बुधवार, 2 जुलाई 2008

ईशान्येत विकास अनुशेष चिंताजनक: पंतप्रधान

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ईशान्येत पायाभूत सुविधांचा अनुशेष चिंताजनक असल्याचे स्पष्ट करून प्रदेशातील राज्यांच्या सर्व राजधान्यांना रेल्वेने जोडण्याची घोषणा केली.
त्यांच्याहस्ते पायाभूत सुविधांच्या प्रस्तावित योजनांच्या भविष्यातील आराखड्याचे अनावरण झाले। ईशान्येत हिंसाचारासोबतच विकास हा प्रमुख मुद्दा असला पाहिजे असे सांगून बंदुकीच्या टोकावर कोणत्याच समस्येची सोडवणूक शक्य नसल्याचे स्पष्ट केले.
विकास हे ईशान्येचे घोषवाक्य असून हिंसेस आपला समाज व संस्कृतीत स्थान नाही। सर्व प्रश्न व समस्यांच्या चर्चेतून सोडवणुकीबाबत त्यांनी विश्वास व्यक्त केला. या क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा अनुशेष सरकारसाठी प्रमुख चिंता आहे.
ईशान्येत विकासाची गंगा वाहण्यासाठी सर्व राज्याच्या राजधानीस रेल्वेसेवेने जोडण्यात येईल। येथे राबवण्यात येणार्या विकास प्रकल्पांना राष्ट्रीय प्रकल्पांचा दर्जा देण्यात आला असून विशेष आर्थिक तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ईशान्येसाठी एकतीस हजार कोटीचा महत्त्वाकांक्षी रस्ते निर्मितीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी अकराव्या पंचवार्षिक योजनेत तरतूद करण्यात आली आहे.

महिलेकडून खंडणी उकळणाऱ्या दोघांना सक्तमजुरी

सातारा - अश्‍लिल छायाचित्रे असल्याचे सांगून बॅंक कर्मचारी महिलेकडून खंडणी उकळल्याप्रकरणी बुधवारी न्यायालयाने दोन युवकांना दोषी धरून चार वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
संदीप उत्तम खरात (वय २६ रा. हमदाबाज) व सचिन जगदेवराव ढाणे (वय २८, पाडळी) अशी आरोपींची नावे आहेत. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. मंथनवार यांनी आरोपींना याप्रकरणात दोषी धरले आहे.
तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक मा. शा. पाटील यांनी या गुन्ह्याचा कौशल्याने तपास करुन संशयितांना अटक केली होती. मे २००५ मध्ये जिल्ह्यात हे प्रकरण गाजले होते.

मुंबईत झवेरी बाजारात बॉम्बची अफवा

मुंबई - दक्षिण मुंबईतील सर्वांत वर्दळीच्या ठिकाणी झवेरी बाजारात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन बुधवारी सकाळी पोलिसांना आल्यानं तर एकच गोंधळ उडाला।
येथील झवेरी बाजारात बॉम्ब पेरून ठेवल्याचा फोन एल.टी. मार्ग पोलिस ठाण्यात आज सकाळी आला. त्यानंतर बॉम्बशोधक पथकासह पोलिस त्याठिकाणी दाखल झाले, व शोधकार्य सुरू केले.
मात्र आक्षेपार्ह काहीही सापडले नाही.

गटारात पडून बालकाचा मृत्यू

नवी मुंबई,दि.2: दोन दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गटाराच्या पाण्याची पातळी वाढली असून त्यामध्ये एक लहान मुलगा वाहून गेल्याची घटना आज तुर्भे येथील इंदिरा नगर विभागात घडली.
गटार बंदीस्त नसल्यामुळे ही घटना घडल्याचे येथील नागरिकांनी सांगितले।तुर्भे एमआयडीसीमधील इंदिरा नगर येथे राहणारा राहूल बाळू कसबे (5) हा खेळता खेळता घरासमोरील गटाराजवळ आला मात्र गटाराच्या पाण्याच्या पातळीत वाढ राहुलच्या लक्षात न आल्याने तो त्या गटारात पडला व वाहत वाहत जवळील झाडामध्ये अडकला. तात्काळ त्याची सुटका न झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना प्रशासनाने केलेल्या अपूऱ्या कामांमुळे झाली असल्यामुळे भविष्यात अशा घटना घडू नये याकरीता प्रशासनाने योग्य ते पाऊल उचलून अपूरी कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी येथील काही नागरिकांनी केली.

एस.एम.कदम यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार

मुंबई, दि. २ : शिवसेना दापोली पालगड विभागाचे विभागप्रमुख व गणपतीपुळे, टांगर या गावचे सुपुत्र एस.एम.कदम यांना ताडदेव जनता केंद्र, मुंबई येथे कामगार नेते व राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष विजय कांबळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व पुरस्कार देवून गौरविण्यात आले. त्याप्रसंगी मुकबधीर क्रिकेट संघाचे अध्यक्ष नामदेव कदम, हृदयरोगतज्ञ डॉ. वाघमारे, कामगार नेते श्याम म्हात्रे, समता ज्ञानदीप मंडळाचे संयोजक सुरज भोईर, अध्यक्ष विठ्ठल घोलप, चित्रपट क्षेत्रातील सन्माननीय व्यक्ती तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती उपस्थित होत्या. महाराष्ट्र राज्याच्या उन्नतीसाठी, सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिंना भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने समता गौरव पुरस्कार देण्यात येतो.
एस.एम. कदम यांनी गेल्या ५० वर्षामध्ये सर्व समाजामध्ये बंधुप्रेम कसे वाढेल व त्याची प्रगती कशी होईल म्हणून सातत्याने प्रयत्न केले आहेत. या पूर्वीदेखील त्यांना जानेवारी २००७ रोजी राष्ट्रीय सन्मानरत्न ऍवार्ड, २३ एप्रिल २००७ राष्ट्रीय सन्मान ऍवार्ड, ११ एप्रिल २००८ महाराष्ट्र रत्न ऍवार्ड मिळाला आहे.
समाजामधील प्रत्येक व्यक्तिंना एस.एम.कदम नियमितपणे मदत करीत आले आहेत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजामध्ये त्यांचे भरभरून कौतुक केले जात आहे.

श्रीरंग विद्यालयातील फी वाढीमुळे पालक संतप्त

ठाणे,दि.3: येथील श्रीरंग विद्यालयातील इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्याची "फी' दुप्पट केल्याने संतप्त झालेल्या पालक-शिक्षक असो.संघाने शाळेला घेराव घातला. याप्रसंगी पालकांनी ही फी वाढ अधिक असून 10 टक्के "ही' वाढ मान्य असल्याचे बोलताना सांगितले.
श्रीरंग विद्यालयाच्या व्यवस्थापनाने 6 महिन्यापूर्वी इंग्रजी माध्यमातील इयात्ता 5 वी ते 10 वी तील विद्यार्थ्यांच्या "फी'मध्ये वाढ केली होती. दरमहा 433 रू असणारी फी सहाशे पन्नास केल्याने पालकांनी यापूर्वी असोसिएशनच्या मदतीने आंदोलने केली.
मात्र आता शाळा सुरू झाल्यानंतरही "फी' वाढ शाळेने चालूच ठेवल्याने घेतात. झालेल्या पालकांनी आज शाळेचे व्यवस्थापकीय सचिव नाईक, सहसचिव मधुकर चव्हाण यांना घेराव घातला. पालकांनी व्यवस्थापकांमुळे एक प्रस्ताव ही सादर केला. आणि ही फी वाढ 10 टक्क्यांनी वाढविण्याची मागणी केली आहे. तर ही वाढ दर 3 वर्षांनी केल्यास पालकांना दरवर्षी किमान 500 ते 550 रुपये द्यावे लागणार असल्याचे असोसिएशन चे म्हणणे आहे. तसेच फी वाढ पालकांच्या आवाक्या बाहेरच आहे. तर ही फी वाढ नाहक असून त्यामुळे विद्यार्थ्यांना इतर मुलभूत सुविधा तसेच इतर उपक्रम राबविता येतील असे म्हणणे शाळेचे सहसचिव मधुकर चव्हाण यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर पालकांनी ही वाढ लवकरातलवकर कमी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

शिर्डी देवस्थानाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी विकास प्राधिकरण स्थापन करणार-मुख्यमंत्री

मुंबई, दि.3 : शिर्डी देवस्थान आणि परिसराचा आणि नियोजनबद्ध विकास होण्यासाठी "शिर्डी विकास प्राधिकरण' स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दिले.
या विकास प्राधिकरण शिर्डी आणि शिर्डी परिसरातील 5 ते 6 गावांचा समावेश राहील. या प्राधिकरणामुळे शिर्डी परिसराचा चांगल्या प्रकारे विकास साधता येईल, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
श्री. साईबाबा संस्थानाच्या प्रलंबित प्रश्न आणि एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात बैठक आयोजित केली होती.
शिर्डीच्या श्री. साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून सर्वधर्माचे भाविक येतात. त्यांना सर्व प्रकारच्या सेवा-सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शिर्डी शहर विकास योजना हाती घेण्यात आली आहे. या विकास योजनांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. शिर्डी शहरातील शिर्डी संस्थानच्या अंदाजे 25 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे मजबुतीकरण आणि सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी त्रिपक्षीय करार करण्यात आलेला आहे. रस्ते विकासाची कामे तीन टप्प्यात केली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात 10 किलोमीटर आणि पुढील टप्प्यात 15 किलोमीटर रस्त्यांची कामे केली जाणार आहे.
शिर्डीत नॉजेल सिटी
शिर्डी येथे नॉलेज सिटी उभारण्यासाठी आपली शिर्डी येथे नॉलेज सिटी उभारण्यासाठी आपली कोट्यावधी किंमतीची जागा साई संस्थानाला देऊ केल्याबद्दल डॉ. प्रेम दर्यानानी यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. नॉलेज सिटी उभारण्यास शासनामार्फत सर्वतोपरी सहाय्य केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

कुख्यात गुंड बंटी पांडेचे "जहरी फुत्कार' वेळीच ठेचले

मुंबई, दि. 3 : मुंबईतील मराठी विरुद्ध उत्तर भारतीय असा वाद तुर्तास जरी शमला असला तरी जातीयवादाचे राजकारण करणारी जात्यांध मंडळी त्यावर अधूनमधून पेट्रोल झिडकून वाद चिघळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
कुख्यात गुंड बंटी पांडे याने उत्तर भारती क्रांती दलाच्या नावाने एक पत्रक काढून "जहरी फुत्कार' टाकण्याचा प्लॅन आखला होता। पण मीरा-भाईंदर पोलिसांनी हा बेत हाणून पाडला आणि पुढील अनर्थ टळला. उत्तर भारती क्रांती दलाने "अगर तुम प्यार से बोलोगे तो जान दे देंगे. तुम हमे थप्पड मारोगे तो हम तुम्हे गोली मारेंगे' अशा शीर्षकाचे भडकावू पत्रक तयार केले होते. संपादक बंटी पांडे यांच्या नावाने काढलेल्या पत्रकात मराठी विरुध्द बिगरमराठी वादाला खतपाणी घालणारे लिखाण केलेले आहे.
"मुंबई में उत्तर भारत से आए हुए सभी उत्तर भारती आणि बिहारी भाईयो आज तक हमने महाराष्ट्र के विकास के लिए अपना गांव छोडकर महाराष्ट्र में अपना कार्यक्षेत्र बनाया है। और महाराष्ट्र हमारा कर्मभूमी है हमारे कुछ लोगों की जन्मभूमी है हम सभी का राज है इस राज को हम कभी नही छोडेंगे'
बंटी पांडेने पुढे अशी मुक्ताफळे उधळली आहेत की, तुम्ही मुंबईतील तबेले हटवले जेणेकरून उत्तर भारतीय पळून जातील जर उत्तर भारतीयांना मुंबईतून पळवून लावायचा प्रयत्न केला तर हाहा:कार उडवू आता आम्ही तुम्हाला माफ केले आहे पण पुन्हा आमच्या वाट्याला जाल तर ज्या हाताने माफ केलेल्याच हातात बंदूक घेऊ। मुंबईतून आम्हाला हाकलणाऱ्यांनो जर हिंमत असेल तर समोर या आणि बंटी पांडेचा सामना करा.
बंटी पांडेच्या कुकर्माची माहिती पोलिसांना समजताच मीरारोड कनकीया पो। ठाण्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत महावरकर आणि पोलीस उपनिरीक्षक मुकूंद महाजन यांनी ममता झेरॉक्स, या झेरॉक्सच्या दुकानावर धाड टाकली.
शांतीनगर कॉम्प्लेक्स येथे असलेले हे दुकान भिमजी राजपूत यांचे आहे. तिथे पोलिसांनी धाड टाकून सदर वादग्रस्त पत्रकाच्या 5 हजार कॉपी ताब्यात घेतल्या. याप्रकरणी शाहबाद हुसैन खॉं. इरफान अब्दुल घोष, हैदर मोहम्मद सय्यद या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रेमभंगामुळे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचा अखेर मृत्यू

मुंबई, दि. 3 : प्रेमभंगापायी स्वत:वरच तब्बल 20 वेळा चाकूने वार तसेच विषप्राशन करून आत्महत्या करणाऱ्या मालाड येथील प्रेमवीराची सोमवारी अखेर जीवनाशी चाललेली झुंज संपली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मालाड (प।) येथे राहणाऱ्या अन्सर अन्वर शेख या 18 वर्षीय तरुणाचे शेजारी राहणाऱ्या मुलीवर प्रेम होते. मात्र, त्या मुलीने अन्सरच्या प्रेमाला नाकारले. त्यामुळे प्रेमभंग सहन न झालेल्या अन्सरने 25 जून 2008 रोजी आपल्या शरीरावर चाकूने तब्बल 20 वेळा वार केले आणि विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
अस्वस्थावस्थेत असलेल्या अन्सरच्या कुटुंबियांनी त्वरित त्याला बोरिवलीच्या भगवती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे दोन दिवस उपचार झाल्यानंतर अंधेरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे अन्सरची मृत्यूशी चाललेली झुंज अखेर सोमवारी संपली. अन्सरच्या मृत्यूचे कारण स्पष्ट समजू शकले नाही. अन्सरच्या वडिलांनी त्याच्या मृत्यूमागे हत्येचा संशय आपल्या पोलीस तक्रारीत व्यक्त केला आहे. मात्र मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अन्सरच्या आत्महत्येचे कारण नैराश्य असल्याचे प्राथमिक तपासात दिसत असल्याचे मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस जयवंत हरगुडे यांनी सांगितले. तर भगवती रुग्णालयाचे डॉ. के. एस. कल्याणकर यांनी अन्सरच्या मृत्यूमागे कोणत्याही व्यक्तीचा हात नसून ती आत्महत्या असल्याचे स्पष्ट केले.

ओबामांनी दिले समलैंगिक विवाहाला समर्थन

कॅलिफोर्नियात समलैंगिक विवाहाला न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर आता डेमोक्रेटीक पक्षाचे राष्ट्रपतिपदाचे दावेदार असणाऱ्या बराक ओबामा यांनीही या विवाहाला पाठिंबा दिला आहे.
अमेरिकेत सध्या हा मुद्दा सर्वत्र चर्चिला जात आहे. कॅलिफोर्नियाच्या विधिमंडळात या निर्णयावर मतदान होणार असून, जर न्यायालयाच्या निर्णया विरोधात मतदान झाले तर न्यायालयाचा तो अपमान ठरण्याची शक्यता आहे, असे असताना ओबामांनी मात्र न्यायालयाच्या निर्णयाला आपले समर्थन दिले आहे.
कॅलिफोर्नियातील समलैंगिक क्लबला ओबामांनी एक पत्र पाठवले असून याला आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.