शनिवार, 5 जुलाई 2008

इराणमध्ये सतरा भारतीयांना अटक

दुबई - इराणच्या पहिल्या अणुप्रकल्पाजवळ आलेल्या सौदी अरेबियाच्या चार नौका ताब्यात घेतल्या असून, त्यावर सतरा भारतीयांनाही अटक केल्याचे इराणच्या प्रवक्‍त्याने सांगितले. सौदी अरेबियाच्या चार नौका इराणच्या समुद्रात बेकायदेशीररीत्या आल्या होत्या आणि मासेमारी करत होत्या. त्यांना सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले. हे ठिकाण बुशर येथील अणुप्रकल्पापासून तीस समुद्र मैल अंतरावर आहे. नौकेवरील कर्मचाऱ्यांमध्ये सतरा भारतीयांचा समावेश आहे, असे बुशरच्या पोलिसप्रमुख रझा मोहमदी येगानेह यांनी सांगितले. या सर्वांना बुशरच्या नाविक पोलिस दलाच्या ताब्यात असून, बोटीवरील कागदपत्रांची आणि वस्तूंची कसून तपासणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
इराणने रशियाच्या मदतीने या अणुप्रकल्पाच्या बांधणीचे काम हाती घेतले असून, २००८च्या अखेरीपर्यंत पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. याआधीही जून २००७ मध्ये आखातामध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याबद्दल संयुक्त अरब अमिरातीच्या तीन नौका जप्त केल्या होत्या. तसेच मार्च २००७ मध्ये इराणच्या नौदलाने ब्रिटनच्या पंधरा सैनिकांना त्यांच्या नावेसह अटक केली होती. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये बराच तणाव निर्माण झाला होता. दोन आठवड्यांनंतर त्यांची सुटका करण्यात आली होती.

कोई टिप्पणी नहीं: