औरंगाबाद - रेल्वेत नव्याने भरती झालेल्या साडेचार ते पाच हजार उत्तरप्रदेशी आणि बिहारी टीसींना बाहेर हाकलून लावा। ही साफसफाई झाल्यानंतर नवनिर्माण करू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे दिला.
पदवीधर मतदार संघातील पक्षाचे उमेदवार प्रकाश महाजन यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज ठाकरे शुक्रवारी शहरात आले होते। त्यावेळी त्यांची जाहीर सभा झाली ते म्हणाले,"" या उत्तरप्रदेशी आणि बिहारी लोकांनी येथे येऊन आपले हक्क हिरावून घेतले आहेत. त्यामुळे मराठी तरुणांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. मुंबई आपली भुमीपूत्रांची आहे, त्यामुळे तिथे आलेल्या प्रत्येकाने आपल्याबरोबरीने आपल्या भागातील तरुणांना मुंबईत आणले पाहिजे. मराठी माणसाने आधी राष्ट्राचा विचार केला, मग राज्याचा विचार केला, ही आता चुक झाली असे वाटू लागले.''
संपूर्ण राज्यात परप्रांतीय घुसले आहेत. त्यांना आता रोखले पाहिजे. त्याशिवाय आपल्याला आपले हक्क मिळणार नाहीत, असे आवाहन त्यांनी केले. महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानाच्या समोर ही सभा झाली. सभेला संपूर्ण मराठवाड्यातून युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यापूर्वी क्रांतीचौकातून प्रकाश महाजन यांची प्रचारफेरी काढण्यात आली.