गुरुवार, 7 अगस्त 2008

इतिहासला सर्वांत महागडा उद्‍घाटन समारंभ

बीजिंग, 8 ऑगस्ट- बीजिंग- कडव्‍या सुरक्षा व्‍यवस्‍थेत चीनच्‍या संस्कृतीचा वारसा सांगत सुरू होणा-या ऑ‍लम्पिक उदघाटनाचा समारंभ आजवरचा सर्वाधिक महागडा उत्‍सव राहणार असून या भव्‍यदिव्‍य आणि महागडया समारंभासाठी सुमारे ५० हजार कोटी डॉलर खर्च केले जात आहेत. या समारंभासाठी जगभरातील प्रमुख नेत्‍यांची उपस्थिती असणार आहे.
पक्ष्‍याच्‍या घरटयाच्‍या आकाराच्‍या 'बर्ड नेस्ट' स्टेडियममध्‍ये होणा-या या समारंभासाठी बिजींगसह संपूर्ण चीन सजले आहे. या सोहळयाकडे संपूर्ण जगाचे बिजींगकडे लक्ष लागले आहे. सुमारे साडेतीन तास चालणा-या उदघाटन समारंभातून ५००० वर्ष जुन्‍या चीनी संस्‍कृतिचा इतिहास त्‍यातून दाखविला जाणार आहे. दारूगोळयांचा वापर करून आकर्षक नक्षीकाम करणा-या या सोहळयासाठी रंगीबेरंगी वेशातील कलाकार नृत्‍य करणार आहेत.
समारंभातील कार्यक्रम पत्रीका गोपनीय ठेवण्‍यात आली असून ती कुणालाही लीक न करण्‍याच्‍या स्‍पष्‍ट सूचना कलाकारांना देण्‍यात आल्‍या आहेत. वेस्टएंड स्टार सारा ब्राइटमॅन आणि चीनचा लोकप्रिय गायक लियू हुआन उदघाटन समारंभात गायन करणार आहे.
साडेतीन तासांच्‍या या समारंभात चीनच्‍या पारंपरिक ड्रम फूच्‍या ठेक्‍यासह उदघाटन होईल। त्‍यानंतर ऑलंम्पिक सर्कल आणि चीनचा राष्ट्रध्वज फडकाविला जाणार आहे. समारंभ रात्री ८ वजून ८ मिनटांनी सुरू होईल. २००८ च्‍या ८ व्‍या महीन्‍याच्‍या ८ व्‍या दिवशी हा कार्यक्रम होणार आहे.

बांगलादेशी घुसखोरांविरोधात धडक मोहीम

ठाणे, ७ अगस्ट-ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात पोलिसांनी धडक मोहिम उघडली आहे. गेल्या आठ दिवसांत ६२ जणांना अटक केल्याची माहिती अप्पर पोलिस आयुक्त प्रशांत बुरडे यांनी दिली. त्याचबरोबर कोणतीही माहिती न देता परस्पर घरात भाडेकरू ठेवणाऱ्या पाच घरमालकांनाही पोलिसांनी अटक केली.
देशात निर्माण झालेलं दहशतीचं सावट दूर करण्यासाठी पोलिसांनी धडक मोहिमा उघडल्या असून त्यात मुंब्रा, कळवा, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ या भागात बेकायदेशीररीत्या वास्तव्याला आलेल्या बांगलादेशी नागरिकांवरही कारवाई सुरू करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली भागातून ४८, अंबरनाथमधून १० तर कळव्यातून चार बांगलादेशीय घुसखोरांना अटक करण्यात आली.

मुशर्रफ यांच्याविरूद्ध महाभियोगाची कारवाई?

इस्लामाबाद, ७ ऑगस्ट- पाकिस्तानमधील सत्ताधारी आघाडी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्याविरूद्ध संसदेत अकरा ऑगस्टला महाभियोग ठराव दाखल करण्याची शक्यता आहे. पाकिस्तान पीपल्स पक्ष व पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ या पक्षांनी राष्ट्राध्यक्षांविरूद्ध महाभियोग ठरावाच्या मसुद्यास अंतिम स्वरूप दिले आहे.
मंत्रिमंडळातील सदस्याने मुशर्रफांविरूद्द संसदेत अकरा ऑगस्टला महाभियोग आणण्यात येईल, असे सांगितले आहे. याचदिवशी संसद व चार प्रांतीय विविमंडळांचे विशेष अधिवेशन घेण्यात येईल.
सरकारने प्रसिद्ध केलेल्या आदेशान्वये बडतर्फ करण्यात आलेल्या न्यायमूर्तीना पदबहाली करण्यात येईल। पाकचे लष्कर सरकारच्या पाठीशी असून मुशर्रफना समर्थन नसल्याचा दावा यां मंत्र्याने केला आहे.
देशातील राजकीय घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी बीजिंग ऑलिम्पिक शुभारंभ सोहळ्यास जाण्याचे रद्द केले आहे.

समाजाला आरक्षणसाठी आंदोलन - हिंगोलीत बस फोडली

हिंगोली, ७ अगस्ट - वसमत-नांदेड मार्गावर निळा पाटीजवळ आठ ते दहा जणांनी लातूर-वसमत या बसच्या (एमएच२०/डी ५६५०) काचा फोडल्या. ही बस निळा पाटीजवळ आली असताना आठ ते दहा जणांनी बससमोर येवून बस थांबवली. त्यानंतर प्रवाशांना खाली उतरवून बसच्या काचा फोडल्या. यामध्ये बसचे आठ हजार रुपयांचे नुकसान झाले.
दरम्यान, मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी ही बस फोडल्याचे वसमत पोलिसांनी सांगितले.
घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक राहूल श्रीरामे, पोलिस निरीक्षक माणिक पेरके, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी भेट दिली. या प्रकरणी चालक सुरेश केंद्रे यांच्या तक्रारीवरून वसमत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे श्री. पेरके यांनी सांगितले.

पत्नी, तीन मुलांना मारून एड्सग्रस्ताची आत्महत्या

मुंबई, अगस्त- एड्सची भीती किती जीवघेणी ठरू शकते, याचा प्रत्यय एका दुदैर्वी घटनेने बुधवारी आला. पाच वर्षे एचआयव्हीने त्रस्त असलेल्या एका दाक्षिणात्य चित्रपट निर्मात्याने पत्नी व आपल्या तीन मुलांची हत्या करून नंतर आत्महत्या केली. ही शोकांतिका बुधवारी सकाळी मुलुंडमध्ये उघडकीस आली.
दाक्षिणात्य चित्रपटांचे निर्माते तसेच वितरक बाबू ईश्वर तेवर (३९) यांचा फ्लॅट मुलुंड पश्चिमेकडील लिंक रोड अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावर आहे. त्यांचा भाऊ अरुमुगम मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास त्यांच्याकडे आला. बराच वेळ बेल वाजवूनही कुणी दरवाजा उघडत नसल्याने त्याने पोलिसांशी संपर्क साधला. अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने पोलिसांनी घरात प्रवेश केला असता समोरच तिघा लहानग्यांचे मृतदेह नजरेस पडले आणि त्यांच्या पायांखालची जमीनच सरकली. तेवर यांचा मृतदेह बेडरूममध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत सापडला. पत्नी ओमुटी (३३) हिचाही म़ृतदेह घरात पडला होता. व्यंकटेश (१०) व मणी (८) ही मुले, तसेच मुलगी महालक्ष्मी (५) असे तिघे लहानगे या दुर्घटनेत बळी पडले.
बाबू तेवर यांनी पत्नी आणि मुलांना अन्नातून विष दिले असावे आणि नंतर गळा आवळून मुलांची हत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. 'पोस्ट मॉटेर्म रिपोर्ट आल्यानंतर या शोकांतिकेचा उलगडा होईल' असे अतिरिक्त पोलिस उपायुक्त उत्तम सोपाने यांनी सांगितले. बाबू यांच्यावर केईएममध्ये उपचार सुरू होते. कुठल्या निराश क्षणी त्यांनी हा भयंकर निर्णय घेतला असावा, याचा शोध पोलिस घेत आहेत.
गेली पाच वर्षे एचआयव्हीने त्रस्त असलेला आपला भाऊ सतत तणावाखाली वावरत होता, असे अरुमुरुगमने पोलिसांना सांगितले.