गुरुवार, 24 जुलाई 2008

सट्टा बाजारात पंतप्रधान मनमोहन जिंकले

संपुआ सरकार बहुमत सिध्‍द करण्‍यात यशस्‍वी होईल किंवा नाही हे आकडयांच्‍या युध्‍दात आजतरी सांगणे कठीण आहे. असे असले तरीही सट्टा बाजारात मात्र पंतप्रधान मनमोहन सिंग बहुमत सिध्‍द करण्‍यात यशस्‍वी ठरले आहेत. सरकार पाडण्‍या आणि जोडण्‍यासाठी दोन्‍ही बाजूने प्रयत्‍न केले जात आहेत.
क्रिकेटमध्‍ये सट्टा लावून लाखों रुपयांची कमाई करणा-या सटो-यांनी यावेळी राजकीय खेळात पेसा लावला आहे. एका बुकीकडून नाव जाहीर न करण्‍याच्‍या अटीवर दिलेल्‍या माहितीनुसार मनमोहन सरकारच्‍या बाजूने १५ अब्‍ज रुपयांचा सट्टालावण्‍यात आला आहे.

पंतप्रधान-सोमनाथदांचे गुफ्तगू

नवी दिल्ली, २४ जुलै-सोमनाथदांना डाव्यांनी डच्चू दिल्यावर गुरुवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीत काय गुफ्तगू झाले हे कळले नसले तरी या भेटीमागे राजकीय समीकरणे असल्याचे स्पष्ट होत आहे.
गेली ४० वर्षे संसदेत कम्युनिस्ट गडाचा आधारस्तंभ असणा-या सोमनाथ चटर्जी यांनी फक्त एकदा पक्षादेश पाळला नाही , म्हणून त्यांना दरवाजा दाखवण्यात आला. माकपच्या या निर्णयाविरुद्ध देशभर नाराजीचे वातावरण तयार झाले असून सोमनाथदांना सहानुभुती मिळत आहे. कदाचित याच वातावरणाचा परिणाम म्हणून पंतप्रधान सोमनाथदांना भेटायला गेले असतील , असे म्हटले जात आहे.
खरं तर येत्या शुक्रवारी आपला ८०वा वाढदिवस साजरा करणा-या चटर्जी यांना पक्षाने दिलेला झटका अनपेक्षित नव्हता. पण तरीही या निर्णयावर चटर्जी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पुढील महिन्यात कॉमनवेल्थ संसदीय बैठकीसाठी आपण क्वालालांपूरला जाणार आहोत , असे त्यांनी बुधवारीच स्पष्ट केले आहे. या घडामोडींमुळे पुढील काही दिवसात सोमनाथदांचे काय होणार याकडे सा-यांचे लक्ष लागून राहिले आहे.

आता इन्कम टॅक्स भरा बॅंक खात्यातून

नवी दिल्ली, २४ जुलै- करदाते आता स्वतःसह कोणाच्याही बॅंक अकाऊंटच्या माध्यमातून तसेच डेबिट व क्रेडिट कार्डच्या सहाय्याने प्राप्तीकर भरू शकतात. प्रत्यक्ष कराच्या मध्यवर्ती मंडळाने (सीबीडिटी) ही माहिती दिली.
देशातील व काही परदेशातील करदात्यांना इंटरनेटद्वारे कर भरण्यात अडचण येत होती. त्याचा विचार करून मंडळाने हा निर्णय घेतला. काही कंपन्या, व्यवसाय व व्यावसायिकांना यंदाच्या एप्रिलपासून इंटरनेटद्वारे कर भरण्याची सक्ती करण्यात आली होती.
करदाता व्यक्ती इतर व्यक्तीच्या खात्यातूनही कर भरू शकतो. मात्र, चलन भरताना त्याला स्वतःचा पॅन नंबर लिहावा लागेल, असेही सीबीडिटीने स्पष्ट केले आहे.

पोलिस शिपाई अपघातात ठार

मुंबई, २४ जुलै-तब्येत बरी नसल्याने मरोळ कॅम्प येथील सहकाऱ्याबरोबर परतताना झालेल्या अपघातात संजय पाटील हा पोलिस शिपाई मंगळवारी सकाळी मृत्युमुखी पडला. त्यानंतर लगोलग दुसऱ्या दिवशी कार उलटून झालेल्या अपघाताची पाहणी करताना पोलिस सबइन्स्पेकर मागून येणाऱ्या बाइकस्वाराच्या धडकेत जखमी झाले.
त्यांना राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. वाशी चेकनाक्यावर उभ्या असलेल्या कंटेनरवर बुधवारी रात्री सुमो आदळली. त्यात सात जखमी झाले. तेथे तपासाला आलेल्या पीएसआय सुनील घास यांना मागून बाइकस्वाराने धडक दिली.