सोमवार, 14 जुलाई 2008

गुन्हेगारी जगताने घेतला सांकेतिक भाषेसाठी आयपीएलचा आधार

मुंबई, दि. १५ : भारतीय बॅटवर विसंबून राहू नका...चांगल्या परिणामासाठी सिझन बॅट वापरा....संपूर्ण संघाला बाद होऊ देऊ नका...केवळ छक्के मारत रहा...एका मागोमाग चौकारांचा पाऊस पडू द्या...अंपायरपासून विशेषत: तिसऱ्या अंपायरपासून सावध रहा तसेच कोणताही अपघात होण्यापासून सावध रहा... हे वाचून तुम्हाला गॅरी कस्टर्न तर भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना टिप्स तर देत नाही ना असे वाटेल पण तसं काहीही नसून हे सर्व काही गुन्हेगारी जगतावर अधिराज्य करणाऱ्या गॅंगस्टर्सचे बदललेली सांकेतिक भाषा अर्थात कोड वर्ड आहेत.
गुन्हेगारी जगतावर अधिराज्य करणाऱ्या गॅंगस्टर टोळ्यांनी आपली सांकेतिक भाषा बदलली आहे। मुंबई पोलिसांच्या हाती सापडू नये यासाठी आपली सांकेतिक भाषा बदलून टाकली आहे.
खोका-पेट्यांची जागा "कान' आणि पेटीची "जागा' हाताने घेतली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने नुकत्याच काही फोन टॅपिंगद्वारे ही सांकेतिक भाषा टॅप केली आहे. विशेष म्हणजे गुन्हेगारी जगताने आपल्या सांकेतिक भाषेसाठी नुकत्याच झालेल्या अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यातील भाषेचा वापर समाविष्ट केला आहे. गुन्हेगारी जगताने आपली सांकेतिक भाषा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्वीच्या सांकेतिक भाषेत टपका डाल ऐवजी आता आऊट, छक्का मार दे ऐवजी हिट द सिक्सर, पांडू से बचके रहेना ऐवजी अम्पायर देख रहा हैं, देसी घोडाऐवजी इंडियन बॅट तर सिझन बॅटचा अर्थ एके-४७ असा होतो (यापूर्वी झाडू वापरायचे).
तर षटकार मारू नको असे कोणत्या गॅंगस्टर टोळीकडून आपल्या सहकाऱ्याला सांगण्यात येते म्हणजे केवळ त्या व्यक्तीला धमकावणे, ठार करणे नव्हे। चौकारचा अर्थ बुलेटचा धाक दाखवणे वा त्याच्या गाडीला अपघात घडवून आणणे असा असून षटकारचा अर्थ ठार मारणे. तसंच अम्पायरचा गुन्हेगारी भाषेतील अर्थ म्हणजे पोलीस आणि थर्ड अम्पायर म्हणजे एन्काऊंटर स्पेशालिस्ट असा होतो. ऍक्सिडंटचा अर्थ अटक होण्याची शक्यता. वाहनांसाठीही गुन्हेगारी जगतात सांकेतिक शब्द आहेत. चार चाकी वाहनांसाठी बकरी, टॅक्सी म्हणजे चुहा (उंदीर). तर एखादा शार्प शूटर मोटारसायकलवरून आला असेल तर त्याचा सांकेतिक शब्द मुर्गी असा ठेवण्यात आला आहे.
पोलिसांपासून स्वत:ला वाचविण्यासाठी गुन्हेगारी जगतात अशा सांकेतिक भाषेचा वापर केला जातो आणि विशेष म्हणजे एकदा का पोलिसांना या सांकेतिक शब्दांचा अर्थ कळल्यास त्या गुंडाचं काही खरं नसतं. त्यामुळे गुन्हेगारी जगतात सतत सांकेतिक भाषा बदलली जाते.

कोई टिप्पणी नहीं: