मुंबई, १६ सप्टेम्बर-मुंबईत झालेल्या ७/११ बॉम्बस्फोटातील आरोपींचे वकील पत्र घेणा-या वकिलांना आपल्या ठाकरी भाषेत ठणकावणारे राज ठाकरे यांची भाषा आता मृदू झाली आहे. त्यांनी या आरोपींचे खटले लढणा-या वकिलांना भावनिक आवाहन करून अशा केस घेवू नये असे सांगितले आहे. या संदर्भातील पोस्ट आता मुंबईच्या विविध ठिकाणी लावले आहेत.२००६ मध्ये राज ठाकरे यांनी बॉम्ब स्फोटातील आरोपींचे वकील पत्र घेणा-या वकीलांना धमकी दिली होती. त्यानंतर त्यांच्यावर न्यायालयाचा अपमान केल्याचे अनेक खटले दाखल करण्यात आले. मात्र, आता दोन वर्षांनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांना कायद्याची जाण झाली आहे. त्यांनी आपली मागणी कायम ठेवली. मात्र, गांधीगिरी करून ते वकिलांना भावनिक आवाहन करीत आहेत.
दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटनंतर मनसेतर्फे विक्रोळी मेट्रोपॉलिटन कोर्टासमोर एक पोस्टर लावण्यात आले आहे. त्यात बॉम्ब स्फोटाच्या आरोपींच्या वकिलांचा विरोध करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये एका चिमुड्याला आपल्या मृत आईसमोर रडताना दाखवलं आहे. त्याच्या शेजारी असलेल्या मजकूरात म्हटले आहे की, वकील साहेब, आम्हांला तुमचा गर्व आहे. तुम्ही बॉम्ब स्फोटातील आरोपींसाठी लढत आहात. पण हे सांगा जे बॉम्ब स्फोटात मारले गेले त्या आमच्या कुटुंबाचा काय दोष होता. त्यांना न्याय कोण देणार ? आमचे कुटुंब आम्हांला परत द्या.
वकिलांनी वकिली करताना काही गोष्टींच भान राखावं असा सल्ला देत या पोस्टरमध्ये म्हटले आहे की, बॉम्ब स्फोटात मारल्या गेलेल्या व्यक्तींच्या मृतदेहावर उभे राहून तुम्ही तुमचे स्थान उंचावू नका. मनसेचे सचिव चिंटू शेख यांनी हे पोस्टर लावले आहे.
चिंटू शेख यांची बहिण शाहीन ही सुद्धा पेशाने वकील आहे. पेशा आणि वैयक्तीक मत यात नेहमी फरक करायला हवे. मात्र, असा विषय असेल तर वकीलांनी बॉम्बस्फोटांच्या आरोपींच्या केस घेवू नये. माझ्या भावाच्या मताशी मी सहमत असल्याचे शाहीन हीने सांगितले.