पुणे - "नॅशनल एअरोनॉटिकल अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन'तर्फे (नासा) आयोजित शिबिरास सलग दुसऱ्या वर्षी भारतातर्फे उपस्थित राहण्याचा मान पुण्यातील शिक्षिकेस मिळाला आहे।"इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एअरोनॉटिकल इंजिनिअरिंग अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी'मधील प्राध्यापिका लीना बोकील "नासा'चा सात दिवसांचा अभ्यासक्रम पूर्ण करून नुकत्याच परतल्या आहेत. यादरम्यान त्यांना आलेल्या अनुभवाचे सादरीकरण त्या शहरातील विविध शाळांमध्ये करणार आहेत.
जगभरातील मोजक्या शिक्षकांसाठी "नासा'तर्फे दर वर्षी "समर कॅम्प' आयोजित केला जातो। विज्ञान, इंजिनिअरिंगच्या शिक्षकांना, प्राध्यापकांना यात प्रामुख्याने प्रवेश दिला जातो. या वर्षी भारतातून निवडलेल्या तीन जणांमध्ये पुण्याच्या "आयआयएइआयटी'मधील एअरोनॉटिक्स विषयाच्या प्राध्यापिका लीना बोकील यांचा समावेश आहे. या शिबिराबद्दल "सकाळ'शी बोलताना त्या म्हणाल्या, ""माझी "एअरोनॉटिक्स'मधील आवड आणि या विषयाच्या प्रसारासाठी सुरू असणारे प्रयत्न पाहून "आयआयएइआयटी'तर्फे "नासा'च्या शिबिराला जाण्यासाठी निवड करण्यात आली. सात दिवसांच्या अभ्यासक्रमामध्ये सकाळी आठ ते रात्री आठ या कालावधीत "एअरोनॉटिक्स', "एव्हिएशन', "रॉकेट इंजिनिअरिंग', "स्पेस सायन्स' या विषयांचे प्रशिक्षण देण्यात आले.
यादरम्यान विशेष यंत्रणांद्वारे तयार केलेल्या चंद्र, तसेच मंगळावरील गुरुत्वाकर्षणाचा आभास आम्हाला अनुभवता आला. स्वत: रॉकेट तयार करून ते उडवण्याचेही प्रात्यक्षिक केले. अनेक आजी-माजी अंतराळवीरांशी झालेला संवादही संस्मरणीय होता. लवकरच मी या सात दिवसांतील अनुभवांचे शहरातील विविध शाळांमध्ये सचित्र सादरीकरण करणार आहे.'' अधिक माहितीसाठी ९८८१४०७५६८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन बोकील यांनी केले आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें