हिंगोली - मोबाईल जवळ असल्यावर रेंज असल्यास कोणशीही कुठेही कधीही संपर्क साधता येणे शक्य झाले आहे। त्यामुळे मोबाईलमुळे संवाद साधण्याची चांगली सोय झाली असली, तरी याच मोबाईलमुळे हिंगोलीतून फरारी झालेले प्रेमीयुगुल अडचणीत सापडून पोलिसांच्या तावडीत सापडले.
हिंगोली शहरातून सुमारे पंधरा दिवसांपूर्वी एक प्रेमीयुगुल फरारी झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी शोध घेऊनदेखील ते सापडले नसल्याने हे प्रकरण पोलिसांत पोचले. शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी अर्ज सादर झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरवात केली होती.
पोलिस निरीक्षक गोविंद पौळ, जमादार प्रकाश अवचार, बाबू जाधव, विठ्ठल सूर्यवंशी, अरुण इंगळे, प्रकाश रेवले, फुलाजी सावळे, खंडेराव नरोटे, विलास राठोड, श्री। पोले यांच्या पथकाने त्या दोघांचा शोध सुरू केला होता. त्यांच्या नातेवाइकांकडे चौकशी केल्यानंतरही ते सापडले नाहीत.
दरम्यान, पोलिसांनी त्यांच्याकडे असलेल्या मोबाईलच्या रेंजवरून त्यांचा शोध सुरू केला. सुरवातीला त्यांच्याजवळील मोबाईलची रेंज जळगाव भागात असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांचे एक पथक जळगावकडे गेले होते. त्यानंतर त्यांच्या मोबाईलची रेंज जिंतूरजवळ असल्याचे स्पष्ट झाले. दोघेही जिंतूरजवळ असल्याचे स्पष्ट होताच शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने त्यांना आज जिंतूर भागातून ताब्यात घेऊन हिंगोली येथे आणले. दरम्यान, याप्रकरणी कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिस विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें