मुंबई, ९ सितम्बर- 'हम युपीवाले है, हिंदी में ही बोलेंगे, असे म्हणता नव्या वादाला जन्म घालणाऱ्या अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांना राज ठाकरे यांनी मराठी झटका दाखविल्यानंतर अखेर उपरती झाली आहे। आपण हे वक्तव्य करण्यापूर्वी विचार करायला हवा होता। पण या वक्तव्यामागे मराठी लोकांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, असे त्यांनी म्हटले आहे. 'माझ्या बोलण्याने मराठी मानांना वेदना झाल्या असतील तर मी त्यासाठी माफी मागते असे सांगत त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.शनिवारी 'द्रोण' या चित्रपटाच्या म्युझिक अल्बमच्या अनावरणप्रसंगी, बोलताना त्यांनी काहीही गरज नसताना मध्येच उठून ' मै यूपी वाली हूं और, हिंदी में ही बात करुंगी. महाराष्ट्र के लोग मुझे माफ करे' असे वक्तव्य केले होते. यानंतर या प्रकरणावरुन राज्यात राजकाणाला सुरुवात झाली होती. मनसेने त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत त्यांचा विरोध सुरु केला होता। शिवसेनेही त्यावर टीका केली होती. पण राज ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन बच्चन कुटुंबियांच्या चित्रपटांवर महाराष्ट्रात बंदी घालण्यात येईल. ते प्रदर्शित करू दिले जाणार नाहीत, असे जाहीर केले, असा इशारा दिला. त्यानंतर मग जया बच्चन यांना आपल्या चुकीची जाणीव झाली.
तोपर्यंत राज समर्थकांनी मुंबईत प्रत्यक्ष कृतीस सुरुवात करून बच्चन कुटुंबियांची पोस्टर्स फाडली. त्यांच्या चित्रपटांची, जाहिरातींची पोस्टर्स, होर्डिंग्ज तोडायला सुरवात केली. मग मात्र जया यांना आपण काय बोललो याचे भान आले आणि त्यांनी सरळ माफीनामा जाहीर करून टाकला. आपण मराठीही चांगले बोलू शकतो. हवे तर याची परीक्षाही घ्या, असे सांगत त्यांनी आपले मराठीप्रेमही व्यक्त केले.