सोमवार, 7 जुलाई 2008

पुण्यात रेल्वे इंजिनांची समोरासमोर धडक; तीन ठार

पुणे - घोरपडीजवळ दोन रेल्वे इंजिनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण ठार तर दोन जण जखमी झाले.
सोमवारी सकाळी हा अपघात झाला. एक इंजिन पुणे स्थानकातील यार्डातून दौंडच्या दिशेने निघाले होते, तर दुसरे दौंडकडून येत होते. दोन्ही इंजिन एकाच रुळावर आल्याने हा अपघात झाला. जखमींना रेल्वेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रेल्वेचे इंजिन चालक रमेश इजायत, सह-चालक आर. के. गुप्ता आणि गार्ड जी. के. सातपुते अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. हे सर्व जण दौंडहून पुणे स्थानकाकडे निघालेल्या इंजिनमध्ये होते, तर पुणे स्थानकाकडून दौंडकडे निघालेल्या इंजिनचे चालक तापुद्दीन मोमीन आणि सह-चालक अमित प्रेमसिंग हे जखमी झाले आहेत.

जलवाहिनी फुटल्याने दादर परिसर जलमय

मुंबई - पाऊस लांबल्याने १५ टक्के पाणीकपात करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे सोमवारी सकाळी अक्षरशः लाखो लिटर पाणी वाया गेले.
सोमवारी पहाटे चार वाजता दादरमधील खोदादाद सर्कलजवळ मोठी जलवाहिनी फुटल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला, पण जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम सुरू करण्यासाठी पालिकेला सकाळी नऊ वाजले.
पहाटे चार ते सकाळी नऊपर्यंत मोठ्या दाबाने पाणी रस्त्यावर आल्याने खोदादाद सर्कल परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले. जलवाहिनी फुटल्यामुळे माटुंगा, वडाळा, परळ आणि दादर परिसरातील घरांमध्ये सकाळी पाणी आले नाही. यामुळे येथील नागरिकांचे हाल झाले. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. ते झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे पालिकेने कळविले आहे.

मृत हरणाने केली आत्रामांची "शिकार'

मुंबई - चिंकारा हरणाच्या शिकारीप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या परिवहन राज्यमंत्री धर्मराज आत्राम यांना सोमवारी अखेर आपल्या मंत्रिपदावर पाणी सोडावे लागले। मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे त्यांनी राजीनामा सादर केला आहे। त्यांच्यावरील आरोप अजून सिद्ध झाला नसलातरी नैतिक जबाबदारी स्विकारून त्यांनी हा निर्णय घेतला.
चौधरवाडी (ता. बारामती) येथील ग्रामस्थांच्या जागरूकतेमुळे १४ जूनच्या रात्री तीन अलिशान गाड्यांतून आलेल्या व्यक्‍तींनी शिकार केल्याचे स्पष्ट झाले होते. यातील एक मोटार परिवहन राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची असल्याचे नंतर स्पष्ट झाले होते.
आत्राम यांच्यादिशेने संशयाची सई फिरू लागल्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांनी हे प्रकरण लावून धरले. भोर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुरावे गोळा करण्यासाठी पाचगणी येथील आत्राम यांच्या बंगल्याची झडती घेतली.
हरणाची शिकार ज्या ठिकाणी आणून ठेवण्यात आली, तसेच मांस जेथे शिजवण्यात आले, त्या जागेवर वन कर्मचाऱ्यांना अवशेष मिळाल्यानंतर आत्राम यांच्यावरील संशयाला अधिक बळकटी मिळाली.
हे प्रकरण आत्राम यांना चांगलेच भोवणार याची चर्चा होती, ती आज खरी ठरली.

हम भी किसीसे कम नहीं। महापालिकेच्या शाळांची शैक्षणिक भरारी

अलिकडच्या काळात पालकांचा आपल्या मुलांना खासगी शाळेत ऍडमीशन घेण्याचा ट्रेन्ड वाढत चालला आहे। परिस्थिती असो वा नसो मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे असो पालकांचा अट्टाहास असतो. त्यातच इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याकडे मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा ओढा असल्यामुळे मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. खासगी करण्याच्या बाजारात गरीबांची शाळा म्हटल्या जाणाऱ्या महापालिकेच्या शाळा ओस पडत चाललायं अशी ओरड सर्व थरातून करण्यात येत होती. खासगी शाळांच्या तुलनेत महापालिकेच्या शाळा कितीतरी पटीने मागे असून चांगल्या दर्जाचे शिक्षण या शाळा विद्यार्थ्यांना देऊ शकत नाही. त्यामुळे महापालिकेच्या शाळा येत्या काही वर्षात बंद पडणार? असा प्रश्न निर्माण झाला होता.
ही सर्व विधाने विधाने खोटी ठरवत मुंबई महापालिकेच्या शाळांचा यंदा दहावीचा निकाल ७२.२७ टक्के इतका लागला आहे. मुंबई महापालिकेच्या शाळांमधून सर्वप्रथम आलेल्या नमिता वाघमारे या विद्यार्थीनीने ९० टक्के गुण मिळविले आहे। महापालिकेच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या भरमसाठ फी घेणाऱ्या खासगी धास्तावल्य आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर मध्यमवर्गातून आणि झोपडपट्‌ट्यांतून विद्यार्थी येतात. विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी दहा हजाराने वाढली आहे.
समाजाच्या तळागाळातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास तसेच त्यांच्यावर संस्कार करण्याची अवघड जबाबदारी महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांवर असते। अशा प्रतिकूल परिस्थितीत आली आहे त्या साधनांच्या साहाय्याने मार्गक्रमण करत मुंबई महापालिकेच्या "एम वार्ड' मधील देवनार, मराठी शाळा क्र. 11ने आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करून खासगी शाळांच्या भाऊगर्दीत "हम भी किससे कम नही' हे दाखवून दिले आहे. 2008 या शैक्षणिक वर्षांमध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वृषाली डौले या विद्यार्थीनीने 300 पैकी 274 गुण मिळवून मुंबई विभागातून 13 वी तर महापालिकेच्या शाळांमधून 3 री आली आहे. वृषालीने आपल्या यशाचे सर्व श्रेय आपले शिक्षक वाठ, गोरडे, चव्हाण, खरात तसेच आदरणीय मुख्याध्यापक शिवाजी सानप सरांना देते. त्यांच्या बहुमोल मार्गदर्शनामुळे आपल्याला हे यश मिळाल्याचे वृषाली सांगते. शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक गुणवत्ताच सिद्ध केली नाही तर शासकीय एलिमेंटरी परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षा, बालवैज्ञानिक, हस्तकला, चर्चासत्र अशा विविध स्पर्धात्मक परीक्षेत उज्ज्वल यश मिळवून खासगी शाळांच्या स्पर्धेत आपला ठसा उमटवला आहे. शासकीय एलिमेंटरी परीक्षेचा यावर्षीचा या शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे. पालिकेच्या शाळा म्हटले की, गलिच्छ, बकाल, दर्जाहिन शाळा असा समज सर्वसमान्यांचा आहे. परंतु सामान्यांच्या या दृष्टीकोनाला अपवाद ठरणारी पालिकेची "एम वार्ड' मधील देवनारची ही शाळा आहे. त्यामुळे या शाळेची ही इमारत खासगी शाळेची आहे का पालिकेची असा संभ्रम निर्माण होता. माजी उपायुक्त एस.एस. शिंदे यांनी शिक्षण गुणवत्ता विकास वाढण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न आणि त्यांचीच प्रेरणा लक्षात घेऊन मुख्याध्यापक शिवाजी सानप आणि शाळेच्या कर्मचाऱ्यांनी शाळेचा कायापालट करण्यासाठी जीवाचे रान केले आणि गेल्या पाच वर्षांची त्याची तपश्चर्या फळाला आली आहे.
खासगी शाळा म्हणजे चांगले शिक्षण असा गोड गैरसमज समाजाने करून घेतलेला आहे। परंतु चांगल्या शिक्षणासाठी आणि संस्कारासाठी पैसा किंवा श्रीमंत शाळेची गरज नसून चांगल्या गुरुची आवश्यकता आहे. तीच गुरु-शिष्याची अनोखी परंपरा या शाळेने जपली आहे. या शाळेनेे शालेय शिक्षणावरच भर न देता सामाजिक आणि सांस्कृतिक मुल्यांची जपणूक केली आहे. "वृक्षरोपण आणि वृक्षसंवर्धन त्यात शून्य कचरा' असा आगळावेगळा उपक्रम राबवून सामाजिक भान विसरत चाललेल्या समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. खासगी शाळेच्या घोडदौडीत आपले अस्तित्त्व टिकवण्यासाठी देवनार महापालिकेच्या मराठी शाळा क्र.1 ने केलेला हा प्रयत्न नक्कीच सर्व शाळांना प्रेरणा देणारा आहे.
राजेश सावंत

परभणीत छावा संघटनेचा रास्ता रोको : ५ बसेसवर दगडफेक; ५ बसेसच्या काचा फोडल्या

परभणी, दि. ७ : अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या रास्ता रोको आंदोलनाला हिसंक वळण परभणी बस स्थानकावर बसेसवर दगडफेक ५ बसेसच्या काचा फोडण्यात आले असता या घटनेप्रकरणात कोतवाली पोलीस ठाण्यात उशिरा पर्यंत कोणत्याही छावा संघटनेच्या कार्यकर्त्यावर अद्याप पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल नाही. हे आंदोलन शेतकऱ्याचे सर्व कर्ज माफी करावी, शेतकऱ्यांवर लाठीमार करणााऱ्या म्हणणाऱ्या गृहमंत्रीने राजीनामा द्यावा. अशा विविध मागण्यासाठी आज ७ जुलै रोजी शिवाजी पुतळ्याजवळ परभणी येथे छावा मराठा युवा संघटनेने रास्ता रोको करण्यात आले.
या वेळी जिल्हाध्यक्ष श्रीनिवास रेंगे, व्यकंटेश काळे, किरण डोंबे, माणिक किरडे, अर्जुन झुटे, मंगेश घाटगे आदि मान्यवर उपस्थित होते.या आंदोलनात पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्याने उपस्थित होते.

कळंबोली येथील आगीत करोडोचे नुकसान

नवी मुंबई, दि. ७ : कळंबोली येथील स्टील मार्केटला आज सकाळी अचानक आग लागल्यामुळे आगीमध्ये करोडो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने आगीमध्ये कोणतीही जीवीत हानी आली नाही.
कळंबोली स्टील मार्केट येथील गाळा क्रमांक ११५९ ला आज सकाळी सहा वाजता शॉक सार्किटमुळे आग लागली. आग पसरत पसरत बाजुला असणाऱ्या गोडावूनला सुद्धा लागली. आग एवढी भिषण होती की पनवेल,कळंबोली, नवी मुंबई विभागातून अग्निशमन दलाचे सुमारे १६ बंब आग विझविण्यासाठी मागवावे लागले. आग विझविण्यासाठी अग्निशमन कर्मचाऱ्यांना चार तास परिश्रम करावे लागले. या गोडावून मध्ये ३५० टॉवेलचे बंडल, १२०० औषधांचे बॉक्स, ५५० प्लास्टीक पाईपचे गोल बंडल, ६५० रबर बॉक्स, नोसील कंपनीचे ७२० ड्रम होते. या सर्व मालाचा आगीमध्ये जळून भस्मसात झाल्या. सदर गोडावूनला कशी काय आग लागली याचा अधिक तपास कळंबोली पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. गरड करत आहेत.

सरकारी कामात व्यत्यय आणल्याबद्दल मनसे शहर उपाध्यक्षावर गुन्हा दाखल

ठाणे, दि. ७ : सरकारी कामामध्ये घोषणाबाजी करुन व्यत्यय आणल्याबद्दल मनसेचे ठाणे शहरउपाध्यक्ष करुन व्यत्यय आणल्याबद्दल मनसेचे ठाणे शहरउपाध्यक्ष राजेश मोरे आणि त्यांचे ३० ते ६० कार्यकर्ते यांच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा करण्यात आला.
पल्स पोलिओ संदर्भात मोरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर आयुक्तांनी याप्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतरही मोरे यांनी सभागृहात आणि सभागृहाच्याबरोबर घोषणाबाजी करून सरकारी कामात व्यत्यय आणला. परिणामी मोरे आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्याविरुद्ध महापालिकेचे साहाय्यक सुरक्षा अधिकारी भालकर यांनी सरकारी कामात व्यत्यय आणल्याबद्दल नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शैक्षणिक क्षेत्रात इ-गर्व्हनन्स प्रकल्प तातडीने राबवा-मुख्यमंत्री

मुंबई, दि. : राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात इ-गर्व्हनन्स प्रकल्प त्वरीत लागू ककेल्यास विद्यार्थी, पालक, शिक्षण संस्था या सर्वांनाच मोठा लाभ होईल ही बाब लक्षात ठेऊन माहिती तंत्रज्ञान विभागाने त्वरीत निर्णय घ्यावा अशी सूचना मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केली आहे. काल सह्याद्री अतिथीगृहात इ-गर्व्हनन्स इन एज्युकेशन या विषयावरील बैठकीत ते बोलत होते, यावेळी या अनुषंगाने उपलब्ध असलेल्या सुविधा व एमजीआरएम नेट या कंपनीच्या सुविधांबाबत चर्चा करण्यात आली.
माहिती तंत्रज्ञानाच्या शैक्षणिक क्षेत्रातील उपयोगामुळे विद्यार्थी व पालकांना विविध अभ्यासक्रमाची माहिती त्वरीत मिळेल। त्यामुळे त्यांना अभ्यासक्रमाची निवड करणे सुलभ होईल. एखाद्या शैक्षणिक संस्थेसंदर्भात दर्जा, उपलब्ध सुविधा, शिक्षक व विद्यार्थ्यांची माहिती, रोजगाराची संधी, रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांची माहिती ऑनलाईन उपलब्ध राहील. माहिती तंत्रज्ञानामुळे परीक्षा पद्धतीत अमुलाग्र बदल घडून येण्यास मदत होऊ शकेल. परीक्षा प्रणाली कार्यक्षम बनेल, वेळापत्रके, निकाल यासाठी श्रम, पैसा, वेळ वाया जाणार नाही. याशिवाय तज्ज्ञ अध्यापकांची व्याख्याने ग्रंथालये, प्रयोगशाळेतील सुविधा याबाबीचीही माहिती ऑनलाईन उपलब्ध राहील.
महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशनने सुद्धा राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील इ-गर्व्हनन्सचा भार उचलण्याची तयारी दर्शविली आहे। या संस्थेमार्फत ३४ लाख विद्यार्थ्यांची विविध संगणकीय अभ्यासक्रमाची ऑनलाईन परीक्षा घेतली असून त्यांना तात्काळ प्रमाणपत्रे दिली आहेत. १२ वी नंतरच्या शैक्षणिक प्रक्रियेसाठी या महामंडळाचे सॉफ्टवेअर तयार असल्याने प्राथमिक स्तराच्या शिक्षण व्यवस्थेसाठी आपण सॉफ्टवेअर उपलब्ध करून देऊ असे महामंडळातर्फे सांगण्यात आले.
या बैठकीला शिक्षणमंत्री वसंत पुरके, उच्चतंत्र शिक्षण राज्यमंत्री सुरेश शेट्टी, मुख्य सचिव जॉनी जोसेफ, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव स्वाधीन क्षत्रिय, शिक्षण सचिव संजीव कुमार, वैद्यकीय शिक्षण सचिव भूषण गगराणी, मुख्य मंत्र्यांचे सचिव संगीतराव, एमजीआरएग नेट व महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशनचे अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या माजी सैनिकांसाठी म्हाडातर्फे यापुढे सदनिका राखीव ठेवणारमुंबई, दि. ८ : महाराष्ट्रातील माजी सैनिकांनी एकत्र येऊन घराची मागणी केल्यास त्यांच्यासाठी म्हाडातर्फे स्वतंत्र सदनिका बांधून दिल्या जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी माजी सैनिकांच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
महाराष्ट्र राज्य माजी सैनिक संघाचे अध्यक्ष कर्नल ए.के.मोरे यांच्या नेतृत्वाखाली माजी सैनिकांच्या शिष्टमंडळाने सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन संघाच्या विविध मागण्या मांडल्या, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. सध्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळामार्फत बांधण्यात येणाऱ्या एकूण घरांपैकी ५ टक्के घरे माजी सैनिकांसाठी राखीव ठेवली जातात. तथापि यापुढे महाराष्ट्राच्या माजी सैनिकांसाठी सदनिका राखून ठेवण्याच्या या संघटनेच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

साहित्य संमेलन वादावर ठालेंना शिवसेनाप्रमुखांचे "टोले'

मुंबई - यंदाचे ८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमेरिकेत भरवण्याची घोषणा करून वादळाच्या तडाख्यात सापडलेल्या कौतिकराव ठाले-पाटीलांनी आता अमेरिकेबरोबरच रत्नागिरीतही संमेलन भरवण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी "सामना'च्या अग्रलेखातून नेहमीच्या ठाकरी शैलीत समाचार घेत टोले लगावले. अग्रलेखात ठाले-पाटील यांचा साहित्य सम्राट असा उल्लेख केला आहे.
अग्रलेखात ठाकरे म्हणतात, ८२ व्या साहित्य संमेलनाचा शिक्‍का अमेरिकेतल्या कि रत्नागिरीतल्या संमेलनावर बसणार?, तसेच अध्यक्षपदाच्या घोड्यावर कोणालातरी बसवल्यानंतर ते अमेरिकेतल्या कि रत्नागिरीच्या संमेलनाच्या व्यासपीठावरून भाषण ठोकणार? एकाचवेळी दोन्ही संमेलनाला हजेरी लावण्याचा "चमत्कार' कसा होईल?
डाव्यांचा अमेरिका विरोध लक्षात घेवून "उगाच पंगा नको' म्हणून अमेरिकेबरोबर रत्नागिरीतही संमेलन घेण्यास मान्यता दिली, अशी अफवा आहे.
मराठी साहित्य संमेलनाच्या वादात पडू इच्छित नाही। आमच्या उभ्या आयुष्यात आम्ही अशाप्रकारच्या उत्सवास कधी हजेरी लावली नाही. मात्र मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी अस्मितेचा जेवढा जीर्णोद्धार करता येईल तेवढा केला असल्याचे ते म्हणतात.
मराठी भाषेचे वैभव टिकविण्यासाठी मुंबई-महाराष्ट्रातला मराठी माणूस टिकला पाहिजे. त्याला स्वतःच्या पायावर उभे करून उंच भरारी मारण्याचे बळ दिले पाहिजे. मराठी माणूस मनाने व पैशाने श्रीमंत होवू द्या. मग भाषेलाही समृद्धी लाभेल. मराठी साहित्यात जुने ते सोनेच होते. पण नवे काय ते जरा सांगा. दुसरे पु.ल., दुसरे कुसुमाग्रज होणे नाही. पण नवे रसरशीत काही निर्माण होणार की नाही? अशी विचारणा त्यांनी केली आहे.