मंगलवार, 8 जुलाई 2008

अखेर डाव्यांनी केंद्र सरकारचा पाठिंबा काढला

नवी दिल्ली - भारत आणि अमेरिकेतील संभाव्य अणुकराराला विरोध करणाऱ्या डाव्या पक्षांनी मंगळवारी औपचारिकपणे केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याची घोषणा केली. तशा आशयाचे एक पत्र परराष्ट्र व्यवहार मंत्री प्रणव मुखर्जी यांना पाठविण्यात आले आहे.
मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, फॉरवर्ड ब्लॉक आणि आरएसपी या डाव्या पक्षांच्या नेत्यांची मंगळवारी सकाळी येथे बैठक झाली. त्यामध्ये एकमताने पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश कारत यांनी ही घोषणा केली.
भारत आणि अमेरिकेतील अणुकरारासाठी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाकडे (आयएईए) जाण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयावर डाव्यांनी तीव्र हस्तक्षेप घेतला. सत्ताधारी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार आणि डावे पक्ष यांच्यातील अणुकराराबाबतची चर्चा पूर्ण झाल्याशिवाय सरकारने "आयएईए'कडे जाऊ नये, असे डाव्यांचे मत होते. मात्र, केंद्र सरकारने "आयएईए'च्या संचालक मंडळाबरोबर सुरक्षा नियमांबाबत वाटाघाटी सुरू केल्याने पाठिंबा काढून घेण्यात येत असल्याचे श्री. कारत यांनी स्पष्ट केले.
डाव्या पक्षांचे नेते बुधवारी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची भेट घेणार असून, त्यांच्याकडे पाठिंबा काढून घेतल्याचे पत्र देणार आहेत.

कोई टिप्पणी नहीं: