परप्रातींय विद्यार्थ्यांच्या पैशांवर डोळा ठेवून मराठी मुला-मुलींना डावलण्यात येत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुमारे ४०-५० कार्यकर्त्यांनी शनिवारी दुपारी एमआयटी संस्थेच्या पौड रोडच्या आवारात तोडफोड करत गोंधळ घातला. यात दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील गेल्या वेळेच्या सभेत परप्रांतीयांच्या मुद्यावरून शहरातील खाजगी कॉलेजांना लक्ष्य केले होते. त्यानंतर अचानक शनिवारी सकाळी मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी एमआयटीकडे मोर्चा वळवला. त्यात काही मुलीही होत्या. घोषणा देत त्यांनी माईर्स एमआयटीचे कार्यकारी संचालक मंगेश कराड यांच्या कार्यालयावर हल्ला चढवला. मात्र ते ऑफिसमध्ये नव्हते. या ऑफिसमधील काचा, कुंड्या, खुर्च्या, टीव्ही या कार्यर्कत्यांनी फोडले. कराड यांच्या सचिव त्यावेळी कार्यालयात होत्या. त्या, तसेच आणखी एका कर्मचारी या गोंधळात किरकोळ जखमी झाले. सागर राऊत, आशीष तुरे आणि गणेश शिंदे अशी अटक कार्यर्कत्यांची नावे आहेत, अशी माहिती कोथरूड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गौतम देशमुख यांनी दिली.
एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, मंगेश कराड, तसेच अनेक पदाधिकारी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला गेले असल्याने बरीचशी ऑफिसे रिकामी होती. अर्ध्या तासात या कार्यकर्त्यांनी या ऑफिसेसचा नक्षा बदलून टाकला. मात्र पोलिसांना याबाबत कळवल्याने त्यांनी तिघा जणांना घटनास्थळीच ताब्यात घेतले, असे देशमुख म्हणाले.
घटनेच्या दृष्टीने संपूर्ण देश हा एकात्म असून परप्रांतीयांना प्रवेश न देण्याची भूमिका घेणे कोणत्याच संस्थाचालकांना घेणे शक्य नाही. त्यामुळे एमआयटीवर समाज विघातकांनी केलेला हा हल्ला अतिशय अन्यायी आणि दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे संस्थापक आणि डीन राहुल कराड यांनी दिली.
शैक्षणिक संस्थांनी ९० टक्के स्थानिक आणि १० टक्के परप्रांतीय विद्यार्थी घेणे अपेक्षित असताना एमआयटीमध्ये मात्र प्रवेशाच्या शेवटच्या टप्प्यातही हे प्रमाण नेमके उलटे आहे. त्याच्या निषेधात हे आंदोलन केल्याचे मनसेच्या विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष किशोर शिंदे यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर कोथरूड पोलिसांनी काही दिवसांपूर्वी परप्रांतीयांच्या प्रवेशाचे काम करणा-या २० एजंट्सना एमआयटीच्या आवारातच पकडले होते, असेही त्यांनी सांगितले.