मंगलवार, 15 जुलाई 2008

गवळीची न्यायालयात विनंती याचिका

मुंबई - शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी मोक्काखाली अटकेत असलेला अंडरवर्ल्ड डॉन आणि आमदार अरूण गवळी याने बुधवारपासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनास उपस्थित राहण्यास परवानगी मिळावी याकरिता न्यायालयात विनंतीअर्ज दाखल केला आहे.
त्यावर न्यायालय गुरूवारी निर्णय देण्याची शक्‍यता आहे.
मोक्‍का न्यायालयाचे न्यायाधिश वाय. डी. शिंदे हे तीन दिवस रजेवर असलेने गवळीच्या विनंतीअर्जावरील सुनावणी तीन दिवस पुढे ढकल्यात आली आहे.

भारिप-बहुजन महासंघाचे प्रवेशासाठी आंदोलन; पोलिसांचा लाठीमार

अहमदनगर - स्थानिकांना डावलून परप्रांतियांना प्रवेश दिला जात असल्याचा आरोप करून त्याची माहिती घेण्यासाठी गेलेल्या भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि येथील अहमदनगर महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये मंगळवारी हाणामारी झाली. कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. मंगळवारी सकाळी साडेअकरा ते एकच्या दरम्यान हा प्रकार घडला.
नगर महाविद्यालयात शहरातील विद्यार्थ्यांना डावलून मिझोराम आणि अन्य राज्यातील विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश दिला जात असल्याचा आरोप भारिप-बहुजन महासंघाच्या जिल्हा संघटक ऍड. अनिता दिघे यांनी केला. याची माहिती घेण्यासाठी महाविद्यालयात गेल्यावर प्रवेशासाठी नेमलेल्या काही दलालांनी आणि कर्मचाऱ्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप दिघे यांनी केला.
दरम्यान महाविद्यालय सुरू असतानाच हा प्रकार घडल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. घटनेनंतर महाविद्यालय बंद करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महाविद्यालयात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सहकारमंत्री पतंगरावांच्या भारती विद्यापीठावर मनसेचा हल्ला

सहकारमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या भारती विद्यापीठावरही राज ठाकरे यांच्या मनसैनिकांनी आज हल्ला चढविला. परप्रांतीयांना प्राधान्य देण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यर्कत्यांनी सलग चौथ्या दिवशी , मंगळवारी सातारा रोडवरील भारती विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेजवर , तसेच आयटी आणि बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटवर दगडफेक केली. यामध्ये मेडिकल कॉलेजची एक मुलगी जखमी झाली आहे.
गेले तीन दिवस मनसे कार्यर्कत्यांनी विविध शैक्षणिक संस्था आणि कार्यालयांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा , तसेच मंगळवारी सकाळीही पोलिसांनी सुमारे २०० कार्यर्कत्यांना ताब्यात घेतले. त्यानंतरही सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्यासह ७-८ कार्यकतेर् मोटारसायकलवरून भारती विद्यापीठाच्या आवारात पोचले. त्यांनी बाहेरूनच इमारतीच्या काचांवर दगडफेक केली आणि लागलीच तेथून पोबारा केला. जाताना आयटी आणि बायोटेक्नॉलॉजीच्या इमारतीवरही त्यांनी दगडफेक केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी अद्याप अटक झाली नसून तपास सुरू आहे.
दरम्यान , मेडिकल कॉलेजच्या पायऱ्यांवर बसलेली एक विद्याथिर्नी काच लागल्याने जखमी झाली असून तिला भारती हॉस्पिटलमध्येच दाखल करण्यात आले आहे.
सहकारमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी या हल्ल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. सात-आठ भुरटे लोक आले आणि काचांवर दगड मारून पळून गेले. हा हल्ला कसला, निव्वळ स्टंटबाजी आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. कदम यांनी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसारच आधी प्रवेश परीक्षा होते. त्या परीक्षेचा निकाल अद्याप लागलेला नाही. त्यामुळे प्रवेश प्रक्रियाही पूर्ण झालेली नाही. त्यापूर्वीच हा स्टंट करण्यात आला, असे ते म्हणाले.