बुधवार, 23 जुलाई 2008

यापुढे नंबरप्लेटवर 'नेम' नाही

नाशिक, २३ जुलै-वाहनांच्या माध्यमातून वाढती गुन्हेगारी आणि नियमांची पायमल्ली रोखण्यासाठी शहर वाहतूक शाखेबरोबरच आता आरटीओ कार्यालयानेदेखील वाहनांच्या नंबरप्लेट्सवर लक्ष केंदीत केले आहे. त्यामुळे यापुढे 'प्रेस', 'पोलिस' अशा प्रकारची नावे अथवा लोगो टाकण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे.
टारगट तरुणांचे 'कोयला'सारखे ग्रुप्स, पक्षाचे ध्वज, 'प्रेस' अशी अनेक नावे आणि लोगो यांनी 'नंबर'प्लेट्स व्यापलेल्या असतात। कित्येकदा नंबरप्लेट्सचा मूळ उद्देशच दूर राहिलेला दिसतो. विशेष म्हणजे या माध्यमातून आपण पोलिस असल्याचे सिद्ध करण्याचा आणि सर्वांना दाखवून देण्याचा मोह पोलिसही आवरू शकलेले नाहीत. ही सर्व धडपड ओळख पटवून देण्यासाठी. कुटुंबातील ज्येष्ठांपासून ते पोराबाळांपर्यंतच्या विविध नावांनीही नंबरची जागा बळकावल्याचे दिसते
वाहनधारकांच्या या हौसेमुळे वाहनचोर, गुन्हेगार, भुरटे चोर यांचे फावले आहे। वाहनावर नंबर टाकला नाही, अथवा केवळ दुबिर्णीतून पाहता येईल एवढ्याच आकारात नंबर टाकला तर ते चोरांच्या पथ्यावरच पडते. एखाद्याला धडक देऊन अथवा मुलींची छेड काढून पळून जाणाऱ्यांच्या वाहनांचे नंबर न दिसल्याने ही मंडळी पोलिसांच्या जाळ्यातून सहज सुटतात.
हे प्रकार थांबावेत यासाठी शहर वाहतूक शाखेने गेल्या महिन्यापासून नंबरप्लेट्सवर नंबरशिवाय इतर कुठलेही नाव अथवा लोगो असलेल्या वाहनांवर कारवाई सुरू केली आहे। मात्र, तरीही अनेक तरुण 'शूरवीरां'नी आपला प्रताप सुरूच ठेवला आहे. नियमभंगाची गंभीर दखल घेत, थेट आरटीओ कार्यालयाने अशा वाहनधारकांवर कारवाईची तयारी सुरू केली आहे. 'कोणत्याही वाहनाच्या मालकाला नंबरप्लेटवर नंबरव्यतिरिक्त अक्षरे, अंक, शब्द, चित्र किंवा स्टिकर्स लावता येणार नाहीत. तसे करण्यास मोटार वाहन नियम १९८९ अन्वये बंदी आहे.
नंबरशिवाय इतर कोणतीही अक्षरे किंवा लोगो लावण्यासाठी वाहतूक आयुक्तांची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल', असा आदेश आरटीओ अधिकाऱ्यांनी काढला आहे. आरटीओ आणि शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त मोहीमेतून नंबरप्लेट्सवरचे 'प्रेम' दूर व्हायला वेळ लागणार नाही.

पुणे पोलिसांना ५० हजारांचे बक्षीस

पुणे, २३ जुलै-पुण्यात बनावट केडिट कार्ड तयार करणाऱ्या टोळींचा पर्दाफाश करून, त्या आरोपींना गजाआड करण्याची कामगिरी केल्याबद्दल पुणे पोलिसांच्या तपास पथकाला ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभेत जाहीर केले.
पुण्यातील ली-मेरिडियन हॉटेलमध्ये जेवणाचे बिल केडिट कार्डद्वारे दिले असता, त्याच हॉटेलचा एका कर्मचारी केडिट कार्डधारकाच्या कार्डमधील डेटा लॅपटॉपमध्ये घेऊन त्याद्वारे बनावट केडिट कार्ड तयार करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले। या प्रकरणातील आरोपी वसीम समी पटेल याच हॉटेलचा कॅशियर असून, त्याच्याकडून दोन लॅपटॉप, एक स्कीमर, रिलायन्स कंपनीचा एक कनेक्टर, एक कार्ड रीडर असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पाटील यांनी लक्षवेधीवरील उत्तरात दिली.
यासंदर्भात आठ आरोपींना अटक झाली असून अन्य फरारींचा शोध सुरू आहे. सायबर क्राइमचा तपास जलद गतीेने व्हावा, यासाठी पुण्यातील ७०९ आणि मुंबईतील १३०० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. वर्षभरात पाच हजार पोलिसांना सायबर क्राइम तपासाचे प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच सर्व पोलिस आयुक्तांच्या कार्यकक्षेत सायबर सेलमध्ये सुरू करण्यात येईल, असे ते म्हणाले.

'गद्दार' हरिभाऊ राठोड भाजपातून निलंबित

मुंबई, २३ जुलै-गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू आणि यवतमाळचे विद्यमान खासदार हरिभाऊ राठोड यांना भाजप नेतृत्वाने त्यांच्या ‘ गद्दारी ’ ची सजा दिलीय. लोकसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी नेमके गैरहजर राहणारे खा. राठोड यांना भाजपमधून निलंबित करण्यात आलेय. दरम्यान, आपणाला काँग्रेस, राष्ट्रवादी, बसपसह अनेक पक्षांकडून ऑफर असल्याचे राठोड यांनी स्पष्ट केलेय.
विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेच्या वेळी दिवसभर हरिभाऊ राठोड लोकसभेत हजर होते। परंतु मतदानाच्या निर्णायक वेळेआधीच ते सभागृहातून बाहेर निघून गेले, ते पुन्हा लोकसभेत आलेच नाहीत. मतदानाच्या वेळी गैरहजर राहून त्यांनी एकप्रकारे काँग्रेसप्रणित यूपीए सरकारला मदतच केल्याचा ठपका त्यांच्यावर आला आहे. या गैरहजेरीची पुरेपूर ‘ किंमत ’ त्यांनी वसूल केल्याची चर्चा दिल्लीत आहे.
विशेष म्हणजे राठोड यांच्या या गद्दारीमुळे गोपीनाथ मुंडे चांगलेच अडचणीत आले आहेत। राठोड हे बंजारा समाजाचे असून, मुंडे यांच्या गोटातील आहेत. मुंडे उपमुख्यमंत्री असताना ते त्यांचे स्वीय सहाय्यक होते. मुंडेंच्याच शिफारशीवरुन त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली व यवतमाळमधून ते खासदार म्हणून निवडूनही आले. परंतु लोकसभा मतदारसंघ फेररचनेत त्यांचा यवतमाळ मतदारसंघ वाशिममध्ये विलीन झाला आहे. तेथून शिवसेनेच्या भावना गवळी खासदार असल्याने युतीच्या जागावाटपात तो मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला जाणार आहे. परिणामी राठोड यांना काहीही आसरा न उरल्याने त्यांनी जाता जाता स्वतःचा राजकीय आणि आर्थिक फायदा करुन घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा बसपकडून आगामी लोकसभा निवडणूक वाशिममधून लढवण्याची त्यांची इच्छा असल्याचे समजते. त्यापैकी राष्ट्रवादीचा पर्याय ते निवडतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, हरिभाऊ राठोड यांनी मात्र आपल्यावरील गद्दारीच्या आरोपांचा इन्कार केला आहे। माझी प्रकृती अचानक बिघडल्याने मतदानाच्या वेळी हजर राहू शकलो नाही. मला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले. आयसीयूमध्ये मोबाईल फोन वगैरे काढून घेतल्याने मला पक्ष नेतृत्वाशी संपर्क साधता आला नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. आपण सभागृहात हजर असता तर कुणाला पाठिंबा दिला असता, अशी विचारणा केली असता, नक्की सांगता येणार नाही. परंतु मनमोहन सिंग यांचे सरकार पडता कामा नये, अशी आपली मनापासून इच्छा होती, असे धक्कादायक वक्तव्य त्यांनी केले. कालपासून मला अनेक पक्षाच्या नेत्यांनी फोन केलेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि बसपचे नेतेही संपर्कात असून, त्यांनी मला पक्षात येण्याची ऑफर दिली आहे, असा खुलासाही राठोड यांनी यावेळी केला.
मतदानाच्या वेळी गैरहजर राहणारे हरिभाऊ राठोड आणि तुकाराम रेंगे पाटील यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व मुंडे विरोधक नितीन गडकरी यांनी केली आहे. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्या दोघांनाही लक्ष्मीदर्शन केले. त्यांचे फोन रेकॉर्डस् चेक करावेत, अशी मागणी करतानाच बेइमान, विश्वासघातकी राठोड यांना पक्षात ठेवणार नाही, अशी तिखट प्रतिक्रियाही गडकरी यांनी व्यक्त केली.

सोमनाथ दादांची हकालपट्टी

नवी दिल्ली - लोकसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यासाठी टाकलेला दबाव लाथाडल्याने खवळलेल्या डाव्या पक्षांपैकी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) सोमनाथ चटर्जी यांच्याविरूद्ध कठोर कारवाईचा बडगा उगारत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली। माकपच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
सोमनाथ चटर्जी यांनी माकपकडून कोणतीही नोटीस मिळाल्याचा मंगळवारी इन्कार केला होता. तसेच माकप नोटीस पाठवू शकत नाही कारण आपण पॉलीट ब्युरोचे सदस्य नाही. त्यामुळे राजीनामा द्यायचा कि नाही ते ठरविण्याचा अधिकार केवळ आपल्यालाच असल्याचे म्हटले होते.

माझे आंदोलन मराठी बाण्‍यासाठी- राज ठाकरे

नवी दिल्ली, २३ जुलै-माझे आंदोलन मराठी बाण्‍यासाठी तो जपणा-या महाराष्‍ट्रासाठी आहे. शिक्षण संस्‍था चालकांविरोधात माझे कार्यकर्ते आंदोलन करीत नाही तर स्‍थानिक विदयार्थ्‍यांना डावलून चुकीच्‍या मार्गाने परप्रांतीय विदयार्थ्‍यांना प्रवेश देणा-या प्रवृत्‍तींसोबत आहे, आणि ते सुरूच राहणार असल्‍याचे प्रतिपादन पुणे येथे पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी केले.
पुणे येथे मनसेच्‍या आंदोलनाची भूमिका स्‍पष्‍ट करण्‍यासाठी त्‍यांनी पत्रकार परिषदेत मनसेची भूमीका स्‍पष्‍ट केली. राज्‍यातील खाजगी शिक्षण संस्‍था त्‍या स्‍थापने संदर्भातील उदेशही विसरल्‍या आहेत. राज्‍यात नियमानुसार प्रवेश प्रक्रिया राबवून मराठी मुलांना प्रवेशासाठी प्राधान्‍य दिले गेले पाहिजे. शिवाय संस्‍था चालकांनी प्रवेश देणार असलेल्‍या विदयार्थ्‍यांच्‍या नावांची यादीही जाहीर करावी. असे फर्मान काढीत त्‍यांनी राज्‍यातील शिक्षण पध्‍दतीवरही कडाडून टीका करताना पुरकेंमुळे विदयार्थ्‍यांचे भवितव्‍य बघिडल्‍याचा आरोप केला आहे.
मनसेने केलेल्‍या आंदोलनात कार्यकर्त्‍यांना जाणून-बूजून टार्गेट केले जात असल्‍याचा आरोप करून त्‍यांनी आपल्‍या कार्यकर्त्‍यांवर जाणून-बाजून अनेक केसेसही करण्‍यात आल्‍या असल्‍याचा आरोप केला आहे. मात्र राष्‍ट्रवादीच्‍या कार्यकर्त्‍यांना वेगळा न्‍याय देउन त्‍यांचे संरक्षण केले जात असल्‍याचा आरोपही त्‍यांनी केला.

भाजपचे 8 खासदार निलंबित

नवी दिल्‍ली, २३ जुलै-संसदेत विश्‍वासमत ठरावाच्‍या वेळी पक्षातून फुटून पक्षविरोधी मतदान व अनुपस्थित राहिल्‍याबददल भाजपने आपल्‍या 8 खासदारांना निलंबित केले आहे. या खासदारांमध्‍ये दमोह मतदार संघाचे खा.चंद्रभान, बृजभूषण शरण, मनोरमा माधवराज, सोमाभाई पटेल, सांगलियाना, बाबूभाई कटारा, मंजूनाथ आणि हरिभाऊ राठोड यांचा समावेश आहे.
संपुआ सरकारने लोकशाही मूल्‍यांचा -हास केल्‍याचा आरोप करीत भाजपने राष्ट्रव्यापी आंदोलन सुरू करण्‍याचाही निर्णय जाहीर केला आहे. भाजपच्‍या सुत्रांनी सांगितले, की पक्षशिस्‍त न पाळणा-याविरुध्‍द पक्षाने नेहमीच कारवाई केली आहे. ज्‍या खासदारांनी पक्षादेश न पाळून पक्ष विरोधी मतदान केले आहे. अशा खासदारांना निलंबित करण्‍याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.
पक्षाचया एका ज्‍येष्‍ठ नेत्‍याने आपल्‍या खासदारांनी पक्षादेशाविरुध्‍द मतदान कसे केले याचे आश्‍चर्य वाटत असल्‍याचे सांगितले. दलित महिला पंतप्रधान बनलेले भाजपला नको होते त्‍यामुळे त्‍यांनी कॉंग्रेससोबत मिळून सरकार वाचविले असा बसपा नेत्‍या मायावतींनी केलेला आरोप चुकीचा असल्‍याचे पक्ष नेत्‍यांनी सांगितले आहे.