रविवार, 27 जुलाई 2008

स्फोटांनंतर आता राजकारणाला सुरुवात

नवी दिल्ली, २७ जुलै- केंद्रातील कॉग्रेस सरकारने दहशतवाद्यांविरोधात मवाळ भूमिका घेतल्यानेच देशात गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद वाढल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीने केल्यानंतर कॉग्रेसनेही आता त्याला जोरदार उत्तर देत भाजपने जरा संयम दाखवावा अशी प्रतिक्रिया दिल्याने या प्रकरणावरून दोन्ही पक्षात आरोपप्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.
केंद्र सरकारने सत्तेवर आल्यानंतर पोटा कायदा रद्द करून सर्वात मोठी चूक केली. यानंतरच दहशतवाद्यांना पाठबळ मिळाल्याचा आरोप भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी केला आहे. सरकार दहशतवाद्यांप्रकरणी मवाळ भूमिका घेत असल्याचे ते म्हणाले.
यानंतर कॉग्रेस गटातूनही यावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली असून प्रवक्ते विरप्पा मोईली यांनी भाजपने जरा संयमाची भूमिका घ्यावी आणि अशी वक्तव्ये टाळावीत असे मत व्यक्त केले आहे.

चॅटर्जीच्या भूमिकेतून दृढनिश्चय झळकतो: ठाकरे

पुणे, २७ जुलै- लोकसभाध्यक्ष सोमनाथ चॅटर्जींना अनपेक्षितपणे सेनाप्रमुख बाळासाहेबांकडून समर्थन लाभले असून माकपच्या भूमिकेविरूद्ध त्यांनी दृढनिश्चय व कणखरपणा दाखवण्याच्या कृतीचे त्यांनी अभिनंदन केले आहे.
सोमनाथ चॅटर्जी यांच्यासोबत आपले वैचारिक मतभेद असले आहेत, मात्र त्यांच्या अंतर्मनाचे ऐकून निर्णय घेण्याच्या क्षमतेसाठी ते आदरार्थी ठरल्याचे 'सामना' मधील अग्रेलेखात बाळासाहेबांनी स्पष्ट केले आहे.
माकपचा लोकसभाध्यक्षपद सोडून सपुआ सरकारला खेचण्यासाठी सरकारविरूद्ध मतदान करण्याचा आदेश त्यांनी फेटाळून लावला. त्यांनी तत्त्वांशी फारकत घेतली नाही. मनमोहन सरकार खेचण्यातील अपयश व मायावतींना पंतप्रधानपदाच्या गादीवर बसवण्याचे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर सोमनाथदांना पक्षातून निलंबित करून त्यांनी राग काढल्याचे अग्रेलेखात स्पष्ट केले आहे.
चॅटर्जी हे ज्योती बसू व बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या पंक्तीतील नेते आहेत. धर्मनिरपेक्ष विचारसरणीसाठी त्यांनी पक्षाचा आदेश फेटाळून राजकीय विरगती पत्करली, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

मुलींमध्ये वाढतेय इंजिनीअरिंगचे क्रेझ

नवी दिल्ली, २७ जुलै-गलेलठ्ठ पगार आणि नवनवीन संधी मिळत असल्याने इंजिनीअरिंग क्षेत्राकडे वळणाऱ्या मुलींची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत असल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे.
गेल्या सहावर्षात इंजिनीअरिंग क्षेत्रात मुलींच्या संख्येत पाचटक्यांहून अधिक वाढ झाली आहे. एसौचेमने या संदर्भात नुकतेच एक सर्वेक्षण केले यात ही माहिती उघड झाली आहे. यात संस्थेने २० इंजिनीअरिंग संस्थांमधून सर्वेक्षण केले, यात त्यांना ४० मुली इंजिनीअरिंग करत असल्याचे दिसून आले.
केवळ चांगला पगार आणि आकर्षणामुळेच आपण हे क्षेत्र निवडल्याची माहिती ७१ टक्के मुलींनी दिली.

