मुंबई - प्रेमाला नकार देणाऱ्या मैत्रिणीला दिवसाला दीड हजारहून अधिक मिस्डकॉल्स देऊन त्रास देण्याचा प्रकार मालाड येथील तरूणाच्या चांगलाच अंगलट आला आहे. अनोळखी नावाने, दरवेळी वेगवेगळ्या सीमकार्डचा वापर करून मैत्रीण तसेच तिच्या आईवडिलांना त्रास देणारा हा माथेफिरू प्रियकर मालाड पोलिसांच्या कोठडीत आहे.
अविनाश डोके (२५) असे या अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. सोमवारबाजार परिसरात राहणाऱ्या या तरूणाचे एका महाविद्यालयीन तरूणीवर एकतर्फी प्रेम होते. सी.ए.चा अभ्यासक्रम पूर्ण करीत असलेल्या तरूणीला त्याने दहा महिन्यांपूर्वी प्रेमाबद्दल विचारणाही केली होती. मात्र या तरूणीने त्याला नकार दिला होता. अविनाशने तिच्या नकारानंतर मैत्री कायम ठेवली. गेल्या सहा महिन्यांपासून तो तरूणीला तिच्या मोबाईलवर दिवसाला शेकडो मिस्डकॉल्स व एसएमएस करू लागला.
सततच्या मिस्डकॉल्स आणि एसएमएसला कंटाळलेल्या या तरूणीने आपला मोबाईल क्रमांक तीन वेळा बदलला. यानंतर मात्र तिचे आई वडिल, मामा आदींना अशाच प्रकारे अविनाश त्रास देऊ लागला. हा सगळा उद्योग आपल्या ओळखीचाच तरूण करीत असल्याची माहिती तरूणीला मुळीच नव्हती.
याप्रकरणी तिने बुधवारी मालाड पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिस निरिक्षक दिपक फटांगडे व उपनिरिक्षक चिमाजी आढाव यांच्या पथकाने या परिसरातून शुक्रवारी दुपारी अविनाशला अटक केली.