मंगलवार, 12 अगस्त 2008

पुणे, ठाण्यातील भारनियमन रद्द

पुणे, १२ अगस्ट - पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, बारामती या शहरांतील भारनियमन रद्द करण्याचा निर्णय राज्य वीज वितरण कंपनीने मंगळवारी घेतला.
राज्यात गेल्या तीन-चार दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे विजेची मागणी घटली आहे. शेती पंपांसाठी लागणाऱ्या विजेची मागणीही कमी झाली आहे. त्याचवेळी धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने वीज निर्मितीमध्ये सुधारणा झाली आहे. यासर्व परिस्थितीमुळे भारनियमन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
औद्योगिक क्षेत्रासाठीचे भारनियमनही आता २४ तासांवरून १६ तासांपर्यंत कमी करण्यात आले आहे.

कोयनेतून २६ हजार क्‍यूसेक पाणी सोडले...

सातारा, १२ अगस्ट : कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे चार फुटाने वर उचलून आज सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी २६ हजार क्‍यूसेक्‍स पाणी कोयना नदीच्या पात्रात सोडण्यात आले. त्यामुळे कोयना नदीचे पाणी वाढणार असून कऱ्हाड व पाटण तालुक्‍यातील काठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोयना पाणलोट क्षेत्रातील गेल्या चार दिवसांतील पावसामुळे धरणातील पाणीसाठा गतीने वाढला. काल या धरणातील पाण्याचा साठा ८९ टीएमसी एवढा (क्षमता १०४ टीएमसी) होता. आज सकाळी तो ९३ टीएमसीपर्यंत पोचला होता. पावसाचा जोर आज सकाळी कमी झाला असला तरी पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय काल झाला होता. त्यानुसार आज सकाळी पाणी सोडण्यात आले. धरणाचे सहा वक्र दरवाजे चार फुटाने उचलून २६ हजार क्‍यूसेक्‍स व पायथ्याशी असणाऱ्या वीजगडहातून 2 हजार १११ क्‍यूसेक्‍स असे २८ हजार १११ क्‍यूसेक्‍स पाणी नदीच्या पात्रात सोडले आहे.

काश्‍मिरमधील हिंसाचारात पाच जणांचा बळी, सात पोलिस जखमी

श्रीनगर, १२ अगस्ट- सुरक्षा दल आणि आक्रमक झालेले आंदोलक यांच्यातील चकमकीत पाच जण ठार झाले आहेत.
काश्‍मिरमधील दहाही जिल्ह्यात लागू केलेली संचारबंदी मंगळवारीही कायम आहे।
सोमवारी "हुरियत'चे नेते शेख अब्दुल अझीज पोलिसांच्या गोळीबारात बळी पडल्यानंतर येथील परिस्थिती अजूनच चिघळली आहे.
त्यांच्या मृत्यूनंतर अनेक संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले. हुरियतच्या नेत्यांना स्थानबद्धतेतून मुक्त करण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान लासजन भागात आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या जावेद मुस्तफा मीर यांच्या खासगी सुरक्षारक्षकाच्या बंदुकीतून "अपघाताने' सुटलेल्या गोळयांनी सात पोलिस जखमी झाले. यांत महेश कुमार या वरिष्ठ अधिकाऱ्याचाही समावेश आहे.

अनीस इब्राहीम अटकेत!

जेद्दा, १२ ऑगस्ट- 'डी' कंपनीचा प्रमुख सुत्रधार दाउद इब्राहिमचा भाउ अनीस इब्राहिमसह आणखी एकास बनावट पासपोर्ट सादर केल्‍या प्रकरणी सौदी अरेबियातील जेद्दा विमानतळावर अटक केली असल्‍याचे वृत्‍त हाती आले आहे. या प्रकरणाची सीबीआयकडून खात्री केली जात असून ते खरे असल्‍यास ही मोठी उपलब्‍धी ठरणार आहे.
मुंबईत १९९३ मध्‍ये झालेल्‍या बॉम्‍बस्‍फोटातील मुख्‍य आरोपी म्‍हणून अनीसचा मुंबई पोलिसांना अनेक दिवसापासून शोध असून जगभरात त्‍याच्‍यावर अनेक स्‍वरूपाचे गंभीर गुन्‍हे दाखल आहेत. दाउदच्‍या देश-विदेशातील अनेक व्‍यवहार अनीस पाहतो त्‍यामुळे तो नेहमीच बाहेर असतो. त्‍याच्‍याकडे अनेक बनावट पासपोर्ट असून त्‍यामुळेच तो जेद्दा पोलिसांच्‍या ताब्‍यात आल्‍याची शक्‍यता वर्तविली जात आहे. अटक करण्‍यात आलेली व्‍यक्‍ती अनीसच आहे की काय याबाबत सीबीआयने जेद्दा पोलिसांकडे चौकशी सुरू केली आहे.

खासदार खरेदी प्रकरणातील सीडी प्रसारित

नवी दिल्ली, १२ ऑगस्ट- विश्वासमत ठरावादरम्‍यान लोकशाहीला स्तब्ध करणा-या 'खासदार खरेदी प्रकरणा'तील विवादस्पद स्‍टींग ऑपरेशनमधील सीडी सोमवारी रात्री एका खाजगी वृत्‍तवाहीनीने प्रसारित केली आहे. त्‍यात समाजवादी पक्षाचे नेत्‍या रेवती रमण सिंह यांना तीन भाजप खासदारांशी चर्चा करताना दाखविण्‍यात आले आहे.
भाजपाच्‍या या खासदारांनी नंतर दावा केला होता, की आपल्‍याला सरकारचे समर्थन करण्‍याच्‍या बदल्‍यात मोठी रक्‍कम देण्‍याचा प्रयत्‍न झाला आहे। खाजगी चॅनलने ही सीडी लाच खोरीच्‍या आरोपांची चौकशी करणा-या संसदीय समीतीकडे सोपविली आहे.
या टेपमध्‍ये भाजप खासदारांना संजीव नामक एका व्यक्‍ती सोबत दाखविले गेले आहे. याच व्‍यक्‍तीने त्‍यांना १ कोटी रुपये दिल्‍याचा आरोप आहे. ही रक्‍कम नंतर संसदेत दाखविण्‍यात आली होती. भाजपचे खासदार अशोक अर्गल, फग्गन सिंह कुलस्ते आणि महावीर भगोरा यांनी आरोप केला होता की त्‍यांना ही रक्‍कम २२ जुलै रोजी सरकारच्‍या विश्वास मत ठरावाच्‍या वेळी अनुपस्थित राहण्‍यासाठी दिली गेली. या नोटा नंतर संसदेत दाखविल्‍याने खळबळ माजली होती.

दिल्लीत हाय अलर्ट

अहमदाबाद, १२ अगस्त- बेंगळुरू शहरात झालेले बॉम्बस्फोट आणि पुढील आठवड्यात होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली शहरात हाय अलर्ट जारी केला आहे.
शहरातील मोक्याच्या जागा, नाक्यानाक्यावर पोलिस तैनात असून सुमारे तीन हजार नीमलष्करी सैन्य टप्प्याटप्प्याने शहरात दाखल होत आहे. सीमा सुरक्षा दल, जलद पोलिस बल आणि जलद कृती दलाचे रक्षकही लवकरच दाखल होतील. १० ते १५ ऑगस्टदरम्यान गदीर्च्या ठिकाणी ३४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत तर धामिर्क स्थळे, माकेर्ट, मॉल्स आणि रेल्वे, बस, मेट्रो स्टेशनवरही अतिरिक्त दल तैनात करण्यात आले आहे.
गेस्ट हाऊस, सायबर कॅफे, टेलिफोन बुथ मालक आणि टॅक्सी ड्रायव्हर्सनाही ग्राहकांवर लक्ष ठेवण्याच्या आणि संशयित व्यक्तींची माहिती पोलिसांना कळवण्याबाबत विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. गेस्ट हाऊस चालकांना सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यास सांगण्यात आले असून टेलिफोन बुथ धारकांना लोकल, एसटीडी आणि आयएसडी कॉल्सची नोंद करण्यास सांगण्यात आले आहे. गेस्ट हाऊसमध्ये रहायला आलेल्या ग्राहकांना गेस्ट हाऊसच्या पत्त्यावर मोबाइल कार्ड देऊ नये, असेही बजावण्यात आले आहे.