पुणे - अनेक दिवसांच्या दडीनंतर गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाच्या सरींमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.येत्या पाच दिवसांत मध्य महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
पावसाच्या विश्रांतीमुळे रखडलेल्या पेरण्या, शेतीच्या; तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई यामुळे शेतकरी; तसेच ग्रामीण भागातील नागरिक चिंतेत आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याशिवाय मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा नसल्याचे हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे आणि असे अनुकूल वातावरण तयार होत नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे। मात्र, येत्या पाच दिवसांत पावसाच्या सरींचे प्रमाण वाढून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
हवामानशास्त्र विभागाच्या जिल्हानिहाय अंदाजांमध्ये पुणे जिल्ह्यात ३० जून ते ३ जुलैदरम्यान १५ ते १८ मिलिमीटर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे, तर विभागनिहाय अंदाजांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे। शहरात गेल्या चोवीस तासांत ८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, येत्या चोवीस तासांतही पावसाचे हेच प्रमाण राहण्याचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्रातील पावसाच्या दडीमुळे शहरातील जून महिन्याचा पाऊस यंदा सरासरीपेक्षा ३० टक्के कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे। २८ जूनपर्यंत शिवाजीनगर येथे मोजला गेलेला ७८ मिलिमीटर पाऊस सरासरीपेक्षा २६ मिलिमीटरने कमी असल्याचे वेधशाळेने सांगितले आहे. कुलाबा वेधशाळेच्या नोंदींप्रमाणे एक ते १८ जूनपर्यंत पुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा ४६ टक्के अधिक पाऊस झाला; मात्र त्यापुढील आठवड्यात जिल्ह्यातील पावसाचे हे प्रमाण अचानक कमी होऊन २५ जूनपर्यंत सरासरीपेक्षा चारच टक्के अधिक झाले. या महिन्यात जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस नोंदला गेला, तर पूर्व भागातील पावसाचे प्रमाण अगदीच नगण्य असल्याचे दिसून आले.
गेले अनेक दिवस दडी मारणाऱ्या पावसाने धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा हजेरी लावली आहे. अद्याप धरणांच्या साठ्यात वाढ झालेली नसली, तरी पाऊस सुरू झाल्याने दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात काल २५ मिलिमीटर आणि आज २५ मिलिमीटर इतका पाऊस झाल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय घोगरे यांनी दिली.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें