध जुळले. प्रेमाचे रूपांतर शारीरिक संबंधात झाले. याबाबत गावातील लोकांना माहिती होती. मात्र, सुषमाच्या रागीट व भांडखोर स्वभावामुळे तिला कोणीच हटकत नव्हते.
प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीला कायमचे संपविण्याचे सुषमाने मनात ठरविले। प्रियकर हितेश खोब्रागडे याच्यासोबत तिने कट रचला. जेवताना दारू पिण्याचा बहाणा करून हितेशने बाहेर गावातून देशी दारू आणली. त्या बाटलीमध्ये विषारी कीटकनाशक औषध टाकून ती सुमितला पिण्यास दिली.
यादरम्यान दोघांमध्ये बाचाबाचीसुद्धा झाली. दारू पिल्यानंतर काही वेळातच सुमितचा मृत्यू झाला, असे हितेश खोब्रागडेने पोलिसांना दिलेल्या बयानात म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आरमोरी पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक इप्पर, जमादार कराडे, पोलिस शिपाई सिडाम करीत आहेत.

तेलाचे भाव पुन्हा वाढणार?

आगामी दोन दिवसांमध्ये कच्च्या तेलाचे भाव पुन्हा एकदा गगनाला भिडण्याची शक्यता इराणमधील एका तेल उत्पादक कंपनीने व्यक्त केली आहे।
चीनने तेलाचे दर वाढवल्याने 140 डॉलर प्रती बॅरलवर गेलेले हे भाव काही अंशी कोसळले आहेत। परंतु आता पुन्हा एकदा हे भाव वाढण्याची शक्यता इराणनेच व्यक्त केल्याने आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. इराण हा तेल उत्पादन करणारा देश मानला जातो.
तेलाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले असून, आता तेलाचा कोणताही तुटवडा जाणवणार नसल्याचे सौदी अरबने आधीच जाहीर केले आहे. आणि याच सोबत तेलाचे उत्पादन वाढवण्यात येणार असल्याचेही सौदीने जाहीर केले आहे. इराणणे मात्र तेलाचे उत्पादन वाढवण्यास नकार दिला आहे.

सोनियांकडून पंतप्रधानांची पाठराखण

अमेरिकेच्या अण्वस्त्र करारावरून सरकारमध्ये नाराजी आणि अनिश्चिततेचे वातावरण तर आहेच, परंतु महागाईदर वाढतच असल्याने विरोधक पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करत असतानाच कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मात्र पुन्हा एकदा मनमोहन यांची पाठराखण केली असून, तेच आज घडीला भारताचे नेतृत्व करू शकतात अशी पुस्तीही जोडली आहे।
यापूर्वीही महागाईदराने आठचा पल्ला गाठल्यानंतर पंतप्रधानांच्या कार्यशैलीवर विरोधकांनी जोरदार टिका केली होती, त्याही वेळी सोनियांनी मनमोहन हेच उत्कृष्ट पंतप्रधान असल्याचे स्पष्ट केले होते।
आता महागाईदर 11.42 टक्क्यांवर गेल्यानंतर डाव्या पक्षांसह विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकेची झोड उडवली आहे. गेल्या चार वर्षात पंतप्रधान म्हणून मनमोहन यांनी घेतलेले निर्णय भारताच्या विकासासाठी पोषक असल्याचेही सोनिया म्हणाल्या.

अंदमान आणि चेन्नईला भुकंपाचा धक्का

अंदमान निकोबार आणि चेन्नईला शुक्रवारी भुकंपाचे धक्के जाणवल्याने काही वर्षांपुर्वी झालेल्या त्सुनामीची आठवण या भागातील नागरिकांना काल पुन्हा झाली।
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अंदमानला 6।7 रिश्टर स्केलचे दोन धक्के जाणवले, तर चेन्नईलाही 6.7 रिश्टर स्केलचे भुकंपाचे धक्के जाणवले.
यात कोणत्याही स्वरुपाची अर्थ अथवा मनुष्यहानी झाली नसल्याचे यानंतर प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आता सौर ऊर्जा मिशन-पंतप्रधान

