नवी दिल्ली - डाव्यांनी केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे लोकसभेचे सभापती सोमनाथ चटर्जी हे देखील आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
लोकसभा सचिवालयाने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून श्री. चटर्जी राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट होते. ""लोकसभेचे कामकाज चालविताना सभापती हे कोणत्याही पक्षाचे प्रतिनिधित्व करीत नसतात. सभापतीपदी निवड झाल्यापासून श्री. चटर्जी यांनी सर्व प्रकारच्या राजकारणापासून स्वतःला दूर ठेवले आहे.'" अशा आशयाचे एक निवेदन मंगळवारी लोकसभा सचिवालयाने प्रसिद्ध केले.
श्री. चटर्जी सभापतीपदाचा राजीनामा देणार, अशा आशयाचे वृत्त काही माध्यमांमधून गेले दोन-तीन दिवस देण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर हे निवेदन देण्यात आले आहे. सभापती सारख्या महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीला विनाकारण वादविवादात ओढू नये, असेही आवाहनही यात करण्यात आले आहे.