सोमवार, 30 जून 2008

मुंबईचे प्राचीन धार्मिक महालक्ष्मी मंदिर

मुंबईतील सर्वाधिक प्राचीन धार्मिक स्थळांमध्ये महालक्ष्मी मंदिर एक आहे. समुद्राच्या किनारी बी. ए. देसाई मार्गावर हे मंदिर आहे. ही महालक्ष्मी नवसाला पावणारी असल्याने भाविकांची येथे नेहमीच गर्दी असते.
महालक्ष्मी म्हणजे अर्थातच धनाची देवता. तिची पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि समाधान लाभते, अशी श्रद्धा आहे. या मंदिराच्या मुख्य द्वारावर आकर्षक नक्षी आहे. मंदिराच्या परिसरात देव-देवतांच्या आकर्षक मूर्ती आहेत.
मंदिराचा इतिहास अत्यंत रोचक आहे। इंग्रजांनी महालक्ष्मी भाग वरळी क्षेत्राची योजना आखली होती. त्यासाठी ब्रीच कॅंडी मार्ग बनविण्यात येणार होता. पण समुद्राच्या तुफानी लाटांनी ही योजनाच बासनात गुंडाळली जाते की काय असे वाटत होते. त्यावेळी देवीने एक ठेकेदार रामजी शिवाजीच्या स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला आणि समुद्रातून देवीच्या तीन मूर्ती काढून त्यांची प्रतिष्ठापना करण्याचा आदेश दिला. रामजीने तसेच केले आणि त्यानंतर ब्रीच कॅंडी मार्ग विनासंकट साकारला.
मंदिराच्या गर्भगृहात महालक्ष्मी, महाकाली व महासरस्वती या तीन देवींच्या मूर्ती आहेत. तिन्ही देवतांना सोने व मोत्याच्या आभूषणांनी सुशोभित केले आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण होते, असा भाविकांचा विश्वास आहे.

धोनीच्या विधानाला कुंबळेचाही पाठिंबा

बंगळूर - एकापाठोपाठ एक सामन्यांमुळे खेळाडू थकल्याच्या कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या विधानाला आता भारताचा फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यानेही पाठिंबा दर्शविला आहे।
एका पाठोपाठ एक सामने खेळणे खेळाडूसाठी सोपे नसल्याचे मत कुंबळेने व्यक्‍त केले आहे।
दोनच दिवसापुर्वी धोनीने अशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ ८४ तासांपैकी ३६ तास मैदानावर असल्याचे सा ंगून सामन्यांच्या नियोजनावर नाराजीचा सूर आळवला होता।

रावळपिंडीमध्ये दोन शक्तिशाली स्फोट

इस्लामाबाद - रावळपिंडी शहराच्या कॅंटोन्मेट भागात सोमवारी सकाळी दोन शक्तिशाली स्फोट झाले। या स्फोटांमध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही. स्फोटांची तीव्रता इतकी मोठी होती की त्यांचा आवाज इस्लामाबाद शहरापर्यंत ऐकू आला.
या स्फोटामुळे येथील प्राप्तिकर विभागाच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. स्फोटानंतर घटनास्थळी काही रुग्णवाहिका वेगाने गेल्याचे वृत्त येथील खासगी वाहिन्यांनी दिले आहे.

अमेरिकेतील भारतीयाच्या भूखंडाची पुण्यात परस्पर विक्री

पुणे - अमेरिकेत गेलेल्या नागरिकाच्या मालकीच्या पाच हजार चौरस फूट भूखंडाचे बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करून त्याची विक्री केल्याच्या आरोपावरून दोन कथित इस्टेट एजंटांना येरवडा पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. त्यांनी एका बांधकाम व्यावसायिकाची सुमारे ४५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे.
या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक तरुणकुमार मिलापचंद दुमावत (वय ४५, रा। आदिनाथ सोसायटी, सातारा रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दीपक हिरालाल गोपलानी (वय ४१, रा. मल्हार सोसायटी, कात्रज-कोंढवा रस्ता) व शरद प्राणनाथ डोडी (वय ५०, रा. बसेरा अपार्टमेंट, एनआयबीएम रस्ता, कोंढवा) यांना फसवणुकीच्या आरोपाखाली अटक झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुमावत यांची कल्याणीनगरजवळ बांधकाम "साइट' सुरू आहे। गोपलानी व डोडी यांनी गेल्या वर्षी जानेवारीमध्ये दुमावत यांच्याशी संपर्क साधला. त्यांचे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ पाच हजार चौरस फुटांचा भूखंड विक्रीसाठी आहे, असे त्याने त्यांना सांगितले. त्यामुळे दुमावत यांनी भूखंड विकत घेण्याची तयारी दाखविली. त्यांनी त्यांना भूखंडाच्या विक्रीचे कुलमुखत्यारपत्र दिले. एक कोटी रुपये भूखंडाची किंमत ठरली होती. दुमावत यांनी वेळोवेळी त्यांना धनादेशांद्वारे ४५ लाख रुपये दिले. त्याचे "सेल डीड' तयार करावे, अशी मागणी त्यांनी केली; परंतु मूळ मालक नंतर येईल, असे सांगून ते टाळाटाळ करीत. नंतर त्यांनी दुमावत यांच्याशी संपर्क टाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना शंका आली. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती.
प्रत्यक्षात तो भूखंड प्रभाकर बिंदुमाधव कुलकर्णी यांच्या मालकीचा आहे. ते अमेरिकेत होते. गोपलानी व डोडी यांनी प्रभाकर बंडोपंत कुलकर्णी यांच्या नावाने कुलमुखत्यारपत्र तयार केले होते. ही घटना समजताच कुलकर्णी अमेरिकेहून पुण्यात आले व त्यांनीही पोलिसांशी संपर्क साधला. फौजदार मोहन ननावरे पुढील तपास करीत आहेत.

कोल्हापुरात खंडणीसाठी मारहाण करणाऱ्या पाच तरुणांना अटक

कोल्हापूर - मटका व्यवसायातून हॉटेलच्या खोलीत डांबून मारहाण करून खंडणी मागणाऱ्या पाच तरुणांना रविवारी सायंकाळी शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. त्यांचा एक साथीदार पळून गेला. रविवारी दुपारपासून सायंकाळपर्यंत सहा जणांकडून हा प्रकार सुरू होता. सायंकाळी फिर्यादीने पार्वती मल्टिप्लेक्‍सजवळील शक्ती बीअरबारमधून स्वतःची सुटका करून या बाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी पाच जणांना अटक केली. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली.
जमीर ऊर्फ पांडू युनूस गुहागरकर, प्रमोद उर्फ शक्तिमान राजाराम पाटील, अरुण वसंत दमे, सुजित जयसिंग अबदागिरी, संदीप दिनकर सुतार (सर्व जण २५-३५ वयोगटातील, रा. शाहूपुरी पाचवी गल्ली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। त्यांचा साथीदार गजानन सुतार पळून गेला आहे. या बाबतची फिर्याद प्रवीण वसंत पाटील (रा. शाहूपुरी पाचवी गल्ली) यांनी शाहूपुरी पोलिसांत दिली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी ः फिर्यादी प्रवीण आणि प्रमोद पाटील यांचा चार वर्षांपूर्वी मटका व्यवसाय होता। व्यवसाय बंद केला तेव्हा प्रवीणकडे प्रमोदचे पन्नास हजार रुपये देणे बाकी होते. त्याची मागणी प्रमोद वारंवार करीत होता. त्याच्या त्रासामुळे प्रवीण काही दिवस बाहेरगावी होता. तो सापडत नसल्याचा राग प्रमोदने आज त्याच्यावर काढला. प्रवीण आज दुपारी शाहूपुरीतील गवत मंडईजवळून जात असताना प्रमोदने त्याला आपल्या सहकाऱ्यांसह जाऊन पळवून नेले.
पराग हॉटेलच्या खोली क्रमांक ६ मध्ये त्याला डांबून मारहाण करून पन्नास हजारांची मागणी केली. दुपारपासून सायंकाळपर्यंत प्रवीणला त्यांनी थांबून थांबून मारहाण केली. त्यानंतर प्रवीणसह सर्व जण पार्वती मल्टिप्लेक्‍सजवळील शक्ती बीअरबारमध्ये गेले. तेथे सर्व जण मद्यप्राशन करीत असल्याचे पाहूण प्रवीणने तेथून पळ काढला. तो थेट शाहूपुरी पोलिस ठाण्यात गेला. त्याने पोलिसांना हकीकत सांगितली. पोलिसांनी तातडीने शक्ती बीअरबारमध्ये जाऊन सर्वांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी बारमध्ये पाच जणांना पकडले; मात्र यावेळी सहावा साथीदार गजानन सुतार पळून गेला. त्याचा शोध पोलिस रात्री उशिरापर्यंत घेत होते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभारावर विद्यार्थी संतप्त

पुणे - फौजदार भरतीची २००५ ची प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेली नाही. २००६ ची फौजदार परीक्षेची प्रक्रियाही अपूर्णावस्थेत असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या परीक्षेची नवीन प्रक्रिया सुरू केली आहे.
त्यासाठी जाहिरात देण्यात आली आहे. त्यामुळे फौजदार परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला आहे. एका भरतीची प्रक्रिया पूर्ण न करताच दुसरी प्रक्रिया सुरू करणे, हाच आयोगाचा कारभार आहे का, अशी टीका विद्यार्थ्यांकडून होत आहे.
एप्रिल २००५ मध्ये सुरू झालेल्या पोलिस उपनिरीक्षक (फौजदार), विक्रीकर निरीक्षक व मंत्रालय सहायक या पदांसाठीची भरती प्रक्रिया तब्बल ३ वर्षे ३ महिने उलटून गेले तरी पूर्ण झालेली नाही। सप्टेंबर २००७ मधील याच पदांसाठीची आणखी एक प्रक्रिया अर्धवट अवस्थेत आहे. आयोगाच्या या कूर्मगती कारभाराबद्दल उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर सहा महिने रखडलेली पदे आयोगातर्फे भरण्यात आली व २००५ च्या परीक्षेतील उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सध्या या परीक्षेतील उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणे बाकी आहे. या परीक्षेचा निकाल २५ जूनपर्यंत लावणार असल्याचे आयोगाने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले होते; पण निकाल अद्याप लागलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची अस्वस्थता वाढली आहे.
गेल्या चार वर्षांत आयोगाने या परीक्षेची कोणतीच प्रक्रिया पूर्ण न केल्याने विद्यार्थ्यांना अन्य पर्यायांवरही पाणी सोडावे लागत आहे। गेल्या तीन वर्षांतील जाहिरातीनुसार, फौजदारपदाची सोळाशे पदे भरणे अपेक्षित असताना आतापर्यंत एकही पद भरलेले नाही.
अशाच पद्धतीने ही भरती प्रक्रिया पुढे सरकत राहिल्यास निवड झालेले फौजदार नाशिकच्या पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेऊन पदावर रुजू होण्यास आणखी दोन वर्षे लागतील, अशी भीती विद्यार्थी व्यक्त करत आहेत। याबाबत आयोगाशी संपर्क साधल्यावर त्यांनी, "सर्व भरती प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात येणार असून २००५ च्या फौजदार, विक्रीकर निरीक्षक व सहायक या परीक्षेचा अंतिम निकाल ३० जूनपर्यंत लागेल,' असे उत्तर दिले. गेल्या सहा महिन्यांपासून आयोगाने आपली कार्यक्षमता दुप्पट केली असून सध्या चालू असलेल्या सर्व भरती प्रक्रिया भविष्यात अल्पावधीत पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे आयोगाचे जनसंपर्क अधिकारी गिरीश महाजन यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या चार वर्षांत कोणतीही भरती प्रक्रिया पूर्ण न केलेल्या आयोगाचे काम आता केवळ जाहिरात देणे व परीक्षा घेणे एवढेच आहे का, असा प्रश्‍न विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येत आहे.

मोबाईल रेंजवरून लागला प्रेमीयुगुलाचा शोध

हिंगोली - मोबाईल जवळ असल्यावर रेंज असल्यास कोणशीही कुठेही कधीही संपर्क साधता येणे शक्‍य झाले आहे। त्यामुळे मोबाईलमुळे संवाद साधण्याची चांगली सोय झाली असली, तरी याच मोबाईलमुळे हिंगोलीतून फरारी झालेले प्रेमीयुगुल अडचणीत सापडून पोलिसांच्या तावडीत सापडले.
हिंगोली शहरातून सुमारे पंधरा दिवसांपूर्वी एक प्रेमीयुगुल फरारी झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी शोध घेऊनदेखील ते सापडले नसल्याने हे प्रकरण पोलिसांत पोचले. शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी अर्ज सादर झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरवात केली होती.
पोलिस निरीक्षक गोविंद पौळ, जमादार प्रकाश अवचार, बाबू जाधव, विठ्ठल सूर्यवंशी, अरुण इंगळे, प्रकाश रेवले, फुलाजी सावळे, खंडेराव नरोटे, विलास राठोड, श्री। पोले यांच्या पथकाने त्या दोघांचा शोध सुरू केला होता. त्यांच्या नातेवाइकांकडे चौकशी केल्यानंतरही ते सापडले नाहीत.
दरम्यान, पोलिसांनी त्यांच्याकडे असलेल्या मोबाईलच्या रेंजवरून त्यांचा शोध सुरू केला. सुरवातीला त्यांच्याजवळील मोबाईलची रेंज जळगाव भागात असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांचे एक पथक जळगावकडे गेले होते. त्यानंतर त्यांच्या मोबाईलची रेंज जिंतूरजवळ असल्याचे स्पष्ट झाले. दोघेही जिंतूरजवळ असल्याचे स्पष्ट होताच शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने त्यांना आज जिंतूर भागातून ताब्यात घेऊन हिंगोली येथे आणले. दरम्यान, याप्रकरणी कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिस विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

३.७ मिलिमीटर पावसाची नोंद

गेल्या दोन दिवसांपासून शहरातील पावसाच्या सरींचे प्रमाण वाढले आहे। आज संध्याकाळनंतर पावसाचा जोर आणखी वाढून, रात्री साडेआठपर्यंत ३.७ मिलिमीटर पावसाची नोंद पुणे वेधशाळेमध्ये झाली. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती.
पश्‍चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव वाढल्यामुळे किनारपट्टी आणि लगतच्या भागांत पावसाचे प्रमाण वाढले असून, पुण्यासह मध्य महाराष्ट्रात होणारा पाऊस हे पावसाच्या प्रगतीसाठी चांगले चिन्ह असल्याचे, हवामानशास्त्र विभागाचे उपसंचालक, डॉ. ए. बी. मुजुमदार यांनी सांगितले.

पाणीकपात नाही !

पाणीकपात नाही ! पुण्यात पाणीकपात करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला नसून येत्या पंधरा जुलैपर्यंत पुरेलइतका साठा आहे। त्यामुळे तोपर्यंत पाणीकपात करण्याची वेळ येणार नाही, असे पाटबंधारे खात्याने स्पष्ट केले आहे.
त्यानंतरही वेळ आलीच, तर महापालिका आणि सर्वांशी चर्चा करूनच पुढील विचार करण्यात येईल, असे खात्याकडून सांगण्यात आले. पंधरा जुलैपर्यंतचा साठा असल्यामुळे पाटबंधारे विभागाचे नियोजन चुकलेले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

येत्या पाच दिवसांत पाऊस पुन्हा एकदा बरसणार

पुणे - अनेक दिवसांच्या दडीनंतर गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाच्या सरींमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.येत्या पाच दिवसांत मध्य महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
पावसाच्या विश्रांतीमुळे रखडलेल्या पेरण्या, शेतीच्या; तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई यामुळे शेतकरी; तसेच ग्रामीण भागातील नागरिक चिंतेत आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याशिवाय मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा नसल्याचे हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे आणि असे अनुकूल वातावरण तयार होत नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे। मात्र, येत्या पाच दिवसांत पावसाच्या सरींचे प्रमाण वाढून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
हवामानशास्त्र विभागाच्या जिल्हानिहाय अंदाजांमध्ये पुणे जिल्ह्यात ३० जून ते ३ जुलैदरम्यान १५ ते १८ मिलिमीटर पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे, तर विभागनिहाय अंदाजांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे। शहरात गेल्या चोवीस तासांत ८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, येत्या चोवीस तासांतही पावसाचे हेच प्रमाण राहण्याचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्रातील पावसाच्या दडीमुळे शहरातील जून महिन्याचा पाऊस यंदा सरासरीपेक्षा ३० टक्के कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे। २८ जूनपर्यंत शिवाजीनगर येथे मोजला गेलेला ७८ मिलिमीटर पाऊस सरासरीपेक्षा २६ मिलिमीटरने कमी असल्याचे वेधशाळेने सांगितले आहे. कुलाबा वेधशाळेच्या नोंदींप्रमाणे एक ते १८ जूनपर्यंत पुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा ४६ टक्के अधिक पाऊस झाला; मात्र त्यापुढील आठवड्यात जिल्ह्यातील पावसाचे हे प्रमाण अचानक कमी होऊन २५ जूनपर्यंत सरासरीपेक्षा चारच टक्के अधिक झाले. या महिन्यात जिल्ह्याच्या पश्‍चिम भागामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस नोंदला गेला, तर पूर्व भागातील पावसाचे प्रमाण अगदीच नगण्य असल्याचे दिसून आले.
गेले अनेक दिवस दडी मारणाऱ्या पावसाने धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा हजेरी लावली आहे. अद्याप धरणांच्या साठ्यात वाढ झालेली नसली, तरी पाऊस सुरू झाल्याने दिलासा मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात काल २५ मिलिमीटर आणि आज २५ मिलिमीटर इतका पाऊस झाल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय घोगरे यांनी दिली.

रविवार, 29 जून 2008

याहूची नवीन स्थानिक सेवा सुरू

याहूने स्थानिक माहिती देणारी नवीन सेवा काल लॉन्च केली। या सेवे अंतर्गत स्थानिक शॉपिंग सेंटर, रेस्टॉरंट, शाळा, बँक, हेल्थ क्लब आदींची माहिती आता घरबसल्या केवळ एका क्लिकवर मिळणार आहे.
बेंगलूरू,मुंबई, चेन्नई आदी प्रमुख शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली असल्याची माहिती याहू इंडियाचे प्रमुख गोपाल कृष्ण यांनी दिली।
या सेवेच्या माध्यमातून ग्राहकांना आपल्या भागातील विविध संस्था तसेच हॉटेल्सची माहितीही सहज उपलब्ध होणार असल्याचे ते म्हणाले.

मानेकशांच्या सन्मानार्थ ध्वज उतरविण्याचा विसर

देशातील पहिले फील्ड मार्शल सॅम मानेकशा यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी महत्त्वाचे राजकीय नेते अनुपस्थित राहिल्याबद़दल सेनादलाने नाराजी व्यक्त केली आहे। मात्र आपल्या महान सैनिकाच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ सेनादलाला आपला ध्वज खाली घेण्याचा विसर पडल्याची माहिती समोर आली आहे.
सेनादलाला आपला ध्वज खाली घेण्याची आठवण नौसेनेच्या अधिका-यांनी करून दिली. सेनादलाच्या नियमानुसार फील्ड मार्शल असलेल्या व्यक्तीस निवृत्तीनंतरही निवृत्त समजले जात नाही. शुक्रवारी पहाटेच सॅम बहादूर यांचे निधन झाल्यानंतर नौसेनेने आपला ध्वज खाली उतरविला. त्यानंतर सेनादलाच्या कार्यालयात वरिष्ठ अधिका-यांची बैठक झाली आणि ध्वज उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला.

महिलांना आवडतात दाढीवाले पुरुष

सुंदर दिसावे असे प्रत्येकालाच वाटत असते। यासाठी महिला ब्युटी पार्लरमध्ये जातात, तर पुरुष अगदी घोटून- घोटून दाढी करतात.काही जण तर चक्क मिशाही काढतात परंतु लंडनमधील संशोधकांना एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की कमी, पण दाढी ठेवणारे पुरुष महिलांना जास्त आवडतात, तेही प्रेम, लाईफ आणि सेक्स पार्टनर म्हणून.
संडे टेलिग्राफने नुकतेच हे सर्वेक्षण प्रसिद्ध केले आहे। यात नोर्थुब्रिया युनिर्व्हर्सिटी मधील डॉक्टर निक नीव यांनी या संदर्भात सर्वेक्षण केले आहे.
दाढी असलेला चेहरा ही मादकतेची ओळख असल्याचे या सर्वेक्षणात त्यांना आढळून आले असून, ती सेक्स परिपक्वतेची ओळख असल्याचे निष्पन्न झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

ओरिसात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यानंतर ५० हून अधिक जवान बेपता

मलकानगरी (ओरिसा)- नक्षलवाद्यांच्या हल्ल्यानंतर नक्षलवादविरोधी पथकाचे ५० हून अधिक जवान बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे। हे जवान नावेतून परतत असताना चित्रकोंडाजवळ त्यांच्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला। त्यामुळे नाव जलाशयात उलटली.
या नावेत एकूण ६४ जवान होते, त्यापैकी ८ जणांनी पोहत येवून आपला जीव वाचवल्याचे समजते.
ओरिसातील चित्रकोंडा हा दुर्गम तसेच नक्षलग्रस्त भाग असून याठिकाणी जाण्यासाठी रस्त्यांची सुविधा नाही, त्यामुळे नाव हेच तेथे ये-जा करण्याचे एकमेव साधन आहे.

खेळा अथवा आराम करा - बीसीसीआयचा धोनीला सल्ला

नवी दिल्ली - भारतीय संघ गेल्या ८४ तासांत ३६ मैदानावर होता। त्यामुळे संघातील खेळाडूंना थकवा जाणवत आहे, या भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या विधानावर बीसीसीआयने "खेळा अथवा आराम करा' असा टोला दिला आहे.
संघातील कोणताही खेळाडू थकला असेल, तर तो विश्रांती घेवू शकतो। बीसीसीआयकडे खेळाडूंचा भरपूर भरणा असून प्रत्येक खेळाडूला पर्यायी खेळाडू उपलब्ध आहे, असा सनसनीत टोला बीसीसीआयचे राजीव शुक्‍ला यांनी धोनीला हाणला आहे.
आयपीएल स्पर्धेच्या वेळी कोणत्याही खेळाडूने थकवा आल्याचे म्हटले नव्हते. मग आताच थकवा कुठून आला? असा सवालही त्यांनी केला.

शनिवार, 28 जून 2008

ग्रामीण शाळा बंद पडण्याच्या मार्गावर!

सम्पादकीय

ग्रामीण शाळा बंद पडण्याच्या मार्गावर

हल्ली सर्वच राजकीय पक्षांना मराठीविषयी अचानक प्रेम दाटून आल्याचे सर्वत्र दिसते। दुकानांच्या इंग्रजी पाट्या हटविणे, बॉम्बे, पुना चे मुंबई, पुणे केले. महापालिका, न्यायालयांमधून मराठी कामकाज व्हावे यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत राज्यात शैक्षणिक प्रगती कशी उंच भरारी मारीत आहे हे दाखविण्यासाठी शासनातर्फे कागदपत्रे रंगवली जात आहेत. पण प्रत्यक्षात मराठी भाषा आणि मराठी शाळांची अवस्था काय आहे याची दखल कोण घेणार?
सगळीकडे मराठीविषयी दाटून आलेल्या प्रेमाचे प्रदर्शन सुरू असताना पुणे जिल्हा परिषदेकडे यंदा एकूण 305 नव्या शाळांसाठी प्रस्ताव दाखल झाले आहेत। त्यापैकी 200 प्रस्ताव फक्त इंग्रजी शाळांसाठी आहेत तर मराठी शाळा सुरू करण्याची तयारी दाखवणारे फक्त 98 आहेत। त्यामुळे टक्केवारीत इंग्रजी-मराठी शाळेचे प्रमाण पाहिल्यास ते 70:30 असे होते. त्यामध्ये 70 टक्के इंग्रजी शाळा या भरमसाठ शुल्क आकारण्यासाठीच असतात की काय, असा प्रश्न पडतो. पर्यायाने अशा शाळेत शिकणारे विद्यार्थी धड इंग्रजी बोलू शकत नाहीत आणि धड मराठीतही बोलू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. विद्यार्थ्यांची मधल्यामध्ये गोची होते. याकडे कोणीच लक्ष देत नाही. "बा बा ब्लॅक शीप हॅव यू एनी वूल' ही कविता शिकवताना विद्यार्थ्यांनी "शीप' कुठे पाहिलेले असते?
"लंडन ब्रिज इज फॉलिंग डाऊन' म्हणताना हा लंडनचा ब्रिज शिक्षकांनीही पाहिलेला नसतो. "रेन रेन गो अवे कम अगेन अनादर डे' या कवितेचा आपल्या "येर येरे पावसा' म्हणत पावसाला बोलावणाऱ्या कृषि संस्कृतीशी कसा मेळ घालणार? या बालमनांवर नेमके काय बिंबवायचे आहे याचा विचार पालकांनी करायला हवा. हव्यासापोटी हा इंग्रजीचा अट्टाहास कशासाठी?
महाराष्ट्राची आर्थिक पाहणी-2008 या सर्व्हेक्षणात महाराष्ट्रातील शैक्षणिक प्रगतीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. हा अहवाल कागदावर जरी उत्तम दिसत असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती मात्र अत्यंत गंभीर आहे यामध्ये शहरी व ग्रामीण असे भाग केलेले नाहीत. शहरांमधून शैक्षणिक प्रगती होत असताना ग्रामीण भागात मात्र शैक्षणिक अधोगती होताना दिसत आहे. याला सर्वस्वी जबाबदार असणाऱ्या सरकारने वस्तुस्थिती लपवून हा आलेख तयार केला असून प्रत्यक्षात खेडेगावातील शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत।
या कागदोपत्री आलेखानुसार राज्यात 1960 साली 34,594 शाळांमधून 41 लाख 78 हजार मुले प्राथमिक शिक्षण घेत होती. 1980 मध्ये 51,045 शाळांमधून 86 लाख 92 हजार, 2000-01 मध्ये 65,960 शाळांमधून 1 कोटी 18 लाख 57 हजार तर 2007-08 या वर्षात 69,330 शाळांमधून 1 कोटी 15 लाख 71 हजार मुलांनी शिक्षण घेतल्याचे दिसते. मात्र आकडेवारीवरून समाधान मानण्यात काहीच अर्थ नाही. कारण यामध्ये मराठी माध्यम किती? इंग्रजी माध्यम किती? शहरांमधील शाळा किती? ग्रामीण भागातील शाळा किती? याचा काहीच विचार केलेला दिसत नाही. फक्त 34 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक हे धोरण राबवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर मात्र शिक्षण खात्याकडून घोर अन्याय होताना दिसत आहे।
कोकणातील उदाहरणादाखल रत्नागिरी जिल्ह्याचा अधिकृत अहवाल पाहिल्यास 2,669 प्राथमिक शाळांमधून 2 लाख 1 हजार 49 मुले शिकत असल्याचे आढळून येते याची सरासरी काढल्यास फक्त 72 मुले प्रत्येक शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिकत आहेत. याच जिल्ह्यातील गणपतीपुळे गावातील प्राथमिक शाळेचे उदाहरण घेतल्यास या शाळेत यावर्षी इयत्ता 1लीत फक्त 9 मुले, इयत्ता 2 री -10 मुले, इयत्ता 3 री मध्ये फक्त 2 मुले तर इयत्ता 4 थी मध्ये 6 मुले शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांची पटसंख्या पाहून येथे फक्त 2 शिक्षकांना नेमण्यात आले आहे. इयत्ता पहिली ते चौथीच्या चार वर्गांसाठी फक्त दोन शिक्षकांनी कसे आणि काय शिकवायचे? त्यामुळे पहिली व दुसरी एकत्र आणि तिसरी व चौथी एकत्र असे 2 वर्गच दिवसभर चालवावे लागतात. मग या अवस्थेत येथील मुले काय शिकणार? शिक्षक तरी कसे काय शिकविणार? शासन मात्र 34 मुलांसाठी 1 शिक्षक या धोरणावर ठाम असल्याने या शाळेला 2 पेक्षा जास्त शिक्षक देऊ शकत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा पायाच कच्चा राहिल्यावर पुढे जाऊन हे काय दिवे लावणार?
ग्रामीण भागातील तरुण रोजगाराच्या शोधात शहरांकडे वळत आहे. तेथे नोकरी धंद्याची सोय होताच एखादं घर घेऊन तेथेच संसार थाटतो. त्यामुळे त्याची मुले शहरात वाढतात. शिक्षण घेतात. त्यामानाने हल्ली ग्रामीण भागातील मुलांमध्ये घट होत आहे. यावर्षी पहिलीच्या वर्गात फक्त 9 मुले आहेत. पुढच्या वर्षी ती 5 वर येईल. आणखी 2-4 वर्षांनी पहिल्या इयत्तेमध्ये मुलेच असणार नाहीत. त्यावेळी काय? त्या शाळा बंद पडल्यास गावातील गोरगरीब 2-4 मुलांनी कोठे शाळेत जायचे? या गंभीर प्रश्नाकडे लक्ष कोण देणार?
मराठी माध्यमातून शिकूनही इंग्रजीतून उत्तम बोलू, लिहू शकणारे जयंत नारळीकरांसारखे थोर शास्त्रज्ञ तयार झालेच ना? मग मराठी माध्यमांच्या शाळांबाबत पालक आणि सरकार एवढे उदासिन का? जगातल्या अतिप्रगत राष्ट्रात इंग्रजीतून सर्व व्यवहार चालवणारी राष्ट्रे किती आहेत? जपान, चीन, जर्मनी, फ्रान्स या देशात कुठे इंग्रजीला एवढे महत्त्व दिले जाते? मात्र हे कोणीच लक्षात घेत नाही. या साऱ्याचा गांभीर्याने विचार करायची आज खरी गरज आहे. -
राजेश सावंत

आता सलमानचाही ब्लॉग

ब्लॉग लिहिण्याची 'लागण' आता सलमान खानलाही झाली आहे। अमिताभ बच्चन, आमीर खान यांच्यानंतर आता सलमान खानही ब्लॉग लिहिणार आहे.
सलमानचे वडिल सलीम खान यांनी बॉलीवूडचे अनेक हिट चित्रपट लिहिले आहेत। सहाजिकच सलमानलाही आपल्यातल्या लेखकाला जागे करायचे आहे. खरे तर त्याने याच्या आधीही लेखनाचे काही प्रयोग केले आहेत. त्याने अनेक चित्रपटांच्या कथा लिहिल्या आहेत. त्याच्याच एका कथेवर 'वीर' हा चित्रपट तयार होतो आहे. सलमानने लिखाणाला सुरवात केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एका वेबसाईटवर त्याचे विचार वाचायला मिळतील, असेही ते म्हणतात.
सलमानचा एक टिव्ही शो' दस का दम'ही लवकरच सुरू होतो आहे. तो त्याच्या प्रचारात गुंतला आहे. आयपीएलच्या फायनलमध्ये तो या चित्रपटाची प्रसिद्धी करणार आहे.

चीन - ऑलिंपिकसाठीची मैदाने बांधून पूर्ण

बीजिंग - नुकत्याच झालेल्या भूकंपाच्या पार्श्‍वभूमीवरही चीनमधील ऑलिंपिकच्या पूर्वतयारीची सर्व कामे वेळेत पूर्ण होत आहेत। ऑलिंपिकचा उद्‌घाटनाचा आणि समारोपाचा सोहळा रंगणाऱ्या पक्ष्याच्या घरट्याच्या आकाराच्या मुख्य मैदानाचे काम पूर्ण झाल्याचे शनिवारी जाहीर करण्यात आले. हे मैदान आता पूर्ण क्षमतेने वापरता येऊ शकते, असे चीनमधील अधिकृत वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
येत्या ऑगस्टमध्ये ऑलिंपिक स्पर्धा होणार आहेत. ऑलिंपिकमधील विविध क्रीडाप्रकारांसाठी जलतरण तलाव आणि ३७ छोटी मोठी मैदाने बांधून पूर्ण करण्यात आली आहेत. यापैकी काही बंदिस्त आहेत, तर काही खुली मैदाने आहेत. मुख्य मैदानाची रचना स्वित्झर्लंडच्या हरझॉंग, डिमेरॉन आणि चीनमधील वास्तूरचनाकार ली झिगॅंग यांनी केली आहे.

पोलीसांनी दखल न घेतल्याने महिलांनीच केले दारूअड्डे उद्‌ध्वस्त!

आष्टी - तालुक्‍यातील धानोरा, पिंपळा आणि अंभोरा येथील महिलांनी दारूबंदीसाठी आक्रमक पवित्रा घेऊन आंदोलन सुरू केले आहे।
महिलांनी १९ जूनला अंभोरा पोलिसांकडे निवेदन देऊन दारूबंदीची मागणी केली होती; परंतु दारू विक्रेत्यांवर कारवाई झाली नाही। त्यामुळे या महिलांनी ग्रामपंचायत सदस्य अनसूया शेळके व किसनाबाई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी रात्री गावातच मोर्चा काढला आणि गावातील तब्बल ११ दारूअड्डे उद्‌ध्वस्त केले.
गावकऱ्यांनी या आंदोलनाचे स्वागत केले। ज्या ज्या गल्लीत हा मोर्चा जाईल तिथे तिथे फटाके वाजवून महिलांचे स्वागत केले. काही तरुणांनी गावातील मटक्‍याच्या साहित्याची होळी केली. त्यामुळे गावात आता दारूबंदीबरोबर मटकाबंदीही झाली आहे.
पिंपळा येथेही महिलांनी गावातील तळिरामांची धुलाई केली, तसेच अंभोरा पोलिसांमार्फत गावातील दारू विक्रेत्यांवर कारवाई केली. अंभोरा येथील महिलांनीही शुक्रवारी गावातील पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला आणि पोलिसांना दारू विक्रेत्यावर कारवाई करण्यास भाग पाडले. त्यामुळे या तिन्ही गावांत दारूबंदी झाली आहे.
आता गावातील महिलांनी पाणंदमुक्त गाव करून निर्मलग्रामकडे वाटचाल करण्याचा निर्धार केला आहे. धानोऱ्यात तळिराम आढळल्यास त्याचे मुंडन करण्यात येणार आहे. अंभोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुणी अवैध दारूविक्री करीत असेल तर २४११३३ या क्रमांकावर फोन करून कळविण्याचे आवाहन अंभोऱ्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुडके यांनी केले आहे.

प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या

आरमोरी - आरमोरी पोलिस ठाण्यांतर्गत सात किमी अंतरावरील पाथरगोटा या गावी पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने स्वत:च्या पतीची विष पाजून हत्या केल्याची घटना बुधवारी (ता।२५) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली। दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
हितेश रतन खोब्रागडे (२६) रा। कोकडी हा काही कामानिमित्त पाथरगोटा येथे गेला. त्याची सुमित लिंगायत (४०) रा. पाथरगोटा यांच्याशी ओळख झाली. त्याचे त्यांच्या घरी येणे-जाणे सुरू झाले. यातच त्याचे सुमितची पत्नी सुषमा लिंगायत (३५) हिच्याशी प्रेमसंबंध जुळले. प्रेमाचे रूपांतर शारीरिक संबंधात झाले. याबाबत गावातील लोकांना माहिती होती. मात्र, सुषमाच्या रागीट व भांडखोर स्वभावामुळे तिला कोणीच हटकत नव्हते.
प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीला कायमचे संपविण्याचे सुषमाने मनात ठरविले। प्रियकर हितेश खोब्रागडे याच्यासोबत तिने कट रचला. जेवताना दारू पिण्याचा बहाणा करून हितेशने बाहेर गावातून देशी दारू आणली. त्या बाटलीमध्ये विषारी कीटकनाशक औषध टाकून ती सुमितला पिण्यास दिली.
यादरम्यान दोघांमध्ये बाचाबाचीसुद्धा झाली. दारू पिल्यानंतर काही वेळातच सुमितचा मृत्यू झाला, असे हितेश खोब्रागडेने पोलिसांना दिलेल्या बयानात म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आरमोरी पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक इप्पर, जमादार कराडे, पोलिस शिपाई सिडाम करीत आहेत.

तेलाचे भाव पुन्हा वाढणार?

आगामी दोन दिवसांमध्ये कच्च्या तेलाचे भाव पुन्हा एकदा गगनाला भिडण्याची शक्यता इराणमधील एका तेल उत्पादक कंपनीने व्यक्त केली आहे।
चीनने तेलाचे दर वाढवल्याने 140 डॉलर प्रती बॅरलवर गेलेले हे भाव काही अंशी कोसळले आहेत। परंतु आता पुन्हा एकदा हे भाव वाढण्याची शक्यता इराणनेच व्यक्त केल्याने आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. इराण हा तेल उत्पादन करणारा देश मानला जातो.
तेलाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले असून, आता तेलाचा कोणताही तुटवडा जाणवणार नसल्याचे सौदी अरबने आधीच जाहीर केले आहे. आणि याच सोबत तेलाचे उत्पादन वाढवण्यात येणार असल्याचेही सौदीने जाहीर केले आहे. इराणणे मात्र तेलाचे उत्पादन वाढवण्यास नकार दिला आहे.

सोनियांकडून पंतप्रधानांची पाठराखण

अमेरिकेच्या अण्वस्त्र करारावरून सरकारमध्ये नाराजी आणि अनिश्चिततेचे वातावरण तर आहेच, परंतु महागाईदर वाढतच असल्याने विरोधक पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करत असतानाच कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मात्र पुन्हा एकदा मनमोहन यांची पाठराखण केली असून, तेच आज घडीला भारताचे नेतृत्व करू शकतात अशी पुस्तीही जोडली आहे।
यापूर्वीही महागाईदराने आठचा पल्ला गाठल्यानंतर पंतप्रधानांच्या कार्यशैलीवर विरोधकांनी जोरदार टिका केली होती, त्याही वेळी सोनियांनी मनमोहन हेच उत्कृष्ट पंतप्रधान असल्याचे स्पष्ट केले होते।
आता महागाईदर 11.42 टक्क्यांवर गेल्यानंतर डाव्या पक्षांसह विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकेची झोड उडवली आहे. गेल्या चार वर्षात पंतप्रधान म्हणून मनमोहन यांनी घेतलेले निर्णय भारताच्या विकासासाठी पोषक असल्याचेही सोनिया म्हणाल्या.

अंदमान आणि चेन्नईला भुकंपाचा धक्का

अंदमान निकोबार आणि चेन्नईला शुक्रवारी भुकंपाचे धक्के जाणवल्याने काही वर्षांपुर्वी झालेल्या त्सुनामीची आठवण या भागातील नागरिकांना काल पुन्हा झाली।
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अंदमानला 6।7 रिश्टर स्केलचे दोन धक्के जाणवले, तर चेन्नईलाही 6.7 रिश्टर स्केलचे भुकंपाचे धक्के जाणवले.
यात कोणत्याही स्वरुपाची अर्थ अथवा मनुष्यहानी झाली नसल्याचे यानंतर प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आता सौर ऊर्जा मिशन-पंतप्रधान

देशात आगामी काळात वीज संकट निर्माण होऊ नये म्हणून सरकार लवकरच विजेच्या सर्व पर्यायी स्रोतांचे अध्ययन करत असल्याची माहिती देत आता आगामी काळात सूर्याच्या ऊर्जेचा वापर करण्यासाठी 'सौर ऊर्जा मिशन' राबविण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जा समन्वय समितीच्या बैठकीत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिली।
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतींत झालेली वाढ आणि आगामी काळात निर्माण होणाऱ्या विजेच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी अक्षय ऊर्जा, आणि सौर ऊर्जेचे संवर्धन गरजेचे असल्याचे मतही पंतप्रधानांनी या बैठकीत व्यक्त केले।

70 व्या वर्षी दिला जुळयांना जन्म

पश्चिम उत्तरप्रदेशातील मुजफ्फरनगरमधील 70 वर्षीय वृद्धेने जुळया मुलांना जन्म दिला आहे। या घटनेने वैद्यकीय संशोधनाला पुन्हा एकदा आव्हान दिले आहे. आई व बाळांची प्रकृती उत्तम आहे.
रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या जुळया बालकांमध्ये एक पुत्र तर एक कन्या आहे। साधारणता वैद्यक शस्त्रानुसार वयाच्या 50 व्या वर्षापर्यंत मासिक पाळी बंद होत असते. आणि त्यानंतर स्त्री आई होऊ शकत नाही. मात्र या महिलेने चक्क जुळयांना जन्म देऊन अनेक डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
वृद्ध दांपत्य पती चरणसिंह (76) आणि ओमकली (70) हे दोघर या गावातील रहिवासी असून त्यांना यापूर्वीच दोन मुली व नातवंडे आहेत. मात्र त्यांना मुलगा व्हावा अशी इच्छा होती आणि त्यांची इच्छा वयाच्या 80 व्या दशकात पूर्ण झाली आहे.

किंमतवाढीचा तेरा वर्षातील उच्चांक

किंमतवाढीच्या मुद्दयावर सरकारची चिंता कमी होण्याचे चिन्ह नसून किंमतवाढीने 11।42 टक्क्यावर झेप घेत तेरा वर्षातील उच्चांक गाठला आहे. अन्नधान्य, दूध, खाद्यतेल व पेट्रोलियम पदार्थाच्या किमतीतील प्रचंड वाढीमुळे किंमतवाढीने उच्चांकी झेप घेतली आहे.
चौदा जूनला संपलेल्या आठवड्यात किंमतवाढीने मागील आठवड्याच्या तुलनेत 0।37 टक्क्यांची वृद्धी नोंदवली आहे. मागील वर्षी याच आठवड्यात किंमतवाढ फक्त 4. 13 टक्क्यांवर होती.
किंमतवाढीने याअगोदर मार्च 1995 मध्ये विक्रमी 16।9 टक्क्यांची झेप घेतली होती. वित्तमंत्र पी चिदंबरम यांनी वृत्तवाहिनीस दिलेल्या मुलाखतीत पाच जूनला केलेल्या पेट्रोल व डिझेलच्या किंमतवाढीचा यावर परिणाम झाल्याचे सांगून सरकार लोकांना याचे स्पष्टीकरण देऊन उपाययोजनांची माहिती देणार असल्याचे स्पष्ट केले.
या आठवड्यात चहाची किंमत तीन टक्क्यांनी, दूध एक टक्के, सूर्यफूल तेल एक टक्के, वनस्पती दोन टक्के आयातीत खाद्यतेलात एक टक्क्यांची वाढ झाली आहे. वित्तमंत्र्यांनी किंमतवाढ काही आठवडे दुहेरी आकड्यात राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आवश्यकता पडल्यास कठोर उपाययोजना करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मॉंटेकसिंह रिझर्व्ह बँकेचे नवे गर्व्हनर?

रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर वाय वी रेड्डी यांचा कार्यकाल लवकरच संपत असुन त्यांच्या जागी या पदावर नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉंटेकसिंह अहलूवालीया यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे।
सरकार त्यांच्या नियुक्तीचा गांभीर्याने विचार करत असल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत असुन लवकरच रेड्डी यांचा कार्यकाल संपत असल्याने अहलूवालीया यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे.

शुक्रवार, 27 जून 2008

उत्तरप्रदेशी आणि बिहारी टिसींना हाकलून लावा ः राज ठाकरे

औरंगाबाद - रेल्वेत नव्याने भरती झालेल्या साडेचार ते पाच हजार उत्तरप्रदेशी आणि बिहारी टीसींना बाहेर हाकलून लावा। ही साफसफाई झाल्यानंतर नवनिर्माण करू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे दिला.
पदवीधर मतदार संघातील पक्षाचे उमेदवार प्रकाश महाजन यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज ठाकरे शुक्रवारी शहरात आले होते। त्यावेळी त्यांची जाहीर सभा झाली ते म्हणाले,"" या उत्तरप्रदेशी आणि बिहारी लोकांनी येथे येऊन आपले हक्क हिरावून घेतले आहेत. त्यामुळे मराठी तरुणांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. मुंबई आपली भुमीपूत्रांची आहे, त्यामुळे तिथे आलेल्या प्रत्येकाने आपल्याबरोबरीने आपल्या भागातील तरुणांना मुंबईत आणले पाहिजे. मराठी माणसाने आधी राष्ट्राचा विचार केला, मग राज्याचा विचार केला, ही आता चुक झाली असे वाटू लागले.''
संपूर्ण राज्यात परप्रांतीय घुसले आहेत. त्यांना आता रोखले पाहिजे. त्याशिवाय आपल्याला आपले हक्क मिळणार नाहीत, असे आवाहन त्यांनी केले. महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानाच्या समोर ही सभा झाली. सभेला संपूर्ण मराठवाड्यातून युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यापूर्वी क्रांतीचौकातून प्रकाश महाजन यांची प्रचारफेरी काढण्यात आली.

कच्च्या तेलाचा चढता प्रवास सुरूच!

लंडन - डॉलरचे मूल्य अन्य महत्त्वाच्या चलनांच्या तुलनेत घसरल्याने गुंतवणूकदारांनी जोखीम कमी करण्यासाठी कच्च्या तेलाची शुक्रवारी मोठ्या प्रमाणात खरेदी केली। त्यामुळे आशियाई बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा भडकल्या आणि कच्चे तेल प्रतिपिंप १४१ डॉलरच्या पुढे गेले.
सत्रातर्गत व्यवहारात कच्चे तेल प्रतिपिंप १४१।७१ डॉलरवर पोचले होते. या आधी सोळा जूनला कच्च्या तेलाने १३९.८९ डॉलर ही उच्चांकी पातळी गाठली होती.
""नजीकच्या भविष्यात कच्च्या तेलाच्या किमती दीडशे ते १७० डॉलर प्रतिपिंपापर्यंत जाऊ शकतात. मात्र, चालू आर्थिक वर्षअखेरपर्यंत कच्च्या तेलाच्या किमती थोड्या खाली येण्याची अपेक्षा आहे,'' असे "ओपेक'चे अध्यक्ष चाकिब खलिल यांनी सांगितले.

महागाईचा निवडणुकीत फटका बसेल-चिदंबरम

नवी दिल्ली- देशातील वाढत्या महागाईचा येणाऱ्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी कॉग्रेस आणि मित्र पक्षांनाही फटका बसण्याची भीती दस्तूरखुद्द अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी व्यक्त केली आहे।
एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चिदंबरम यांनी ही भीती व्यक्त केली। महागाईदरावर नियंत्रण करण्यात सरकारला अपयश आल्याच्या आरोपांचा मात्र त्यांनी इन्कार केला.
महागाई वाढल्याची बाब जरी खरी असली तरी, सरकार अपयशी ठरल्याचा ठपका लावणे चुकीचे असल्याचे स्पष्ट करत देशातील नागरिक समजदार असल्याने त्यांना महागाईवाढीची नेमकी कारणे माहिती असल्याचे चिदंबरम म्हणाले।
आगामी काळात महागाईदर 10 टक्क्यांच्या आसपासच राहणार असल्याचेही त्यांनी कबूल केले आहे।
महागाईच्या पुरात बाजार गेला वाहून अमेरिकी बाजारात झालेली विक्रमी पडझड, आणि महागाईदराने साडे अकराचा पल्लाही ओलांडल्यामुळे या नकारात्मक प्रवाहात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक शुक्रवारी अक्षरशः वाहून गेला।
सत्राच्या आरंभीच अमेरिकी बाजारात झालेल्या पडझडीचे वृत्त बाजारात येऊन थडकल्याने बाजाराची सुरुवात घसरणीनेच झाली होती। यात बीएसईचा निर्देशांक 620 अंशांनी तुटत दहा महिन्यांनंतर बाजार 14 हजार अंशांखाली आला, तर नॅशनल स्टॉक एक्सेंजमध्येही 179 अंशांची पडझड झाली.
बाजारावर इतका नकारात्मक परिणाम दिसून आला, की शेअर बाजारातील 30 पैकी एकाही कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली नाही।
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 142 डॉलरच्या जवळपास जाऊन खेटल्याचा परिणामही बाजारावर दिसून आला. यातच महागाईदर वाढल्याने आणि तज्ज्ञांनी तो 12 टक्क्यांपर्यंत जाण्याच्या तयारीत असल्याचे भाकीत केल्याने दलाल स्ट्रीटवर निराशेची लाट आली आहे.

जगातील सर्वात मोठी बासरी

आग्रा - जगातील सर्वात मोठी बासरी बनवण्याचा स्वतः:चाच विश्वविक्रम मोडण्याची तयारी उत्तर प्रदेशातील दिनेश शांडिल्य यांनी सुरू केली आहे।
यापूर्वी त्यांनी पाच फूट लांब आणि साडेतीन इंच व्यासाची तयार करत आधीच आपले नाव ग्रिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नांदवले आहे। आता हा रेकॉर्ड मोडण्यासाठी ते आणखी एक बासरी तयार करत असून त्याची लांबी आणि व्यासही जास्त असेल असा त्यांचा दावा आहे.
आपल्या लहान भावाच्या आणि पत्नीच्या मृत्यूनंतर आपण इतके व्यथित झालो की, त्यांच्या स्मरणार्थ आपण ही बासरी तयार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईत गँगवॉर , तीन अटकेत

मुंबई- गँगस्टर करीम लाला याच्या नातेवाईकांवर काल मुंबईत दाऊदच्या तिघा गुंडांनी हल्ला चढवला। यानंतर पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 30 जून पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तारिक, हाजी अमीन आणि यूनूस दुर्रानी या तिघांनी करीम लाला याचा नातेवाईक असलेल्या गुड्डू पठाण याच्यावर काल हल्ला केला। यानंतर हे तिघेही फरार झाले होते. यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत या तिघांना अटक केली.
यानंतर मुंबईत पुन्हा एकदा गँगवॉर सुरू होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

भारतीय वंशाच्या अमेरिकी महिलेला ११ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

न्यूयॉर्क - गुलामगिरीच्या आरोपावरून भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक वर्षा सभनानी यांना येथील न्यायालयाने अकरा वर्षांचा तुरुगवासआणि २५ हजार डॉलरचा दंड ठोठावला आहे। सभनानी या ४६ वर्षांच्या असून, अमेरिकीतील लक्षाधीश नागरिकांपैकी एक आहेत.
इंडोनेशियाच्या एका महिलेची पिळवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर होता। तो न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर न्या. आर्थर स्पॅट यांनी ही शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावल्यानंतर आपल्या पतीशी आणि मुलांशी बोलताना त्यांना रडू कोसळले. श्री. सभनानी यानाही न्यायालयात शिक्षा सुनावताना आपले अश्रू आवरता आले नाहीत. याच खटल्यात श्री. सभनानी यांनाही नंतर शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
न्यायालयाने खूप कठोर शिक्षा सुनावली आहे आणि त्याविरुद्ध आपण वरिष्ठ न्यायालयात धाव घेऊ, असे बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितले. सभनानी कुटुंबीयांचा सुगंधी द्रव्यांचा व्यवसाय आहे. अमेरिकेतील कायद्याप्रमाणे गुलामगिरीच्या १२ निकषांच्या आधारे सभनानी पती-पत्नींना गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच दोषी ठरविण्यात आले होते.

कोल्हापूर- खंडणीसाठी अपहरण करणारे चौघे पोलिसांकडून जेरबंद

कोल्हापूर- दोन लाख रुपयांच्या खंडणीसाठी टेंबलाईवाडी येथील कामकार कंत्राटदार विजय बनसोडे व त्याचा मुलगा राहूल यांचे अपहरण करणाऱ्या सराईत गुंड काळू गायकवाडच्या चार साथीदारांना पोलिसांनी आज नाट्यमरित्या पकडले।
या वेळी पोलिसांवर जांबीयाने हल्ला करण्याचा प्रयत्न काही आरोपींनी केला। पोलिस व आरोपींच्यात झटापट झाली. या संधीचा फायदा घेऊन काळू पसार झाला.
पोलिसांनी विजय व राहूलची सुटका केली आहे. काळूने काल आपल्या साथीदारांसह विजय व त्याच्या मुलाचे अपहरण केले होते. काळू आपल्या साथीदारासह कणेरी मठाजवळील शेतात लपून बसल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तेथे छापा टाकला. तेथे चौघांना पकडले. काळू शेतात पळून गेल्यावर त्याच्या शोधासाठी पोलिसांनी "कॉबींग ऑपरेशन' राबविले, पण काळू सापडला नाही.

मंगळावरील माती, आपल्याप्रमाणेच - संशोधकांचा दावा

लॉस एंजिल्स - नासाच्या "फिनीक्‍स' या अंतराळ यानाने खोदलेल्या मातीच्या नमुन्यांच्या सुरवातीच्या चाचण्यांवरून तेथे "वातावरण' असण्याच्या दाव्याला अनुकूल दिशा मिळाल्याचे अंतराळ संशोधकांनी स्पष्ट केले आहे।
यानाच्या रोबोटिक भुजेने खोदून काढलेल्या मातीच्या नमुन्यांचा यानातील प्रयोगशाळेने केलेल्या परीक्षणाच्या आधारे मंगळावरील माती अपेक्षेपेक्षा अधिक क्षारयुक्‍त आढळल्याचे "नासा'च्या संशोधकांनी सांगितले।
कोणत्याही ग्रहावरील मातीत पोषक तत्त्वे असणे म्हणजे तेथे "जीवन' आहे असा अर्थ होतो, मंगळावर आढळलेली मातीही आपल्या घराच्या आसपास असलेल्या मातीसारखीच आहे, याबाबत मातीचे पूर्ण आणि सखोल परीक्षण करण्याची आवश्‍यकता असल्याचे नासाच्या रसायन विभागाचे प्रमुख्य(तपास) सेम कोनवेस यांनी म्हटले आहे.

"खतरों के खिलाडी' अक्षयचा नवा "अवतार'

मुंबई - बॉलीवुडचा "सबसे बडा खिलाडी' अक्षयकुमार आता आपल्या नव्या लूकमधून प्रेक्षकांसमोर येत आहे। पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या कलर वाहिनीच्या "फिअर फॅक्‍टर- आयडिया खतरों के खिलाडी' या रिऍलिटी शोमध्ये तो आपल्या ऍक्‍शन हिरोच्या इमेजला साजेशा रूपात दिसेल.
टोपी असलेले जॅकेट, गळ्यात "टाय'प्रमाणे स्कार्फ, उंच लांबीचे बुट असा त्याचा वेश असून लंडनस्थित डिझायनरने ते तयार केले आहेत।
नव्या लूक विषयी अक्षय म्हणतो, नव्या स्टाईलला शोभण्यासाठी मला सर्व रंग हवे होते। काहीसा शांत वाटणारे कपड अजिबात नको होते।'
"फिअर फॅक्‍टर -आयडिया खतरों के खिलाडीं' या कार्यक्रमात सर्वोत्तम शारीरीक आणि मानसिक आव्हान असणार आहे। त्यात याना गुप्ता, आदिती गोवरीत्रीकर, पूजा बेदी, सोनाली कुलकर्णी, अनिता हस्नांदणी, मेघना नायडू, तपूर चटर्जी, नेत्रा रघूरामन, अंजना सुखानी, दिपान्निता शर्मा, विद्या माळवदे आणि उर्वशी शर्मा या १३ बॉलीवुड तारका एकमेकांसमोर उभ्या ठाकरणार आहेत।
कार्यक्रमाचे संपूर्ण चित्रिकरण दक्षिण अफ्रिकेत करण्यात आले असून त्यासाठी एक महिन्याहून अधिक कालावधी लागला.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक कोसळला

मुंबई - मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक शुक्रवारी सकाळी ५३६ अंशांनी कोसळून १४ हजारांच्या खाली गेला। गेले काही दिवस बाजारात सुरू असलेली चढउताराची स्थिती आणि जागतिक बाजारांमध्ये असलेल्या अस्थिरतेच्या वातावरणामुळे निर्देशांक कोसळला.
शुक्रवारी सकाळी बाजार सुरू होताच विक्रीच्या माऱ्याने निर्देशांक कोसळू लागला. सकाळी अकराच्या सुमारास निर्देशाक १३,९०८ अंशांवर होता. गेल्या दोन दिवसांतील सत्रांमध्ये निर्देशांकात ३२५ अंशांनी वधारणा झाली होती. त्यापार्श्‍वभूमीवर, शुक्रवारच्या पडझडीमुळे सामान्य गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इन्फोसिस या दोन्ही शेअरचे भाव कोसळले.

गुरुवार, 26 जून 2008

मुंबईत पोलिस चकमकीत दोन गुंड ठार, पोलिस निरीक्षक जखमी

मुंबई - कांदिवली-चारकोप भागात आज झालेल्या पोलिस चकमकीत कुख्यात रवी पुजारी टोळीचे दोन गुंड ठार झाले। या चकमकीत एक पोलिस निरीक्षकही जखमी झाले.
उपलब्ध माहितीनुसार आज सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास पुजारी टोळीचा सुनील बंगेरा उर्फ़ पुथरन हा गुंड आपल्या एका साथीदारासह चारकोप परिसरात येणार असल्याची खबर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेस मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी तेथे सापळा रचला. त्या ठिकाणी पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत हे दोघेही गुंड मारले गेले. या वेळी पायास गोळी लागून पोलिस निरीक्षक नितीन अलकनुरे हे जखमी झाले. त्यांना भगवती रुग्णालयात घेवून गेले असता त्यांनी अलकनुरे यांना नानावटी हास्पिटल मध्ये घेवून जाण्यास सांगितले. तेथे त्यांच्यावर उपचार शुरू आहेत।

दहावीचा निकाल घोषित

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २००८ मध्ये घेतलेल्या शालांत परीक्षेत कोल्हापूर विभागातील साताऱ्याचा गौरव कुलकर्णी हा राज्यात पहिला आला. त्याला ९७.८४ टक्के गुण मिळाले आहेत. गौरव हा साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी आहे. विभागनिहाय पहिले आलेले विद्यार्थी आणि त्यांची टक्केवारी गौरव कुलकर्णी - ९७.८४ टक्के (कोल्हापूर) पूजा सुनीलराव वानखेडे - ९७.२३ टक्के (अमरावती) सायली रुपसिंग सागर - ९७.२३ टक्के (लातूर) सुरभी सुरजलाल गणवीर - ९७.०७ टक्के (नागपूर) स्नेहा गोविंदप्रसाद डालिया - ९६.७६ टक्के (औरंगाबाद) प्रतीक मोहन रामदासी - ९६.६१ टक्के (मुंबई, विभागून) मधुरा सुधीर नाईक - ९६.६१ टक्के (मुंबई, विभागून) बिल्वा दीपक उपाध्ये - ९६.०० टक्के (पुणे) कल्याणी कृष्णा सुर्यवंशी - ९५.२३ टक्के (नाशिक) यंदाच्या निकालाची ठळक वैशिष्ट्ये- उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण जास्त. औरंगाबादचा निकाल राज्यात सर्वाधिक. मागच्या वर्षीपेक्षा यंदा ७० हजार विद्यार्थी जास्त बसले होते. पन्नास टक्केपेक्षा कमी निकाल लागलेल्या शाळांची संख्या पाचशे इतकी.