शनिवार, 12 जुलाई 2008

देशाला अणुकरारापेक्षा भाजपचा धोका - ज्योती बसू

कोलकाता - भारताला अणुकरारापेक्षा भारतीय जनता पक्षाचा जास्त धोका असल्याची टीका पश्‍चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते ज्योती बसू यांनी केली. अणुकराराच्या मुद्‌द्‌यावरून डाव्यांनी केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. त्यापार्श्‍वभूमीवर, या टीकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर श्री. बसू यांनी प. बंगाचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या "पॉलिट ब्युरो'चे सदस्य निरुपम सेन यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी ही टीका केली. श्री. बसू यांनी गेल्या आठ जूनला ९५ व्या वर्षांत पदार्पण केले. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी श्री. भट्टाचार्य आणि श्री. सेन त्यांच्या निवासस्थानी गेले होते.
डाव्यांच्या अणुकराराला विरोध आहे आणि तो त्यांनी केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेऊन जाहीर केला आहे. आता या मुद्‌द्‌यामुळे विश्‍वासदर्शक ठरावाच्यावेळी सरकारच्या विरोधात मत देण्याची गरज नाही.

मायावतींनी डागली कॉंग्रेस, भाजप आणि समाजवादी पक्षावर तोफ

नवी दिल्ली - बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी शुक्रवारी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेस सोबत भारतीय जनता पक्ष आणि समाजवादी पक्षावर जोरदार हल्ला चढविला. भाजप, कॉंग्रेस आणि समाजवादी पक्ष आपल्याला लक्ष्य करीत असल्याची टीका त्यांनी केली.
समाजवादी पक्ष कॉंग्रेसच्या साह्याने बहुजन समाज पक्षाला बदनाम करीत आहे. दरवेळी निवडणुका जवळ आल्या की, माझ्या बदनामीची मोहीम सुरू होते, पण केंद्र सरकारच्या कट कारस्थानांना माझा पक्ष कधीच घाबरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ज्या आरोपांवरून माझ्याविरुद्ध खटले दाखल केले आहेत. तसेच आरोप समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यांच्याविरुद्ध असताना केंद्र सरकार आणि "सीबीआय' गप्प का, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला आहे.

औरंगाबाद - मिलिंद महाविद्यालयातून दोन लाखांचा ऐवज लंपास

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद कला महाविद्यालय आणि मिलिंद विज्ञान महाविद्यालयाची तिजोरी फोडून शुक्रवारी रात्री दोन लाखांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिंचवडमधील कंपनीत आग

चिंचवडमधील मोहननगर येथील श्री गणेश ऍडेटिव्ह टेस्ट या कंपनीमध्ये शनिवारी दुपारी पावणे बारा वाजता आग लागली। अग्निशामक दलाने ४५ मिनिटात विझवली.
आगीत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

बसची धडक बसून पिंपरीत मुलगी मृत्युमुखी

पिंपरी - पिंपरीतील थरमॅक्‍स - आकुर्डी रस्त्यावर खासगी बसची धडक बसून पंधरा वर्षांची मुलगी मरण पावली.
शनिवारी सकाळी हा अपघात झाला. मुलगी सायकलवरून जात होती त्यावेळी तिला बसची धडक बसली.

साताऱ्याजवळ अपघातात ट्रकचालक ठार

सातारा - पुणे- बंगळूर महामार्गावर येथून चार किलोमीटरवर शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास मुंबईवरून बंगळूरला चाललेला ट्रक पलटी होऊन ट्रकचा चालक ठार झाला.
अपघातग्रस्त ट्रक मुंबईहून लोखंड घेऊन चालला होता. शहराजवळील खिंडवाडीच्या अलिकडे एका छोट्या पुलावरून जाताना नियंत्रण सुटल्यामुळे तो पलटी झाला.
अपघात झाला त्यावेळी ट्रकचा क्‍लिनर ट्रक चालवत होता. तो गंभीर जखमी असून, त्याच्यावर येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत चालक व जखमी क्‍लिनर या दोघांचीही नावे समजू शकलेली नाहीत.

महिंद्रा हॉलीडेच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर - सूरज बोरेकर यांच्या आत्महत्येप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी शुक्रवारी क्‍लब महिंद्रा हॉलिडेच्या संचालकांविरुद्ध ३०६ या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. जनता चौकात असलेल्या टोलेजंग इमारतीच्या दहाव्या माळ्यावरील क्‍लब महिंद्रा हॉलिडेच्या कार्यालयातून सूरजला मारहाण करून फेकून देण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला, असा आरोप सूरजच्या नातेवाइकांनी केला होता.
घटनेच्या दिवशी मृतक सूरज आपला थकीत पगार घेण्यासाठी गेला असता त्याला बेशुद्ध होईस्तोवर मारहाण करण्यात आली आणि नंतर त्याला दहाव्या माळ्यावरून फेकून दिले. त्यामुळे ही आत्महत्या नसून सुनियोजित हत्याच आहे, असे त्यांनी म्हटले होते.
याप्रकरणी सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये मृतकाचा भाऊ धीरज दत्तपंत बोरेकर यांच्या तक्रारीवरून हॉलिडेच्या संचालकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल ३०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आता नव्याने तपास केला जाणार आहे.

विजय कोलते यांच्या मोटारीला अपघात

आंबेगाव - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते विजय कोलते यांच्या मोटारीला आज सकाळी सव्वादहा वाजता पुणे नाशिक रस्त्यावर अपघात झाला. या अपघातात कोलते यांना इजा झाली नाही. मात्र, त्यांच्या मोटारीतील दोन जण जखमी झाले आहे.

मुंडेंचा दौरा अचानक रद्द, नागपूरमध्ये चर्चेला उधाण !

नागपूर- नितीन गडकरी यांच्या शुक्रवारच्या प्रचारसभेला भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे अनुपस्थित होते. मुंडे यांचा दौरा अचानक रद्द झाल्याने, शहरात उलटसुलट राजकीय चर्चा सुरू होत्या.
मुंडे यांनी मुद्दामच गडकरी यांच्या सभेला येण्याचे टाळले, असेही बोलले जात होते. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कालच्या सभेमुळे मुंडे काय बोलतात, हे ऐकण्यास अनेकजण उत्सुक होते. मुंडे हेच मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी त्यांना गडकरी या पदावर दावा करीत आहेत. हे समजले तरी पुरे आहे, अशी विनोदाने कोटी केली होती. यामुळे मुंडे यांच्या आगमनाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
गडकरी यांनी भाषणात मुंडेंच्या अनुपस्थितीचा खुलासा केला. मुंडे यांच्या आईंना पक्षघाताचा झटका आला असून, त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. मात्र, चुकीचा संदेश जाऊ नये, म्हणून मुंडे यांनी हेलिकॉप्टरने येण्याची तयारी दर्शविली होती. आज सकाळीसुद्धा त्यांनी आपण येणे गरजेचे आहे का, अशी विचारणा केली होती. मात्र, प्रचारापेक्षा आईची काळजी घेणे आवश्‍यक आहे, असे आपण सांगितले. विजय निश्‍चित आहे, चिंता करण्याचे कारण नाही, असे सांगितले. तेव्हा त्यांनी दौरा रद्द केल्याचे गडकरी यांनी भाषणात सांगितले.

अणुकरार आपण स्वीकारला पाहिजे - डॉ. श्रीकांत परांजपे

पुणे - ""रशिया व चीन या मोठ्या देशांशी अमेरिकेने यापूर्वीच अणुकरार केला आहे. आता आपल्याबरोबर ते हा करार करत आहेत. देशाला उपयुक्त असलेला करार आपण स्वीकारला पाहिजे,'' असे पुणे विद्यापीठाचे संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. श्रीकांत परांजपे यांनी शुक्रवारी सांगितले. कोणताही देश जगापासून फटकून वागू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
"एमआयटी स्कूल ऑफ गर्व्हनमेंट'तर्फे आयोजित "इंडो-यूएस न्यूक्‍लिअर डील : हाऊ गुड हाऊ बॅड' या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते। राज्याचे माजी निवडणूक आयुक्त यशवंत राजवाडे, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. अजित अभ्यंकर यात सहभागी झाले होते. "एमआयटी'चे संस्थापक डॉ. विश्‍वनाथ कराड, प्रा. राहुल कराड, प्रा. डी. पी. आपटे, डॉ. के. आर. भाटिया या वेळी उपस्थित होते. डॉ. परांजपे म्हणाले, ""अणुकरारामुळे संशोधनाचा मार्ग खुला होऊन देशाचे खऱ्या अर्थाने जागतिकीकरण होईल. यातून देशाला वीज उपलब्ध होईल. अर्थात काही मिळविताना काही त्याग करण्याची तयारी ठेवली पाहिजे.''
राजवाडे म्हणाले, ""हा करार करताना आपण देशहिताची पुरेशी दक्षता घेतली पाहिजे। यापूर्वी सोव्हिएत संघराज्याशी आपण शस्त्रास्त्रे व औद्योगिक करार केले आहेत.''
अमेरिकेबरोबर करण्यात येणारा अणुकरार देशहिताच्या विरुद्ध आहे. या करारामुळे पुरेशी वीज निर्माण होईल, असे सांगण्यात येत असले, तरी वायूपासून निर्माण केलेली वीज अणुशक्तीपासून निर्माण केलेल्या विजेपेक्षा खूप स्वस्त आहे. त्यामुळे युरेनियम आयात करण्याची गरज नाही. सोव्हिएत संघराज्याच्या विघटनानंतर अमेरिका जगाला आपल्या लहरीप्रमाणे नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी भूमिका अभ्यंकर यांनी मांडली.
प्रा. मुक्ता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. राहुल कराड यांनी आभार मानले.

गोरगरीबांवरील उपचारांत दोन कोटींचा गैरव्यवहार...

मुंबई - परळच्या केइएम रुग्णालयात गोरगरिबांवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या "पुअर बॉक्‍स फंडा'तील दोन कोटी रुपये प्रशासकीय कामांसाठी काढल्याचे धक्कादायक वृत्त आहे. आयुक्तांच्या परवानगीशिवाय हे पैसे काढण्यात आल्याने हा एकप्रकारचा गैरव्यवहारच असल्याचे म्हटले जाते.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांवर करावयाच्या उपचारासाठी केईम रुग्णालयांत १९२६ साली पुअर बॉक्‍स फंडाची स्थापना करण्यात आली. दानशूर व्यक्ती व अनेक सामाजिक संस्था या फंडासाठी मोठ्या प्रमाणात देणगी देतात. सध्या या फंडात ६ कोटी रुपये जमा आहेत. त्याच्या व्याजातून दरवर्षी महापालिका प्रशासनाला ७० लाख रुपये व्याज मिळते. या व्याजातून रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत दिली जाते.
अलिकडेच प्रशासकीय कामासाठी या फंडातील २ कोटी रुपये काढण्यात आले आहेत। या वृत्ताला अतिरिक्त आयुक्त किशोर गजभिये यांनीही शुक्रवारी महापालिकेतील पत्रकार परिषदेत बोलताना दुजोरा दिला. या फंडातील पैसे काढताना आयुक्त डॉ. जयराज फाटक यांची परवानगी घेतली नसल्याचे गजभिये यांनी मान्य केले. या प्रकरणाची सध्या दक्षता विभागामार्फत चौकशी सुरू असल्याचे सूत्रानी सांगितले. सहाय्यक आयुक्त मिलिंद शंभरकर हे या प्रकरणाची चौकशी करीत असून पुढील आठवड्यात त्यांचा अहवाल अपेक्षित आहे.

अश्‍लिल नृत्य करणाऱ्या बारबालांना मुलुंडमध्ये अटक

मुंबई - बारमध्ये अश्‍लिल नृत्य करणाऱ्या १३ बारबालांना शुक्रवारी रात्री मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने अटक केली. या सर्व बारबाला मुलुंडमधील राहणाऱ्या आहेत.
मुलुंडमधील पुष्पा बिअर बारमध्ये काही मुली अश्‍लिल नृत्य करीत असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. त्याआधारे या बारवर शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास छापा टाकण्यात आला. यावेळी १३ मुली तिथे नृत्य करीत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्यांना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मायावतींनी डागली कॉंग्रेस, भाजप आणि समाजवादी पक्षावर तोफ

नवी दिल्ली - बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी शुक्रवारी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेस सोबत भारतीय जनता पक्ष आणि समाजवादी पक्षावर जोरदार हल्ला चढविला. भाजप, कॉंग्रेस आणि समाजवादी पक्ष आपल्याला लक्ष्य करीत असल्याची टीका त्यांनी केली.
समाजवादी पक्ष कॉंग्रेसच्या साह्याने बहुजन समाज पक्षाला बदनाम करीत आहे. दरवेळी निवडणुका जवळ आल्या की, माझ्या बदनामीची मोहीम सुरू होते, पण केंद्र सरकारच्या कट कारस्थानांना माझा पक्ष कधीच घाबरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ज्या आरोपांवरून माझ्याविरुद्ध खटले दाखल केले आहेत. तसेच आरोप समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यांच्याविरुद्ध असताना केंद्र सरकार आणि "सीबीआय' गप्प का, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला आहे.