मुंबई, २४ सप्टेंबर- मुंबई पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने केलेल्या एका कारवाईत इंडियन मुजाहिदीनच्या ५ सदस्यांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेले उत्तर प्रदेशातील दहशतवादी आजमगढ येथील रहिवासी असल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त हसन गफूर यांनी दिली. मुंबईत घातपात घडवून आणण्याचे त्यांचे नियोजन होते.मुंबईतील भिवंडी, गोवंडी आणि मुंब्रा परिसरातून फजलूर रहमान गॅंगसाठी काम करणा-या पाच दहशतवाद्यांना मुंबई पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथकाने आज छापे टाकून अटक केली. मोहमद सादीक, अफजल उस्मानी, अबू आरीफ, आतीफ बदर आणि मो.जाकीर शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर स्फोटके, मशीन गन डिटोनेटर आदी जप्त करण्यात आले आहे. या दहशतवाद्यांना पाकिस्तानात प्रशिक्षण दिले गेले असल्याची माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी ४ जणांना मुंबईतून तर अफजलला आजमगढ येथून अटक करण्यात आली आहे.
या दहशतवाद्यांचे संबंधही आजमगढशीच असल्याची माहिती समोर आली असून इंडियन मुजाहिदीनसाठी ते काम करीत होते. २००५ पासून दहशतवादी कारवायांमध्ये या सर्वांचा सहभाग आहे. अहमदाबाद व सूरत शहरात बॉम्ब ठेवण्यात आणि धमकीचा ई-मेल पाठविण्यात त्यांचा सहभाग आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी सादीक हा इंडियन मुजाहिदीनचा फाऊंडर मेंबर आहे. तर दोघे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मुंबई पोलीस व दहशतवादी विरोधी पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईचा गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी अभिनंदन केले असून कारवाईत सहभागी पथकाला ५ लाखांचे पारितोषिक जाहीर केले आहे.
दरम्यान, कर्नाटकचा रोशन खान हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. तर या सर्व दहशवाद्यांवर नियंत्रण ठेवणारा आमीर रजा नावाचा दहशवादी पाकिस्तानात लपून असल्याचे पोलिसांनी सांगितले. दहशतवादी कारवायांसाठी हवालाच्या माध्यमातून पैसे मिळत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.