बुधवार, 17 सितंबर 2008

जागतिक वित्तीय संकटापासून भारत पूर्णत: सुरक्षित राहू शकत नाही: अनिल अंबानी

मुंबई, १७ सप्टेम्बर- जागतिक अर्थव्यवस्थेशी भारतीय अर्थव्यवस्था जोडली गेलेली असल्यामुळे जागतिक वित्तीय संकटापासून भारत पूर्णत: सुरक्षित राहू शकत नाही, असा इशारा 'रिलायन्स कॅपिटल'चे अध्यक्ष व 'एडीएजी' समूहाचे प्रमुख अनिल अंबानी यांनी मंगळवारी दिला. 'लेहमन ब्रदर्स'चे निघालेले दिवाळे, आथिर्क संकटातून सुटण्यासाठी 'मेरिल लिंच'ने केलेली स्वत:ची विक्री या घटनांच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
कंपनीच्या वाषिर्क सर्वसाधारण सभेत बोलताना अंबानी म्हणाले : भारतातील शेअर बाजार आणि परकीय चलन बाजारांवर जागतिक, अमेरिकेतील घडामोडींचे परिणाम आताच दिसू लागले आहेत। मात्र त्यांची तीव्रता कमी प्रमाणात असेल. याचे कारण आहे आपल्या धोरणर्कत्यांनी, सरकारांनी स्वीकारलेले सावध, टप्प्याटप्प्यांनी आथिर्क सुधारणा अमलात आणण्याचे नेमस्त धोरण!
अमेरिकेच्या कर्जपेठेतील पेचप्रसंगाने वित्तीय बाजारातील बड्या कंपन्यांचा बळी घेतला आहे. वाढती देशांतर्गत भाववाढीची चढती कमान, खूपच दोलायमान बनलेले शेअर बाजार यांमुळे ग्राहकांचा खर्च करण्याची क्षमता घटली असून सर्वच क्षेत्रांत विश्वास डळमळीत होऊ लागला आहे. पण सुदैवाने देशांतर्गत मागणी आणि गुंतवणुकीच्या बळावर आपण जागतिक मंदीच्या झंझावातापासून सहीसलामत राहू, असे अंबानी पुढे म्हणाले. (वृत्तसंस्था)

मराठा आरक्षणाचा सहानुभूतिपूर्वक विचार: देशमुख

मुंबई, १७ सप्टेंबर- राज्यातील मराठा जातीला आरक्षण देण्याची मागणी जोर धरत असतानाच राज्य सरकार याचा सहानुभूतिपूर्वक विचार करत असल्याची माहिती मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दिली.
याविषयावर अधिक मंथन करण्याची गरज नसून, लवकरच याविषयीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याविषयाची माहिती राज्य सरकार जमवत असून, इतर कोणत्याही जातीवर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.