मुंबई आणि इंदूरमध्ये हाय अलर्ट

मुंबई, २७ जुलै- जयपूर पाठोपाठ बेंगलूरू आणि अहमदाबादेत झालेल्या साखळी स्फोटांनंतर आता देशातील प्रमुख शहरांमधील सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
याअंतर्गत राज्य शासनाला निर्देश देण्यात आले असून, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यासाठी दोनही राज्यात विशेष पोलिस दल नियुक्त करण्यात आले असून राज्यात प्रवेश करणाऱ्या सीमांवर सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
पोलिसांनी बाजार, आणि गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. वर्दळीच्या ठिकाणी संशयित आढळल्यास त्याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दहशतवाद्यांनी अहमदाबादमध्ये स्फोट करण्यापूर्वी मेल करत दिलेल्या धमकीत मुंबई आणि इंदूरला आगामी काळात आपले लक्ष करण्याची धमकी दिली आहे.

अहमदाबाद स्फोटांप्रकरणी गुजरात सरकारकडून विशेष समितीची स्थापना

अहमदाबाद, २७ जुलै - येथे शनिवारी झालेल्या १७ भीषण बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी केंद्रीय सुरक्षा संस्था तसेच राज्य सुरक्षा संस्थेत सुसंवाद साधण्यासाठी गुजरात सरकारने रविवारी गृहखात्याच्या अधिपत्याखाली एका विशेष समितीची नियुक्‍ती करण्याची घोषणा केली.
गृहमंत्री अमित शहा यांनी यासंबंधी माहीती देताना सांगितले कि, बॉम्बस्फोट मालिकेनंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज सकाळी बोलावण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक विशेष समितीची नियुक्‍ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीत चार अन्य सदस्य असून त्यामध्ये राज्य पोलिस संचालक प्रमुख, राज्य आय. बी. प्रमुख, कायदा संचालक तसेच डायरेक्‍टोरेट ऑफ फोरेंसिक सायन्सचे संचालक यांचा समावेश आहे.
ही समिती केंद्रीय सुरक्षा संस्था तसेच अन्य राज्यांच्या सुरक्षा संस्थांशी सुसंवाद साधून राज्य पोलिसांच्या मदतीने बॉम्बस्फोट मालिकेच्या तपासात मदत करेल.
याशिवाय केंद्रीय सुरक्षा समिती तसेच अन्य राज्यांच्या सुरक्षा समित्यांकडून याआधीच्या बॉम्बस्फोटांच्या तपासाच्या माहीतीचा अभ्यास करून अहमदाबाद येथील बॉम्बस्फोटाची दिशा ठरवेल.

अहमदाबादेतील मृतांची संख्या ४५ वर

अहमदाबाद, २७ जुलै- गुजरातसह संपूर्ण देशाला हादरविणाऱ्या अहमदाबादेतील बॉम्बस्फोटांतील मृतांची संख्या ४५ वर पोचली आहे.
शनिवारी संध्याकाळी साडे सहापासून सुमारे ९० मिनिटांच्या कालावधीत शहरात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण १७ स्फोट झाले होते. त्यामध्ये शंभराहून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपाचार सुरू आहेत.
दरम्यान, रविवारी सकाळी हटकेश्‍वर परिसरातील निवासी वसाहतीमध्ये एक जिवंत बॉम्ब आढळला। पोलिसांच्या बॉम्ब नाशक पथकाने तो निकामी केल्याने आणखी अनर्थ टळला. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मतदार संघामध्येही एक जिवंत बॉम्ब सापडल्याचे वृत्त आहे.
स्फोटांच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे. स्फोटांमध्ये अमोनियम नाईट्रेटचा वापर केल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.

झारखंडमध्ये बॉम्बस्फोट, ५ जखमी

गोड्डा, २७ जुलै-झारखंडमध्ये गोड्डा शहरात एका बस स्टँडजवळ रविवारी पहाटे सव्वा पाच वाजता झालेल्या बॉम्बस्फोटात पाचजण जखमी झाले . जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे .
हा स्फोट कमी क्षमतेचा असल्याचे पोलिस अधिक्षक जितेंद्र सिंग यांनी सांगितले . स्फोटप्रकरणी तपास सुरू असल्याचे ते म्हणाले .