सोमवार, 30 जून 2008

अमेरिकेतील भारतीयाच्या भूखंडाची पुण्यात परस्पर विक्री

पुणे - अमेरिकेत गेलेल्या नागरिकाच्या मालकीच्या पाच हजार चौरस फूट भूखंडाचे बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करून त्याची विक्री केल्याच्या आरोपावरून दोन कथित इस्टेट एजंटांना येरवडा पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. त्यांनी एका बांधकाम व्यावसायिकाची सुमारे ४५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे.
या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक तरुणकुमार मिलापचंद दुमावत (वय ४५, रा। आदिनाथ सोसायटी, सातारा रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दीपक हिरालाल गोपलानी (वय ४१, रा. मल्हार सोसायटी, कात्रज-कोंढवा रस्ता) व शरद प्राणनाथ डोडी (वय ५०, रा. बसेरा अपार्टमेंट, एनआयबीएम रस्ता, कोंढवा) यांना फसवणुकीच्या आरोपाखाली अटक झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुमावत यांची कल्याणीनगरजवळ बांधकाम "साइट' सुरू आहे। गोपलानी व डोडी यांनी गेल्या वर्षी जानेवारीमध्ये दुमावत यांच्याशी संपर्क साधला. त्यांचे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ पाच हजार चौरस फुटांचा भूखंड विक्रीसाठी आहे, असे त्याने त्यांना सांगितले. त्यामुळे दुमावत यांनी भूखंड विकत घेण्याची तयारी दाखविली. त्यांनी त्यांना भूखंडाच्या विक्रीचे कुलमुखत्यारपत्र दिले. एक कोटी रुपये भूखंडाची किंमत ठरली होती. दुमावत यांनी वेळोवेळी त्यांना धनादेशांद्वारे ४५ लाख रुपये दिले. त्याचे "सेल डीड' तयार करावे, अशी मागणी त्यांनी केली; परंतु मूळ मालक नंतर येईल, असे सांगून ते टाळाटाळ करीत. नंतर त्यांनी दुमावत यांच्याशी संपर्क टाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना शंका आली. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती.
प्रत्यक्षात तो भूखंड प्रभाकर बिंदुमाधव कुलकर्णी यांच्या मालकीचा आहे. ते अमेरिकेत होते. गोपलानी व डोडी यांनी प्रभाकर बंडोपंत कुलकर्णी यांच्या नावाने कुलमुखत्यारपत्र तयार केले होते. ही घटना समजताच कुलकर्णी अमेरिकेहून पुण्यात आले व त्यांनीही पोलिसांशी संपर्क साधला. फौजदार मोहन ननावरे पुढील तपास करीत आहेत.

कोई टिप्पणी नहीं: