शुक्रवार, 11 जुलाई 2008

मुलीचे हत्या करून अकरा तुकडे करणाऱ्या आई-वडिलांना जन्मठेप

मुंबई - हिंदु मुलाशी विवाह केला म्हणून स्वतःच्या मुलीचा गळा दाबून खून केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे अकरा तुकडे करणाऱ्या आई-वडिलांना सत्र न्यायालयाने आज जन्मठेपेची सजा सुनावली. आरोपींना आणखी पाच अल्पवयीन मुले असल्यामुळे त्यांचे फाशीचे जन्मठेपेच्या शिक्षेवर निभावले.
अतिरिक्त सत्र न्या. ओ. एस. जयस्वाल यांनी आज सकाळी आरोपी मोहम्मद मुन्ना सरकार खान (३८) व शहनाझ मुन्ना खान (३५) यांना भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ व २०७ नुसार हत्या व पुरावे नष्ट करणे या आरोपांसाठी जन्मठेप व सात वर्षे कारावासाची सजा सुनावली. दोन्ही शिक्षा आरोपींना एकाच वेळी भोगायच्या आहेत. तसेच प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंडही न्यायालयाने सुनावला. मागील तीन दिवस या निकालाचे काम सुरू होते. यावेळी आरोपींच्या चेहऱ्यावर पश्‍चातापाच लवलेशही नव्हता. आरोपींची मयत मुलगी मेहनाझ (१८) हिची सासू रुक्‍मिणी जाधव यावेळी न्यायालयात हजर होती.
अभियोग पक्षाच्या वतीने आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र आरोपींना आणखी पाच लहान मुले आहेत. त्यामुळे अभियोग पक्षाची मागणी न्यायालयाने मान्य केली नाही. हत्या केल्यानंतर त्यांनी मृतदेहाचे तुकडे केले. त्यामुळे हा गुन्हा अपवादात्मक नव्हता असेही मत न्यायालयाने व्यक्त केले. खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही तपास यशस्वीपणे केल्याबद्दल पोलिसांचे न्यायालयाने कौतुक केले.
दरम्यान, या गुन्ह्याचा यशस्वीपणे तपास करणारे कफपरेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण हिंदुराव पाटील यांनी, आरोपींना फाशीची शिक्षेच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात अपील करण्यात येईल, असे निकालानंतर सांगितले. पोलिसांकडे तपासाचे आव्हान होते पण आम्ही शिताफीने तपास केला, असेही ते म्हणाले.
न्यायालयाच्या निकालाबाबत आम्ही समाधानी आहोत, असे मूर्तझाची सासू रुक्‍मिणी जाधव यांनी सांगितले. आरोपींना कडक शिक्षा व्हायलाच हवी कारण आई-वडिल असूनही त्यांनी ज्याप्रमाणे आपल्या मुलीची हत्या केली ती शहारे आणणारी आहे. या निकालामुळे अन्य आई- वडिलांनाही योग्य ती शिकवण मिळेल, असे जाधव म्हणाल्या. मूर्तझा आम्हाला पसंत होती. ती घरीही वारंवार यायची आणि सगळ्यांशी हसून-खेळून वागायची. मुलाने व तिने लग्न केल्यावर तिच्या वडिलांनी पुन्हा रितसर लग्न लावण्याची तयारी दाखविली आणि आम्ही त्यांच्यावर विश्‍वास ठेवला. पण नंतर मूर्तझा आम्हाला दिसली नाही, असे त्यांनी रडत रडत सांगितले.

