रविवार, 6 जुलाई 2008

महिला पत्रकाराला विनयभंग करणारे रेल्वे कर्मचारी सस्पेंड

मुंबईत लोकल रेल्वेने प्रवास करणा-या एका महिला पत्रकाराची छेड काढल्याप्रकरणी दोन रेल्वे कर्मचा-यांना सेवेतून सस्पेंड करण्यात आले आहे. शनिवारी रात्री उशिरा काम संपवून ही महिला पत्रकार घरी परतत असताना धावत्या लोकलमध्ये छेडखानीचा हा धक्कादायक प्रकार घडला.
एनडीटीवीचे पत्रकार धर्मेंद्र तिवारी शनिवारी रात्री आपल्या मैत्रिणीसोबत घरी चालले होते. घाटकोपरला जाण्यासाठी या दोघांनी सायनला लोकल पकडली. कुर्ल्याला गाडी आल्यानंतर दारुच्या नशेत धुंद असलेला रेल्वे यार्ड मास्तर शशीकांत पाटील आणि त्याचा मित्र रविंद्र ठाकूर हेही डब्यात चढले. पाटील याने तिवारी यांच्यासोबत असलेल्या महिला साथीदाराची छेड काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेला अटकाव केला असता पाटील आणि ठाकूर यांनी तिवारींना उलट धक्काबुक्की केली.
आपण एका पत्रकार महिलेची छेड काढलीय हे लक्षात आल्यावर या दोघांनीही दमदाटी करत रेल्वे पोलिस फोर्सचे जवान असल्याचे सांगून पळून जाण्याचा प्रयत्न केला। पण या दोघा पत्रकारांनी या बेशिस्त कर्मचा-यांना जबरदस्तीने घाटकोपर स्टेशनवर उतरवून त्यांना आरपीएफच्या जवानांच्या ताब्यात दिले. पाटील आणि ठाकूर या दोघांही कर्मचा-यांना तात्काळ अटक करण्यात आली असून त्यांच्यावर मोलेस्टेशन चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कर्मचा-यांना तात्काळ सेवेतून निलंबित करण्याची घोषणा रेल्वेकडून करण्यात आली. तर त्यांच्या शरीरात दारूचे प्रमाण तपासण्यासाठी या कर्मचा-यांचे रक्ताचे नमून घेण्यात येणार आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येईल.

कोई टिप्पणी नहीं: