रविवार, 24 अगस्त 2008

नगरसेवकासह पाच जणांना अटक

नवी मुंबई, २४ ऑगस्ट-अनधिकृत झोपड्या तोडल्यामुळे ऐरोली येथे दोन गटांत उसळलेल्या दंगलीप्रकरणी राष्ट्रवादीचे नगरसेवक गणेश ठाकूर यांच्यासह दोन्ही गटांतील पाच जणांना शुक्रवारी अटक करण्यात आली. आरोपींना पोलिस कोठडी सुनावली.

दिघा परिसरातील न्यू गणेश नगर वस्तीमध्ये मोकळ्या असलेल्या एमआयडीसीच्या भूखंडावर तेथेच राहणाऱ्या बापू धांडेने झोपड्या बांधल्या होत्या. ही बाब स्थानिक नगरसेवक गणेश ठाकूर यांना समजल्यावर त्यांच्या समर्थकांनी या झोपड्या जमीनदोस्त केल्या. त्यामुळे संतापलेल्या बापू धांडेची मुले राजेंद व गोविंद यांनी नगरसेवक ठाकूर यांचा सुपरवायझर नागेश नाईक याला बेदम मारहाण केली.

मुंबईत दहीहंडी फोडताना ५९ गोविंदा जखमी

मुंबई, २४ ऑगस्ट- राज्यभर दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा केला जात असताना, मुख्य आकर्षण असलेल्या मुंबईत दडीहंडी फोडताना विविध ठिकाणी झालेल्या घटनांत ५९ गोविंदा जखमी झाले आहेत.
त्यातील ४७ जणांना केईएम रूग्णालयात, पाच जणांना नायर रूग्णालयात तर सात जणांना लोकमान्य टिळक रूग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मेटे यांचे केतकरांना आव्हान

मुंबई, २४ ऑगस्ट- ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्यावरील हल्ल्याचे आपण कधीच समर्थन केले नाही, मात्र असे हल्ले करण्याची पाळी का येते, याचाही विचार झाला पाहिजे, असे सांगत 'छत्रपतींचा अवमान केला नसल्याचे केतकर यांनी सिद्ध करून दाखवावे', असे आव्हान शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे माजी उपाध्यक्ष विनायक मेटे यांनी शनिवारी दिले. तसेच, शिवस्मारकासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करून स्मारकाचे काम पावसाळा संपताक्षणी सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली.
' पत्रकारांवर यापूवीर् शिवसेनेने, आरपीआय तसेच नारायण राणे यांच्या कार्यर्कत्यांनीही हल्ले केले आहेत. या हल्ल्यांसाठी बाळासाहेब ठाकरे, राणे किंवा आरपीआयच्या नेत्यांवर कधीही गुन्हा नोंदवला गेला नाही. माझ्यावर मात्र गुन्हा नोंदवण्यात आला. आमच्याच पक्षाचे राज्य असताना कसलीही शहानिशा न होता अशा प्रकारे गुन्हा नोंदवला जाणे हा गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या निष्पक्षपातीपणाचा पुरावा आहे', असा टोलाही त्यांनी हाणला.
पवार काय भूमिका घेतात, यानुसार आपण आपल्या राजकीय वाटचालीचा निर्णय घेऊ, असे त्यांनी शिवसेनाप्रवेशाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. ठाणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात आरोप करणाऱ्या नगरसेवक प्रताप सरनाईक यांच्या हकालपट्टीची मागणी करण्यात आली. मग केतकर हल्ल्याप्रकरणी आपल्याविरोधात बोलणाऱ्या पक्षातील नेत्यांवर कारवाई का झाली नाही, असा सवाल त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार जीतेंद आव्हाड यांचे नाव न घेता केला.

इंडियन मुजाहिदीन'चा धमकीचा मेल, गुजरात आणि महाराष्ट्र "हिट लिस्ट'वर

नवी दिल्ली, २४ ऑगस्ट-गुजरातमधील बॉम्बस्फोटांची जबाबदारी स्वीकारलेल्या "इंडियन मुजाहिदीन' या दहशतवादी संघटनेने महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आणखी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिली आहे.
वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांना रविवारी मुजाहिदीनने हा धमकीचा मेल पाठविला आहे.
या मेलमध्ये "सिमी' च्या कार्यकर्त्यांच्या आणि इतर दहशतवाद्यांच्या कृत्यांचे समर्थन केले आहे.
या मेलमध्ये अहमदाबाद स्फोटामध्ये वापरलेल्या कारची छायाचित्रेही आहेत.
यापूर्वी गुजरातमध्ये स्फोट घडवून आणण्यापूर्वी पाठविलेल्या मेलमध्ये त्यांनी पाच स्फोट घडवून आणण्याची धमकी दिली होती.