गुरुवार, 14 अगस्त 2008

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी माणिकराव ठाकरेंची वर्णी

मुंबई, १४ ऑगस्ट- प्रभाराव यांची हिमाचलच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर रिक्त झालेल्या कॉग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी राज्यमंत्री माणिकराव ठाकरे यांची वर्णी लागल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
अनेक दिवसांपासून या पदासाठी राज्यात रस्सीखेच सुरू आहे. कॉग्रेसचे अनेक नेते दिल्ली वारी करून थकल्यानंतर आता या पदावर अचानक स्पर्धेत नसलेल्या माणिकरावांचे नाव आल्याने राज्यातील नेत्यांसह कार्यकर्तेही बुचकळ्यांत पडले आहेत.
पतंगराव कदम यांना प्रभारीप्रदेशाध्यक्ष करण्‍यात आल्याने त्यांच्या समर्थकांच्या आशा अधिक उंचावल्या होत्या, परंतु आता माणिकरावांचे नाव यात आल्याने त्यांचे समर्थकही नाराज झाल्याचे समजते.

नारायण राणे नवा पक्ष स्थापणार

मुंबई, १४ ऑगस्ट- मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी असलेल्या मतभेदामुळे आपल्या महसूल मंत्री पदाचा राजीनामा दिलेल्या नारायण राणे यांनी आता आपल्या समर्थकांची जमवाजमव केली असून, ते स्वातंत्र्य दिनानंतर नवा पक्ष स्थापन करण्याची दाट शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांना कॉग्रेस पक्ष श्रेष्ठींनी पुन्हा एकदा अभय देत 'जुने ते सोने' हा पाढा राणेंपुढे वाचल्याने व्यथित झालेल्या राणेंनी आता बंडाचे निशाण फडकवण्याची तयारी सुरू केल्याचे समजते। राणे सध्या कोंकण दौऱ्यावर आहेत.
दरम्यान त्यांनी आपल्या समर्थकांची जमाजमव सुरू केली आहे। येत्या दोन दिवसांमध्ये राणे मुंबईत एक बैठकही घेण्याची शक्यता आहे.
राणे समर्थकांसह त्यांनीही या बाबतीत मौन पाळल्याने याला दुजोरा मिळत असून, राणेंच्या पाठीशी 30 ते 32 आमदारांचा फौजफाटा असल्याचे त्यांच्या निकटवर्तियांचे म्हणणे आहे. या आमदारांची संख्या पाहता राज्यातील अनेक पक्षांना राणेंनी सुरुंग लावण्याची तयारी पूर्णं केल्याचे दिसून येते.