सोमवार, 30 जून 2008

मुंबईचे प्राचीन धार्मिक महालक्ष्मी मंदिर

मुंबईतील सर्वाधिक प्राचीन धार्मिक स्थळांमध्ये महालक्ष्मी मंदिर एक आहे. समुद्राच्या किनारी बी. ए. देसाई मार्गावर हे मंदिर आहे. ही महालक्ष्मी नवसाला पावणारी असल्याने भाविकांची येथे नेहमीच गर्दी असते.
महालक्ष्मी म्हणजे अर्थातच धनाची देवता. तिची पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि समाधान लाभते, अशी श्रद्धा आहे. या मंदिराच्या मुख्य द्वारावर आकर्षक नक्षी आहे. मंदिराच्या परिसरात देव-देवतांच्या आकर्षक मूर्ती आहेत.
मंदिराचा इतिहास अत्यंत रोचक आहे। इंग्रजांनी महालक्ष्मी भाग वरळी क्षेत्राची योजना आखली होती. त्यासाठी ब्रीच कॅंडी मार्ग बनविण्यात येणार होता. पण समुद्राच्या तुफानी लाटांनी ही योजनाच बासनात गुंडाळली जाते की काय असे वाटत होते. त्यावेळी देवीने एक ठेकेदार रामजी शिवाजीच्या स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला आणि समुद्रातून देवीच्या तीन मूर्ती काढून त्यांची प्रतिष्ठापना करण्याचा आदेश दिला. रामजीने तसेच केले आणि त्यानंतर ब्रीच कॅंडी मार्ग विनासंकट साकारला.
मंदिराच्या गर्भगृहात महालक्ष्मी, महाकाली व महासरस्वती या तीन देवींच्या मूर्ती आहेत. तिन्ही देवतांना सोने व मोत्याच्या आभूषणांनी सुशोभित केले आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण होते, असा भाविकांचा विश्वास आहे.

धोनीच्या विधानाला कुंबळेचाही पाठिंबा

बंगळूर - एकापाठोपाठ एक सामन्यांमुळे खेळाडू थकल्याच्या कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या विधानाला आता भारताचा फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यानेही पाठिंबा दर्शविला आहे।
एका पाठोपाठ एक सामने खेळणे खेळाडूसाठी सोपे नसल्याचे मत कुंबळेने व्यक्‍त केले आहे।
दोनच दिवसापुर्वी धोनीने अशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ ८४ तासांपैकी ३६ तास मैदानावर असल्याचे सा ंगून सामन्यांच्या नियोजनावर नाराजीचा सूर आळवला होता।

रावळपिंडीमध्ये दोन शक्तिशाली स्फोट

इस्लामाबाद - रावळपिंडी शहराच्या कॅंटोन्मेट भागात सोमवारी सकाळी दोन शक्तिशाली स्फोट झाले। या स्फोटांमध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही. स्फोटांची तीव्रता इतकी मोठी होती की त्यांचा आवाज इस्लामाबाद शहरापर्यंत ऐकू आला.
या स्फोटामुळे येथील प्राप्तिकर विभागाच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. स्फोटानंतर घटनास्थळी काही रुग्णवाहिका वेगाने गेल्याचे वृत्त येथील खासगी वाहिन्यांनी दिले आहे.

अमेरिकेतील भारतीयाच्या भूखंडाची पुण्यात परस्पर विक्री

पुणे - अमेरिकेत गेलेल्या नागरिकाच्या मालकीच्या पाच हजार चौरस फूट भूखंडाचे बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करून त्याची विक्री केल्याच्या आरोपावरून दोन कथित इस्टेट एजंटांना येरवडा पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. त्यांनी एका बांधकाम व्यावसायिकाची सुमारे ४५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे.
या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक तरुणकुमार मिलापचंद दुमावत (वय ४५, रा। आदिनाथ सोसायटी, सातारा रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दीपक हिरालाल गोपलानी (वय ४१, रा. मल्हार सोसायटी, कात्रज-कोंढवा रस्ता) व शरद प्राणनाथ डोडी (वय ५०, रा. बसेरा अपार्टमेंट, एनआयबीएम रस्ता, कोंढवा) यांना फसवणुकीच्या आरोपाखाली अटक झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुमावत यांची कल्याणीनगरजवळ बांधकाम "साइट' सुरू आहे। गोपलानी व डोडी यांनी गेल्या वर्षी जानेवारीमध्ये दुमावत यांच्याशी संपर्क साधला. त्यांचे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ पाच हजार चौरस फुटांचा भूखंड विक्रीसाठी आहे, असे त्याने त्यांना सांगितले. त्यामुळे दुमावत यांनी भूखंड विकत घेण्याची तयारी दाखविली. त्यांनी त्यांना भूखंडाच्या विक्रीचे कुलमुखत्यारपत्र दिले. एक कोटी रुपये भूखंडाची किंमत ठरली होती. दुमावत यांनी वेळोवेळी त्यांना धनादेशांद्वारे ४५ लाख रुपये दिले. त्याचे "सेल डीड' तयार करावे, अशी मागणी त्यांनी केली; परंतु मूळ मालक नंतर येईल, असे सांगून ते टाळाटाळ करीत. नंतर त्यांनी दुमावत यांच्याशी संपर्क टाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना शंका आली. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती.
प्रत्यक्षात तो भूखंड प्रभाकर बिंदुमाधव कुलकर्णी यांच्या मालकीचा आहे. ते अमेरिकेत होते. गोपलानी व डोडी यांनी प्रभाकर बंडोपंत कुलकर्णी यांच्या नावाने कुलमुखत्यारपत्र तयार केले होते. ही घटना समजताच कुलकर्णी अमेरिकेहून पुण्यात आले व त्यांनीही पोलिसांशी संपर्क साधला. फौजदार मोहन ननावरे पुढील तपास करीत आहेत.

कोल्हापुरात खंडणीसाठी मारहाण करणाऱ्या पाच तरुणांना अटक

कोल्हापूर - मटका व्यवसायातून हॉटेलच्या खोलीत डांबून मारहाण करून खंडणी मागणाऱ्या पाच तरुणांना रविवारी सायंकाळी शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. त्यांचा एक साथीदार पळून गेला. रविवारी दुपारपासून सायंकाळपर्यंत सहा जणांकडून हा प्रकार सुरू होता. सायंकाळी फिर्यादीने पार्वती मल्टिप्लेक्‍सजवळील शक्ती बीअरबारमधून स्वतःची सुटका करून या बाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी पाच जणांना अटक केली. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली.
जमीर ऊर्फ पांडू युनूस गुहागरकर, प्रमोद उर्फ शक्तिमान राजाराम पाटील, अरुण वसंत दमे, सुजित जयसिंग अबदागिरी, संदीप दिनकर सुतार (सर्व जण २५-३५ वयोगटातील, रा. शाहूपुरी पाचवी गल्ली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। त्यांचा साथीदार गजानन सुतार पळून गेला आहे. या बाबतची फिर्याद प्रवीण वसंत पाटील (रा. शाहूपुरी पाचवी गल्ली) यांनी शाहूपुरी पोलिसांत दिली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी ः फिर्यादी प्रवीण आणि प्रमोद पाटील यांचा चार वर्षांपूर्वी मटका व्यवसाय होता। व्यवसाय बंद केला तेव्हा प्रवीणकडे प्रमोदचे पन्नास हजार रुपये देणे बाकी होते. त्याची मागणी प्रमोद वारंवार करीत होता. त्याच्या त्रासामुळे प्रवीण काही दिवस बाहेरगावी होता. तो सापडत नसल्याचा राग प्रमोदने आज त्याच्यावर काढला. प्रवीण आज दुपारी शाहूपुरीतील गवत मंडईजवळून जात असताना प्रमोदने त्याला आपल्या सहकाऱ्यांसह जाऊन पळवून नेले.
पराग हॉटेलच्या खोली क्रमांक ६ मध्ये त्याला डांबून मारहाण करून पन्नास हजारांची मागणी केली. दुपारपासून सायंकाळपर्यंत प्रवीणला त्यांनी थांबून थांबून मारहाण केली. त्यानंतर प्रवीणसह सर्व जण पार्वती मल्टिप्लेक्‍सजवळील शक्ती बीअरबारमध्ये गेले. तेथे सर्व जण मद्यप्राशन करीत असल्याचे पाहूण प्रवीणने तेथून पळ काढला. तो थेट शाहूपुरी पोलिस ठाण्यात गेला. त्याने पोलिसांना हकीकत सांगितली. पोलिसांनी तातडीने शक्ती बीअरबारमध्ये जाऊन सर्वांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी बारमध्ये पाच जणांना पकडले; मात्र यावेळी सहावा साथीदार गजानन सुतार पळून गेला. त्याचा शोध पोलिस रात्री उशिरापर्यंत घेत होते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभारावर विद्यार्थी संतप्त