आता लवकरच महागाईचेही वाजणार बारा

सरकार महागाई रोखण्याचे प्रयत्न करत असल्याचा दावा करत असले , तरी महागाईचा आलेख चढतच आहे . शुक्रवारी जाहीर झालेला चलनवाढीचा दर ११ . ८९ टक्के झाला असून लवकरच तो १२ च्या घरात पोहचण्याची चिन्हे दिसताहेत .
गेल्या आठवड्यात ११ . ६३ टक्के असणारा हा दर ० . २६ टक्क्यांनी वाढून या आठवड्यात ११ . ८९ झाला . हा दर सातत्याने वाढत असून गेल्या चार आठवड्यात तो तब्बल ११ टक्क्यांनी वाढला आहे . गेल्या वर्षी या आठवड्यात हाच दर फक्त ४ . ४२ टक्के एवढा होता .
महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार आणि रिझर्व बॅंक वेगवेगळे आर्थिक उपाय कर आहेत । पण जागतिक महागाईमुळे देशातंर्गत महागाईचा दर आटोक्यात येत नसून बाजारातील दरवाढीने सामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे .
अन्नधान्य , फळं , डाळी , भाज्या अशा जीवनावश्यक वस्तुंच्या दराबरोबर निर्मिती क्षेत्रातल्या उत्पादनांच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत . तसेच इंधनाच्या किमतीही सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत .
तज्ज्ञांच्या मते , या वाढत्या दराचा दबाव रिझर्व बँकेवर आला असून बँक या महिन्याच्या २९ तारिखला क्रेडिट पॉलिसी रिव्यू करणार आहे . तसेच या समस्येवर उपाय म्हणून बँकेला शॉर्ट टर्म दरामध्ये वाढ अपरिहार्यपणे करावी लागणार आहे .
सरकारने महागाई रोखण्यासाठी आयात दरात कपात आणि निर्यातीवर निर्बंध घालण्यात आले आहेत . तर येते काही आठवडे डबल डिजिट महागाई वाढत जाणार असल्याचा इशाराही सरकारने दिला आहे .

संशोधनाची करणी नि चंदावर पाणी

'चंदावर पाणी असू शकते' असा निष्कर्ष अमेरिकेतल्या 'ब्राउन युनिव्हसिर्टी'च्या प्रयोगशाळेत बसून प्रोफेसर अल्बेतोर् साल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने काढला आहे; तोही, १९६९च्या चांदमोहिमेनेच जमवलेल्या माहितीचे नव्या प्रकारे विलेषण करून!
आजवर किमान ४० निरनिराळ्या प्रयोगशाळांनी पाणी नसल्याचे निष्कर्षच काढले असताना हा वेगळा निष्कर्ष निघाला, याची दखल 'नेचर' या नियतकालिकानेही घेतली आहे. चांदमोहिमेतील दोघा अंतराळवीरांनी चंदावरून तेथील 'व्होल्कॅनिक ग्लास' देखील आणली होती. ज्वालामुखीचा लाव्हारस थंड होत असताना त्यात अन्य खनिजे आणि वायू जाऊन जो अर्धपारदर्शक दगड तयार होतो; तो म्हणजे ही 'व्होल्कॅनिक ग्लास'. या पदार्थाचे नव्याने विश्लेषण अल्बेतोर् यांच्या पथकाने केले आणि 'चंदाच्या पृष्ठभागाच्या खाली पाण्याचे प्रमाण दर १० लाख भागांमागे २६० ते ७०० भाग (पीपीएम : पार्ट पर मिलियन) असावे' असा निष्कर्ष काढला.
म्हणजेच, चंदावर कथित 'पाणी' असण्याची शक्यता ०.०२६ टक्के ते ०.०७० टक्के एवढीच आहे. त्यामुळे यापुढे चंदावर संशोधनपथके गेल्यास त्यांना थेट पाणी सापडण्याची शक्यता अगदी कमीच आहे.

