शुक्रवार, 25 जुलाई 2008

अनुसूचित जातींतील अधिक विद्यार्थ्यांसाठी आता शिष्यवृत्ती

मुंबई, २५ जुलै- - राज्यातील अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी भविष्यात अधिक विद्यार्थ्यांना परदेशात स्कॉलरशिप देण्याची राज्य सरकारची योजना असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत प्रश्‍नोत्तराच्या तासात दिली.
सुभाष चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्‍नाला उत्तर देताना हंडोरे यांनी सांगितले की, आतापर्यंत ७२ विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमासाठी परदेशात पाठविण्यात आले आहे, पण नजीकच्या काळात यामध्ये निश्‍चितच वाढ होईल। त्यांच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठी राज्य सरकारने १९ कोटीची तरतूद केली आहे व गेल्या चार वर्षांत दहा कोटी खर्च करण्यात आले आहेत.
सन २००३ ते २००६ या काळात सरकारने दरवर्षी दहा विद्यार्थ्यांना परदेशात पाठविले आहे, त्यांनतरच्या दोन वर्षांत २५ विद्यार्थ्यांना पाठविण्यात आले आहे. पण या योजनेचा लाभ अधिक विद्यार्थ्यांना मिळावा, यासाठी मागणी वाढत आहे.असेही हंडोरे यांनी एका उपप्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.

औरंगाबादेत मुसळधार पाऊस

औरंगाबाद, २५ जुलै - औरंगाबादेत बुधवारी रात्री या हंगामातील पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर गुरूवारी दिवसभर पाऊसाने दडी मारली आणि शुक्रवारी रात्री साडे आठ पासून शहर आणि परिसरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली.
शहरातील रेल्वे स्टेशन, पद्‌मपुरा, क्रांतीचौक, ज्योतीनगर, शहानुरमियॉं दर्गा, सिडको, हडकोसह शहरातील मुख्य बाजारपेठेत पाऊस झाला. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला.

कंडोम कंपन्यांना न्यायालयाने फटकारले

कंडोमची विक्री करण्यासाठी उत्पादनाच्या पाकिटांवर अश्लिल छायाचित्र लावणे चुकिचे असल्याचे स्पष्ट करत विक्रीसाठी अश्लिल जाहीराती करणार्‍या कंडोम कंपन्यांना न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे.
एका जनहीत याचिकेवरील सुनावणी दरम्यान मुख्य न्यायाधीश ए के गांगुली आणि न्या. पी ज्योतिमनी यांच्या खंडपीठाने याचिकेवरील निर्णय सुनावताना कंपन्यांवर ताशेरे ओढले. अशा स्वरुपाच्या जाहीराती आणि पाकिटांवरील छायाचित्रांमुळे चुकिचा संदेश जात असल्याचे याचिकाकर्ते सी रवीकुमार यांचे म्हणणे होते.

भारतीय फलंदाजांची तंबूकडे पळापळ

भारतीय गोलंदाजांना धू धू धुतल्यानंतर श्रीलंकेने 600 धावांचे लक्ष्य भारतीयांना दिले होते. पण त्याचा पाठलाग करताना ज्या वरिष्ठ भारतीय खेळाडूंवर कर्णधार कुंबळेने विश्वास व्यक्त केला होता, त्यांनीच तंबूत परतून कुंबळेचा विश्वास श्रीलंकेच्या समुद्रात बुडवला. भारताची भक्कम फलंदाजी १४६ धावांवर ६ बाद अशी केव्हाही मान टाकेल अशा स्थितीत आहे.
आयपीएल लीगमध्ये झटपट धावा काढण्याची सवय लागलेले भारतीय फलंदाज आज सारे तंत्र विसरुन केवळ धावांच्या मागे लागल्याचे चित्र दिसत होते. यात पहिला बळी गेला तो, सेहवागचा. सेहवाग 25 धावांचे योगदान देत तो पव्हेलियनमध्ये परतला. त्याला कुलशेखराने तंबूत धाडले.
यानंतर सचिन आणि गंभीर यांच्याकडून भारतीय क्रिकेटप्रेमींना आशा होत्या परंतु, तेही स्वस्तात तंबूत परतले. यापूर्वी भारताची भिंत अर्थात राहूल द्रविड कोसळला. नंतर गांगुली दादाही आल्या पावली परत गेला.
कार्तिकलाही मुरलीने परत पाठवल्यावर कर्णधार कुंबळे आणि लक्ष्मण आता मैदानावर टिकून आहेत. आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची ६ बाद १४७ अशी अवस्था होती. आता भारतावर फॉलोऑचे संकट आहे.

दवाखाना सुरू करताना पोलिसांकडे नोंदणी आवश्‍यक करणार

मुंबई, २५ जुलै - बोगस डॉक्‍टरांना आळा घालण्याच्या उद्देशाने वैद्यकीय पदवीधराने नवीन दवाखाना सुरू करताना स्थानिक पोलिस ठाण्यामध्ये नोंदणी केली पाहिजे, असा नियम करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी शुक्रवारी विधान परिषदेत ही घोषणा केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उषा दराडे आणि इतर तीन सदस्यांच्या लक्षवेधी सूचनेवर निवेदन करताना राज्यमंत्र्यांनी बोगस डॉक्‍टरांचे प्रमाण मुंबईत अधिक असल्याचे सांगितले. बीड जिल्ह्यात २८ बोगस डॉक्‍टरांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले.
पोलिस ठाण्यात डॉक्‍टरांना अशी नोंदणी करावयास लावणे अवमानकारक असल्याचे मत शिवसेनेचे डॉ. दीपक सावंत यांनी व्यक्त केले. त्यावर पेईंग गेस्ट, पोटभाडेकरू ठेवतानाही घरमालकाने पोलिसांना कळवावे अशी तरतूद आहे, याकडे राज्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

नवी मुंबईत आता पावणेसहा तास भारनियमन

नवी मुंबई, २५ जुलै - एकविसाव्या शतकातील शहर म्हणून नावाजलेल्या नवी मुंबईतील वीज भारनियमनाच्या वेळेत वाढ करण्यात आली असून, चार तासांचे भारनियमन आता पावणेसहा तासांपर्यंत करण्यात आले आहे. या निर्णयामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

समाजवादी पक्षाचे ६ खासदार निलंबित

लखनऊ, २५ जुलै- केंद्रातील संपुआ सरकारच्या विश्‍वासदर्शक ठरावावेळी संसदेत हजर राहून सरकारच्या बाजुने मतदान करण्यासाठी समाजवादी पक्षाने खासदारांसाठी जारी केलेला व्हिप धुडकावून अनुपस्थित राहीलेल्या सपा खासदारांवर आज शुक्रवारी पक्षाने कठोर कारवाईचा बडगा उगारत त्यांना निलंबित केले.

वसंत डावखरेंना जीवे मारण्याची धमकी, चौकशीचे आदेश

मुंबई, २५ जुलै- विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, अशी माहिती आज विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर विधान परिषदेत दिली. या घटनेची दोन दिवसात चौकशी करण्याचे आदेश विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी राज्य सरकारला दिले आहेत.
या प्रकरणी, शुक्रवारी विधान परिषदेत फुंडकर यांनी डावखरेंना गुन्हेगारी टोळ्यांकडून मिळणा-या जीवे मारण्याच्या धमक्यासंदर्भात पत्र वाचून दाखविले. पत्रात डावखरे यांच्या नावाची सुपारी देण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
डावखरे यांना जीवे मारण्याची धमकी गॅंगस्टर किरण पुजारीने दिली आहे, असे हिरामण शहा यांनी पत्राद्वारे कळवले आहे. पुजारी सध्या मटकाकिंग सुरेश भगतच्या खुनप्रकरणात गजाआड आहे. भांडुपचे आमदार संजय पाटील यांचेही अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा उल्लेख या पत्रात आहे, फुंडकर यांनी सभागृहात सांगितले.

बंगलूरुमध्ये साखळी स्फोट, तिन ठार

बंगलूरू, २५ जुलै - बंगलूरुमध्ये आज पाच साखळी स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. हे स्फोट कमी तिव्रतेचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे असले तरी, यात आतापर्यंत तिघांचा बळी गेला आहे. यानंतर देशातील महत्वांच्या शहरांमध्ये अतिदक्षतेचे आदेश देण्यात आले असुन, बॉम्बशोधक पथकांनी बंगलूरु मधील अनेक महत्वांच्या जागी शोध मोहिम सूरु केली आहे.
बंगलूरुचे पोलिस आयुक्त सिकंदर यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिला स्फोट नयंद इल्ली भागात झाला। ही मुख्य बाजारपेठ असल्याने नागरिकांना लक्ष्य करुनच हे हल्ले करण्यात आले. यानंतर माडीवाला, आरुगोडी, राजा राम मोहन जंक्शन, आणि कोडा मंगला भागात एका पोठोपाठ स्फोट झाल्याने बंगलूरसह कर्नाटक हादरले.
या स्फोटात अंबु, आणि मुनी हे दोन नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी शहरभर सतर्कतेचे आदेश देत जागोजाग शोध मोहिम सुरु केली आहे.