पुणे - फौजदार भरतीची २००५ ची प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेली नाही. २००६ ची फौजदार परीक्षेची प्रक्रियाही अपूर्णावस्थेत असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या परीक्षेची नवीन प्रक्रिया सुरू केली आहे.
त्यासाठी जाहिरात देण्यात आली आहे. त्यामुळे फौजदार परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला आहे. एका भरतीची प्रक्रिया पूर्ण न करताच दुसरी प्रक्रिया सुरू करणे, हाच आयोगाचा कारभार आहे का, अशी टीका विद्यार्थ्यांकडून होत आहे.
एप्रिल २००५ मध्ये सुरू झालेल्या पोलिस उपनिरीक्षक (फौजदार), विक्रीकर निरीक्षक व मंत्रालय सहायक या पदांसाठीची भरती प्रक्रिया तब्बल ३ वर्षे ३ महिने उलटून गेले तरी पूर्ण झालेली नाही। सप्टेंबर २००७ मधील याच पदांसाठीची आणखी एक प्रक्रिया अर्धवट अवस्थेत आहे. आयोगाच्या या कूर्मगती कारभाराबद्दल उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर सहा महिने रखडलेली पदे आयोगातर्फे भरण्यात आली व २००५ च्या परीक्षेतील उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सध्या या परीक्षेतील उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणे बाकी आहे. या परीक्षेचा निकाल २५ जूनपर्यंत लावणार असल्याचे आयोगाने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले होते; पण निकाल अद्याप लागलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची अस्वस्थता वाढली आहे.
गेल्या चार वर्षांत आयोगाने या परीक्षेची कोणतीच प्रक्रिया पूर्ण न केल्याने विद्यार्थ्यांना अन्य पर्यायांवरही पाणी सोडावे लागत आहे। गेल्या तीन वर्षांतील जाहिरातीनुसार, फौजदारपदाची सोळाशे पदे भरणे अपेक्षित असताना आतापर्यंत एकही पद भरलेले नाही.
अशाच पद्धतीने ही भरती प्रक्रिया पुढे सरकत राहिल्यास निवड झालेले फौजदार नाशिकच्या पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेऊन पदावर रुजू होण्यास आणखी दोन वर्षे लागतील, अशी भीती विद्यार्थी व्यक्त करत आहेत। याबाबत आयोगाशी संपर्क साधल्यावर त्यांनी, "सर्व भरती प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात येणार असून २००५ च्या फौजदार, विक्रीकर निरीक्षक व सहायक या परीक्षेचा अंतिम निकाल ३० जूनपर्यंत लागेल,' असे उत्तर दिले. गेल्या सहा महिन्यांपासून आयोगाने आपली कार्यक्षमता दुप्पट केली असून सध्या चालू असलेल्या सर्व भरती प्रक्रिया भविष्यात अल्पावधीत पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे आयोगाचे जनसंपर्क अधिकारी गिरीश महाजन यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या चार वर्षांत कोणतीही भरती प्रक्रिया पूर्ण न केलेल्या आयोगाचे काम आता केवळ जाहिरात देणे व परीक्षा घेणे एवढेच आहे का, असा प्रश्‍न विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येत आहे.

मोबाईल रेंजवरून लागला प्रेमीयुगुलाचा शोध

हिंगोली - मोबाईल जवळ असल्यावर रेंज असल्यास कोणशीही कुठेही कधीही संपर्क साधता येणे शक्‍य झाले आहे। त्यामुळे मोबाईलमुळे संवाद साधण्याची चांगली सोय झाली असली, तरी याच मोबाईलमुळे हिंगोलीतून फरारी झालेले प्रेमीयुगुल अडचणीत सापडून पोलिसांच्या तावडीत सापडले.
हिंगोली शहरातून सुमारे पंधरा दिवसांपूर्वी एक प्रेमीयुगुल फरारी झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी शोध घेऊनदेखील ते सापडले नसल्याने हे प्रकरण पोलिसांत पोचले. शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी अर्ज सादर झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरवात केली होती.
पोलिस निरीक्षक गोविंद पौळ, जमादार प्रकाश अवचार, बाबू जाधव, विठ्ठल सूर्यवंशी, अरुण इंगळे, प्रकाश रेवले, फुलाजी सावळे, खंडेराव नरोटे, विलास राठोड, श्री। पोले यांच्या पथकाने त्या दोघांचा शोध सुरू केला होता. त्यांच्या नातेवाइकांकडे चौकशी केल्यानंतरही ते सापडले नाहीत.
दरम्यान, पोलिसांनी त्यांच्याकडे असलेल्या मोबाईलच्या रेंजवरून त्यांचा शोध सुरू केला. सुरवातीला त्यांच्याजवळील मोबाईलची रेंज जळगाव भागात असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांचे एक पथक जळगावकडे गेले होते. त्यानंतर त्यांच्या मोबाईलची रेंज जिंतूरजवळ असल्याचे स्पष्ट झाले. दोघेही जिंतूरजवळ असल्याचे स्पष्ट होताच शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने त्यांना आज जिंतूर भागातून ताब्यात घेऊन हिंगोली येथे आणले. दरम्यान, याप्रकरणी कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिस विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

३.७ मिलिमीटर पावसाची नोंद

गेल्या दोन दिवसांपासून शहरातील पावसाच्या सरींचे प्रमाण वाढले आहे। आज संध्याकाळनंतर पावसाचा जोर आणखी वाढून, रात्री साडेआठपर्यंत ३.७ मिलिमीटर पावसाची नोंद पुणे वेधशाळेमध्ये झाली. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती.
पश्‍चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव वाढल्यामुळे किनारपट्टी आणि लगतच्या भागांत पावसाचे प्रमाण वाढले असून, पुण्यासह मध्य महाराष्ट्रात होणारा पाऊस हे पावसाच्या प्रगतीसाठी चांगले चिन्ह असल्याचे, हवामानशास्त्र विभागाचे उपसंचालक, डॉ. ए. बी. मुजुमदार यांनी सांगितले.

पाणीकपात नाही !

पाणीकपात नाही ! पुण्यात पाणीकपात करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला नसून येत्या पंधरा जुलैपर्यंत पुरेलइतका साठा आहे। त्यामुळे तोपर्यंत पाणीकपात करण्याची वेळ येणार नाही, असे पाटबंधारे खात्याने स्पष्ट केले आहे.
त्यानंतरही वेळ आलीच, तर महापालिका आणि सर्वांशी चर्चा करूनच पुढील विचार करण्यात येईल, असे खात्याकडून सांगण्यात आले. पंधरा जुलैपर्यंतचा साठा असल्यामुळे पाटबंधारे विभागाचे नियोजन चुकलेले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

येत्या पाच दिवसांत पाऊस पुन्हा एकदा बरसणार

पुणे - अनेक दिवसांच्या दडीनंतर गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाच्या सरींमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.येत्या पाच दिवसांत मध्य महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
पावसाच्या विश्रांतीमुळे रखडलेल्या पेरण्या, शेतीच्या; तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई यामुळे शेतकरी; तसेच ग्रामीण भागातील नागरिक चिंतेत आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याशिवाय मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा नसल्याचे हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे आणि असे अनुकूल वातावरण तयार होत नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे। मात्र, येत्या पाच दिवसांत पावसाच्या सरींचे प्रमाण वाढून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
हवामानशास्त्र विभागाच्या जिल्हानिहाय अंदाजांमध्ये पुणे जिल्ह्यात ३० जून ते ३ जुलैदरम्यान १५ ते १८ मिलिमीटर पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे, तर विभागनिहाय अंदाजांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे। शहरात गेल्या चोवीस तासांत ८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, येत्या चोवीस तासांतही पावसाचे हेच प्रमाण राहण्याचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्रातील पावसाच्या दडीमुळे शहरातील जून महिन्याचा पाऊस यंदा सरासरीपेक्षा ३० टक्के कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे। २८ जूनपर्यंत शिवाजीनगर येथे मोजला गेलेला ७८ मिलिमीटर पाऊस सरासरीपेक्षा २६ मिलिमीटरने कमी असल्याचे वेधशाळेने सांगितले आहे. कुलाबा वेधशाळेच्या नोंदींप्रमाणे एक ते १८ जूनपर्यंत पुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा ४६ टक्के अधिक पाऊस झाला; मात्र त्यापुढील आठवड्यात जिल्ह्यातील पावसाचे हे प्रमाण अचानक कमी होऊन २५ जूनपर्यंत सरासरीपेक्षा चारच टक्के अधिक झाले. या महिन्यात जिल्ह्याच्या पश्‍चिम भागामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस नोंदला गेला, तर पूर्व भागातील पावसाचे प्रमाण अगदीच नगण्य असल्याचे दिसून आले.
गेले अनेक दिवस दडी मारणाऱ्या पावसाने धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा हजेरी लावली आहे. अद्याप धरणांच्या साठ्यात वाढ झालेली नसली, तरी पाऊस सुरू झाल्याने दिलासा मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात काल २५ मिलिमीटर आणि आज २५ मिलिमीटर इतका पाऊस झाल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय घोगरे यांनी दिली.