सांगली - सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या निवडणूकीत अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील विकास महाआघाडीने ७४ पैकी ३६ जागा जिंकून सत्तेचा दावा केला आहे। कॉंग्रेसला २५, जनसुराज्यला २ तर ११ अपक्ष निवडून आले आहेत. महाआघाडीला दोन अपक्षांचा पाठींबा आहे. या निकालामुळे आमदार मदन पाटील यांची सत्ता संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. विकास महाआघाडी सत्तेच्या उबरठ्यावर पोहोचली आहे.
अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सांगलीचा कारभारी बदला, अशी धडक मोहीम घेवून सर्वपक्षीय महाआघाडी स्थापन केली। भाजप, जनता दल या दोन प्रमुख पक्षांना सोबत घेवून मंत्री पाटील यांनी महापालिका क्षेत्र पिंजून काढले. त्यांच्या विरोधात कॉंग्रेसचे सहयोगी आमदार मदन पाटील व जिल्ह्याचे पालकमंत्री पतंगराव कदम या ंनी कॉंग्रेसच्या झेंड्याखाली ही निवडणूक लढवली.
या निवडणूकीत अर्थमंत्री पाटील यांनी जातीयवादी पक्षांना सोबत घेतल्याची टीका कॉंग्रेसने केली। तर महाआघाडीने प्रारंभपासून विकासाचा मुद्दा उचलून धरला. या निवडणूकीत वसंतदादा घराणे विरोधी राजारामबापू पाटील यांच्या घराण्यातील संघर्षाचे वळण देण्याचा प्रयत्न झाला. प्रचारसभांमध्ये "मला संपवण्याचे प्रयत्न कदापी यशस्वी होणार नाहीत', असा इशारा देत आमदार पाटील यांनी आव्हानाची भाषा वापरली होती. प्रत्युत्तरादाखल अर्थमंत्र्यांनी मात्र ही निवडणूक गल्लीच्या विकासाची आहे, असा पवित्रा घेत या निवडणूकीला वसंतदादा घराणे विरोधातील संघर्षाचे वळण येणार नाही, याची दक्षता घेतली.
प्रमुख विजेत्यांमध्ये - माजी उपमहापौर दादासाहेब लांडगे, मुन्ना कुरणे, साजीदअली पठाण, सुरेश आवटी, उत्कर्षा किशोर जामदार, लक्ष्मण नवलाई, मकरंद देशपांडे, राजेश नाईक, हणमंत पवार, शेखर इनामदार, दिग्वीजय सुर्यवंशी, विक्रमसिंह सावर्डेकर, युवराज बावडेकर, संतोष देवळेकर, हरिदास पाटील, धनंजय सुर्यवंशी, धनपाल खोत, सुलोचना खोत, किरण सुर्यवंशी, प्रतिक्षा पाटील, अनारकली कुरणे, विवेक कांबळे, शहनाज हारूण शिकलगार यांचा समावेश आहे.
या निवडणूकीत अनेक दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले। त्यामध्ये उपमहापौर मोहन जाधव, माजी महापौर किशोर शहा, विजय धुळूबुळू, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष इद्रीस नायकवडी, कॉंग्रेसच्या पक्षप्रतोद वहिदा नायकवडी, कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अय्याज नायकवडी, शिक्षण मंडळाचे सभापती अशोक शेठ, सदस्य अशोक सुर्यवंशी, भाजप नेत्या नीता केळकर, नगरसेवक उमेश पाटील, सुब्राव मद्रासी, अंकूश कोळेकर, बालाजी काटकर, अभय शिरगुप्पे, जयगोंड परगोंड, हारूण शिकलगार, सतीश गोरे, प्रशांत खिलारे, स्वाती शिंदे, शेखर माने, विलास सर्जे, छाया सलगर, फिरोज महात यांचा समावेश आहे.
प्रभाग १९ मध्ये "टाय' - येथील महाआघाडीच्या उमेदवार भारती दिगडे व कॉंग्रेस बंडखोर उमेदवार आशा शिंदे यांना १३४१ अशी समान मते पडली। यावर मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी बाजीराव जाधव यांनी चिट्टी टाकून विजेता ठरवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आशा शिंदे यांना विजयी घोषीत करण्यात आले.
सातव्यांदा नगरसेवक - महाआघाडीचे दादासाहेब लांडगे यांनी माजी महापौर विजय धुळूबुळू यांचा पराभव करून यावेळी सातव्यांदा निवडणूक जिंकली। हा एक नवा विक्रमच आहे.
नायकवडी कुटूंबातील प्रमुख तिघांचा पराभव - राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष इलियास नायकवडी यांच्या कुटूंबातील तीन उमेदवारांना नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. महाआघाडीचे प्रमुख नेते इद्रीस नायकवडी, कॉंग्रेसकडून निवडणूक लढवलेले अय्याज आणि वहिदा नायकवडी यांचा पराभव झाला आहे. अय्याज नायकवडी यांचा महाआघाडीचे सज्जाद भोकरे यांनी सुमारे ३०० मतांनी पराभव केला तर वहिदा नायकवडी यांचा महाआघाडीचे आरीफ चौधरी यांनी ८५ मतांनी पराभव केला. इद्रीस नायकवडी यांच्या पत्नी आणि विद्यमान नगरसेविका आयेशा नायकवडी आणि इद्रीस यांची आई हसिना या विजयी झाल्या.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें