गुरुवार, 3 जुलाई 2008

कच्च्या तेलाचा चढता प्रवास सुरूच!

लंडन, ता. २७ - डॉलरचे मूल्य अन्य महत्त्वाच्या चलनांच्या तुलनेत घसरल्याने गुंतवणूकदारांनी जोखीम कमी करण्यासाठी कच्च्या तेलाची आज मोठ्या प्रमाणात खरेदी केली.त्यामुळे आशियाई बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा भडकल्या आणि कच्चे तेल प्रतिपिंप १४१ डॉलरच्या पुढे गेले.
सत्रांतर्गत व्यवहारात कच्चे तेल प्रतिपिंप १४१.७१ डॉलरवर पोचले होते. या आधी सोळा जूनला कच्च्या तेलाने १३९.८९ डॉलर ही उच्चांकी पातळी गाठली होती.
""नजीकच्या भविष्यात कच्च्या तेलाच्या किमती दीडशे ते १७० डॉलर प्रतिपिंपापर्यंत जाऊ शकतात। मात्र, चालू आर्थिक वर्षअखेरपर्यंत या तेलाच्या किमती थोड्या खाली येण्याची अपेक्षा आहे,'' असे "ओपेक'चे अध्यक्ष चाकिब खलिल यांनी सांगितले. तसेच कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात करण्याचे सूतोवाच लीबियानेही केले आहे. या सर्व घटनांचा परिणाम तेलाच्या किमतींवर जाणवत आहे. श्री. खलिल पुढे म्हणाले, ""कच्च्या तेलाची मागणी खरोखरच वाढली, तर ती पूर्ण करण्यासाठी "ओपेक' प्रयत्न करील. जगाची तेलाची गरज पुढील पन्नास वर्षे भागविली जाईल एवढे कच्चे तेल सध्या उपलब्ध आहे. गेल्या वर्षभरात कच्च्या तेलाच्या किमतीत दुपटीनी वाढ झाली आहे. कच्च्या तेलाचे भाव उच्चांकी पातळीवर पोचले असल्याने तेलदरवाढीचा जागतिक पातळीवर निषेध होत आहे. तेलाच्या किमती वाढण्यामागे सट्टेबाजी हे एक कारण असून, ही सट्टेबाजी दीर्घकाळ टिकणार नाही. अमेरिकेनेही सट्टेबाजीला विरोध केला आहे.''
कच्च्या तेलात चालणाऱ्या सट्टेबाजीला लवकरात लवकर आळा घातला जावा यासाठी नवीन कायदा केला जाणार असून, त्या संदर्भातील विधेयक अमेरिकेच्या प्रतिनिधी मंडळापुढे मांडण्यात आले आहे। मात्र, या विधेयकाला सिनेटची मान्यता मिळाल्यावर त्याचे रूपांतर कायद्यात होणार आहे. ""या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यावर त्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर अल्पकाळापुरताच होईल,'' असे हॉंगकॉंगस्थित मर्क्‍युरी सिक्‍युरिटीजचे तेल विश्‍लेषक डेव्हिड जॉन्सन यांनी सांगितले.
श्री। खलिल म्हणाले, ""कच्चे तेल प्रतिपिंप दोनशे डॉलरवर जाण्याची शक्‍यता कमी आहे. मात्र, इराणमध्ये तेलाच्या उत्पादनाबाबत काही पेचप्रसंग निर्माण झाल्यास किमती प्रतिपिंप दोनशे, तीनशे डॉलर आणि पुढेही जाऊ शकतात. व्याजदराबाबत युरोपीय सेंट्रल बॅंकेची बैठक (ईसीबी) येत्या गुरुवारी होणार आहे. बॅंकेने व्याजदरात वाढ केल्यास कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ होऊ शकते.''
युरोपातही चलनवाढीची समस्या
युरोपातही चलनवाढीची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या "ईसीबी'च्या बैठकीत व्याजदरात पाव टक्का वाढ होण्याची शक्‍यता असून, वाढ झाल्यास हा दर सव्वाचार टक्‍क्‍यांवर पोचणार आहे. युरोचे मूल्य डॉलरच्या तुलनेत वाढत आहे. त्यामुळे कच्च्या तेलाची मागणी वाढण्यामागचे हे एक कारण असून इराण, इराक किंवा नायजेरियातील पेचप्रसंगाचा परिणाम त्याच्यावर होत आहे.

प्रतियुनिट ४८ पैसे आकारणार; नियामक आयोगाचा आदेश

पुणे, ता। २३ - शहर व पिंपरी-चिंचवडमध्ये अखंडित वीजपुरवठ्यासाठी प्रतियुनिट ४८ पैसे इतका दर (रिलायबिलीटी चार्जेस) निश्‍चित करण्यात आला आहे. राज्य वीज नियामक आयोगाने आज हा आदेश दिला.
दरमहा तीनशे युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मात्र हा आकार भरावा लागणार नाही. येत्या एक जुलैपासून हा दर आकारण्यात येणार आहे.
पूर्वी शहर व परिसरातील उद्योगांकडून वीजनिर्मिती करून शहरातील विजेची तूट भरून काढण्यात येत होती। त्यासाठी प्रतियुनिट ४२ पैसे इतका आकार लावण्यात येत होता. मात्र, शहरातील मागणी वाढत गेली, त्या तुलनेत पुरवठा वाढला नाही. त्यामुळे शहरात भारनियमन लागू होण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. मात्र, शहरात अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी २४ तास शंभर मेगावॉट अतिरिक्त वीज "टाटा पॉवर'मार्फत घेण्यात येत आहे. या संदर्भात "महावितरण'ने राज्य वीज नियामक आयोगापुढे प्रस्ताव ठेवला होता. त्यावर आयोगाने पुण्यात सुनावणी घेतली होती. ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ, विविध स्वयंसेवी संस्था, महापालिका आणि राजकीय पक्षांनी या वेळी बाजू मांडली होती. त्या संदर्भात आयोगाने आज आदेश दिला आहे. शहरात अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी प्रतियुनिट ४८ पैसे इतका आकार आयोगाने निश्‍चित केला आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. हा दर पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत लागू राहणार आहे. त्यामुळे पुढील उन्हाळ्यातही पुणेकरांना याच दरात अखंडित वीजपुरवठ्याचा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, या नव्या व्यवस्थेची दर तीन महिन्यांनी लेखापरीक्षकांकडून तपासणी करून घ्यावी, असाही आदेश आयोगाने दिला आहे.
दरम्यान, "कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज'च्या (सीआयआय) राज्य शाखेचे अध्यक्ष आणि "पुणे मॉडेल'चे प्रवर्तक प्रदीप भार्गव यांनी आयोगाच्या आदेशाचे स्वागत केले आहे। ग्राहकांना यासाठी ४८ पैशांचा अतिरिक्त भार पडणार असून, त्यातूनही सर्वसामान्य ग्राहकांना वगळण्यात आले आहे, ही स्वागतार्ह बाब आहे, असे भार्गव यांनी सांगितले; तसेच "पुणे मॉडेल' अधिक सुलभ झाले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
अखंडित वीजपुरवठ्यासाठी आयोगाने प्रतियुनिट आकारात माफक वाढ करून पुणेकरांना दिलासा दिला आहे, अशी प्रतिक्रिया "सजग नागरिक मंचा'चे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी व्यक्त केली। मात्र, अखंडित वीजपुरवठ्याचा आकार घेताना शहरात खरोखरीच अखंडित वीजपुरवठा करण्याची जबाबदारी "महावितरण'ने पार पाडली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुढील वर्षीच्या मे महिन्यापर्यंत हा दर निश्‍चित केला असला, तरी त्यानंतर पावसाळा येत असल्याने पुढील ऑक्‍टोबरपर्यंत पुणेकरांना दिलासा मिळाला आहे, असे ते म्हणाले.
""अखंडित वीजपुरवठ्यासाठी "पुणे मॉडेल'ने संपूर्ण राज्याला नवा मार्ग दाखवून दिला असून बारामती, नवी मुंबई आणि ठाणे ही शहरेही भारनियमनमुक्त होत आहेत.''

डाव्या पक्षांची उद्या सरकारला सोडचिठ्ठी

नवी दिल्ली, दि. २ : अणुकराराच्या मुद्द्यावरून सरकार विरुध्द आक्रमक भूमिका घेतलेल्या डाव्या पक्षांनी आपला पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय पक्‍का केला आहे। खात्रीलायक वृत्तानुसार 4 जुलै रोजी डाव्या पक्षांची विशेष बैठक घेतली जाईल आणि पाठोपाठ सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचे निवेदन राष्ट्रपती सौ. प्रतिभाताई पाटील यांच्याकडे सोपविले जाईल.
फॉरवर्ड ब्लॉकचे महासचिव खा. देववृत्त विश्‍वास यांनी सांगितले की, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अणुकरारावर पुढचे पाऊल टाकून युपीएने गंभीर उल्लंघन केले आहे. कॉंग्रेसने डाव्या पक्षांचा विश्‍वासघात केला आहे.
दरम्यान अणुकराराबाबत समाजवादी पक्षाने आपला निर्णय युएनपीच्या बैठकीनंतर घेतला जाईल, असे घोषित केले आहे. राजदचे नेते रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर आज बुधवारी खुशीत दिसत होते. ते म्हणाले, समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांचा सरकारला थेट पाठिंबा मिळेल याचा मला विश्‍वास वाटतो. मुलायम हमारे है । सरकार तथा करार दोनो बचे रहेंगे ।
इकडे समाजवादी पक्षाने म्हटले आहे की, पंतप्रधानांनी अणुकरारासंदर्भात दूरदर्शनवरून काही गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजेत आणि लोकांना विश्‍वासात घेतले पाहिजे.

तासवडे टोलनाक्‍यावर संतप्त जमावाचा हल्लाबोल

उंब्रज, दि. 2 : तासवडे, ता. कराड येथील टोलनाक्‍यावरील कर्मचारी यांची सुरू असलेली गुंडगिरी व वाहनधारक यांना नाकारण्यात आलेली सवलत या कारणावरून उंब्रज येथील सुमारे 300 जणांच्या संतप्त जमावाने मोठ्या प्रमाणात दगडफेक करून टोलनाक्‍याची तोडफोड केली. या दगडफेकीत तीन जण जखमी झाले, तर सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. याबाबत टोलनाका व्यवस्थापकाकडून तळबीड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. संतप्त भूमिकेमुळे या परिसरातील वातावरण बराच वेळ तणावपूर्ण होते.
टोलनाका व वाहनधारक यांचा वाद हा आता नवा राहिलेला नाही. तासवडे टोलनाक्‍यावरील ही अन्यायकारक टोलवसुली व अरेरावीबाबत या परिसरातील वाहनधारकांनी बऱ्याचवेळा आंदोलने केली आहेत. मात्र येथील परिस्थितीही ये रे माझ्या मागल्यासारखीच आहे. पी. बी. ए. कंपनीकडून तासवडे टोलनाका चालविण्याची निविदा संपल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून उल्हासनगर येथील कोनार्क कंपनीने टोलनाका चालविण्यास घेतला आहे.
मागील कंपनीने स्थानिक वाहनधारकांच्या टोलमाफीच्या आक्रमक भूमिकेमुळे स्थानिकांना टोलमधून वगळले होते, मात्र गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कोनार्क कंपनीने स्थानिकांची सवलत रद्द केली होती. टोलवसुली दरम्यान वाहनधारक व कर्मचारी यांच्यामध्ये वादावादी ही नित्याची झाली होती. गुंडशाही व अरेरावीच्या कारणावरुन येथील सुमारे ३०० जणांच्या संतप्त जमावाने टोलनाक्‍यावर दगडफेक करुन तोडफोड केली. टोलनाक्‍यावरील बुथ, संगणक आदींचे नुकसान झाले. येथील कर्मचारी हे संतप्त जमावाच्या आक्रमकतेमुळे पळून गेले.
याच दरम्यान घटनास्थळी सपोनि हरीष खेडकर, डॉ. दिगंबर प्रधान दाखल झाले व त्यांनी जमावास शांततेचे आवाहन केले. यावेळी टोलनाक्‍याचे संबंधित अधिकारी डॉ. दिगंबर प्रधान, तहसीलदार धनाजी तोरस्कर, नगरसेवक राजेंद्र यादव यांच्यासह जमावातील काहीजणांना चर्चेसाठी बोलविण्यात आले. या चर्चेदरम्यान स्थानिक वाहनधारकांना टोलमधून वगळण्यात यावे तसेच टोलनाक्‍यावर चाललेली गुंडगिरी, अरेरावी ही तात्काळ थांबवावी असे वाहनधारकांनी सांगितले. राजेंद्र यादव म्हणाले, स्थानिकांना सवलत देण्यास प्राधान्य दिले आहे, मात्र स्थानिक वाहनधारक शिवीगाळ करत आहेत.
यापुढे स्थानिक वाहनधारकांना टोलमधून वगळण्यात येणार असून गुंडगिरी व अरेरावी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. दरम्यान याबाबतची फिर्याद टोलनाक्‍यावरील मॅनेजर मूलचंद जेठवाणी यांनी तळबीड पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी जमावातील अकरा जणांसह सुमारे १२ जणांवर सार्वजनिक मालमत्तेची मोडतोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे।
तासवडे टोलनाका येथे सकाळी १० वाजता झालेल्या दगडफेकीनंतर सुमारे तीन तास टोलनाक्‍यावरील टोल आकारणी बंद होती. त्यामुळे अनेक वाहनचालक टोल न देताच जात असल्यामुळे वाहनधारकांकडून समाधान व्यक्‍त केले जात होते.

सांगलीत कुपवाडला तरुणाचा निघृण खून

कुपवाड - येथील संतोष बाळासाहेब ओलेकर (वय२०) या तरुणाचा बुधवारी मध्यरात्री अज्ञातांनी खून केला. शिवनेरीनगर रस्त्यावर ही घटना घडली। गुप्तीसारख्या धारदार शस्त्राने त्याच्यावर वार करण्यात आले.
संतोष हा आयसीआयसीआय बॅंकेच्या मिरज शाखेत सिक्‍युरिटी गार्ड म्हणून काम करत होता। त्याचे गेल्या महिन्यात सं जयनगरातील काही जणांशी भांडण झाले होते. यातूनच हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
याबाबत कुपवाड पोलिस ठाण्यात नोंद झाली असून अद्याप कोणालाही पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही.

देशातील सर्वात मोठ्या तस्कराला अटक ?

मुंबई - इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तुंची तस्करी करणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या तस्कराला केंद्रीय महसूल गुप्तचर विभागाच्या पथकाने ३२ लाख रूपयांचा कर चुकविल्याप्रकरणी अटक केल्याचे वृत्त आहे।
गेल्या १० वर्षांपासून या व्यवसायात असलेल्या या तस्कराने आजवर एक हजार कोटी रूपयांहून अधिक रूपांची कर चुकवेगिरी केल्याची शक्‍यता महसूल गुप्तचर खात्यातील सूत्रांनी वर्तविली आहे।
सुनिल गुप्ता असे या तस्कराचे नाव आहे. देशभरात इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तुंची विक्री करणाऱ्या मोठमोठ्या मॉल्सना तो कमी किंमतीत इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंचा पुरवठा करतो. त्याला आज गुरूवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जम्मू-काश्‍मीरमध्ये लष्करच्या दोन अतिरेक्‍यांचा खातमा

श्रीनगर - लष्कर-ऐ-तैयबा या दहशतवादी संघटनेच्या एका प्रमुखासह दोन अतिरेक्‍यांचा पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी गुरूवारी खातमा केला।
सुरक्षा दलाने नैनाबातपोरा गावात एका घरावर आज सकाळी छापा टाकला असता अतिरेक्‍यांनी गोळीबार सुरू केला. उत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात हे अतिरेकी ठार झाले.

"भारत बंद'ला देशभरात संमिश्र प्रतिसाद

नवी दिल्ली - अमरनाथ देवस्थान समितीकडे वनजमीन हस्तांतर करण्याचा निर्णय रद्द करण्याच्या जम्मू-काश्‍मीर सरकारच्या निर्णयाविरूद्ध विश्‍व हिंदू परिषद तसेच हिंदूत्ववादी संघटनांनी गुरूवारी पुकारलेल्या देशव्यापी "भारत बंद'ला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे। या बंदला भाजप, शिवसेनेसह अनेक हिंदू संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. अनेक राज्यांमध्ये आंदोलकां कडून दुकाने उघडण्यास अटकाव करणे तसेच बसेसवर दगडफेक करण्याचे प्रकार घडत आहेत.
जम्मू-काश्‍मीर - अमरनाथ देवस्थानला वनजमीन देण्याचा निर्णय मागे घेण्याच्या निर्णयाविरूद्ध सुरू असलेल्या "भारत बं द'ला जम्मृूत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना काश्‍मीरमध्ये मात्र बंदचा कोणताही परिणाम दिसत नाही।
आग्रा - आगऱ्यात बंद दरम्यान दिल्ली-भोपाळ शताब्दी एक्‍स्प्रेस अडवली आहे. भोपाळ - काही ठिकाणी तोडफोडीच्या घटनांचे वृत्त आहे. सर्व शाळा-कॉलेजना सुट्टी. पजांब - विहिंप कार्यकर्त्यांनी राजापुरा महामार्ग-१ रोखून धरला. सर्व हिंदू संघटनांचा बंदला पाठिंबा. इंदूर - बंद दरम्यान "रिलायन्स फ्रेश'वर हल्ल्याचे वृत्त बंगळूर - बंदला संमिश्र प्रतिसाद, म्हैसूरमध्ये शाळा-कॉलेजना सुट्टी जाहीर.

ज्ञानेश्‍वर माऊलींचे सातारा जिल्ह्यात आगमन

सातारा - संत शिरोमणी ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे गुरूवारी दुपारी अडीच वाजता सातारा जिल्ह्याच्या सीमेवर पाडेगाव (ता. खंडाळा) येथे भव्य स्वागत करण्यात आले.
दुपारी अडीच वाजता पालखी सोहळा निरानदीजवळ आला. त्यानंतर माऊलींच्या पादूकांना पारंपरिक पद्धतीने स्नान घालण्यात आले. नंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्याच्या सिमेवर पालखीचे स्वागत करण्यात आले.
सायंकाळपर्यंत पालखी सोहळा लोणंद येथे पोचेल. तेथेच त्यांचा मुक्काम असून उद्या(शुक्रवारी) सकाळी पालखी मार्गस्थ होणार आहेत.

विहिंपच्या बंदला हिंसक वळण

देशभर तोडफोड, दगडफेक
अमरनाथ देवस्थानच्या जमिनीसाठी विश्व हिंदू परिषदेने दि. ३ जुलै रोजी देशव्यापी बंदचे आवाहन केले असून अत्यावश्यक सेवांसह सर्व व्यवहार बंद दिवसभर बंद ठेवण्याचे जाहीर केले असले तरीही विहिंपच्या या बंदला देशभर हिंसक वळण मिळाले असून त्‍यामुळे जनजीवन विस्‍कळीत झाले आहे.
अमरनाथ मंदिर देवस्थानला वनजमीन देण्याच्या निर्णयाच्या विरोधात गेल्या महिन्याभरापासून जम्मू-काश्मिरमध्ये राजकीय आंदोलन सुरू झाले आहे। तेथील गुलाम नबी आझाद सरकारमधील घटक पक्ष असलेल्या पीडीपीने सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. परिणामी वनजमीन देण्याच्या निर्णयावरून आझाद सरकारने माघार घेतल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी देशभर आंदोलन पुकारले असून केंद सरकारने ही जमीन तातडीने देवस्थानला परत करावी या मागणीसाठी विहिंप, बजरंग दल यासह अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी देशव्यापी बंदचे आवाहन केले आहे.
दरम्यान, विहिंपच्या या बंद आंदोलनाचे देशभर जोरदार पडसाद उमटले असून दिल्ली, नागपूर, आग्रा, इंदूर व पेणसह अनेक भागात आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आहे। बंदमुळे सामान्य जनजीवन मात्र विस्कळीत झाले आहे. बंदच्या पूर्वसंध्येला नागपुरमध्ये हिंसक वळण मिळाले असून संतप्त निदर्शकांनी शहरातील महाल भागात बसेसची तोडफोड केली असून आणि इतर वाहनांवर दगडफेक केली आहे. त्यामुळे नागपुरात संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. तर पेण, इंदूरसह अनेक भागात विहिंपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करीत तोडफोड केली. आग्य्रात कार्यकर्त्यांनी शताब्दी एक्सप्रेस अडविल्यानेही काही काळ गोंधळ झाला आहे.
काश्मिरात मतं मिळवण्यासाठी देवस्थानची हक्काची जमीन न देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे। ही वनजमीन असल्यानं ती देवस्थानाला देता येणार नाही, असं सरकारचं म्हणणं आहे. परंतु मुस्लिमांचं लांगूल चालन करण्यासाठी आणि हिंदू समाजाचा अपमान करण्यासाठी हा डाव असल्याचा आरोप विहिंपने केले आहे.
विहिंपच्या या बंदमध्ये संघ परिवारातील भाजप, अभाविप, भारतीय मजदूर संघ यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. तर शिवसेनेनेही बंदला नैतिक पाठिंबा दिला आहे.