शनिवार, 26 जुलाई 2008

अहमदाबादमध्ये बाँबस्फोट मालिका, गुजरात हादरलं

अहमदाबाद, २६ जुलै-व्यावसायिकांचं शहर म्हणून ओळखल्या जाणा-या अहमदाबादमध्ये आज १७ बाँबस्फोट झाल्याचं समजतं. त्या सर्व स्फोटांना प्रशासनाने दुजोरा दिलेला नाही. कमी तीव्रतेचे हे स्फोट असून त्यात १५ जण मृत्युमुखी पडले असून ३० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.
संध्याकाळी सातच्या सुमारास मणिनगरमध्ये पहिला स्फोट झाला आणि त्यापाठोपाठ सरदार पटेल डायमंड मार्केट, सरनपूर ब्रिज आणि इशानपूर, बापूनगर आणि रायपूर इथे आठ-दहा मिनिटांत एकापाठोपाठ एक स्फोट झाले. ही सर्व ठिकाणी नेहमीच गजबजलेली असतात.
एक बाँब सायकलवर ठेवला होता आणि दुसरा बाँब टिफिनमध्ये लपवण्यात आला होता, असं प्राथमिक वृत्त आहे. एक स्फोट बसमध्ये झाल्याचं समजतं. स्फोटाचं वृत्त कळताच, पोलिस आणि प्रशासन लगेचच घटनास्थळी पोहोचलं असून जखमींना हॉस्पिटलमध्ये हलवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालं आहे.
संपूर्ण गुजरातमध्ये हाय alart जाहीर करण्यात आला असून दिल्ली, मुंबई आणि संवेदनशील शहरांमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला असून नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे. तर दुसरीकडे, या स्फोटानंतर काँग्रेस विरुद्ध भाजप असं राजकारण रंगू लागलं आहे. चूक कुणाची?, केंद्राची की राज्याची यावरून आता आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.
कर्नाटकपाठोपाठ गुजरात लक्ष्य झाल्यानं भाजपशासित राज्यच टार्गेट का ?, असाही प्रश्न चर्चिला जात आहे. १५ ऑगस्टदरम्यान कमी तीव्रतेचे स्फोट करून देशवासियांमध्ये घबराट पसरवण्याचा हा दहशतवादी यंत्रणेचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय.

मुंबईतील रेल्वे जमिनींचा पैसा महाराष्ट्रालाच

मुंबई, २६ जुलै-रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्याकडून महाराष्ट्रासाठी तब्बल ३६०० कोटी मिळवण्यात मुख्यमंत्री विलासराव देशमुख शुक्रवारी यशस्वी झाले.
मुंबईतील रेल्वेच्या जमिनींचा एफएसआय दोनऐवजी चार करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने पूवीर्च घेतला होता. या निर्णयामुळे एफएसआयच्या विक्रीतून अंदाजे ३६०० कोटी रुपये मिळतील. त्यातील दोन तृतीयांश रक्कम मुंबईच्या विकासासाठी तर उर्वरित देशातील योजनांसाठी देण्याचे रेल्वेने तत्वत: मान्य केले होते. परंतु, महाराष्ट्रात एफएसआयमध्ये वाढ केल्यास सुमारे तीन लाख रुपये चौ. मीटर दराने सरकारतफेर् प्रीमियम आकारला जातो. रेल्वेला तो आकारण्यात आला नसल्याने एफएसआयमधून उभी राहणारी सर्व रक्कम जवळपास ३६०० कोटी राज्याच्या विकासासाठी वापरण्यास अनुमती मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. लालूंनीही त्याला अनुमती दिली.

अंदमानच्या समुद्रात भूकंपाचे धक्के

नवी दिल्ली, जुलै - अंदमानच्या समुद्रात शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास ५.२ मॅग्निट्यूडच्या भूकंपाची नोंद झाल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.
अंदमानच्या समुद्रात पूर्वेकडे ११.७ डिग्री रेखांश आणि ९१.८ अक्षांश अंतरावर हा भूकंप जाणवला. तथापि या मुळे कुठल्याही प्रकारच्या वित्त अथवा जीवित हानी झालेली नसल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

"समाजात अशांतता पसरवण्यासाठीच बॉम्बस्फोट'

नवी दिल्ली, २६ जुलै - समाजातील दोन गटांमध्ये कटूता निर्माण करण्याच्या हेतूनेच स्फोट घडवून आणण्यात आले आहेत. नागरिकांनी या परिस्थितीत शांत राहावे, असे आवाहन पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी केले.
नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. स्फोट घडवून आणणाऱ्यांचा कसून तपास करण्यात येत आहे. स्फोटांच्या पार्श्‍वभूमीवर, संपूर्ण देशातील सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे.

विमान दुर्घटना टळली, शरद पवार बचावले

मुंबई, २६ जुलै-केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि त्यांच्यासह अनेक प्रवाशांना दिल्लीहून मुंबईला घेऊन येणा-या जेट एअरलाइन्सच्या विमानाचा अपघात शुक्रवारी सायंकाळी थोडक्यात होता होता टळला आणि शरद पवारांसह सर्वजण सुदैवाने बचावले. विमानाचा एक दरवाजा लॉक झाला नसल्याची बाब वेळीच लक्षात आल्याने या विमानाचे दिल्ली विमानतळावर इर्मजन्सी लँडिंग करावे लागले.
दिल्लीहून मुंबईला येणा-या जेटच्या बोईंग ७३७ विमानाने (९ डब्ल्यू ३६२) काल सायंकाळी सव्वा पाच वाजता दिल्ली विमानतळावरुन हवेत उड्डाण केले। विमान ६५०० फूट हवेत असतानाच, विमानाचा मागचा दरवाजा व्यवस्थित लॉक झालेला नसल्याची बाब केबीन क्रूच्या लक्षात आली. त्याने ती बाब वैमानिकाच्या लक्षात आणली. वैमानिकाने दिल्ली विमानतळाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. नियंत्रण कक्षाने त्यांना काही इंधन हवेत जाळण्याचे निर्देश दिले. तेव्हा विमानाने हवेतच गोल गोल फे-या मारल्या आणि तासाभराच्या उड्डाणानंतर पुन्हा विमानाचे दिल्ली विमानतळावर इर्मजन्सी लँडींग करण्यात आले. या विमानात केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह अनेक प्रवासी होते. हे विमान दुर्घटनाग्रस्त होता होता थोडक्यात वाचले आणि सर्व प्रवाशांचा जीव वाचला.
विमानाच्या इर्मजन्सी लँडिंगच्या वेळी काही प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या। या सर्वांवर दिल्ली विमानतळावरच किरकोळ उपचार करण्यात आले. त्यानंतर दुस-या विमानाने सर्व प्रवाशांना दिल्लीहून मुंबईला रवाना करण्यात आले.
दरम्यान, केबीन क्रूच्या हलगर्जीपणामुळेच हा प्रकार घडल्याने, तडकाफडकी दोघांना निलंबित करण्यात आले आहे. विमानाचे सर्व दरवाजे व्यवस्थित लॉक झाले नसतील, तर वैमानिकांच्या कॉकपीटमध्ये लाल दिवा पेटतो. परंतु हे बटनच स्वीच ऑफ होते. त्यामुळे विमानाने हवेत उड्डाण घेईपर्यंत ही गंभीर बाब वैमानिक वा केबिन क्रूच्या निदर्शनास आली नाही. विमान ६५०० फूट हवेत उडाल्यानंतरच हा हलगर्जीपणा लक्षात आला. तेव्हा तत्काळ इर्मजन्सी लँडिंगचा निर्णय घेण्यात आला.

बाबा गुरमितसिंगविरुद्ध बलात्काराचा खटला भरण्याचे आदेश

नवी दिल्ली, २६ जुलै - डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहिम गुरमितसिंग यांच्याविरुद्ध बलात्काराचा खटला दाखल करण्याचे आदेश केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने शनिवारी दिले.
बाबा गुरमितसिंग यांनी "डेरा' समुदायाला मानणाऱ्या महिलांचा शारिरीक छळ केल्याने त्यांच्याविरुद्ध बलात्काराचा खटला दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. "डेरा' समुदायातील एका शिष्येवर बलात्कार केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. या प्रकरणी "सीबीआय' तपास करीत आहे.