परप्रांतीयप्रेमी अधिका-यांना राज ठाकरे यांचे प्रेमपत्र

यूपी-बिहारमधून येणा-या परप्रांतियांना वास्तव्याचा दाखला, रेशन कार्ड देताना वा मतदारयाद्यांमध्ये नाव घालताना सरकारी अधिका-यांनी कायद्याचे काटेकोर पालन करावे. महिनाभरात अंमलबजावणी झाली तर ठीक, नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आवश्यक ती खबरदारी घेईल, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. मनसेच्या शुक्रवारच्या राज्यव्यापी मेळाव्यात राज ठाकरे यांनी सरकारी अधिका-यांना उद्देशून लिहिलेली ही पत्रे कार्यकर्त्यांना देण्यात आली. आता ती सरकारी खात्यांमध्ये वाटली जाणार आहेत.
रवींद नाट्यमंदिरात सकाळी दहाला राज्यातील प्रमुख पदाधिकारी- कार्यर्कत्यांचा मेळावा झाला. यात राज ठाकरे यांनी कार्यर्कत्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी सरकारी खात्यांमध्ये वाटण्यासाठी ही पत्रे कार्यर्कत्यांना वाटली.
बाहेरच्या राज्यात येणा-या कोणालाही येथे आल्यानंतर काही वर्षे राहावे लागते. त्यानंतर त्यांना वास्तवाचा दाखला, रेशन कार्ड वा टॅक्सीचा परवाना मिळतो. त्यासाठी नियम, कायदे आहेत. मात्र, बरेच अधिकारी चिरीमिरीसाठी नियम धाब्यावर बसवून बेधडक रेशनकार्ड वा इतर प्रमाणपत्रे देतात. यातूनच पुढे बेकायदा झोपड्या उभ्या राहतात, असे या राज यांनी पत्रात म्हटले आहे.
परप्रांतातून आलेल्या अनेकांना इथले रस्तेही माहीत नसतात। मात्र, एकेका परवान्यावर ही मंडळी २० ते ५० टॅक्सी चालवतात. बरेच अधिकारी बेकायदा नोकरभरती करतात. काही अधिकाऱ्यांच्या हलगजीर्ने हे शक्य होते. औद्योगिक वसाहतीमध्ये यूपी-बिहारचे कंत्राटदार आणि कामगार कायद्याचा मुलाहिजा न बाळगता घुसतात. बहुतेक उद्योगपती परप्रांती असल्याने मराठी कंत्राटदार आणि कामगार परवडत नाहीत, अशी ओरड करतात. हे सर्व कठोरपणे मोडून काढायला हवे. एक महिन्याने मी पुन्हा संवाद साधेन. तोपर्यंत हालचाल दिसली नाही, तर मग मनसेने महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था व सुसंस्कृतता राखण्याच्या घटनात्मक कामाला सुरूवात केल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचेलच, असेही या पत्रात म्हटले आहे.
असेही पोहोचा राज ठाकरेंपर्यंत!
यूपी-बिहारच्या लॉबीने तुमच्यावर दबाव आणल्यास आपण माझ्याशी ९९८७९ ९९४४४/९९८७९ ९९५५५ या मोबाइलवर संपर्क साधावा. आपल्या माहिती वा नावाची गुप्तता राखली जाईल, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.

"वंदे मातरम्‌'ची घोषणा हा सरपोतदारांचा गुन्हा काय - ठाकरे

पुणे - मुंबईतील १९९२ च्या दंगलीच्या खटल्यात शिवसेनेचे माजी खासदार मधुकर सरपोतदार यांना झालेल्या शिक्षेबद्दल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी "सामना'च्या अग्रलेखातून टीका केली आहे.
न्यायालयाच्या निर्णयाचा आपल्याला पूर्ण आदर असल्याचे सांगून, श्री. सरपोतदार यांनी "वंदे मातरम्‌'ची घोषणा दिल्या म्हणजे गुन्हा केला काय, असे त्यांनी म्हटले आहे.
वंदे मातरम्‌ची घोषणा दिली, म्हणून कोणाला शिक्षा होत असेल, तर देशाचा भविष्यकाळ कठीण आहे, असे त्यांनी अग्रलेखात म्हटले आहे. श्री. सरपोतदार सच्चे शिवसैनिक असून, याआधीही ते शिक्षेच्या अग्निदिव्यातून गेले आहेत. आता न्यायालयाने ठोठावलेली शिक्षाही ते भोगतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

उंदरांच्या स्वैर संचारामुळे मुंबईचे महापौर, आयुक्तही हैराण

मुंबई - सर्वसामान्य मुंबईकरच नव्हे; तर मुंबईच्या महापौर आणि पालिका आयुक्तदेखील उंदरांमुळे हैराण झाले आहेत।त्यांच्या कार्यालयांतील महत्त्वाच्या कागदपत्रांना उंदरांमुळे धोका पोहोचू नये म्हणून प्रशासनावर त्यांच्या दालनात पिंजरे लावण्याची वेळ आली आहे.
पावसाळ्यात मुंबईत उंदरांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढतो. रस्त्यांवरील हातगाड्यांवर शिजविले जाणारे अन्न आणि कचरापेट्यांतील कचरा रस्त्यावर वाहून येत असल्याने उंदरांना आयतेच अन्न मिळते. या अन्नामुळे पावसाच्या दिवसांत उंदीर आणि घुशी चांगल्याच धष्टपुष्ट होतात. या दिवसात ठिकठिकाणी तुंबणाऱ्या पाण्यात उंदरांचे मलमूत्र मिसळते. त्यामुळे "लेप्टोस्पायरोसिस'चा धोका अधिक असतो.
यंदाच्या पावसात "लेप्टो'ने गेल्या दीड महिन्यात १४ रुग्णांचे बळी घेतले आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. "लेप्टो'चा वाढता धोका लक्षात घेऊन पालिकेने उंदीर पकडण्यासाठी तातडीने १० हजार पिंजरे खरेदीचा प्रस्ताव नुकताच स्थायी समितीत आणला होता. मात्र एक पिंजरा ६५२ रुपये किंमतीचा असल्याचे ऐकून समिती सदस्यांचे डोळेच पांढरे झाले. या पिंजरे खरेदीत मोठा भ्रष्टाचार असल्याचा संशय सदस्यांनी व्यक्त केल्याने खरेदीचा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला. उंदरांचा वाढता उपद्रव पाहता पिंजऱ्यांची खरेदी लवकरात लवकर होणे गरजेचे असतानाच उंदरांच्या उपद्रवामुळे दस्तुरखुद्द प्रशासन आणि लोकप्रतिनिधीही हैराण झाले आहे. महापौर डॉ. शुभा राऊळ, उपमहापौर विनोद घेडिया, पालिका आयुक्त डॉ. जयराज फाटक, अतिरिक्त आयुक्त, सहायक आयुक्त, मुख्य जनसंपर्क अधिकारी यांच्यासह महत्त्वाच्या ८ ते१० कार्यालयांत असे पिंजरे लावण्यात आले असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

डॉ. तलवार यांच्याविरुद्ध पुरावे नाहीत - सीबीआय

नवी दिल्ली, ११ जुलाई- आरुषी हत्याकांड प्रकरणाला कलाटणी देणारी माहिती केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शुक्रवारी जाहीर केली. आरुषीचे वडील डॉ. तलवार यांच्याविरुद्ध कोणतेही पुरावे सापडले नसल्याची माहिती "सीबीआय'चे सह-संचालक अरुण कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या संबंधीची माहिती गाझियाबाद न्यायालयाला कळविण्यात आली असून, डॉ. तलवार यांच्या जामिनाच्या अर्जावर कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
आरुषीच्या हत्येच्या आरोपावरून नोएडाच्या पोलिसांनी डॉ. तलवार यांना अटक केली होती. डॉ. तलवार यांना अटक केली, तेव्हा पोलिसांकडे त्यांच्याविरुद्ध कोणतेही पुरावे नव्हते, असेही अरुण कुमार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे.