पुणे - फौजदार भरतीची २००५ ची प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेली नाही. २००६ ची फौजदार परीक्षेची प्रक्रियाही अपूर्णावस्थेत असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या परीक्षेची नवीन प्रक्रिया सुरू केली आहे.
त्यासाठी जाहिरात देण्यात आली आहे. त्यामुळे फौजदार परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला आहे. एका भरतीची प्रक्रिया पूर्ण न करताच दुसरी प्रक्रिया सुरू करणे, हाच आयोगाचा कारभार आहे का, अशी टीका विद्यार्थ्यांकडून होत आहे.
एप्रिल २००५ मध्ये सुरू झालेल्या पोलिस उपनिरीक्षक (फौजदार), विक्रीकर निरीक्षक व मंत्रालय सहायक या पदांसाठीची भरती प्रक्रिया तब्बल ३ वर्षे ३ महिने उलटून गेले तरी पूर्ण झालेली नाही। सप्टेंबर २००७ मधील याच पदांसाठीची आणखी एक प्रक्रिया अर्धवट अवस्थेत आहे. आयोगाच्या या कूर्मगती कारभाराबद्दल उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर सहा महिने रखडलेली पदे आयोगातर्फे भरण्यात आली व २००५ च्या परीक्षेतील उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सध्या या परीक्षेतील उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणे बाकी आहे. या परीक्षेचा निकाल २५ जूनपर्यंत लावणार असल्याचे आयोगाने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले होते; पण निकाल अद्याप लागलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची अस्वस्थता वाढली आहे.
गेल्या चार वर्षांत आयोगाने या परीक्षेची कोणतीच प्रक्रिया पूर्ण न केल्याने विद्यार्थ्यांना अन्य पर्यायांवरही पाणी सोडावे लागत आहे। गेल्या तीन वर्षांतील जाहिरातीनुसार, फौजदारपदाची सोळाशे पदे भरणे अपेक्षित असताना आतापर्यंत एकही पद भरलेले नाही.
अशाच पद्धतीने ही भरती प्रक्रिया पुढे सरकत राहिल्यास निवड झालेले फौजदार नाशिकच्या पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेऊन पदावर रुजू होण्यास आणखी दोन वर्षे लागतील, अशी भीती विद्यार्थी व्यक्त करत आहेत। याबाबत आयोगाशी संपर्क साधल्यावर त्यांनी, "सर्व भरती प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात येणार असून २००५ च्या फौजदार, विक्रीकर निरीक्षक व सहायक या परीक्षेचा अंतिम निकाल ३० जूनपर्यंत लागेल,' असे उत्तर दिले. गेल्या सहा महिन्यांपासून आयोगाने आपली कार्यक्षमता दुप्पट केली असून सध्या चालू असलेल्या सर्व भरती प्रक्रिया भविष्यात अल्पावधीत पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे आयोगाचे जनसंपर्क अधिकारी गिरीश महाजन यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या चार वर्षांत कोणतीही भरती प्रक्रिया पूर्ण न केलेल्या आयोगाचे काम आता केवळ जाहिरात देणे व परीक्षा घेणे एवढेच आहे का, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येत आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें