बुधवार, 9 जुलाई 2008

आमीर खान करणार मराठी चित्रपट

बॉलीवूडमधील आघाडीचा अभिनेता आमीर खान आता मराठी चित्रपट करणार आहे. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात त्याने ही बाब सूचित केली. या चित्रपटात आमीर स्वतः कामही करणार आहे।
राज ठाकरे यांच्या मराठी दणक्यानंतर बॉलीवूडचे अभिनेते मराठीकडे वळले आहेत। अमिताभ बच्चन यांनीही नुकतीच मराठी चित्रपट बनविण्याची घोषणा केली आहे. पण आमीरचे मराठी प्रेम त्यातून आले नसावे. कारण मध्यंतरी वळू या मराठी चित्रपटाच्या प्रिमीयरसाठीही आमीर उपस्थित होता. त्याने अतिशय बारकाईने हा चित्रपट पाहून दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांचे कौतुक केले होते.
आमीर आता मराठी चित्रपटासाठी चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात आहे. आपल्या प्रॉडक्शन कंपनीतर्फे मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यासही तो उत्सुक आहे.

जळगावमध्ये घरफोड्या करणारी बच्चागॅंग गजाआड

जळगाव - शहरात घरफोड्या, छोट्या-मोठ्या चोऱ्या करणाऱ्या बच्चे गॅंगला शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीने अटक केली. या गॅंगमध्ये पाच जणांचा समावेश आहे. यातील दोन जणांना अटक करण्यात आली. तीन जणांचे वय हे कमी असल्याने त्यांना घरी सोडून देण्यात आले.
भिकमचंदनगरसह इतर भागात बंद असलेल्या घरात घरफोडी करणे, वाहनांच्या बॅटऱ्या चोरून नेण्याचे प्रकार वाढले होते. सातत्याने होणाऱ्या घरफोड्या व चोरींने पोलिस त्रस्त झाले होते. शहर पोलिस ठाण्याचे हवालदार नूरोद्दीन शेख, आनंदसिंग पाटील, बाळू निंबाळकर, सुरेश सपकाळे, सुनील पाटील, सतीश डोल्हारे यांनी काही भागांवर लक्ष केंद्रित करून चोऱ्या बच्चेगॅंगकडून होत असल्याचे निदर्शनास आले.
यातील एका मुलास विश्‍वासात घेऊन पोलिसांनी या गॅंगचा छडा लावीत या गॅंगमधील पाचही जणांना आज ताब्यात घेतले. या गॅंगकडून दोन बॅटरी व जैननगरात चोरीस गेलेल्या चांदीच्या वस्तू हस्तगत केल्या आहेत. काही वस्तू त्यांनी विकल्या असून त्या उद्या हस्तगत करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक संतोषसिंह बिसेन यांनी सांगितले. गॅंगमधील जितेंद्र रामकृष्ण जगदाळे व जितेंद्र रमेश भोई यांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान या गॅंगकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नेरूळमध्ये २० ते २५ कुत्री मृत आढळल्याने खळबळ

मुंबई - नेरूळमध्ये डी. वाय पाटील कॉलेजच्या मागील बाजुस रहिवासी भागात कल (बुधवारी) सकाळी २० ते २५ कुत्री मरून पडल्याचे आढळले.
रहिवासी परिसरातील अशा प्रकारच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

नागपूरात तेलंगखेडी उद्यानात अश्‍लील चाळे करणारी जोडपी अटकेत

नागपूर - तेलंगखेडी उद्यानात अश्‍लील चाळे करणाऱ्या सहा जोडप्यांना मंगळवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने जेरबंद केले. सामाजिक सुरक्षा पथक गस्त करीत असताना त्यांना तेलंखेडी उद्यानात काही जोडपी नको ते चाळे करीत असल्याची माहिती मिळाली.
पथकाने उद्यानात धाड घातली असता, झाडाझुडपाआड नको त्या अवस्थेत सहा जोडपी आढळली. त्यांना ताब्यात घेऊन, अंबाझरी पोलिस ठाण्यात आणण्यात आले. तेथे त्यांच्यावर ११०, १११ आणि ११७ कलमानुसार कारवाई करून, ताकीद देऊन, सोडण्यात आले.
अतिरिक्त पोलिस आयुक्त अनुपकुमार सिंह, सहायक आयुक्त बी. के. गावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गायकवाड, महिला उपनिरीक्षक सौ. नंदिनी चांदपूरकर, सहायक फौजदार देशमुख, हवालदार सहारे, उके, मडावी, महिला शिपाई भारती, ललिता आणि वाहनचालक सुरेश पंधरे आदींनी ही कारवाई केली.

पुण्यात चौघांना उडवले

पुणे - रास्ता पेठेतील कादरभाई चौकात पोलिस व्हॅन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एक वर्षाच्या मुलीसह तीन महिला जखमी, तर सात दुचाकींचा चेंदामेंदा झाला. हा अपघात मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडला.
या अपघातात जखमी झालेल्यांना केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तनिष्का यतीन सोनवणे (वय १), सीमा शिवाजी सोनवणे (वय २४), चंद्रा शिवाजी सोनवणे (वय ५२, तिघी रा. २९० रास्ता पेठ, गुरुप्रसाद सोसायटी) अशी त्यांची नावे आहे. या प्रकरणी समर्थ पोलिसांनी पोलिस व्हॅन चालक सोमनाथ हरिभाऊ होले (वय ४०, रा. वानवडी पोलिस वसाहत) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक हा व्हॅनमधून नेहरू रस्त्याने चालला होता. तेव्हा कादरभाई चौकात एक रिक्षा डाव्या बाजूने अचानक आली, तेव्हा होलेने व्हॅन वळविली. यामुळे त्याचे व्हॅनवरील नियंत्रण सुटले. व्हॅन वेगात पुढे गेल्याने वळणावरील सर्व दुचाकींचा चेंदामेंदा झाला. तेव्हा जखमी स्कुटीवरून चालल्या होत्या. त्यांच्या दुचाकीला व्हॅनची धडक बसली. दर्शन ऑटो कॉर्नर या दुकानाचा दरवाजा तोडून ती व्हॅन थांबली. अपघातानंतर व्हॅन चालक पोलिसाने पळ काढला. तो समर्थ पोलिस ठाण्यात हजर झाला.
दरम्यान, घटनास्थळी पोलिस निरीक्षक मारुतराव डफळे यांच्यासह पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मनसेचे कार्यकर्ते नीलेश शिंदे, संजय बकरे आदींनी जखमींना रुग्णालयात हलविले. महापालिकेने नेहरू रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या जागेवर अद्याप रस्ता तयार करण्याचे काम पूर्ण झालेले नाही. येथे जलवाहिन्या टाकण्याचे काम अपूर्ण असून, खड्डे खोदून ठेवण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी होते. वाहतूक नियंत्रित करण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून कोणीच उपस्थित नाही, अशा तक्रारी या वेळी नागरिकांनी केल्या.

अख्खा जावली तालुका "दारू दुकानमुक्त'!

सातारा - नांदगणे (ता. जावली) येथील महिलांनी गावातील परमिटरूम बंद करत बुधवारी संपूर्ण जावली तालुका दारूदुकान मुक्त केला. महिलांच्या दारूबंदी चळवळीतून दारू दुकानमुक्त झालेला हा राज्यातील पहिला तालुका ठरला आहे.
सकाळी दहा वाजता झालेल्या महिलांच्या विशेष ग्रामसभेत ११५ महिला मतदारांपैकी ५८ महिलांनी सभेस उपस्थिती लावली होती. सर्वच्यासर्व महिलांनी गावातील दारूदुकान बंद करण्याच्या ठरावाला हातउंचावून एकमुखी पाठिंबा दिला. हा ठराव संमत झाल्याने जावली तालुक्‍यातील अखेरचे परवानाधारक दारूदुकान बंद झाले आहे.
यापूर्वी तालुक्‍यातील आनेवाडी, मेढा, कुडाळ येथील दारूदुकाने मतदानाने बंद झाली आहेत. हुमगाव येथील दुकान यापूर्वीच स्वय ंस्फूर्तीने बंद झाले आहे. तालुक्‍यात आता एकही परवानाधारक दारूदुकान राहिलेले नाही.

अणुकरार दोन्ही देशांसाठी महत्त्वाचा - बुश

टोकियो - जी-८ संमेलनासाठी जपान दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज (बुधवारी) अमेरिकेचे राष्ट्रपती जॉर्ज डब्ल्यू बुश यांची भेट घेवून अणूऊर्जा करारावर महत्वपूर्ण चर्चा केली.
अणुकरार दोन्ही देशांकरिता महत्त्वाचा आहे. मात्र या मुद्यावरून दोन्हीही देशांना राजकीय विरोधाला सामोरे जावे लागत असल्याचे राष्ट्रपती बुश यांनी चर्चेनंतर सांगितले.
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भारत-अमेरिका मैत्रिसंबंध अधिक दृढ झाल्याचे तसेच अणु कराराबाबत बुश यांनी सर्वतोपरी सहकार्य देण्याचे आश्‍वासन दिले असल्याचे सांगितले.
दोन्ही नेत्यांदरम्यान जवळपास ५० मिनिटे चर्चा रंगली.

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला न्यायालयाची स्थगिती

मुंबई - राज्यातील इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली आहे.
राष्ट्रवादीचे नेते प्रताप सरनाईक यांनी यासंबंधीची याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

दंगलीप्रकरणी शिवसेना नेते मधुकर सरपोतदार यांना एक वर्षाचा कारावास

मुंबई - मुंबईमध्ये १९९२-९३ मध्ये उसळलेल्या जातीय दंगलीदरम्यान चिथावणीखोर विधाने करून जातीय तेढ निर्माण केल्याच्या आरोपावरून शिवसेनेचे माजी खासदार मधुकर सरपोतदार यांना येथील सत्र न्यायालयाने बुधवारी दोषी ठरवत एक वर्षाची साधी कारावास तसेच पाच हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. त्यांच्यासोबत जयवंत परब व अशोक शिंदे यांनाही हीच शिक्षा सुनावली.
या शिक्षेविरूद्ध हायकोर्टात अपिल करण्यासाठी न्यायालयाने शिक्षेला १६ ऑगस्टपर्यंत संस्थगिती दिली आहे.
दरम्यान, न्यायालयाने मधुकर सरपोतदार, जयवंत परब व अशोक शिंदे यांना पाच हजार रूपयांचा जामीन मंजुर केला आहे.