सोमवार, 14 जुलाई 2008

इस्टेट एजंटची हत्या करणारा बिल्डर फरार

मीरा रोड,दि.१५: मीरा रोड येथील बहुचर्चित क्वीन्स पार्कमधील मर्क्युरी अपार्टमेंटमधील लिफ्टच्या तळास गौरव रिजन्सीमध्ये राहणाऱ्या इस्टेट एजंट फिरोज सिकंदर खानचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली होती.
यासंदर्भात मीरा रोड पोलिसांनी कसून तपास केल्यावर सदर प्रकार हत्येचा असल्याचे उघड झाले असून हत्याप्रकरणी बिल्डर नरेंद्र अग्रवाल विरोधात गुन्हा दाखल केला असून महिना उलटून गेल्यावरही सदर बिल्डर फरार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे।
मीरा रोडच्या गौरव रिजन्सीमध्ये राहणारा फिरोज सिंकदर खान हा इस्टेट एजंट १२ जून रोजी रात्रीच्या सुमारास एका जमिनीच्या व्यवहारासाठी आनंदलाल यास भेटण्यासाठी क्वीन्स पार्कमधील मर्क्युरी अपार्टमेंटमध्ये आला होता. रात्रीपासून फिरोज घरी न आल्याने त्याचा भाऊ इमरान याने फिरोज हरविल्याची तक्रार मीरा रोड पोलीस ठाण्यात दाखल केली. १३ जून रोजी फिरोजच्या हत्येप्रकरणी बोरीवलीचा नामांकित बिल्डर नरेंद्र अग्रवाल याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला. जमिनीच्या संदर्भात फिरोजचे बिल्डर अगरवालबरोबर अनेकवेळा व्यवहार झाले होते. काही दिवसापूर्वी फिरोजने आपल्या आईस जमिनीच्या व्यवहारातून आपणास एक कोटी २२ लाख रुपये मिळणार असल्याचेही सांगितले होते. सदर प्रकरणी १३ जुलै म्हणजेच एक महिना उलटून गेला तरी हत्यारा बिल्डर नरेंद्र अग्रवाल अजूनही फरार असल्याने पोलिसांवर संशय व्यक्त केला जात आहे.

कोई टिप्पणी नहीं: