बुधवार, 13 अगस्त 2008

सायनाचा 'सायोनारा', आव्हान संपुष्टात

बीजिंग, १३ अगस्ट-ऑलिंपिकमध्ये पहिल्या दिवसापासून जिगरबाज खेळ करून ऑलिंपिकच्या बॅडमिंटन स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारणा-या सायना नेहवालचं आव्हान अखेर आज संपुष्टात आलं. जागतिक क्रमवारीत ३० व्या क्रमांकावर असलेल्या इंडोनेशियाच्या मारिया युलान्तीनं तिला नमवलं.
सामन्याची सुरुवात झाली, ती सायनाच्या बाजूनं। तिनं पहिला गेम जिंकला, पण त्यासाठी तिला बरंच झगडावं लागलं. २०-१६ अशी सायना आघाडीवर होती. पण सलग चार पॉइंट मिळवत युलान्तीनं बरोबरी केली. मग शेवटी नेटजवळ थरारक खेळ करत सायनानं हा गेम २८-२६ असा जिंकला. तिच्यातला आत्मविश्वास स्पष्ट जाणवत होता आणि तो स्वाभाविकही होता. कारण, आधीच्या सामन्यात वर्ल्ड रँकिंगमध्ये पाचव्या स्थानावर असलेल्या हाँगकाँगच्या चेन वँगचं आव्हान तिनं दणक्यात परतवून लावलं होतं.
पण दुस-या गेममध्ये मारियानं आपले काही ठेवणीतले शॉट्स खेळत सायनाला सतावलं. हा गेम तिनं २१-१४ असा जिंकला. त्यामुळे दबावाखाली आलेली सायना तिस-या गेममध्येही प्रभावहीन ठरली आणि हा गेम तिनं १५-२१ असा गमावला. या पराभवामुळे सायना ऑलिंपिकमधून बाहेर पडली आहे. भारतीयांच्या पदकाच्या आशा त्यामुळे मावळल्या आहेत. आता सगळ्यांचंच लक्ष आहे, पेस-भूपती जोडीकडे.

रेलिंग कोसळल्याने मुंबईत शाळेतील २५ विद्यार्थी जखमी

मुंबई, १३ अगस्ट - भायखळ्यातील एका शाळेच्या इमारतीचे रेलिंग कोसळल्यामुळे बुधवारी सकाळी शाळेतील २५ विद्यार्थी जखमी झाले. भायखळा पूर्व येथील संत सावता मार्गावरील अंतोनिया डिसोझा हायस्कूलमध्ये सकाळी पावणे बाराच्या सुमारास ही घटना घडली.
घटनेनंतर जखमींपैकी २४ विद्यार्थ्यांवर शाळेतच प्राथमिक उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले. एका विद्यार्थ्यांला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर शाळेची इमारत कोसळल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी दिल्यामुळे शाळेबाहेर पालकांची मोठी गर्दी झाली होती.

सुभिक्षाच्या दुकानांवर २० दिवसांची बंदी

मुंबई, १३ अगस्ट-सुभिक्षा या दुकांनांमध्ये जुन्या औषधांची विक्री होत असल्याचे आढळून आल्यामुळं अन्न आणि औषध प्रशासनानं २० दिवसांची बंदी घातली आहे. याबद्दल अन्न आणि औषध प्रशासनाकडे ग्राहकांच्या तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन प्रशासनानं बुधवारी ही कारवाई केली.
सुभिक्षाची देशभरात रिटेल सामान विक्रीची दुकाने आहेत. यात औषधांसोबत इतर दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंची विक्री केली जाते. मात्र या दुकांनामधल्या सामानाचा दर्जा आणि पॅकेजिंगबाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळं अन्न व औषध प्रशासनानं या दुकानांवर धाडी घातल्या होत्या. हा प्रश्न विधानपरिषदेतही चर्चेला आला होता. त्यावेळी चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

भारत-बांग्लादेश सीमेवर हाय अलर्ट

१३ अगस्त- बांग्लादेश सीमेवर असलेल्‍या सीमा सुरक्षा दलाच्‍या जवानांना जागरूक राहण्‍याच्‍या सुचना देण्‍यात आल्‍या असून 'बॉर्डर सील' करण्‍यात आली आहे। स्वातंत्र्य दिनाच्‍या काळात दहशतवादी हल्‍ला होण्‍याच्‍या शक्‍यतेचा विचार करून हा निर्णय घेण्‍यात आला असून त्‍यासाठी मोठया प्रमाणावर सैन्‍यबळ या भागात लावण्‍यात आले आहे.
सीमा सुरक्षा दलाच्‍या सुत्रांनी सांगितले, की सीमेवर जादा सैन्‍यबळ तैनात करण्‍यात आले असून राष्ट्रविरोधी कारवाया रोखण्‍यासाठी हा निर्णय घेण्‍यात आला आहे. दहशतवादी कारवाईचा विशेष धोका नसला तरीही गुप्‍तचर यंत्रणेकडून मिळालेल्‍या माहितीनुसार बांग्‍लादेशात आश्रय घेतलेले दहशतवादी स्‍वातंत्र्य दिनाच्‍या पार्श्‍वभूमीवर सीमारेषा पार करून भारतात प्रवेश करण्‍याची शक्‍यता आहे. सीमेवरील 4 फुटीरवादी गटांनी दरवर्षाप्रमाणे यंदाही स्‍वातंत्र्य दिवसावर बहिष्‍काराची घोषणा केली आहे. या भागात तपासणी अभियानही राबविले जात आहे.

पाकिस्तानात ५ अतिरेकी लष्कराच्या हल्ल्यात ठार

वाना, १३ अगस्ट - "तालिबान' आणि "अल कायदा'च्या अतिरेक्‍यांचा गड मानल्या जाणाऱ्या वायव्य सरहद प्रांतातील वाना या शहरापासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या भागर या शहरातील अतिरेकी तळांवर पाकिस्तानी लष्कराने बुधवार केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात पाच तालिबानी अतिरेकी ठार झाले.
मंगळवारी अतिरेक्‍यांनी केलेल्या बॉंबस्फोटात १४ पाकिस्तानी सैनिक ठार झाले होते. त्यानंतर लगेचच लष्कराने ही कारवाई केली.
गेल्या काही महिन्यांपासून या भागात लपलेल्या अतिरेक्‍यांचा बीमोड करण्यासाठी लष्कराने कारवाई सुरू केली आहे. अमेरिकेनेही अफगाणिस्तानातून या भागात क्षेपणास्त्र हल्ले चढविले आहेत.

मनसेने बिल्डरांच्याविरोधात दंड थोपटले

मुंबई, १३ अगस्ट- परप्रांतियांच्या विरोधात आघाडी उघडल्यानंतर आता मराठी रहिवाशांना हुसकावून लावण्याच्या प्रयत्नात असलेल्या बिल्डरांकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मोर्चा वळवला आहे.
गिरगावातील मुगभाट लेन येथील भादण हाऊस बिल्डिंगच्या दर्शनी भागात जाहीर फलक लावून मनसेने आपली भविष्यातील वाटचाल स्पष्ट केली आहे। विभाग अध्यक्ष बबन महाडिक आणि उपविभाग अध्यक्ष श्रीधर जगताप यांच्या नावाने लावलेल्या या फलकांवर बिल्डरांना अप्रत्यक्ष इशारा आहे. तसेच, गिरगावातील मराठी कुटुंबांच्या मागे खंबीर उभे असल्याची ग्वाहीदेखील मनसेने दिली आहे.
भादण हाऊसमध्ये ३९ कुटुंबे आहेत। त्यापैकी १० जणांनी अद्याप विकासाला संमती दिलेली नाही. इमारतीच्या विकासाला आपला विरोध नाही. मात्र, विकासाबाबत काही मागण्या बिल्डरने पूर्ण कराव्या, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. करारनाम्यात रहिवाशांना मिळणारे क्षेत्रफळ नमूद करावे, भविष्यात येणा-या मेन्टेनन्सचा खर्च भागवण्यासाठी बिल्डरने जुन्या रहिवाशांना द्यायच्या ५० लाख रूपये कॉर्पस फंडाचा उल्लेख करारनाम्यात करावा, पर्यायी जागेचे भाडे वाढून द्यावे, आदी मागण्या रहिवाशांनी केल्यात. या मागण्या पूर्ण केल्यास विकासाला परवानगी देऊ, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.
त्यातच गेल्या आठवड्यात इमारतीचे बांधकाम पाडण्यास आलेल्या विकासकाच्या कामगारांशी रहिवाशांची बाचाबाची झाली. त्यावेळी इमारतीच्या रहिवाशांनी श्रीधर जगताप आणि श्रीकांत तेंडुलकर या मनसैनिकांच्या मदतीने हुसकावले. 'बिल्डरने रहिवाशांची चर्चा करून हा प्रश्न निकाली काढावा. अन्यथा मराठी माणसावर अन्याय करणाऱ्या विकासकांच्या विरोधात मनसेच्या पद्धतीने आंदोलन छेडण्यात येईल,' असा इशारा जगताप यांनी दिला आहे.

इंधन कपातीची शक्‍यता पेट्रोलियम मंत्र्यांनी फेटाळली

नवी दिल्ली, १३ अगस्ट - गेल्या दोन महिन्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या दरात आठ टक्‍क्‍यांनी घट झाली असली तरीही भारतातील इंधन दरावर त्याचा काहीएक परिणाम होणार नसून नजीकच्या काळात इंधनाच्या दरात घट होण्याची कोणतीही चिन्हे नसल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी जाहीर केले.
ते म्हणाले की, कच्च्या तेलात होणारी घट एक चांगली बाब असून ती स्वागतार्हच आहे तथापि देशातील इंधन दरात मात्र त्यामुळे सध्या कोणतीही घट होणार नाही.
मागच्या महिन्यात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १४७ अमेरिकन डॉलर इतके होते ते आता १०९.८८ अमेरिकन डॉलरपर्यंत घसरले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झालेल्या कच्च्या तेलाच्या दरवाढीमुळे चार जूनला देशातील पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली होती। पेट्रोलियम कंपन्यांना होणारा तोटा भरून काढण्यासाठी ही वाढ करण्यात आली होती.
दरम्यान कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती जरी कमी झाल्या असल्या तरीही देशांतर्गत पेट्रोलियम कंपन्यांचा तोटा अजूनही भरून निघाला नाही. त्यामुळे सध्यातरी पेट्रोलच्या दरात घट करता येणार नाही असे स्पष्टीकरण देवरा यांनी दिले.

इमारत कोसळून भिंडीबाजारात 6 ठार

मुंबई, १३ ऑगस्ट- मुंबईतील कुंभारवाडा भागातील एक पडकी इमारत कोसळून ६ जण ठार तर २८ जण जखमी झाल्‍याची घटना सकाळी ५.३० वाजेच्‍या सुमारास घडली. जखमींना मुंबईतील जे.जे. रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे. मृतांची संख्‍या वाढण्‍याची शक्‍यता आहे.
दत्तनिवास नावाची या चार मजली इमारतीचा जिन्याजवळील काही भाग कोसळल्याने किमान 6 जण ठार तर २८ जण जखमी झाले आहेत. मोडकळीस आलेली ही जुनाट इमारत अतिशय दाटीवाटीच्‍या जागी असल्‍याने आणि सतत पाउस सुरू असल्‍याने मदत कार्यात अडचणी येत आहेत. जखमींना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इमारतीचा ढिगारा बाहेर काढला जात असला तरीही यात आणखी काही जण अडकले असण्‍याची शक्यता अग्निशमन दलाने वर्तवली आहे.