कोल्हापूर - मटका व्यवसायातून हॉटेलच्या खोलीत डांबून मारहाण करून खंडणी मागणाऱ्या पाच तरुणांना रविवारी सायंकाळी शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. त्यांचा एक साथीदार पळून गेला. रविवारी दुपारपासून सायंकाळपर्यंत सहा जणांकडून हा प्रकार सुरू होता. सायंकाळी फिर्यादीने पार्वती मल्टिप्लेक्सजवळील शक्ती बीअरबारमधून स्वतःची सुटका करून या बाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी पाच जणांना अटक केली. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली.
जमीर ऊर्फ पांडू युनूस गुहागरकर, प्रमोद उर्फ शक्तिमान राजाराम पाटील, अरुण वसंत दमे, सुजित जयसिंग अबदागिरी, संदीप दिनकर सुतार (सर्व जण २५-३५ वयोगटातील, रा. शाहूपुरी पाचवी गल्ली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। त्यांचा साथीदार गजानन सुतार पळून गेला आहे. या बाबतची फिर्याद प्रवीण वसंत पाटील (रा. शाहूपुरी पाचवी गल्ली) यांनी शाहूपुरी पोलिसांत दिली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी ः फिर्यादी प्रवीण आणि प्रमोद पाटील यांचा चार वर्षांपूर्वी मटका व्यवसाय होता। व्यवसाय बंद केला तेव्हा प्रवीणकडे प्रमोदचे पन्नास हजार रुपये देणे बाकी होते. त्याची मागणी प्रमोद वारंवार करीत होता. त्याच्या त्रासामुळे प्रवीण काही दिवस बाहेरगावी होता. तो सापडत नसल्याचा राग प्रमोदने आज त्याच्यावर काढला. प्रवीण आज दुपारी शाहूपुरीतील गवत मंडईजवळून जात असताना प्रमोदने त्याला आपल्या सहकाऱ्यांसह जाऊन पळवून नेले.
पराग हॉटेलच्या खोली क्रमांक ६ मध्ये त्याला डांबून मारहाण करून पन्नास हजारांची मागणी केली. दुपारपासून सायंकाळपर्यंत प्रवीणला त्यांनी थांबून थांबून मारहाण केली. त्यानंतर प्रवीणसह सर्व जण पार्वती मल्टिप्लेक्सजवळील शक्ती बीअरबारमध्ये गेले. तेथे सर्व जण मद्यप्राशन करीत असल्याचे पाहूण प्रवीणने तेथून पळ काढला. तो थेट शाहूपुरी पोलिस ठाण्यात गेला. त्याने पोलिसांना हकीकत सांगितली. पोलिसांनी तातडीने शक्ती बीअरबारमध्ये जाऊन सर्वांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी बारमध्ये पाच जणांना पकडले; मात्र यावेळी सहावा साथीदार गजानन सुतार पळून गेला. त्याचा शोध पोलिस रात्री उशिरापर्यंत घेत होते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें