सोमवार, 21 जुलाई 2008

खासदार हरिश्चंद्र चव्हाण एअर अँब्युलन्समधून दिल्लीकडे

नाशिक, अपघातात जखमी झालेले मालेगावचे भाजप खासदार हरिश्चंद्र चव्हाण उद्या संसदेत विश्वासदर्शक ठरावावर होणा-या मतदानासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यांना दिल्लीला घेऊन जाण्यासाठी भाजपने एअर अँब्युलन्सची व्यवस्था केलेय. ते आज संध्याकाळपर्यंत राजधानीत पोहोचतील, असे समजते.
अलीकडेच एका अपघातात, खासदार चव्हाण यांच्या पायांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे ते संसदेच्या विशेष अधिवेशनाला उपस्थित राहणार की नाही, याबद्दल अनिश्चितता होती. परंतु, विश्वासदर्शक ठरावावरील मतदानात, एक-एक मत निर्णायक ठरणार असल्याने, त्यांना दिल्लीत घेऊन जाण्याचा निर्णय भाजपने घेतला होता. त्यानुसार, मुंबईहून एक खास वैद्यकीय पथक नाशिकला गेलं, त्यांनी चव्हाणांच्या तब्येतीची तपासणी केली आणि कुटुंबियांशी चर्चाही केली. त्यानंतर त्यांना एअर अँब्युलन्समधून दिल्लीला नेण्याचं ठरलंय. आता ते उद्या संसदेच्या लॉबीमधून मतदान करतील.

बसपाच्या चारशेहून अधिक कार्यकर्त्यांची सोडचिठ्ठी

नागपूर, महाराष्ट्राचे प्रभारी कर्नल सुधीर सावंत यांना , कॉंग्रेसचा हेर असा ठपका ठेवून बहुजन समाज पक्षातून काढल्यामुळे बसपमधील कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला. नागपुरात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यातून स्पष्ट झाले.
सावंत यांना पक्षातून काढून टाकल्याला विरोध म्हणून सुमारे चारशेवर कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष विलास गरूड यांच्याकडे राजीनामे देऊन बसपाला सोडचिठ्ठी दिली.
बहुजनांच्या हाती सत्ता देण्याचे बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांचे मिशन पूर्ण करण्यासाठी राजीनामा दिलेले सर्व कार्यकर्ते महाराष्ट्रात मिशनरी कार्यकर्त्यांची शक्ती उभारणार असल्याचा संकल्प कर्नल सावंत यांनी बोलून दाखवला. सुमारे एक ते दीड हजारांवर कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात तो स्वीकारला. बैद्यनाथ चौकातील कामगार भवन सभागृहात आयोजित मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईतूनही बसप कार्यकर्ते आले होते. बसप आणि बामसेफ मिशनमधील जुन्या कार्यकर्त्यांनाही बोलावण्यात आलं होतं.
कांशीराम यांच्या मिशनवर श्रद्धा असलेल्या कार्यकर्त्यांची शक्ती महाराष्ट्रात उभी करण्यात येणार असल्याती माहितीही यावेळी बोलताना सावंत यांनी दिली. या शक्तीतून बसप प्रदेशाध्यक्ष विलास गरूड आणि त्यांच्या कंपूचे खरे स्वरूप मायावती यांच्या नजरेत आणून देण्याची धमकीही त्यांनी यावेळी दिली. आपण त्यांच्या भूलथापांना बळी न पडल्यामुळे , मायावतींकडे आपली तक्रार करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.

विधानसभेत पुरकेसरांविरोधात हक्कभंग

मुंबई-राज्याचे शालेय शिक्षणमंत्री वसंत पुरके पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडलेत. यावेळी, शाळांमध्ये सेक्स एज्युकेशन शिकवण्याचा मुद्दा त्यांच्या अंगाशी आलाय. लैंगिक शिक्षण शिकवण्यास विधानसभेनं स्थगिती दिली असतानाही, गेल्या आठवड्यात पुरके सरांनी या विषयाबद्दल आग्रही भूमिका घेतली होती. त्यामुळे भाजपच्या आमदार शोभाताई फडणवीस यांनी आज त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल केला आहे.
शालेय शिक्षणात, लैंगिक शिक्षण या विषयाचा समावेश करण्याचा विषय अलीकडे खूपच गाजला होता. परंतु त्याहीआधी, गेल्या वर्षीच विधानसभेत या विषयावर जोरदार चर्चा झाली होती. त्यावेळी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांनी हा विषय शिकवण्याला स्थगिती दिली होती. असं असतानाही, शिक्षणावरील चर्चेला उत्तर देताना वसंत पुरके यांनी, सेक्स एज्युकेशन शिकवण्यावरून आग्रही भूमिका मांडली. त्यांच्या या भाषणाकडे लक्ष वेधून, हा सभागृहाचा अवमान असल्याचा मुद्दा शोभाताई फडणवीस यांनी उपस्थित केला. भंडारा जिल्ह्यात अनेक शाळांमध्ये हा विषय शिकवला जात असल्याचंही त्यांनी निदर्शनास आणलं.
बाबासाहेब कुपेकर यांनी हा हक्कभंग दाखल करून घेतला असून पुरकेंना स्पष्टीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी पुरकेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

"रालोआ'तील दहा खासदार उद्या अनुपस्थित राहणार?

नवी दिल्ली - विश्‍वासदर्शक ठरावावर मंगळवारी मतदान होणार असतानाच सोमवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) फूट पडल्याची चर्चा राजधानीमध्ये सोमवार दुपारपासून होती.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील दहा खासदार मतदानाच्यावेळी अनुपस्थित राहण्याची शक्‍यता आहे. यामध्ये गुजरात, कर्नाटक आणि राजस्थानमधील भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येकी दोन खासदारांचा, बिजू जनता दलातील एकाचा, संयुक्त जनता दलातील दोघांचा आणि शिवसेनेतील एका खासदाराचा समावेश आहे.
विरोधी पक्षातील दहा खासदार अनुपस्थित राहणार असल्याच्या शक्‍यतेमुळे सोमवारी सत्ताधारी पक्षातील खासदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

सभागृहात अशा घडल्‍या घडामोडी

अणू कराराच्‍या मुदयावरून डाव्‍या पक्षांनी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्‍यानंतर पंतप्रधानांना विश्‍वासमत प्रस्‍ताव मांडण्‍यासाठी संसदेच्‍या विशेष अधिवेशनास आज सुरूवात झाली। अधिवेशनास सुरूवात झाल्‍यानंतर घडलेल्‍या काही प्रमुख घडामोडी अशा -
१) सभापती सोमनाथ चॅटर्जी सकाळी लोकसभेत आले आणि त्‍यांनी विश्‍वासमत प्रस्‍तावापूर्वी राजीनामा देणार नसल्‍याचे सिध्‍द केले.
२) संसदेत साडेचार वर्षातील सर्वाधिक संख्‍या आज पहावयास मिळाली.
३) सत्ताधा-यांच्‍या बाजूने एकही आसन रिकामे नव्‍हते मात्र विरुध्‍द पक्षाच्‍या बाजूने काही जागा रिकाम्‍या होत्‍या.
४) सभागृहात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी अनुपस्थित होते.
५) राष्ट्रीय जनता दलाचे खासदार पप्पू यादव उर्फ मोहम्मद शाहबुद्दीन सभागृहात उपस्थित. सभागृहाच्‍या एका विशेष पत्राने त्‍यांना उपस्थितीसाठी परवानगी मिळविण्‍यात आली आहे.
६) नेहमीच गंभीर वाटणारे पंतप्रधान मनमोहन सिंग आज प्रचंड आत्‍मविश्‍वासात सभागृहात प्रवेश करण्‍यापूर्वी त्‍यांनी माध्‍यमांच्‍या प्रतिनिधींकडे 'व्‍ही'खूण करून आपला विजय निश्चित असल्‍याचे पुन्‍हा अधोरेखित केले.
७) विश्‍वासमत प्रस्‍तावास सुरुवात होण्‍यापूर्वी विरुध्‍द पक्ष नेते लालकृष्ण आडवाणी सोबतच्‍या कुठल्‍यातरी विषयावर हसतानाही ते दिसून आले.
८) कामकाजास सुरूवात होताच सभागृहात घोषणाबाजी सुरू झाली. सभापतिंनी समज दिल्‍यानंतर घोषणा बंद.
९) मृत सदस्‍यांना श्रध्‍दांजली प्रस्‍तावाच्‍या वेळीही सदस्‍यांची चुळबूळ, सभापती रागावल्‍यानंतर शांतता.
१०) पंतप्रधानांनी केवळ तीन ओळीत विश्‍वासमत प्रस्‍ताव सादर केला.
११) कॉंग्रेस देशभक्‍त पक्ष असल्‍याचा प्रधानमंत्र्यांचे प्रतिपादन.
१२) विरोधी पक्ष नेते अडवाणींनी सरकारची अवस्‍था आयसीयुतल्‍या रुग्‍णासारखी झाल्‍याचा आरोप केला.
१३) सरकारला पराभूत करणे हा उददेश सरकार अस्थिर करायची नाही- आडवानी.
१४) सरकार बहुमतात- प्रणव मुखर्जी .
१५) मुखर्जी यांच्‍या वक्‍तव्‍यानंतर सभागृहात गोंधळ.
१६) सभागृह 3 वाजेपर्यंत तहकूब .
१७) कामकाज 3 वाजेनंतर सुरू झाल्‍यानंतर पुन्‍हा गोंधळ.
१८) सदस्‍यांचे एकमेकाविरोधात आरोप-प्रत्‍यारोपाच्‍या फैरी.

एसटीचालकाला वाईत मारहाण केल्याने "कामबंद' आंदोलन

वाई - वीज कंपनीच्या कर्मचाऱ्याने चालकाला मारहाण केल्याच्या निषेधार्थ वाई आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी आज अचानक "काम बंद' आंदोलन केले. त्यामुळे प्रवाशांची काही काळ गैरसोय झाली.
सर्जेराव नाना धायगुडे असे या चालकाचे नाव असून, त्याला वाई येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धायगुडे दुपारी बाराच्या सु मारास खंडाळा आगाराची गाडी घेऊन वाईला येत होते. वाईजवळच्या एमएसईबी कार्यालयाजवळ गाडी न थांबविल्यामुळे गाडीतून प्रवास करणारा एमएसईबीचा अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांनी त्यांना मारहाण केली. त्यात धायगुडे जखमी झाले.
घटनेचे वृत्त समजताच वाई आगारातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले. वाई पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून निवेदन दिले. पोलिसांनी कारवाईचे आश्‍वासन दिल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.