सोमवार, 14 जुलाई 2008

डॅडी, व्ही डोंट मिस यू

गवळी साम्राज्याला अवकळा?
मुंबई, दि. १५ : भायखळा येथील दगडी चाळ आणि त्याच्या आसपासच्या रहिवाशांची सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र अतिशय दहशतीत जात होती. मात्र जेव्हापासून गॅंगस्टरकडून आमदारकीकडे वळलेल्या डॅडी उर्फ अरुण गवळीला अटक करण्यात आली आहे तेव्हापासून दगडी चाळीतील आसपासचा परिसरच नव्हे तर दगडी चाळ अगदी स्वच्छंद आणि मोकळेपणाने श्वास घेत आहे.
डॅडी उर्फ अरुण गवळीला मोक्कान्वये अटक झाल्यानंतर दगडी चाळीतील दिवस नित्यनेमाने उगवत असेल असं वाटत होतं मात्र गवळीच्या अटकेनंतर येथे सर्व दृश्य बदललं आहे. दगडी चाळीतील पान डॅडीच्या आदेशाशिवाय हलत नव्हते. चाळीतील रहिवाशांना चाळीत राहण्यासाठी वा बाहेर पडण्यासाठी अरुण गवळीची परवानगी घ्यायला लागायची. रात्री ११ वाजल्यानंतर चाळीत कुणालाही परवानगी नाकारली जायची. एखादा रहिवाशी रात्री ११ नंतर घरी आला असेल तर त्याला प्रवेश नाकारला जायचा. एव्हढेच नव्हे तर एखाद्या रहिवाशाचा नातेवाईक रात्री ११ नंतर परतल्यास त्याला आपल्या सामानासह दुसऱ्या दिवशीच्या पहाटे साडेचार वाजेपर्यंत ताटकळत वाट पहात थांबावे लागायचे। उशिरा येण्याची ही शिक्षाच असायची. दगडी चाळीतील या जाचक अटी व नियमांना कंटाळून एखाद्या रहिवाशाला आपले घर विकून दुसरीकडे जावेसे वाटले तर त्याला जोपर्यंत एखादा घर विकत घेणारा मिळत नाही तोपर्यंत तो घर सोडू शकत नव्हता. अन्यथा कुणी विकत घेणारा मिळत नसल्यास मालकाला आपले घर डॅडींच्या एखाद्या नातेवाईकाला नाईलाजाने विकावे लागे. विशेष म्हणजे डॅडीच्या साम्राज्यामुळे बाजारभावाप्रमाणे ही घरे कधीच विकली जायची नाहीत.
डॅडीच्या राज्यकाळात दगडी चाळीच्या मुख्य प्रवेशद्वारावर पहाऱ्यासाठी २-३ सुरक्षा रक्षक होते आणि संध्याकाळी ५.३० वाजताच हे प्रवेशद्वार बंद केले जायचे मात्र जेव्हापासून गवळीला अटक करण्यात आली आहे तेव्हापासून येथे पहाऱ्यावर असलेले सुरक्षा रक्षक गायबच झाले आहेत. दगडी चाळीत कुणीही कसाही, विनाचौकशी प्रवेश करू शकतो. एकूण डॅडीच्या साम्राज्याला अवकळा आली आहे हे खरे.

कोई टिप्पणी नहीं: