शुक्रवार, 4 जुलाई 2008

पाक न्यायालयाने शोएबवरील बंदी हटवली

कराची, ४ जुलै-पाकिस्तानचा वादग्रस्त वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याच्यावर घालण्यात आलेली अठरा महिन्यांची बंदी हटवण्याचा आदेश लाहोर उच्च न्यायालयाने दिला.
याप्रश्नी अंतिम निर्णय होईपर्यंत त्यास खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे। मात्र मंडळाने त्यास ठोठावलेला सत्तर लाखाचा दंड न्यायालयाने कायम ठेवला आहे। निर्णयामुळे शोएबला दिलासा मिळाला असून त्याची आगामी चॅम्पियन्स करंडकात खेळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पाकिस्तान क्रिकेट मंडळाविरूद्ध वक्तव्ये व खेळाडूंशी गैरवर्तनासाठी त्याच्यावर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती. यानंतर लवादाने कमी करून अठरा महिन्यांची केली होती. शोएबने बंदीस न्यायालयात आव्हान दिले होते.

कोल्हापूरात अल्पवयीन मुलीवर तिघांचा बलात्कार

गांधीनगर, ता. ३: घरामध्ये खेळावयास आलेल्या नऊ वर्षांच्या मुलीवर तिघा अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याची महिन्यापूर्वी घडलेली घटना चिंचवाड (ता. करवीर) येथे आज उघडकीस आली। या बाबतची फिर्याद गांधीनगर पोलिसांत दाखल झाली आहे.
उन्हाळी सुटीत संबंधित मुलगी संशयिताच्या घरी खेळावयास जायची. तिला तिघा आरोपींनी घराच्या मागील न्हाणीघरात नेले व तिथे बलात्कार केला. या मुलीस त्रास होऊ लागल्याने लगेचच तिने ही गोष्ट आईस सांगितली. गावामध्ये बोभाटा होईल या भीतीने मुलीच्या घरच्यांनी ही गोष्ट कोणास सांगितली नाही.
या घटनेनंतर महिनाभर बाहेरगावी असणारे मुलीचे चुलते घरी आले. त्यांनी तत्काळ या बाबत पोलिसांत फिर्याद देण्यास सांगितले. यानुसार मुलीच्या आईने पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून तिन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेतले.

मटकाकिंग सुरेश भगत हत्येप्रकरणी त्याच्या पत्नीला अटक

मुंबई - मटकाकिंग सुरेश भगत याच्या हत्येप्रकरणी त्याची पत्नी जया भगत हिला आज शुक्रवारी दुपारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली।
अतिरिक्त पोलिस आयुक्‍त देवन भारती यांनी ही माहीती दिली.

डाव्यांची सरकारला ३ दिवसांची मुदत

नवी दिल्ली - अणुकरार मुद्यावर केंद्र सरकारला ७ जुलैपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याची मुदत डाव्या पक्षांनी आज शुक्रवारी झालेल्या बैठकीत दिली असून त्यानंतर पाठिंबा काढून घेण्याचे संकेत दिले आहेत।
डाव्या पक्षांनी परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांना पत्र लिहून त्यात आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेबरोबर (आयएईए) सेफगार्ड करारावषयी सरकारने ७ जुलैपर्यंत भूमिका स्पष्ट करण्यास सांगण्यात आले आहे।
अणुऊर्जा मुद्यावर सेफगार्ड कराराची मंजुरी मिळविण्याकरिता आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या संचालक मंडळाकडे जाण्याचा सरकारने निर्धार केला आहे का? याबाबत स्पष्टीकरण द्यावे असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

सिहांची शिकार, भारतीय संघ फायनलमध्ये

भारतीय संघाने भक्कम फलंदाजीच्या भरवशावर एकोणीस चेंडू शिल्लक ठेवून सहा गड्यांनी दणदणीत विजय प्राप्त करून आशिया करंडकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे। तडाखेबंद ६७ धावा करणाऱ्या धोनीस सामनावीराचा पुरस्कार बहाल करण्यात आला.
सलामीपासून प्रत्येक भारतीय फलंदाजाने धावा काढल्याने श्रीलंकेस तीनशे आठ धावांचाही बचाव करता आला नाही. श्रीलंकेकडडून फक्त मुरलीधरणने फलंदाजांवर जरब बसवली, मात्र इतर गोलंदाज निष्प्रभ ठरल्याने भारतीय संघाने सेहचाळीसाव्या षटकातच विजयी उद्दिष्ट गाठले.
श्रीलंकेने अगोदरच फायनलमध्ये प्रवेश केल्याने त्यांनी अनुभवी गोलंदाज चामिंडा वा व फिरकीपटू अजंता मेंडीस यांना विश्रांती देण्याच्या निर्णय भारताच्या पथ्यावरच पडला। भारताचे सलामीवीर गौतम गंभीर व विरेंद्र सेहवागने नेहमीप्रमाणेस भक्कम सुरूवात दिली.
गंभीरने धडाकेबाज अर्धशतक झळकवले तर सेहवागला अर्धशतकासाठी आठ धावा कमी पडल्या. त्यांनी पहिल्या गड्यासाठी ११.४ षटकात ९२ धावांची भक्कम आघाडी दिली. सेहवाग बाद झाल्यानंतर आलेल्या सुरेश रैनानेही ५४ धावांची सुरेख खेळी केली. वीस षटकात भारताच्या १३५ धावा फळ्यावर असताना गंभीर बाद झाला.
यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी व सुरेश रैनाने सारख्या धावा काढत धावफलक हलता ठेवला. धोनीने ६७ धावांची भक्कम खेळी केली. त्यास मुरलीधरणने यष्टीचित केले. २३४ व २५३ धावांवर अनुक्रमे रैना व धोनी बाद झाल्यानंतर राहिलेल्या धावा काढण्याची औपचारिकता युवराज सिंग व रोहित शर्माने पूर्ण केली.

रेशनिंगवर स्वस्त दरात तांदूळ, पाम तेल - सुनील तटकरे

मुंबई - राज्यातील सर्व रेशनिंग दुकानांमधून दारिद्य्र रेषेखालील (बीपीएल) व दारिद्य्र रेषेवरील (एपीएल) कुटुंबांना स्वस्त दरात पाच किलो तांदूळ व एक लिटर पाम तेलाचा पुरवठा करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत।
त्यानुसार येत्या आठ- दहा दिवसांत रेशनिंग दुकानांमध्ये तांदूळ व खाद्य तेल उपलब्ध होईल, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री सुनील तटकरे यांनी दिली. एपीएल कार्डधारकांसाठी सात रुपये प्रतिकिलो दराने गहूही देण्याचा विचार आहे, असे त्यांनी सांगितले.
मार्च-एप्रिलमध्ये महागाईचा भडका उडाल्यानंतर विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात त्यावर मोठी चर्चा झाली। त्यावर राज्य सरकारने महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला रेशनिंग दुकानांतून स्वस्त दरात तांदूळ, तूरडाळ व खाद्यतेल देण्याचा निर्णय घेतला; परंतु डाळ खरेदीच्या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाल्याने तटकरे यांनी त्याला स्थगिती दिली व नव्याने निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. त्यामुळे १ मेपासूनच रेशनिंग दुकानांमधून बीपीएलप्रमाणेच एपीएल कार्डधारकांना स्वस्त दरात धान्य व खाद्यतेल देण्याची योजना लांबणीवर पडली. आता हे "डाळ प्रकरण' न्यायालयात गेले आहे.
दरम्यान, अन्न व नागरी पुरवठा विभागाने रेशनिंग दुकानांमधून एपीएल कार्डधारकाला १२ रुपये प्रतिकिलो दराने पाच किलो तांदूळ आणि ४२ रुपये प्रतिलिटर दराने एक लिटर पाम तेलाचा पुरवठा करण्याचे आदेश काढले आहेत. त्यासाठी ७० हजार मेट्रिक टन तांदूळ व १८ हजार २०० मेट्रिक टन पाम तेल खरेदी करण्यात आले आहे, अशी माहिती तटकरे यांनी दिली. किमान आधारभूत किमतीवर प्रतिक्विंटल शंभर रुपये जादा मोजून राज्यातील शेतकऱ्यांकडून १० हजार मेट्रिक टन गहू खरेदी करण्यात आला आहे. शिवाय केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राज्याला १० हजार मेट्रिक टन जास्तीचा गहू दिला आहे. राज्यात खरेदी केलेला गहू एपील कार्डधारकांना ७ रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध करून देण्याचा शासनाचा विचार आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे तशी परवानगी मागण्यात येणार आहे, असे तटकरे यांनी सांगितले.

राष्ट्रपती आज पुणे भेटीवर

पुणे - राष्ट्रपती प्रतिभा पाटील या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी पुण्यात येणार आहेत.
दुपारी सव्वाचार वाजता लोहगाव विमानतळावर त्यांचे आगमन होणार आहे. तेथून त्या राजभवनावर जाणार आहेत. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या १५०व्या जयंतीच्या कार्यक्रमाला त्या सायंकाळी सहा वाजून २५ मिनिटांनी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमानंतर, सायंकाळी साडेसातला त्या राजभवनाकडे प्रयाण करतील.
राजभवनात शनिवारी सकाळी सव्वादहा ते दुपारी बारा वाजून २० मिनिटांपर्यंत त्यांचा वेळ राखीव ठेवण्यात आला आहे। महापालिकेतर्फे राष्ट्रपतींचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी त्या बालगंधर्व रंगमंदिरात सायंकाळी पाच ते साडेसहा वाजेपर्यंत उपस्थित राहणार आहेत. तेथून राष्ट्रपती पाटील कॉसमॉस बॅंकेच्या कार्यक्रमासाठी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात जाणार आहेत. तेथे सहा वाजून ५५ मिनिटांपासून रात्री पावणेआठपर्यंत त्या उपस्थित राहणार आहेत. तेथून त्या राजभवनात मुक्कामासाठी जाणार आहेत.
राष्ट्रपती पाटील रविवारी सकाळी त्यांच्या कन्या ज्योती राठोड यांच्या घरी जाणार आहेत. तेथून त्या पुणे विमानतळावरून तिरुपतीला रवाना होणार आहेत. त्या सोमवारी सायंकाळी तिरुपतीहून मुंबईला जाणार आहेत. नवी मुंबईत डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यक्रमासाठी मंगळवारी सकाळी त्या उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमानंतर दुपारी त्या दिल्लीला रवाना होतील.

आशियातील सर्वांत मोठ्या थर्माकोलची निर्मिती पुण्यात

पुणे - आशिया खंडातला सर्वांत मोठा थर्माकोल कोठे तयार होतो, याची कदाचित कोणी कल्पनाही केली नसेल. पण, हा थर्माकोल चक्क पुण्यात तयार होतो.
भोसरीतील इलेक्‍ट्रॉनिक झोनमधील "माने ग्रुप ऑफ कंपनीज'मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून या थर्माकोलची निर्मिती होतेय. वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या या थर्माकोलची "लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'नेही दखल घेतली आहे। एवढेच काय, पण लहान मुलांसाठीची "पोगो वाहिनी'देखील खेळांचे "सेट्‌स' उभारण्यासाठी इथल्याच थर्माकोलचा वापर करते.
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रामदास माने, थर्माकोल आणि थर्माकोल स्वयंचलित यंत्राचे भारतातील मोठे उत्पादक आणि निर्यातदार आहेत। माने यांनी मस्कतच्या राजाला तयार करून दिलेल्या थर्माकोल स्वयंचलित यंत्राची नोंद "गिनेस बुक ऑफ रेकॉर्ड'मध्येही झाली आहे. माने यांच्या कंपनीत तयार होत असलेला हा थर्माकोलचा ठोकळा १२ फूट बाय चार फूट बाय दोन फूट या आकारातील आहे. हा ठोकळा एका अखंड साच्यात तयार होत असल्यानेच त्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. तो बनविण्यासाठी १५ मिनिटे इतका कमी कालावधी लागतो.
याबाबत अधिक माहिती देताना श्री। माने म्हणाले, ""पोगो वाहिनीला आतापर्यंत थर्माकोलच्या १७०० ठोकळ्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. नजीकच्या दिवसांत आणखी तेवढेच ठोकळे तयार करून द्यायचे आहेत. या ठोकळ्यांच्या साह्याने वाहिनी विविध प्रकारची खेळाची साधने तयार करतेच; पण त्याच्या साह्याने खेळांचे मोठमोठे सेट्‌सही उभारले जातात.''
व्यकंटेश्‍वरा हॅचरीज या कंपनीच्या अंडी उबवणी केंद्राकडूनही या ठोकळ्यांना मोठी मागणी आहे; तर "उष्णतारोधक' पत्रे तयार करणारी पुण्यातील एक कोरियन कंपनीदेखील याच ठोकळ्यांना प्राधान्य देते.

केवळ ५० रुपयांसाठी मुलाला रेल्वेतून फेकले

राऊरकेला - केवळ ५० रुपयांसाठी रेल्वेच्या एका तिकीट कलेक्‍टरने लहान मुलाला धावत्या रेल्वेतून बाहेर फेकून, आपल्या क्रूरतेचे दर्शन घडविले.
रेल्वेतून प्रवास करताना लहान मुले रेल्वेचे डबे साफ करताना आपण नेहमीत पाहतो। बरेच प्रवासी त्यांना आपल्या इच्छेनुसार पैसेसुद्धा देतात. त्याच पैशांतून हे मुले स्वतःचे तसेच आपल्या कुटुंबाचे पोट भरतात. शंकरसिंह नावाचा १२ वर्षांचा मुलगासुद्धा रेल्वेचे डबे साफ करून, स्वतःचे तसेच कुटुंबाचे पोट भरायचा. नेहमीप्रमाणे तो रेल्वेच्या डब्यात शिरून डब्बा झाडायला लागला. झाडता झाडता त्याला एका बेंचखाली ५० रुपयांची नोट आढळली. ती त्याने आपल्या खिशात टाकली. हे तेथे उभा असलेल्या एका तिकीट कलेक्‍टरने बघितले. त्याने शंकरसिंहला ती नोट मागितली. परंतु, त्याने ती देण्यास नकार दिला. त्याला काय माहिती की, ५० रुपयांची ही नोट आपल्या जिवावर बेतेल. ५० रुपये न मिळाल्याने तिकीट कलेक्‍टरचे डोके एकदम संतापले, तो रागाने लालबुंद झाला. त्याने शंकरसिंहसोबत वाद घातला. तो वाद इतका विकोपाला गेला की, कुठलाही विचार न करता, त्या क्रूरकर्मा तिकीट कलेक्‍टरने शंकरसिंहला धावत्या रेल्वेतून बाहेर फेकले.
तेथे उपस्थित प्रवाशांनी सांगितले की, फेकण्यापूर्वी तिकीट कलेक्‍टरने शंकरसिंहला मारपीटही केली होती. त्यांनी त्याला समजाविण्याचा प्रयत्यही केला; परंतु डोक्‍यात राक्षस संचारलेल्या त्या दुष्टाने लहानग्या शंकरसिंहला धावत्या रेल्वेतून बाहेर फेकले. यात शंकरसिंहचा उजवा हात आणि डावा पाय पूर्ण निकामी झाला. गंभीर अवस्थेत त्याला राऊरकेला येथील इस्पात रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्‍टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्याची प्रकृती आता पहिल्यापेक्षा बरी आहे. केवळ ५० रुपयांसाठी शंकरसिंहला संपूर्ण आयुष्यासाठी अपंग होण्याची पाळी आली. सामाजिक संघटनांनी सामाजिक बांधिलकीशी देणे-घेणे नसलेल्या, त्या तिकीट कलेक्‍टरला कडक शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली आहे.