रविवार, 3 अगस्त 2008

दुसऱ्या कसोटीत भारताची "जय' - श्रीलंकेचा १७० धावांनी पराभव

गॉल, ३ अगस्ट - हरभजन, ईशांत शर्मा आणि अनिल कुंबळे यांच्या भेदक गोलंदाजीने श्रीलंकेच्या फलं दाजीच्या चिंधड्या उडवत भारताने दुसरी कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी साधली। सामनावीर पुरस्कार धडाकेबाज द्विशत ठोकणाऱ्या वीरेंद्र सेहवागला मिळाला.
तत्पुर्वी, भारताने कालच्या ४ बाद २०० वरून आज आपल्या डावाची सुरूवात केली. मात्र गां गुली १६ धावा तर लक्ष्मण १३ धावाकरून तंबूत परतले. त्यानंतर दिनेश कार्तिक २० धावांची भर घालून चालता झाला. नंतर आलेल्या अनिल कुंबळे २, हरभजन ११, ईशांत शर्मा ० आणि जहीर खान १ (नाबाद) यांनी केवळ मैदानावर हजेरी लावण्याचे काम केल्याने भारताचा दुसरा डाव २६९ धावांत आटोपला.
भारताच्या ३०६ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या श्रीलंकेला सुरवातील हरभजन, ईशा ंत शर्मा आणि जहीर खानने हादरे देवून अडचणीत आणले.
सलामीला आलेल्या व्हंडोर्टला (१०) हरभजनने बाद करून श्रीलंकेला पहिला हादरा दिला। त्यानंतर वर्नपुराला ईशांत शर्माने शुन्यावर, संघकाराला एकवर जहीर खानने आणि जयवर्धनेला ५ वर ईशांत शर्माने तंबूत धाडून श्रीलंकेची अवस्था दयनीय केली.
दुसरीकडे समरविराने (नाबाद ६७) एक बाजू टिकवून धरली। त्याला दिलशानने (३८ धावा) चांगली साथ दिली. मात्र ईशांत शर्माने दिलशानला बाद केल्यानंतर फलंदाजीला गळती लागली. दिलशाननंतर आलेले जयवर्धने (४ धावा), चामिंडा वास (०), कुलाशेखरा (१), मेंडीस (२) आणि मुरलीधरन (०) स्वस्तात परतल्याने श्रीलंकेचा दुसरा डाव अवघ्या १३६ धावांत आटोपला. आणि भारताने तब्बल १७० धावांनी विजय मिळवत, पहिल्या कसोटीतील पराभवाचा वचपा काढला.
भारतातर्फे हरभजनने ५१ धावांत ४, ईशांत शर्माने २० धावांत ३, अनिल कुंबळेने ४१ धावांत २ तर १८ धावांत १ मोहरा टिपला.
तीन कसोटींच्या मालिकेत भारत आणि श्रीलंका यांनी प्रत्येकी एक कसोटी जिंकून बरोबरी साधली आहे.

नयना देवीच्या देवळात चेंगराचेंगरी, १२० भाविक ठार

बिलासपुर, ३ अगस्ट- हिमांचल प्रदेशात विलासपूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध नयना देवीच्या देवळात आज झालेल्या चेंगराचेंगरीत रेलिंग कोसळून १२० भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर ३०० हून अधिक भाविक जखमी झाले आहेत।
शनिवारपासून सुरू झालेल्या श्रावण अष्टमी यात्रेसाठी आज रविवार असल्यानं भाविकांनी प्रचंड गर्दी केली। देवीच्या दर्शनासाठी देवळात एकाच वेळी झुंबड उडाली. या चेंगराचेंगरीत देवळाच्या बाहेरचं रेलिंग कोसळलं आणि भाविकांचा तोल गेला. शेकडो भाविक खाली कोसळले आणि त्यात सुमारे १२० जण जागीच ठार झाले. त्यातील ६० शवं टेकडीवरून खाली आणण्यात आली आहेत. जखमींची संख्याही मोठी असल्यानं त्यांना विलासपूर आणि चंढिगडच्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु हवामान अत्यंत खराब असल्यानं मदतकार्यात अडथळे येत आहेत.
नयना देवीचं हे मंदिर उंच टेकडीवर आहे. दरवर्षी तिथे भरणा-या यात्रेवेळी होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनानं सर्व तयारी केली होती. परंतु, आज सुट्टीचा दिवस असल्यानं हजारो भाविकांनी एकदम गर्दी केली आणि देऊळ परिसरात शंभर पोलिस असूनही ते या गर्दीवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत. या चेंगराचेंगरीत अनेकजण एकमेकांखाली चिरडले गेले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

'मेट्रो'ची तीन कंत्राटे!

मुंबई, ३ अगस्ट-मेट्रो प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातल्या तीन विविध कामांसाठी 'मुंबई मेट्रो वन' कंपनीने तीन कंपन्यांना कंत्राटे दिली आहेत. यात वीजपुरवठा, सिग्नल यंत्रणा, ट्रेन कंट्रोलिंग व तीन विशेष पूल बांधण्याच्या कंत्राटांचा समावेश आहे. ही कंत्राटे अनुक्रमे एबीबी, सीमेन्स व स्यू कन्स्ट्रक्शन कंपनीला दिली असल्याचे मुंबई मेट्रो वन प्रा. लि. चे संचालक कृष्णप्रसाद माहेश्वरी यांनी सांगितले.
मेट्रोच्या मार्गावर वीजपुरवठा तारा उभारणे, त्यांची चाचणी करणे व वीजवितरण व 'स्काडा' यंत्रणा (सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा अॅक्विझिशन) उभारण्याचे काम एबीबी कंपनी करेल। दिल्ली मेट्रो रेल्वेच्या पहिल्या टप्प्याचा (४५ रुट किमी) वीजपुरवठाही याच कंपनीने उभारला. दुसऱ्या टप्प्याचे (१२१ रुट किमी) कामही हीच कंपनी करत आहे.
सिग्नल यंत्रणा या क्षेत्रातील दादा कंपनी सीमेन्स करेल। या ११.४० किमी लांबीच्या पहिल्या टप्प्यातील सिग्नल यंत्रणा उभारण्याचे काम सोपवले आहे. २५ टक्के वीजबचत करणारे'एलझेडबी ७०० एम' तंत्रज्ञान वापरून हे सिग्नल बसतील. दिल्ली मेट्रोच्या तिसऱ्या लाइनवरील (लांबी : २५ किमी) सिग्नलही सीमेन्सनेच अवघ्या १६ महिन्यांत बसवले. जगभरात जर्मनी, कोरिया, ऑस्ट्रिया, चीन, थायलंड अशा विविध देशांमध्ये तब्बल ७५० किमी लांबीच्या मेट्रो लाइन्सवर सीमेन्सनेच सिग्नल आहेत.
मेट्रो जिथे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे ओलांडेल, तिथे केबल स्टे पूल असेल. तसेच मेट्रोच्या या मार्गावर अंधेरी स्टेशन व मिठी नदी परिसरात कँटिलिव्हर पूल असतील. स्यू कन्स्ट्रक्शन्स ही कंपनी व्हीएसएल कंपनीच्या सहकार्याने २० महिन्यांमध्ये या तीन पुलांचे काम पूर्ण करेल. या तीनही कंत्राटांसह संपूर्ण मेट्रो रेल्वेचे काम ३० महिन्यांत पूर्ण करण्याचा निर्धारही माहेश्वरी यांनी व्यक्त केला.

आर्कुटवर धमक्या देणारा तरुण ठाण्यातला?

ऑकुर्टवरील 'अंटी शिवसेना' या कम्युनिटी साइटवर 'पाच ऑगस्ट रोजी आम्ही शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांना ठार मारू' अशी धमकी देणाऱ्या आणि वर्षभर शिवसेनेबद्दल बदनामीकारक मजकूर लिहिणाऱ्या तरुणाला पकडण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार एकनाथ शिंदे आणि भारतीय विद्याथीर् सेनेचे सरचिटणीस विकास रेपाळे यांनी अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रशांत बुरडे यांच्याकडे केली आहे। रेपाळे वर्षभर या साइटवर लक्ष ठेवून आहेत.
कम्युनिटीच्या मॉडरेटरचा शोध घेण्यासाठी त्यांनी एका मुलीच्या नावाने बोगस स्क्रॅप पाठवला होता। स्क्रॅपला उत्तर देताना मॉडरेटने आपले नाव आणि फोन नंबर दिला. हा तरुण झोराज या नावाने लॉग इन करीत असला तरी त्याचे खरे नाव सूरज असल्याचे रेपाळे यांनी शोधून काढले. तो गेल्या वषीर्पर्यंत ठाण्यातील सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूलमध्ये शिकत होता. बारावी झालेला सूरज आता कुठे आहे, ते शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची, तसेच शिवसेनेची बदनामी करणाऱ्या या साइटवर बंदी घालण्याची मागणीही शिवसेनेने केली आहे.
पोलिस तपासात मात्र या साइटचा मॉडरेटर हा ठाण्यातला रहिवासी नसल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याचा या प्रकरणाशी काही संबंध आहे की नाही, याची चौकशी सुरू आहे.