देशात आगामी काळात वीज संकट निर्माण होऊ नये म्हणून सरकार लवकरच विजेच्या सर्व पर्यायी स्रोतांचे अध्ययन करत असल्याची माहिती देत आता आगामी काळात सूर्याच्या ऊर्जेचा वापर करण्यासाठी 'सौर ऊर्जा मिशन' राबविण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जा समन्वय समितीच्या बैठकीत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिली।
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतींत झालेली वाढ आणि आगामी काळात निर्माण होणाऱ्या विजेच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी अक्षय ऊर्जा, आणि सौर ऊर्जेचे संवर्धन गरजेचे असल्याचे मतही पंतप्रधानांनी या बैठकीत व्यक्त केले।

70 व्या वर्षी दिला जुळयांना जन्म

पश्चिम उत्तरप्रदेशातील मुजफ्फरनगरमधील 70 वर्षीय वृद्धेने जुळया मुलांना जन्म दिला आहे। या घटनेने वैद्यकीय संशोधनाला पुन्हा एकदा आव्हान दिले आहे. आई व बाळांची प्रकृती उत्तम आहे.
रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या जुळया बालकांमध्ये एक पुत्र तर एक कन्या आहे। साधारणता वैद्यक शस्त्रानुसार वयाच्या 50 व्या वर्षापर्यंत मासिक पाळी बंद होत असते. आणि त्यानंतर स्त्री आई होऊ शकत नाही. मात्र या महिलेने चक्क जुळयांना जन्म देऊन अनेक डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
वृद्ध दांपत्य पती चरणसिंह (76) आणि ओमकली (70) हे दोघर या गावातील रहिवासी असून त्यांना यापूर्वीच दोन मुली व नातवंडे आहेत. मात्र त्यांना मुलगा व्हावा अशी इच्छा होती आणि त्यांची इच्छा वयाच्या 80 व्या दशकात पूर्ण झाली आहे.

किंमतवाढीचा तेरा वर्षातील उच्चांक

किंमतवाढीच्या मुद्दयावर सरकारची चिंता कमी होण्याचे चिन्ह नसून किंमतवाढीने 11।42 टक्क्यावर झेप घेत तेरा वर्षातील उच्चांक गाठला आहे. अन्नधान्य, दूध, खाद्यतेल व पेट्रोलियम पदार्थाच्या किमतीतील प्रचंड वाढीमुळे किंमतवाढीने उच्चांकी झेप घेतली आहे.
चौदा जूनला संपलेल्या आठवड्यात किंमतवाढीने मागील आठवड्याच्या तुलनेत 0।37 टक्क्यांची वृद्धी नोंदवली आहे. मागील वर्षी याच आठवड्यात किंमतवाढ फक्त 4. 13 टक्क्यांवर होती.
किंमतवाढीने याअगोदर मार्च 1995 मध्ये विक्रमी 16।9 टक्क्यांची झेप घेतली होती. वित्तमंत्र पी चिदंबरम यांनी वृत्तवाहिनीस दिलेल्या मुलाखतीत पाच जूनला केलेल्या पेट्रोल व डिझेलच्या किंमतवाढीचा यावर परिणाम झाल्याचे सांगून सरकार लोकांना याचे स्पष्टीकरण देऊन उपाययोजनांची माहिती देणार असल्याचे स्पष्ट केले.
या आठवड्यात चहाची किंमत तीन टक्क्यांनी, दूध एक टक्के, सूर्यफूल तेल एक टक्के, वनस्पती दोन टक्के आयातीत खाद्यतेलात एक टक्क्यांची वाढ झाली आहे. वित्तमंत्र्यांनी किंमतवाढ काही आठवडे दुहेरी आकड्यात राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आवश्यकता पडल्यास कठोर उपाययोजना करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मॉंटेकसिंह रिझर्व्ह बँकेचे नवे गर्व्हनर?

रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर वाय वी रेड्डी यांचा कार्यकाल लवकरच संपत असुन त्यांच्या जागी या पदावर नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉंटेकसिंह अहलूवालीया यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे।
सरकार त्यांच्या नियुक्तीचा गांभीर्याने विचार करत असल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत असुन लवकरच रेड्डी यांचा कार्यकाल संपत असल्याने अहलूवालीया यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे.