मंगलवार, 8 जुलाई 2008

27-उत्तर मुंबई गोरेगाव लोकसभा क्षेत्राचा कार्यकर्ता मेळावा संपन्न

मुंबई, दि. ८ : २७ -उत्तर मुंबई गोरेगाव लोकसभा क्षेत्रातील शिवसेना विभाग क्र. १ व २ मधील आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, गटप्रमुख, भारतीय विद्यार्थी सेना व स्थानीय लोकाधिकार समिती कार्यकर्ते यांचा मेळावा रविवार दि. ६ जुलै २००८ रोजी न्यू स्टॅन्डर्ड इंजिनियरींग हॉल, गोरेगांव (पूर्व) येथे संपन्न झाला.
सदर मेळाव्याच्या प्रसंगी शिवसेना नेते सर्वश्री लिलाधर डाके, सुभाष देसाई, गजानन कीर्तिकर, प्रा. सुनिल देवधर, शिवसेना सचिव अनिल देसाई, विनायक राऊत, भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अभिजीत पानसे, मुंबई मनपा सभागृह नेता सुनिल प्रभू, स्थायी समिती अध्यक्ष रविंद्र वायकर, सुधार समिती अध्यक्ष यशोधर फणसे अतिथी म्हणून उपस्थित होते. सदर मेळाव्याचे आयोजन शिवसेना विभाग क्र. १ चे विभागप्रमुख, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, आमदार व विभाग क्र. २ चे विभागप्रमुख ऍड. अनिल परब, महिला विभाग संघटक साधनाताई माने व स्मिताताई बागवे यांनी केले होते.

कळवा पूर्वमध्ये विजेचा लपंडाव

कळवा, दि ८ :ठाणे जिल्ह्यातील कळवा (पूर्व) कडील भागात महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनी विज पुरवठा करते. कळवा शिवाजी नगर, आनंद नगर, वाघोबा नगर या भागामध्ये प्रामुख्याने गेले दोन-तीन दिवसातून ४ ते ५ वेळा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. याची ग्राहकांना पूर्व सूचना न देता सदर प्रकार चालू आहे. त्यामुळे शिवाजी नगर, आनंद नगर, वाघोबा नगर याभागातील रहिवासी नियमित वीज बील अदा करतात. तरी महावितरण कंपनी स्थानिक रहिवाशांवर अन्याय करीत आहे. विद्यार्थी वर्ग, गृहीणी, आजारी नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा स्थानिक नागरिकांचा विद्युत वितरण कंपनीवर रोष असून संबंधितांनी याची नोंद घ्यावी, अशी लोकांची मागणी आहे.

विद्युत फ्यूज चोरांमुळे पायधुनीवासिय हैराण

मुंबई, दि. : गेल्या रविवारी पायधुनी येथील अब्दुल रहेमान मार्गावर स्थित असलेल्या रंगवाला इमारतीतील रहिवाशांना तब्बल ५ अंधारात काढावे लागले होते. या परिसरात वाढत्या फ्यूज चोऱ्यांंनी रहिवाशी हैराण झाले असून आरोपींना पकडण्यात पोलिसांनाही अद्याप यश आलेले नाही.
अशा प्रकारची फ्यूज चोरी होण्याची ही दुसरी वेळ असून ऐन रविवारच्या सुट्टीच्या दिवशी झालेल्या वीज फ्यूज चोरीमुळे इलेक्ट्रिशियन मिळणेही कठीण झाले होते. अखेर इलेक्ट्रिशियन मिळाला पण चांगलाच आर्थिक फटका सहन करावा लागला. फ्यूजची चोरी करणारी टोळी ही अंमली पदार्थांचे सेवन करीत असून अवघ्या 30 ते 40 रुपयांसाठी ही टोळी ही चोरी करीत असल्याचे उघड झाले आहे. सुरुवातीला रात्रीच्या गडद अंधारात चोऱ्या होत असत मात्र आता दिवसाढवळ्याही होत असलेल्या या चोऱ्यामुळे रहिवाशी हैराण झाले आहेत. जवळ असलेल्या शस्त्रास्त्रांच्या सहाय्याने अलगद टाळे उघडून वीज फ्यूजची चोरी केली जात आहे. या टोळ्यांचे दुकानदारही ठरवलेले असल्याने वीज फ्यूजची चोरी करून ते ओळखीच्या दुकानदारांना विकले जात. या वीज फ्यूज चोऱ्यांमुळे रहिवाशी कमालीचे संतप्त झाले असून लवकरात लवकर त्यांचा या फ्यूज चोरांचा त्वरीत बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे

मटका क्वीन जया भगतची रोजची कमाई एक कोटी

मुंबई, दि. ८ : कधी काळी गरीबांचा जुगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मटक्याच्या धंद्यात रोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असून मुंबईत कल्याण मटक्याची क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जया भगतची दररोजची कमाई एक कोटी रुपये असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.
मटका किंग सुरेश भगतच्या हत्येप्रकरणी जया सध्या तुरुंगात आहे. जयाची संपत्ती मुंबईमध्ये तर ठाणे, कल्याण आणि गुजरातच्या वलसाड ठिकाणीसुध्दा आहे. तिचा वरळीला मोठा बंगला आहे तर घाटकोपरला स्वत:चे रो हाऊसेस आहेत. वलसाडला तिचे एक 35 एकरचा फार्म हाऊस आहे. दादर आणि सायन या ठिकाणी स्वत:च्या इमारतीसुध्दा आहेत. या सर्व गोष्टी चौकशीनंतर पोलिसांच्या निदर्शनास आल्या.
जया भगत दर दिवशी १ करोड रुपयांचा धनादेश कमावते. जया भगत म्हणते, मी दरदिवशी मटका धंद्यात होणाऱ्या फायद्यात ४०-५० लाख कमावते' पोलिसांच्या माहितीनुसार जया भगत दरदिवशी कोटींच्या घरात पैसा कमावते. आता मटका धंदा हा बेईमानीचा खेळ आहे व त्यात अनेक माणसे लुबाडली जातात. पूर्वी कल्याण लगतच्या काळात मटका धंदा प्रामाणिकपणे खेळला जायाचा व त्यात तोटा पण होता. सध्या मटका हा असा धंदा आहे की जो फक्त फायदा करुन देतो. तोटयाचे प्रमाण शून्य म्हणण्या इतकं असतं. शिवसेना नगरसेवक जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या मटका किंग पप्पू सावलाची कहाणीही वेगळी नाही. सावलाने १३ एसआरए योजनेत भरभक्कम पैसा गुंतवला आहे आणि डी एन नगर, अंधेरी या ठिकाणी नवीन उभारीत असलेल्या मॉलचा तो पार्टनर असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.
सावला याने गुंतवलेल्या १३ एसआरए योजनेचा तसेच जयाच्या संपत्तीचा तपास पोलीस करीत आहेत. या दोघांकडे असलेला पैसा बेकायदेशीर मटक्यातून कमावलेल्या तर नाही ना ? याची पडताळणी करुन लवकरात लवकर न्यायालय त्यांची मालमत्ता सील करण्यात येणार असल्याचे मुंबई क्राईम ब्रॅंच प्रमुख राकेश मारिया यांनी सांगितले.

मुंबईत भोजपुरी चित्रपट लागलेल्या सिनेमागृहावर मनसेचा हल्लाबोल, कांदिवलीतील डाव हाणून पाडला

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी सोमवारी रात्री दक्षिण मुंबईतील ग्रॅंट रोडवरील सूपर प्लाझा चित्रपटगृहावर हल्लाबोल करून फर्निचर तसेच साहित्याची नासधूस केली. याठिकाणी भोजपुरी चित्रपट सुरू असल्याने मनसेकडून हा हल्ला करण्यात आला. तर मंगलवारी कांदिवली पश्चिम येथील मयूर टाकीज वर मनसे कार्यकर्ते हल्ला करणार असल्याची कूणकूण लागताच पोलिसांनी येथे प्रचंड कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार भोजपुरी चित्रपट लावल्याच्या कारणावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी येथील चित्रपटगृहाच्या ऑफीसमध्ये प्रवेश करून फर्निचर तसेच साहित्याची मोडतोड केली.
गेल्या शनिवारी बोरिवलीत मनसेच्या नवीन कार्यालयाचे उद्‌घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतरची यापरिसरातील ही पहिलीच घटना आहे. उद्‌घाटन समारंभात राज यांनी उत्तर भारतीयांविरूद्ध आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते.
सुपर प्लाजा वरील हल्या नंतर कांदिवली येथील मयूर टाकिज मध्ये शुरू असलेला भोजपुरी चित्रपट मुन्ना बजरंगी बंद पाडन्या साठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी कट रचला होता । याची माहिती पोलिसांना मिळ्ताच कांदिवली पोलिस ठान्याचे व० पो० नि० सुरेन्द्र कुमार जायसवाल यांच्या मार्गदर्शनाखाली येथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे .

प्रभा राव यांना हटवले; हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती

नवी दिल्ली - महाराष्ट्रात मंगळवारी घडलेल्या नाट्यमय घडामोडीत कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा प्रभा राव यांच्याकडून पदभार काढून घेत त्यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे.

ज्येष्ठ निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांचे निधन

पुणे - ज्येष्ठ निरुपणकार नानासाहेब तथा डॉक्‍टर विष्णू धर्माधिकारी (वय ८७) यांचं पुण्यात निधन झाले. कफाचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना सोमवारी पुण्यातल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
मात्र, आधीची बायपास शस्त्रक्रिया आणि आत्ताचा त्रास यामुळे त्यांची प्रकृती उपचारांना साथ देत नव्हती. मंगळवारी सं ध्याकाळी साडेपाचच्या सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली.
नानासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.
त्यांच्यावर उद्या बुधवारी सकाळी शासकीय इतमामात रेवदंड्यालाच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

स्कायवॉकने घातली जाहिरातदारांनाही भुरळ...

मुंबई - पहिल्यावहिल्या वांद्रे स्कायवॉकने मुंबईकरांना चांगलीच भुरळ घातल्यानंतर आता जाहिरातदारही या स्कायवॉकला भुलले आहेत.
ऐन मोक्‍याच्या ठिकाणी असलेल्या स्कायवॉकवर जाहिराती झळकविण्यासाठी अगदी पहिल्या दिवसापासूनच जाहिरातदारांनी प्रचंड उत्सुकता दाखवीत वाटेल तेवढे पैसे मोजण्याचीही तयारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे दाखविली असल्याचे समजते. दरम्यान, स्कायवॉकच्या देखभालीची निविदा ज्या कंपनीला मिळेल, त्याच कंपनीकडे जाहिरातीचे अधिकार दिले जाणार असून, ही निविदा जुलैअखेरीस मंजूर केली जाणार आहे.
पश्‍चिम द्रुतगती महामार्गावर अगदी मोक्‍याच्या ठिकाणावरून स्कायवॉक जातो. त्यामुळे या स्कायवॉकवर जाहिराती लावून अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करणे जाहिरातदारांना सोपे होणार आहे. हे लक्षात घेत, या स्कायवॉकवर जाहिराती लावण्यासाठी स्कायवॉक बांधण्याला आलेला खर्च देण्यासही काही जाहिरातदार कंपन्या तयार असल्याचे समजते. जाहिरातदारांचा हा प्रचंड प्रतिसाद पाहता, "एमएमआरडीए'ने स्कायवॉकवर शक्‍य तिथे जाहिराती लावण्याचा निर्णय घेतला आहे.
देखभाल करणाऱ्या कंपनीला अधिकार : २० जुलै रोजी स्कायवॉकच्या देखभालीसाठी निविदा मागविण्यात येणार असून, जुलैअखेरीस त्यास अंतिम मंजुरी देण्यात येणार आहे. ज्या कंपनीला देखभालीचे कंत्राट मिळणार आहे, त्याच कंपनीकडे जाहिरातीसंदर्भातील सर्व अधिकार देण्यात येणार आहेत. स्कायवॉकवर कुठे, कोणत्या जाहिराती लावायच्या हे सर्व ही कंपनीच ठरवेल. याद्वारे "एमएमआरडीए'ला बऱ्यापैकी महसूल मिळणार असून, यातून स्कायवॉकच्या बांधकामाचा खर्चही लागलीच वसूल होणार आहे.
आता कांजूर मार्ग, विरार-पश्‍चिम आणि मध्य रेल्वेस्थानकाबाहेर ५० ठिकाणी "एमएमआरडीए' स्कायवॉक बांधणार असून, त्यातील २० स्कायवॉकचे बांधकाम महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळ; तर ३० स्कायवॉकचे बांधकाम स्वतः "एमएमआरडीए' करणार आहे. त्यानुसार कांजूर मार्ग आणि विरार-पूर्व, विरार-पश्‍चिम स्कायवॉकसाठी "एमएमआरडीए'ने निविदा मागविल्या असून, येत्या १५ जुलैला त्यास अंतिम रूप देण्यात येणार आहे. त्यानंतर त्वरित बांधकामास सुरुवात करण्यात येणार आहे. कांजूर मार्ग स्कायवॉक २२० मीटर लांबीचा असून, त्यासाठी चार कोटी ९४ लाख रुपये इतका खर्च येणार आहे. स्कायवॉक कम शॉपिंग प्लाझा, असा हा स्कायवॉक असल्याने स्कायवॉकच्या एका बाजूला एकूण ७४ गाळे बांधण्यात येणार आहेत. विरार-पूर्व आणि पश्‍चिमेला असे दोन स्कायवॉक बांधण्यात येणार असून, पूर्व स्कायवॉक ३०३ मीटरचा आहे. त्यास दोन कोटी ८४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. विरार-पश्‍चिमेच्या स्कायवॉकची लांबी ५८९ मीटर असून, त्यासाठी सात कोटी १६ लाख रुपये खर्च येणार आहे.

पाच महिन्यांच्या गर्भवतीवर सामूहिक बलात्कार

मुंबई, - पान खाऊन इमारतीखाली थुंकल्याने एका गर्भवती महिलेला तिच्या पतीसमोर मारहाण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी सहा तरुणांना अटक केली आहे.
ही घटना भांडुप येथे घडली. बलात्कार झालेल्या महिलेवर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी अटकेत असलेल्या तिघा अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
नाहूरच्या सुभाषनगर परिसरात असलेल्या म्हाडा कॉलनीत काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला। येथील १०५ क्रमांकाच्या इमारतीत राहणारी वीस वर्षीय गर्भवती महिला पान खाऊन खिडकीतून थुंकली. थुंकी उडाल्याने संतप्त झालेले सहा तरुण जाब विचारण्यासाठी तिच्या घरात शिरले. तिचा पतीही त्या वेळी घरात होता. तरुण आणि तिचा पती यांच्यात शाब्दिक चकमक होऊन या तरुणांनी पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या या महिलेला तसेच तिच्या पतीला काठ्या तसेच लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. या मारहाणीत तिचा पती बेशुद्ध होऊन पडल्याचे पाहताच दोघा जणांनी या महिलेचे हातपाय धरले; तर अन्य दोघांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मध्यरात्री उशिरा सूरज दीपक भारशंकर (१९), शानू भीमा गौडा (२०), संतोष कचरू पवार (२०) आणि पंधरा वर्षे वयाच्या अन्य तीन मुलांना पोलिसांनी अटक केली. या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी या तरुणांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
आरोप खोटा : रविवार असल्याने ही मुले फुटबॉल खेळून इमारतीखाली उभी होती. आपल्या मुलांची बलात्काराचा आरोप करणारी ही महिला व तिच्या पतीसोबत हाणामारी झाली; मात्र तिने केलेला बलात्काराचा आरोप खोटा असल्याचे एक पालक कचरू पवार यांनी बोलताना सांगितले. यातील काही मुले विक्रोळीच्या संदेश विद्यालय; तर काही कस्तुरी विद्यालयात शिकतात. त्यांना बलात्कारासारख्या गुन्ह्यात अडकविल्यास त्यांचे आयुष्य उद्‌ध्वस्त होईल, असेही येथील इमारत क्रमांक १०४ मध्ये राहणाऱ्या नागरिकांचे म्हणणे आहे. फॉरेन्सिक सायन्स लॅबचा अहवाल आल्यानंतर बलात्काराचे स्पष्टीकरण होईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक पी. जे. जाधव यांनी दिली.

अखेर डाव्यांनी केंद्र सरकारचा पाठिंबा काढला

नवी दिल्ली - भारत आणि अमेरिकेतील संभाव्य अणुकराराला विरोध करणाऱ्या डाव्या पक्षांनी मंगळवारी औपचारिकपणे केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याची घोषणा केली. तशा आशयाचे एक पत्र परराष्ट्र व्यवहार मंत्री प्रणव मुखर्जी यांना पाठविण्यात आले आहे.
मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, फॉरवर्ड ब्लॉक आणि आरएसपी या डाव्या पक्षांच्या नेत्यांची मंगळवारी सकाळी येथे बैठक झाली. त्यामध्ये एकमताने पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश कारत यांनी ही घोषणा केली.
भारत आणि अमेरिकेतील अणुकरारासाठी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाकडे (आयएईए) जाण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयावर डाव्यांनी तीव्र हस्तक्षेप घेतला. सत्ताधारी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार आणि डावे पक्ष यांच्यातील अणुकराराबाबतची चर्चा पूर्ण झाल्याशिवाय सरकारने "आयएईए'कडे जाऊ नये, असे डाव्यांचे मत होते. मात्र, केंद्र सरकारने "आयएईए'च्या संचालक मंडळाबरोबर सुरक्षा नियमांबाबत वाटाघाटी सुरू केल्याने पाठिंबा काढून घेण्यात येत असल्याचे श्री. कारत यांनी स्पष्ट केले.
डाव्या पक्षांचे नेते बुधवारी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची भेट घेणार असून, त्यांच्याकडे पाठिंबा काढून घेतल्याचे पत्र देणार आहेत.

पुणे विद्यापीठाची "एमए'ची परीक्षा सोळाशे गुणांची

पुणे - पुणे विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयातील कला, मानसनीती व समाजविज्ञान शाखेच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना या शैक्षणिक वर्षापासून सत्र पद्धती सुरू करण्यात येणार आहे. नव्या पद्धतीमुळे हा अभ्यासक्रम आता सोळाशे गुणांचा होणार असून, अंतर्गत मूल्यमापनासाठी प्रत्येक सत्रासाठी वीस गुण राहणार आहेत.
नव्या बदलानुसार मराठी, हिंदी, इंग्रजी (सर्व भाषा विषय) इतिहास, भूगोल, ग्रंथालयशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र या सर्व विषयांची दोन्ही वर्षांची परीक्षा सोळाशे गुणांची होणार आहे। यामध्ये प्रत्येक विषयाची सत्र परीक्षा ऐंशी गुणांची होईल; तसेच अंतर्गत मूल्यमापनासाठी प्रत्येक सत्राला वीस गुण देण्यात येणार आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून पदव्युत्तर अभ्यासक्रमाची वार्षिक परीक्षा घेतली जात होती. त्यामध्ये ऐंशी गुणांची वार्षिक परीक्षा व वीस गुणांची अंतर्गत परीक्षा घेतली जात होती. यामध्ये या वर्षी प्रथमच बदल करण्यात येत आहे. या संदर्भात बोलताना विद्यापीठाच्या महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे (बीसीयूडी) संचालक डॉ. पंडित विद्यासागर म्हणाले, ""विद्यापीठातील विभागांमधील सर्व अभ्यासक्रमांना सध्या सत्र पद्धत अस्तित्वात आहे. हीच पद्धती या शैक्षणिक वर्षापासून सर्व महाविद्यालयात लागू करण्यात येईल.''
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील कला, मानसनीती व समाजविज्ञान शाखेच्या विद्यापीठाची मान्यता असणाऱ्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना सत्र पद्धत सुरू करण्याचा विचार गेल्या काही वर्षांपासून सुरू होता. त्याची अंमलबजावणी या वर्षीपासून होत आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रेमीयुगलांचे पाठीराखे पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव - शहरातील नंदिनीबाई विद्यालयासमोर असलेल्या एका कोल्ड्रिंक्‍सच्या दुकानात प्रेमीयुगलांकडून पैसे घेऊन जागा उपलब्ध करून देणाऱ्या दुकानमालकासह नोकरास पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले.
शहरातील सेलिब्रेशन कोल्ड्रिंक्‍स, बेकरी शॉप या दुकानात अश्‍लील चाळे करण्यासाठी प्रेमीयुगलांना जागा उपलब्ध करून दिली जाते, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक अविनाश अंबुरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भास्कर पाटील, नंदू चौधरी व संजय हिवरकर या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन दुकानावर छापा टाकला. येथे आढळून आलेल्या अल्पवयीन प्रेमीयुगलास ताकीद देऊन घरी पाठविण्यात आले. या घटनेमुळे पोलिसांना मिळालेली माहिती खरी असल्याचे दिसून आले.
या दुकानावर प्रेमीयुगलांसाठी एक खोली तयार करण्यात आली असून, त्यांना काही मिनिटांसाठी सुमारे २००, ३०० व ५०० रुपये घेऊन खोली देण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याप्रकरणी दुकान मालक प्रकाश ललवाणी व नोकर गोपाळ श्रावण चौधरी यांना जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. अशा घटना टाळण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांबद्दल सतर्कता बाळगणे आवश्‍यक असल्याचे श्री. अंबुरे यांनी बोलताना सांगितले.

नवऱ्याच्या श्रीमुखात भडकावून "तिने' घेतला घटस्फोट

नाशिक - फारकत घेताना "तिने' न्यायालयातच मंगळसूत्र परत करून चक्क "त्याच्या' श्रीमुखात भडकावले. हा प्रकार पाहून न्यायाधीशांसह सर्वच आवाक्‌ झाले. या प्रकारानंतर "तिला' न्यायालयाच्या अवमानाची नोटीस काढण्यात आली. त्यानंतर या वादावर पडदा पडला. जिल्हा न्यायालयात एका जोडप्याने परस्पर संमतीने फारकत मिळण्यासाठी अर्ज केला होता.
न्यायालयाने दोघांना संमतीविषयी विचारल्यावर दोघांनी होकारही दिला. पण न्यायालयाच्या कक्षात तिने एका डबीत मंगळसूत्र परत केले अन्‌ त्याचबरोबर राग अनावर होऊन "त्याच्या' श्रीमुखात भडकावली.

केंद्र सरकार अल्पमतात

नवी दिल्ली - डाव्या पक्षांनी केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे केंद्रातील कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार अल्पमतात आले आहे.
बहुमतासाठी आवश्‍यक असलेला २७२ चा आकडा कसा गाठायचा, असा प्रश्‍न आता सरकारपुढे उभा राहिला आहे. डाव्या पक्षांनी पाठिंबा काढल्यामुळे सरकारला पाठिंबा देणाऱ्या लोकसभा सदस्यांची संख्या ५९ ने कमी झाली आहे. या स्थितीत बहुमत सिद्ध करण्यासाठी सरकारला ४५ खासदारांचा पाठिंबा मिळवावा लागणार आहे.
समाजवादी पक्षाचे लोकसभेत ३९ सदस्य आहेत. त्यामुळे समाजवादी पक्षाने पाठिंबा जाहीर केला, तरी बहुमतासाठी २७२ चा आकडा गाठणे केंद्र सरकारसाठी अवघड ठरणार आहे. त्यामुळे सरकारला बहुमतासाठी अन्य सहा खासदारांचा पाठिंबा मिळवणे आवश्‍यक आहे.
दिल्लीत सुरू असलेल्या राजकीय सुंदोपसुंदीत बहुजन समाज पक्ष काय भूमिका घेतो, हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. बहुजन समाज पक्षाने विश्‍वासदर्शक ठरावाच्यावेळी तटस्थ भूमिका घेतल्यास केंद्र सरकार वाचण्याची शक्‍यता अधिक आहे.