मुंबई, दि. १८ : श्री सिद्धीविनायक देवस्थानच्या संरक्षक भिंतीवरून वाद सुरु असताना आता माहिम येथील जगप्रसिद्ध माहिम दर्ग्यात उभारण्यात आलेल्या संरक्षक प्रवेशद्वाराला स्थानिक रहिवाशांनी कडाडून विरोध केला आहे.
माहिम येथे पीर मखदूम सहिबबाबाचा जगप्रसिद्ध दर्गा असून हा दर्गा माहिमचा दर्गा म्हणून ओळखला जातो. केवळ मुस्लिम धर्मियच नव्हे तर जगभरातून नानाविध धर्माचे अनेक भाविक येथे येतात. नुकतेच या दर्ग्याजवळ संरक्षक प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. पीर मखदूम साहिब स्वंयसेवी संस्थेने दर्ग्याच्या संरक्षणाचे कारण पुढे करून या ठिकाणी संरक्षक प्रवेशद्वार उभारले आहे. मात्र या प्रवेशद्वाराला स्थानिक रहिवाशांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. गेल्या दोन दशकाहून अधिक काळ आम्ही या दर्ग्यातूनच ये-जा करीत असताना अचानक प्रवेशद्वार उभारून आम्हाला प्रवेश नाकारण्यात येणे हे चुकीचे असल्याचा तक्रार दर्गा स्ट्रीट ऍडव्हान्स्ड लोकल मॅनेजमेंटचे अध्यक्ष अन्वर खान यांनी केली.
दर्ग्यातून जाणारा मार्ग हा आधीच अरुंद असून येण्यासाठी वा जाण्यासाठी प्रवेशद्वाराचा वापर केला जाऊ शकतो असे म्हणत प्रवेशद्वारामुळे चेंगराचेंगरीही होऊ शकते अशी भितीही खान यांनी व्यक्त केली.
तर याबाबत राज्य अल्पसंख्यांक समिती आणि पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही पक्षांना समजावले. मात्र दर्गा समितीने आम्ही दर्ग्याच्या आतील बाजूस प्रवेशद्वार उभारत असून त्यासाठी कुणाच्याही परवानगीची गरज वाटत नाही. तसेच प्रवेशद्वार उभारायचे की नाही हा सर्वस्वी आमचा प्रश्र्न आहे त्यामुळे कुणीही यात मध्यस्थी करू नये. येथे येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोय लक्षात घेऊनच आम्ही हे प्रवेशद्वार उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यात केवळ दर्ग्याचे संरक्षण हाच मुद्दा नसून दर्ग्याची स्वच्छता हा विषयदेखील महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राज्य अल्पसंख्यांक समितीच्या सदस्यांनी सदर मुद्दयात समझौता करण्यासाठी नसीम सिद्दीकी यांच्या अध्यक्षतेखाली दर्ग्याला भेट दिली.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें