मंगलवार, 1 जुलाई 2008

भ्रष्ट प्रशासनाची वर्षात ८८३ कोटींची लाच

नवी दिल्ली - भारताला सरकारी कर्मचाऱ्यांची लाचखोरी रोखण्यावर अद्याप मार्ग सापडला नसल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे। कामे करून घेण्यासाठी गेल्या वर्षांत सरकारी कर्मचाऱ्यांना तब्बल ८८३ कोटी रुपयांची लाच द्यावी लागली आहे.
"ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल इंडिया' (टीआयआय) या स्वयंसेवी संस्थेने गेल्या वर्षीची ही आकडेवारी प्रसिद्ध केली। आपली कामे करून घेण्यासाठी दारिद्य्ररेषेखालील एक तृतीयांश नागरिकांना सरकारी कर्मचाऱ्यांना तब्बल ८८३ कोटी रुपयांची लाच द्यावी लागल्याचे ती सांगते. यात पोलिसांपासून सार्वजनिक वितरण व्यवस्थेपर्यंतच्या अनेक खात्यांचा समावेश आहे. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.
सरकारच्या अखत्यारीतील ११ सेवांचा या संस्थेने अभ्यास केला. सार्वजनिक वितरण व्यवस्थेबरोबरच रुग्णालये, विद्युत व्यवस्था, पाणीपुरवठा, पोलिसांची मदत आदी साध्या सेवांसाठीही लाच द्यावी लागत असल्याचे त्यात आढळले. नागालॅंड व गोव्यासारख्या छोट्या राज्यांत या सेवांसाठी द्याव्या लागणाऱ्या लाचेचे प्रमाण चिंताजनक पातळीवर; तर चंडीगड आणि त्रिपुरात मध्यम असल्याचे दिसले.
सरकारी खात्यांत पोलिस खाते सर्वाधिक भ्रष्ट आढळले. त्यापाठोपाठ दस्तावेज नोंदणी, गृह, पाणीपुरवठा, वन, विद्युत, आरोग्य, सार्वजनिक वितरण व्यवस्था, बॅंकिंग आणि बारावीपर्यंतचे शिक्षण या खात्यांचा क्रमांक आहे.

नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरमध्ये कडकडीत बंद

मनमाड (जि। नाशिक) - मालेगावमधील सोयगावमध्ये झालेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटातर्फे आज मगंळवारी मनमाड बंदची हाक देण्यात आली आहे.
त्यामुळे मनमाड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. गोळीबाराची चौकशी व्हावी, दलितांवरील अत्याचार रोखावेत अशा मागण्या या बंदच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

तुळजापूर-सोलापूर रस्त्यावर शिक्षकास लुटले

तुळजापुर - तुळजापूर-सोलापूर रस्त्यावर सोमवारी रात्री मोटारसायकलवरून जाणाऱ्या एका शिक्षकाला चोरट्यांनी अडवून मारहाण केली। तसेच त्याच्याजवळील १८ हजारांचा ऐवज पळवून नेला.
जखमी शिक्षकास सोलापूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पावसामुळे नाशिकमधील रेल्वेसेवा विस्कळीत

नाशिक - मुंबईत पर्जन्यवृष्टी वाढल्यामुळे नाशिकहून रेल्वेने प्रवास करणे मुश्‍किल बनले आहे। मंगळवारी सकाळी नाशिकहून मुंबईकडे पंचवटी एक्‍स्प्रेस सोडण्यात आली होती. ती कसाऱ्याच्या पुढे गेली असतानाच परत बोलविण्यात आली.
मनमाड-कुर्ला ही गोदावरी एक्‍स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तसेच सकाळी ९ च्या सुमारास धावणारी शताब्दी एक्‍सप्प्रेस नाशिकरोड स्थानकावर थांबविण्यात आली आहे. रेल्वेसेवेत अडथळे निर्माण झाले असल्याने दुपारपर्यंत कल्याण ते नाशिकरोड या मार्गावरील सुमारे ३० हजार प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

नाशिकमध्ये पावसाचा जोर कायम

नाशिक - नाशिक शहर व जिल्ह्यांत सोमवारपासून सुरू असलेली संततधार मंगळवारी सकाळपर्यंतही कायम आहे.
बऱ्याच प्रतिक्षेनंतर पाऊस सुुरू झाल्याने खरीपाचे धोरण काय असावे या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे आज तज्ज्ञांची बैठक होत आहें.

नाशिककरांची तेरा तास "बत्ती गूल'

नाशिक रोड - वीज पारेषण कंपनीच्या टॉवरमध्ये आज पुन्हा बिघाड होऊन शहरात बारा तासांहून अधिक काळ वीज गायब झाल्याने शहरातील पाणीपुरवठ्यासह उद्योग-व्यवसायाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। सायंकाळी साडेपाचपर्यंत २०२४ तक्रारींची नोंद झाली होती.
वीज पारेषण कंपनीच्या आडगाव आणि टाकळी येथील उच्चदाब उपकेंद्रात मध्यरात्री अडीचच्या सुमारास बिघाड झाल्याने अर्ध्याहून अधिक नाशिकचा वीजपुरवठा खंडित झाला। पहाटे पाऊस सुरू झाल्याने त्यातून हा बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.
दरम्यान, वीज कंपनीचे या संदर्भात मौन कायम आहे. वीज गेल्याच्या तक्रारी सुरू झाल्यावर वितरण कंपनीने तातडीने वीजवाहिन्यांची तपासणी केली. त्यात पारेषण कंपनीच्या यंत्रणेत बिघाड झाल्याची माहिती पुढे आली.

पाकमध्ये खेळण्यास नकार देणाऱ्या देशांना आयसीसीचा इशारा

लाहोर - आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार देणाऱ्या देशांना भविष्यात त्यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेवेळीही अशीच परिस्थिती उद्‌भवू शकते, असा इशारा आयसीसीने दिला आहे.
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड तसेच न्युझीलंड या देशांच्या खेळाडूंना आयसीसीचे अध्यक्ष रे माली यांनी मंगळवारी हा इशारा दिला आहे.
येत्या काही दिवसांत आयसीसी अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक दुबईत होत असून त्यात सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

इचलकरंजीत चोर समजून बारा तरुणांना बेदम माराहाण

कोल्हापूर - चोर असल्याच्या संशयावरुन राजस्थान समाजातील बारा तरुणांना अमानुषपणे माराहाण केल्याची घटना मंगळवारी पहाटे साडेचार वाजता इचलकरंजीतील जवाहरनगर परिसरात घडली। जखमी तरुणांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
मंगळवारी पहाटे जमावाने हे तरुण राहात असलेल्या कारखाना परिसरात हल्ला केला। कोयता, तलवारी, दगडी पाटा यांनी या तरुणांना माराहाण करुन तेथे असलेल्या दुचाकी गाड्या, प्रापंचिक साहित्याचेही नुकसान केले.
या घटनेनंतर शहरातील राजस्थान समाजातील सुमारे दोन हजारहून अधिक नागरिकांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. माराहाण करण्यांवर कारवाई करण्याची मागणी करुन बुधवारी उद्योग बंद ठेवणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

एसटीने ठोकरल्याने इचलकरंजीत वृद्धेचा मृत्यू

कोल्हापूर - एसटीने ठोकरल्यामुळे सरस्वती गणपतराव होगाडे (वय ८०, रा। इचलकरंजी) या पादचारी वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी इचलकरंजीतील शाहू पुतळा येथे हा अपघात घडला. जनता दलाचे राज्य उपाध्यक्ष व महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांच्या त्या आई होत.
सरस्वती होगाडे नेहमीप्रमाणे सकाळी फिरण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी मागून एसटीने त्यांना धडक दिली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

महाराष्ट्रातील पोलिस होणार सायबर कॉप्स्‌ !

नाशिक - आर्थिक गुन्हेगारी आणि दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्रातील पोलिस दलाला सायबर कॉप्सचा चेहरा देण्याचे नियोजन करण्यात आले। त्यासंबंधीच्या प्रशिक्षणाची जबाबदारी नाशिकमधील महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीने स्विकारली आहे.
आतापर्यंत राज्यातील ६३० अधिकाऱ्यांना सायबर गुन्हेगारी विषयक प्रशिक्षण देण्यात आले आहे। येत्या दोन ते तीन महिन्यात उपनिरीक्षकांची एक हजार जणांची तुकडी प्रशिक्षणासाठी प्रबोधिनीमध्ये दाखल होत आहे. त्यासाठी प्रबोधिनीमध्ये आतापर्यंत दोन संगणक प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. आणखी एक संगणक प्रयोगशाळा उभारण्यात येत असून ती सप्टेंबर जुलैमध्ये कार्यान्वीत होईल. तसेच गुन्हे प्रशिक्षण कार्यशाळेत सेवातंर्गत प्रशिक्षणासाठी येणाऱ्या शंभर जणांच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी इथं प्रशिक्षण देण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील पोलिस ठाणे संगणकीय जाळ्यांनी जोडण्यात येतील. प्राथमिक गुन्ह्यांची नोंद देखील "सीपा' या संगणकीय सॉफ्टवेअरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. प्रबोधिनीचे उपसंचालक रितेश कुमार यांनी ही माहिती आज येथे दिली.

महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी पावसाचा जोर

पुणे - राज्यात पावसाचा जोर रात्रभर कायम राहिलाय. कालच्या तुलनेत पश्‍चिम किनारपट्टीवगळता मोठा पाऊस झालेला नाही. मात्र, मुंबईत कुलाब्याला २०० मिलिमीटर तर सांताक्रूझला १४३ मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. त्यामुुळे तिथल्या वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झालाय.
राज्याच्या इतर भागात डहाणूला १०३, अलिबागला ९९, भीऱ्याला ९१ तर महाबशेश्‍वरला ८४ मिलिमीटर पावसाची नोंद आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात झालीय. नाशिकलाही ४६ तर नागपूरला १८ मिलिमीटर पाऊस झालाय. पश्‍चिम किनारपट्टीवरच्या पावसाचा जोर पुढचे अठ्‌ठेचाळीस तास कायम राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय.
राज्यात झालेला पाऊस (मि.मि.) - मुंबई (कुलाबा) - २०० मुंबई (सांताक्रूझ) - १४३ डहाणू - १०३ अलिबाग - ९९ भीरा - ९१ महाबळेश्‍वर - ८४ नाशिक - ४६ नागपूर - १८ पुणे - ९ लोहगाव - १० पाषाण - ११
पुणे - मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण रेल्वेस्थानकावर पाणी साचल्याने मुंबईकडे जाणारी प्रगती एक्‍स्प्रेस लोणाळ्याहून तसेच डेक्कन एक्‍स्प्रेस कर्जतहून परत पुण्याकडे पाठविण्यात आली आहे.

माऊलींच्या पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा मृत्यू

सासवड - श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यात मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास मागील ट्रकची धडक बसून सर्जेराव आनंद यादव (वय ५५, रा। मोरळवाडी, ता. पाटण, जि. सातारा) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बोरावके मळ्याजवळ घडली.
तसेच पार्वती मधुकर पवार (वय ६५, रा. भोर) यांचा हद्‌यविकाराच्या झटक्‍याने निधन झाले.

सांगली महापालिकेत विकास महाआघाडीचा सत्तेचा दावा

सांगली - सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या निवडणूकीत अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील विकास महाआघाडीने ७४ पैकी ३६ जागा जिंकून सत्तेचा दावा केला आहे। कॉंग्रेसला २५, जनसुराज्यला २ तर ११ अपक्ष निवडून आले आहेत. महाआघाडीला दोन अपक्षांचा पाठींबा आहे. या निकालामुळे आमदार मदन पाटील यांची सत्ता संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. विकास महाआघाडी सत्तेच्या उबरठ्यावर पोहोचली आहे.
अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सांगलीचा कारभारी बदला, अशी धडक मोहीम घेवून सर्वपक्षीय महाआघाडी स्थापन केली। भाजप, जनता दल या दोन प्रमुख पक्षांना सोबत घेवून मंत्री पाटील यांनी महापालिका क्षेत्र पिंजून काढले. त्यांच्या विरोधात कॉंग्रेसचे सहयोगी आमदार मदन पाटील व जिल्ह्याचे पालकमंत्री पतंगराव कदम या ंनी कॉंग्रेसच्या झेंड्याखाली ही निवडणूक लढवली.
या निवडणूकीत अर्थमंत्री पाटील यांनी जातीयवादी पक्षांना सोबत घेतल्याची टीका कॉंग्रेसने केली। तर महाआघाडीने प्रारंभपासून विकासाचा मुद्दा उचलून धरला. या निवडणूकीत वसंतदादा घराणे विरोधी राजारामबापू पाटील यांच्या घराण्यातील संघर्षाचे वळण देण्याचा प्रयत्न झाला. प्रचारसभांमध्ये "मला संपवण्याचे प्रयत्न कदापी यशस्वी होणार नाहीत', असा इशारा देत आमदार पाटील यांनी आव्हानाची भाषा वापरली होती. प्रत्युत्तरादाखल अर्थमंत्र्यांनी मात्र ही निवडणूक गल्लीच्या विकासाची आहे, असा पवित्रा घेत या निवडणूकीला वसंतदादा घराणे विरोधातील संघर्षाचे वळण येणार नाही, याची दक्षता घेतली.
प्रमुख विजेत्यांमध्ये - माजी उपमहापौर दादासाहेब लांडगे, मुन्ना कुरणे, साजीदअली पठाण, सुरेश आवटी, उत्कर्षा किशोर जामदार, लक्ष्मण नवलाई, मकरंद देशपांडे, राजेश नाईक, हणमंत पवार, शेखर इनामदार, दिग्वीजय सुर्यवंशी, विक्रमसिंह सावर्डेकर, युवराज बावडेकर, संतोष देवळेकर, हरिदास पाटील, धनंजय सुर्यवंशी, धनपाल खोत, सुलोचना खोत, किरण सुर्यवंशी, प्रतिक्षा पाटील, अनारकली कुरणे, विवेक कांबळे, शहनाज हारूण शिकलगार यांचा समावेश आहे.
या निवडणूकीत अनेक दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले। त्यामध्ये उपमहापौर मोहन जाधव, माजी महापौर किशोर शहा, विजय धुळूबुळू, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष इद्रीस नायकवडी, कॉंग्रेसच्या पक्षप्रतोद वहिदा नायकवडी, कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अय्याज नायकवडी, शिक्षण मंडळाचे सभापती अशोक शेठ, सदस्य अशोक सुर्यवंशी, भाजप नेत्या नीता केळकर, नगरसेवक उमेश पाटील, सुब्राव मद्रासी, अंकूश कोळेकर, बालाजी काटकर, अभय शिरगुप्पे, जयगोंड परगोंड, हारूण शिकलगार, सतीश गोरे, प्रशांत खिलारे, स्वाती शिंदे, शेखर माने, विलास सर्जे, छाया सलगर, फिरोज महात यांचा समावेश आहे.
प्रभाग १९ मध्ये "टाय' - येथील महाआघाडीच्या उमेदवार भारती दिगडे व कॉंग्रेस बंडखोर उमेदवार आशा शिंदे यांना १३४१ अशी समान मते पडली। यावर मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी बाजीराव जाधव यांनी चिट्टी टाकून विजेता ठरवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आशा शिंदे यांना विजयी घोषीत करण्यात आले.
सातव्यांदा नगरसेवक - महाआघाडीचे दादासाहेब लांडगे यांनी माजी महापौर विजय धुळूबुळू यांचा पराभव करून यावेळी सातव्यांदा निवडणूक जिंकली। हा एक नवा विक्रमच आहे.
नायकवडी कुटूंबातील प्रमुख तिघांचा पराभव - राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष इलियास नायकवडी यांच्या कुटूंबातील तीन उमेदवारांना नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. महाआघाडीचे प्रमुख नेते इद्रीस नायकवडी, कॉंग्रेसकडून निवडणूक लढवलेले अय्याज आणि वहिदा नायकवडी यांचा पराभव झाला आहे. अय्याज नायकवडी यांचा महाआघाडीचे सज्जाद भोकरे यांनी सुमारे ३०० मतांनी पराभव केला तर वहिदा नायकवडी यांचा महाआघाडीचे आरीफ चौधरी यांनी ८५ मतांनी पराभव केला. इद्रीस नायकवडी यांच्या पत्नी आणि विद्यमान नगरसेविका आयेशा नायकवडी आणि इद्रीस यांची आई हसिना या विजयी झाल्या.

मुंबईत पावसाचा कहर

मुंबई-तब्बल आठवड्या भराच्या विश्रांती नंतर पुन्हा एकदा मुंबईत पावसाने आपली हजेरी लावली असून, सुरू असलेल्या संततधारेच्या परिणामी मुंबईतील लोकलचे वेळापत्रक कोलमडले आहे.
कुर्ला, चेंबूर, सायन, आणि घाटकोपरच्या बहुतांश भागातील ट्रॅक आणि रस्त्यावरही पाणी साचल्याने या मागावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
पावसाचा मारा सलग दुसऱ्याही सुरू आहे। त्यामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाली आहे. खार, हिंदमाता, सांताक्रुज, विलेपार्ले, अंधेरी या भागासह मुंबईतील जवळपास महत्त्वाच्या रस्त्यांवर पाणी साचल्याने हे रस्ते बंद झाले आहेत.
पश्चिम किनारपट्टीवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आगामी दोन दिवसात मुंबईसह महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.