शनिवार, 5 जुलाई 2008

विषारी सापांची पाण्यासाठी जंगलामधून शहराकडे धाव

जळगाव - "उन्हामुळे जगलांतील पाणी संपलेले आहे. त्यामुळे सापांनी जळगावमधून शहराकडे जिथे पाणी मिळेल, तिथे धाव घेतलेली आहे. त्यामुळे मेहरूण तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर विषारी साप आढळून येत आहेत', अशी माहिती येथील सर्पमित्र सागर ढाके यांनी दिली.
शहरातील मेहरूण परिसरात राहणाऱ्या कैलास बुधो चौधरी यांच्या घरांमधून त्यांनी "इंडियन ब्लॅक कोब्रा' या विषारी जातीचा नाग शुक्रवारी पकडला आहे. तर, गेल्या दोन दिवसांपूर्वी महाबळ परिसरामधीलच मोहननगर, दौलतनगर या भागामधूनही चार विषारी नाग पकडण्यात आलेले आहेत.
विषारी सापाच्या वाढत्या संख्येबाबत माहिती देताना श्री. ढाके यांनी सांगितले की, उन्हाळ्यात जंगलातील पाणीसाठा संपलेला असतो. त्यामुळे हे साप पाण्याच्या शोधासाठी शहराकडे धाव घेतात व पाण्याच्या जागी आपले वास्तव्य करतात. त्यामुळे शिरसोली व परिसरामधील साप मेहरूण तलावाच्या परिसरात आलेले आहेत. या ठिकाणच्या बिळात ते वास्तव्य करून राहत आहेत. शहरामधील कांचननगर, आशाबाबानगर, या भागातही हे विषारी साप सापडण्याची शक्‍यता आहे. घोणस व फुरसे या जातीचे सापही आढळण्याची शक्‍यता आहे.

पुण्याच्या शिक्षिकेचा "नासा'च्या शिबिरात सहभाग

पुणे - "नॅशनल एअरोनॉटिकल अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन'तर्फे (नासा) आयोजित शिबिरास सलग दुसऱ्या वर्षी भारतातर्फे उपस्थित राहण्याचा मान पुण्यातील शिक्षिकेस मिळाला आहे।"इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एअरोनॉटिकल इंजिनिअरिंग अँड इन्फर्मेशन टेक्‍नॉलॉजी'मधील प्राध्यापिका लीना बोकील "नासा'चा सात दिवसांचा अभ्यासक्रम पूर्ण करून नुकत्याच परतल्या आहेत. यादरम्यान त्यांना आलेल्या अनुभवाचे सादरीकरण त्या शहरातील विविध शाळांमध्ये करणार आहेत.
जगभरातील मोजक्‍या शिक्षकांसाठी "नासा'तर्फे दर वर्षी "समर कॅम्प' आयोजित केला जातो। विज्ञान, इंजिनिअरिंगच्या शिक्षकांना, प्राध्यापकांना यात प्रामुख्याने प्रवेश दिला जातो. या वर्षी भारतातून निवडलेल्या तीन जणांमध्ये पुण्याच्या "आयआयएइआयटी'मधील एअरोनॉटिक्‍स विषयाच्या प्राध्यापिका लीना बोकील यांचा समावेश आहे. या शिबिराबद्दल "सकाळ'शी बोलताना त्या म्हणाल्या, ""माझी "एअरोनॉटिक्‍स'मधील आवड आणि या विषयाच्या प्रसारासाठी सुरू असणारे प्रयत्न पाहून "आयआयएइआयटी'तर्फे "नासा'च्या शिबिराला जाण्यासाठी निवड करण्यात आली. सात दिवसांच्या अभ्यासक्रमामध्ये सकाळी आठ ते रात्री आठ या कालावधीत "एअरोनॉटिक्‍स', "एव्हिएशन', "रॉकेट इंजिनिअरिंग', "स्पेस सायन्स' या विषयांचे प्रशिक्षण देण्यात आले.
यादरम्यान विशेष यंत्रणांद्वारे तयार केलेल्या चंद्र, तसेच मंगळावरील गुरुत्वाकर्षणाचा आभास आम्हाला अनुभवता आला. स्वत: रॉकेट तयार करून ते उडवण्याचेही प्रात्यक्षिक केले. अनेक आजी-माजी अंतराळवीरांशी झालेला संवादही संस्मरणीय होता. लवकरच मी या सात दिवसांतील अनुभवांचे शहरातील विविध शाळांमध्ये सचित्र सादरीकरण करणार आहे.'' अधिक माहितीसाठी ९८८१४०७५६८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन बोकील यांनी केले आहे.

पैशांसाठी डॉक्‍टरांना मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा

बदलापुर - येथील डॉ. पाटील यांना पैशाच्या मागणीसाठी डोक्‍यात लोखंडी वस्तू मारून जखमी करण्यात आले; तसेच त्यांच्या खिशातील १३ हजार पाचशे रुपये हिसकावून नेल्याप्रकरणी संजय जऱ्हाड व अन्य दोघा जणांविरुद्ध शुक्रवारी सायंकाळी सात वाजता बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत डॉ। जनार्दन तुकाराम पाटील (रा. बदनापूर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की जोशीनगर येथील त्यांच्या रुग्णालयात गुरुवारी रात्री नऊ वाजता संजय सर्जेराव जऱ्हाड, लक्ष्मण भाऊसाहेब पवार व अन्य एक जण (रा. बदनापूर) अशा तिघांनी त्यांच्याकडे २५ हजार रुपयांची मागणी केली. त्यांनी पैसे देण्यास नकार दर्शविल्याने तिघांनी डॉ. पाटील यांना मारहाण केली; तसेच लोखंडी वस्तूने डोक्‍यात मारल्याने ते जखमी झाले. शिवाय डॉ. पाटील यांच्या खिशातील १३ हजार पाचशे रुपये बळजबरीने काढून घेतले; तसेच अन्य दोघा-तिघा साथीदारांना मारहाण करून रुग्णालयाचे नुकसान केले.
याप्रकरणी डॉ। जनार्दन पाटील यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी "त्या' तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास फौजदार सय्यद असिफ करीत आहेत.
खोटी तक्रार : पाटील-माझा मित्र नंदू विनायक अंभोरे यांना उपचारासाठी डॉ. पाटील यांच्याकडे नेले असता डॉ. पाटील दारूच्या नशेत होते. त्यांनी आम्हा दोघा-तिघांना धक्काबुक्की केली आणि पोलिस ठाण्यात माझ्याविरुद्ध खोटी तक्रार दिली. याप्रकरणी आम्ही तहसील यांच्याकडे शुक्रवारी (ता. ४) निवेदन दिले आहे. या निवेदनातही डॉ. पाटील यांच्यावर कारवाई करून त्यांचा वैद्यकीय परवाना रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

इराणमध्ये सतरा भारतीयांना अटक

दुबई - इराणच्या पहिल्या अणुप्रकल्पाजवळ आलेल्या सौदी अरेबियाच्या चार नौका ताब्यात घेतल्या असून, त्यावर सतरा भारतीयांनाही अटक केल्याचे इराणच्या प्रवक्‍त्याने सांगितले. सौदी अरेबियाच्या चार नौका इराणच्या समुद्रात बेकायदेशीररीत्या आल्या होत्या आणि मासेमारी करत होत्या. त्यांना सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले. हे ठिकाण बुशर येथील अणुप्रकल्पापासून तीस समुद्र मैल अंतरावर आहे. नौकेवरील कर्मचाऱ्यांमध्ये सतरा भारतीयांचा समावेश आहे, असे बुशरच्या पोलिसप्रमुख रझा मोहमदी येगानेह यांनी सांगितले. या सर्वांना बुशरच्या नाविक पोलिस दलाच्या ताब्यात असून, बोटीवरील कागदपत्रांची आणि वस्तूंची कसून तपासणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
इराणने रशियाच्या मदतीने या अणुप्रकल्पाच्या बांधणीचे काम हाती घेतले असून, २००८च्या अखेरीपर्यंत पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. याआधीही जून २००७ मध्ये आखातामध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याबद्दल संयुक्त अरब अमिरातीच्या तीन नौका जप्त केल्या होत्या. तसेच मार्च २००७ मध्ये इराणच्या नौदलाने ब्रिटनच्या पंधरा सैनिकांना त्यांच्या नावेसह अटक केली होती. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये बराच तणाव निर्माण झाला होता. दोन आठवड्यांनंतर त्यांची सुटका करण्यात आली होती.

मुंबईत २२ बारबालांना अटक

मुंबई - मालाडमधील अरूणा बार आणि रेस्टॉरंटवर पोलिसांनी शुक्रवारी रात्री धाड टाकून २२ बारबालांना अटक केली. त्याचबरोबर बारचा मॅनेजर, वेटर्स यांनाही ताब्यात घेण्यात आले. नंतर त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली.
ग्राहकांसमोर अश्‍लिल नृत्य व लज्जास्पद हावभाव सुरू असल्याच्या माहीतीवरून पोलिसांनी कारवाई केली. बार रात्री उ शिरापर्यंत सुरू असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

नाशिकमधील तीन घरफोड्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश

नाशिक - नाशिक रोड भागातील तीन घरफोड्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. या घरफोड्यातील पाच लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, घरफोड्यांमधील ऐवज विकत घेणाऱ्या पाच सराफांना अटक करण्यात आली आहे. नाशिकचे पोलिस आयुकत हिमांशू रॉय यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
श्री. रॉय म्हणाले, नाशिक शहरातील रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी नऊ हजार ५४० खटले करण्यात आले आहेत, तसेच दहा लाख २२ हजार रुपयांचा दंड गेल्या महिन्यात वसूल करण्यात आला आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी महापालिका आरटीओ आणि पोलिस यांचामध्ये समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांचे तुंबळ युद्ध महापालिकेने जागा निश्‍तिच केल्यावर संपुष्टात येईल. बॅंकांच्या थकबाकी वसुली एजंटांना पोलिस बंदोबस्त देण्यात येणार नाही. उलटपक्षी कोणालाही धमकविल्यास अशा एजंटाविरुद्ध गुन्हा दाखल होईल. गुंडगिरी आटोक्‍यात आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

तिसरी आघाडी, काम बिघाडी

नवी दिल्ली - समाजवादी पक्षाने अणुकरारास पाठिंबा दर्शविल्याने कॉंग्रेसला हुरूप आला असलातरी तिसऱ्या आघाडीत मात्र यावरून फूट पडू लागली आहे. घटक पक्षांना मुलायमसिंहांचा हा निर्णय रूचलेला दिसत नाही. त्यांनी मुलायमसिंह यादव या च्या समाजवादी पक्षाची आघाडीतून हकालपट्टी केल्याचे समजते. त्यामुळे तिसऱ्या आघाडीत आता बिघाडाची शक्‍यता आहे.
ओमप्रकाश चौटाला यांनी आपल्या प्रतिक्रियेत मुलायमसिंहांवर हल्ला चढवत त्यांना आघाडीतून बाहेर काढण्यात आल्याचे सांगितले. मुलायमसिंहाच्या विनाही युएपीए (संयुक्‍त पुरोगामी राष्ट्रीय आघाडी) सुरू राहील असेही त्यांनी ठणकावून सां गितले. अणुकरार मुद्यावर तिसरी आघाडी सरकारच्या विरोधात मतदान करणार असल्याचे चौटाला यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे टिडीपीचे प्रमुख चंद्रबाबू नायडूनींही मुलायमसिंह बाहेर पडल्यास तिसऱ्या आघाडीवर काहीही परिणाम होणार नसल्याचे म्हटले.

सुनिता विल्यम्स्‌ला पद्मभूषण पुरस्कार प्रदान

ह्यूस्टन(अमेरिका) - अंतराळात सर्वाधिक काळ वास्तव्य करणारी भारतीय वंशाची अमेरिकेची अंतराळवीर सुनिता विल्यम्सला तिच्या अलौकीक कर्तृत्वाबद्दल आज शनिवारी भारताचा दुसरा सर्वोच्च नागरिक पुरस्कार "पद्मभूषण' प्रदान करण्यात आला.
भारताचे वाणिज्य महादूत एस. एम. गवई यांनी एका समारंभात हा पुरस्कार देवून सुनिताचा सन्मान केला. यावेळी तिचे पिता दिपक पंड्याही उपस्थित होते. कार्यक्रमास भारतीय वंशाच्या असंख्य नागरिकांनी उपस्थिती लावली. आपल्या व्यस्त कार्यक्रमांमुळे हा पुरस्कार स्विकारण्यास भारतात येवू शकली नव्हती.

थप्पडीनंतर श्रीशांतने घेतला होता भज्जीबरोबर "डिनर'चा आनंद

नवी दिल्ली - आयपीएल स्पर्धेदरम्यानच्या सामन्यत श्रीशांतला लगावलेला थप्पड हरभजनला ३ कोटी रूपयांला महागात पडला. शिवाय आयपीएलच्या उर्वरीत तसेच ५ एकदिवशीय सामन्यापासूनही वंचित राहावे लागले.
हे जरी खरे असलेतरी श्रीशांतने थप्पड लगावल्यानंतर त्याच सामन्यानंतर रात्री एकत्र भोजनाचा आनंद घेतला होता, अशी कबुली देवून सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्‍का दिला आहे.
एका वाहीनीला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणतो, "आम्ही त्याच दिवशी एकत्र भोजनाचा आनंद घेतला, मात्र प्रसार माध्यम तसेच लोकांनी या घटनेला खूपच गंभीर बनवून राईचा पर्वत केला.'
आता सर्वकाही ठीक असून आमच्यात आता कोणताही वाद राहीलेला नाही, हे प्रकरण भूतकाळात जमा झाल्याचे त्याने सांगितले.

मुशर्रफांचे अस्तित्वासाठी लष्करी डावपेच

कराची, शनिवार, 5 जुलै-पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफांनी माजी लष्करप्रमुख म्हणून आपण संरक्षणात्मक व आणीबाणीच्या परिस्थितीत उपयुक्त डावपेंचांनी सिद्ध असल्याचे स्पष्ट करून आपणास अटकेची भीती नसल्याचे रोखठोक वक्तव्य केले आहे.
त्यांना कथितरीत्या अटक करण्याच्या वृत्तावर कठोर वक्तव्य करताना देशहिताचे रक्षण करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत सक्षम असल्याचे स्पष्ट केले. निर्णायक परिस्थिती उद्भवल्यास त्यासाठी आपणाकडे योजना तयार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
देशास कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी राजकीय पक्षांसोबतच आपलीही भूमिका महत्त्वाची असल्याने देश सोडून जाण्याचा कोणताही उद्देश नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
देशात सद्भावनेचे राजकारण केल्यास राजकीय स्थैर्य आताही शक्य आहे। सत्ताधारी आघाडी सरकारने पाच वर्षाचा कालखंड पूर्ण केल्यास आपणास आनंदच होईल असे स्पष्ट करून विद्वेषाचे राजकारणातून मुक्त होऊन भविष्यातील आव्हानांकडे लक्ष केंद्रित करून सरकारने कार्य केल्यास मूळ प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत त्यांनी आशावाद व्यक्त केला.
दहशतवाद, फूटीरवाद व आर्थिक अस्थैर्याचा व्यापार, उद्योगांवर प्रतिकूल परिणाम होत आहे. लष्कराचा वापर, राजकीय चर्चा व आर्थिक पुनर्बांधणी या त्रिसूत्री समस्येवर तोडग्यासाठी परिणामकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.