पुणे, ता। २३ - शहर व पिंपरी-चिंचवडमध्ये अखंडित वीजपुरवठ्यासाठी प्रतियुनिट ४८ पैसे इतका दर (रिलायबिलीटी चार्जेस) निश्चित करण्यात आला आहे. राज्य वीज नियामक आयोगाने आज हा आदेश दिला.
दरमहा तीनशे युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मात्र हा आकार भरावा लागणार नाही. येत्या एक जुलैपासून हा दर आकारण्यात येणार आहे.
पूर्वी शहर व परिसरातील उद्योगांकडून वीजनिर्मिती करून शहरातील विजेची तूट भरून काढण्यात येत होती। त्यासाठी प्रतियुनिट ४२ पैसे इतका आकार लावण्यात येत होता. मात्र, शहरातील मागणी वाढत गेली, त्या तुलनेत पुरवठा वाढला नाही. त्यामुळे शहरात भारनियमन लागू होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, शहरात अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी २४ तास शंभर मेगावॉट अतिरिक्त वीज "टाटा पॉवर'मार्फत घेण्यात येत आहे. या संदर्भात "महावितरण'ने राज्य वीज नियामक आयोगापुढे प्रस्ताव ठेवला होता. त्यावर आयोगाने पुण्यात सुनावणी घेतली होती. ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ, विविध स्वयंसेवी संस्था, महापालिका आणि राजकीय पक्षांनी या वेळी बाजू मांडली होती. त्या संदर्भात आयोगाने आज आदेश दिला आहे. शहरात अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी प्रतियुनिट ४८ पैसे इतका आकार आयोगाने निश्चित केला आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. हा दर पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत लागू राहणार आहे. त्यामुळे पुढील उन्हाळ्यातही पुणेकरांना याच दरात अखंडित वीजपुरवठ्याचा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, या नव्या व्यवस्थेची दर तीन महिन्यांनी लेखापरीक्षकांकडून तपासणी करून घ्यावी, असाही आदेश आयोगाने दिला आहे.
दरम्यान, "कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज'च्या (सीआयआय) राज्य शाखेचे अध्यक्ष आणि "पुणे मॉडेल'चे प्रवर्तक प्रदीप भार्गव यांनी आयोगाच्या आदेशाचे स्वागत केले आहे। ग्राहकांना यासाठी ४८ पैशांचा अतिरिक्त भार पडणार असून, त्यातूनही सर्वसामान्य ग्राहकांना वगळण्यात आले आहे, ही स्वागतार्ह बाब आहे, असे भार्गव यांनी सांगितले; तसेच "पुणे मॉडेल' अधिक सुलभ झाले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
अखंडित वीजपुरवठ्यासाठी आयोगाने प्रतियुनिट आकारात माफक वाढ करून पुणेकरांना दिलासा दिला आहे, अशी प्रतिक्रिया "सजग नागरिक मंचा'चे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी व्यक्त केली। मात्र, अखंडित वीजपुरवठ्याचा आकार घेताना शहरात खरोखरीच अखंडित वीजपुरवठा करण्याची जबाबदारी "महावितरण'ने पार पाडली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुढील वर्षीच्या मे महिन्यापर्यंत हा दर निश्चित केला असला, तरी त्यानंतर पावसाळा येत असल्याने पुढील ऑक्टोबरपर्यंत पुणेकरांना दिलासा मिळाला आहे, असे ते म्हणाले.
""अखंडित वीजपुरवठ्यासाठी "पुणे मॉडेल'ने संपूर्ण राज्याला नवा मार्ग दाखवून दिला असून बारामती, नवी मुंबई आणि ठाणे ही शहरेही भारनियमनमुक्त होत आहेत.''
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें